तूर्तास भाजपमध्ये मोदींनंतर स्वत:ची वेगळी ओळख असलेले फक्त चार नेते आहेत. अमित शहा, नितीन गडकरी, योगी आदित्यनाथ आणि देवेंद्र फडणवीस…

सुनामी येण्याआधी सर्व कसे शांत-शांत होते. आकाशही निरभ्र होते, ना वारा ना वादळ. समुद्र किनाऱ्यावर लाटा अंगावर घेत लोक आनंदात बागडत होते. त्यांना कल्पनाही नव्हती की, पुढच्या क्षणी नव्वद फुटी लाटांचा तडाखा त्यांना संपवून टाकेल. भाजपमध्येही आत्ता अशीच शांतता दिसते. पण कोणत्या क्षणी भाजपमध्ये सुनामी येईल आणि त्यात कोण-कोण गटांगळ्या खातील हे सांगता येत नाही. सुनामी काही सांगून येत नाही. समुद्राच्या तळाशी कित्येक किमीच्या मोठ्या भेगा आधीच पडलेल्या असतात, त्या हळूहळू रुंद व्हायला लागतात. मग जमीन वर-खाली व्हायला लागते. प्रचंड भूकंप होतो आणि सुनामी येते. भाजप नावाच्या समुद्राच्या तळाशी भेगा पडायला सुरुवात झाली आहे. त्या रुंद होतील तेव्हा सुनामी येईल, ती सध्या आलेली नाही, इतकेच!

congress leader pawan khera reply on bjp vote jihad
उलेमांचा पूर्वी भाजपलाही पाठिंबा ‘तो व्होट जिहाद नाही का’
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
BJP, Vanchit bahujan aghadi, Murtizapur constituency
मूर्तिजापूरमध्ये भाजप व वंचितमध्ये लढा, राष्ट्रवादीला बंडखोरी व अंतर्गत नाराजीचा फटका बसण्याची चिन्हे
BJP rebel Varun Patils decision to work for mahayuti in Kalyan
कल्याणमध्ये भाजप बंडखोर वरूण पाटील यांचा महायुतीचे काम करण्याचा निर्णय
maharashtra vidhan sabha election 2024 shahapur assembly constituency sharad pawar ncp vs ajit pawar ncp
अजित पवारांचे दरोडा शिवसैनिकांना नकोसे
readers feedback on loksatta editorial readers reaction on loksatta articles
लोकमानस : आगलाव्या भाषणावर आयोग गप्प राहील…
नक्षलवादी संविधानाला मानत नाही; भाजपलाही संविधान संपवायचे आहे – छत्तीसगड माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल
Kalyan, Dombivli rebels, Kalyan, Dombivli, campaigning,
कल्याण, डोंबिवलीतील बंडखोरांचे पाठीराखे प्रचारातून गायब; बंडखोर, अपक्षांचा एकला चलो रे मार्गाने प्रचार

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मोदींचा करिष्मा लयाला जाऊ लागल्याचे संकेत मिळू लागले आहेत. सत्तेवरील पकड ढिली झालेली नाही असे दाखवण्याचा मोदी कितीही प्रयत्न करत असले तरी त्यांच्या कृतीतून त्यांना त्यांच्या बाणेदारपणाला मुरड घालावी लागत असल्याचे दिसते. आत्ताचे केंद्रातील सरकार मोदींवर नव्हे तर नितीशकुमार आणि चंद्राबाबू नायडूंवर अवलंबून असल्याचे भाजपलाही माहीत आहे. मोदी सरकारमधील मंत्र्यांना सातत्याने या दोन्ही नेत्यांचा वारंवार उल्लेख करावा लागतो. निती आयोगाच्या बैठकीत चंद्राबाबू २० मिनिटे बोलले, ७ मिनिटांची मर्यादा ओलांडली तरी त्यांना अडवण्याची हिंमत कोणी केली नाही. नितीशकुमार तर बैठकीला आलेही नाहीत. ‘एनडीए’तील घटक पक्ष मोदींवर शिरजोर होऊ लागल्याचे हे लक्षण आहे. त्यामुळेच केंद्रातील सरकार किती काळ टिकेल हा प्रश्न नजीकच्या काळात उघडपणे विचारला जाऊ शकतो. पूर्वी मोदींच्या चेहऱ्याकडे बघून लोकसभेचीच नव्हे तर विधानसभा अगदी महापालिकेची निवडणूक लढली जात होती. मोदी प्रत्येक निवडणुकीत भाजपच्या नेत्यांची फौज प्रचारात उतरवत असत. हैदराबाद महापालिकेच्या निवडणुकीत योगी आदित्यनाथ, हेमंत बिस्वा-शर्मा यांच्यासारख्या जहाल हिंदुत्ववादी नेत्यांना पाठवले जात होते. आता महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत मोदींच्या जिवावर भाजपला सत्ता मिळवता येणार नाही अशी चर्चा होत आहे. लोकसभा निवडणुकीत मोदींच्या १८ मतदारसंघांतील प्रचारसभांपैकी १२ मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार पराभूत झाले. मोदीच हतबल झाले असतील तर नव्या नेत्याची शोधाशोध भाजपमध्ये केली जाऊ शकेल. संघाने तसे संकेत दिलेले आहेत. सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोदींना कोपरखळ्या दिलेल्या आहेत. गेल्या दहा वर्षांमध्ये संघाने मोदींविरोधात अप्रत्यक्षदेखील मत व्यक्त केले नव्हते. त्यामुळेच मोदींनंतर भाजपचे नेतृत्व कोणाकडे जाईल याचा विचार केला जाऊ शकतो. हा विचार म्हणजेच समुद्राच्या तळात पडलेली भेग आहे, ती वरून दिसणार नाही.

हेही वाचा >>> समोरच्या बाकावरून: अर्थमंत्र्यांना गरीब दिसतच नाहीत…?

तूर्तास भाजपमध्ये मोदींनंतर स्वत:ची वेगळी ओळख असलेले फक्त चार नेते आहेत. अमित शहा, नितीन गडकरी, योगी आदित्यनाथ आणि देवेंद्र फडणवीस. त्यापैकी मोदींइतके तुल्यबळ मानले गेले गडकरी. गडकरी शांत बसले आहेत, आब राखून आहेत. पण केंद्र सरकारच्या स्थैर्याला धक्का लागला तर गडकरींच्या पारड्यात संघाचे वजन पडणारच नाही, असे नाही. २०१४ मध्ये मोदींना पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करण्याआधी या पदासाठी लालकृष्ण अडवाणींनीही दावा केला होता. मोदींशी थेट स्पर्धा मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, छत्तीसगढचे मुख्यमंत्री रमण सिंह यांनीही केली होती असे म्हणतात. मोदींचे स्पर्धक आता कुठेही नाहीत. शिवराजसिंह तर मोदींच्या मंत्रिमंडळातील एक मंत्री बनून राहिले आहेत. मोदींनी पक्षात आणि सरकारमध्ये क्रमांक दोनवर अमित शहांची वर्णी लावली. मग शहांना मोदींचा उत्तराधिकारी व्हावे असे वाटले तर चुकीचे काय? २०१४ मध्ये भाजपमध्ये नेतृत्वावरून झालेल्या संघर्षाची दशकभरानंतर पुनरावृत्ती होऊ लागल्याचे दिसते.

भाजपमध्ये मोदी अजूनही अजिंक्यच आहेत; त्यांच्याशी कोणी स्पर्धा करण्याची शक्यता नाही. पण, त्यांची भाजपला जिंकून देण्याची क्षमता कमी-कमी होत गेली तर कुठल्या तरी टप्प्यावर भाजपला नव्या नेतृत्वाकडे बघावे लागेल. ही स्थिती प्रत्यक्षात येईल तेव्हा मोदींची जागा कोण घेईल या मुद्दा उपस्थित होतो. आत्ता तरी शहा, योगी आणि फडणवीस हे तिघे असू शकतात असे मानले जाते. या तिघांच्या नेतृत्वासाठी होत असलेल्या स्पर्धेमध्ये शहांनी आघाडी घेतलेली आहे, हे कोणालाही नाकारता येत नाही. भाजपचे मुदत संपलेले अध्यक्ष जे. पी. नड्डा असले तरी पक्षातील निर्णय अमित शहांच्या परवानगीशिवाय होत नाहीत हे भाजपमधील प्रत्येकाला माहिती आहे. तसे नसते तर महाराष्ट्रातून शिंदे-अजितदादा शहांना वारंवार भेटायला गेले नसते. त्यांनी नड्डांना महत्त्व दिले असते. मोदींच्या काळात अडवाणी, शिवराज, गडकरी वा अन्य कोणी सत्तेच्या स्पर्धेतून बाहेर फेकले गेले तसे शहादेखील आपल्या स्पर्धकांना अलगदपणे सत्तेच्या परिघातून बाहेर काढण्याचा किंवा त्यांना नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करतील. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये भाजपअंतर्गत होत असलेल्या घडामोडी पाहता शहांनी हे प्रयत्न सुरू केले असल्याचे जाणवते.

हेही वाचा >>> चांदनी चौकातून : ‘आम्हाला स्वाभिमान नाही’?

योगी कोणाविरोधात?

लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्या अपयशाचे खापर योगी आदित्यनाथ यांच्यावर फोडले जात आहे. त्यासाठी योगींचे विरोधक उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांना हाताशी धरले जात असल्याचे सांगितले जाते. मौर्य यांनी वारंवार दिल्लीच्या फेऱ्या केल्या आहेत, त्यांनी शहा-नड्डांशी चर्चा केली आहे. मौर्य यांच्या खांद्यावरून योगींवर नेम धरला जात असेल तर बंदूक कोणाच्या हाती असेल हे सांगण्याची गरज उरत नाही. योगींकडून मुख्यमंत्रीपद काढून घेण्यासाठी एक-एक सोंगट्या पुढे सरकवल्या जात आहेत, त्या सोंगट्यांमध्ये मौर्य हे एक. पण, मौर्यांकडे योगींना पर्याय होण्याची क्षमता नाही. ते विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत झाले आहेत. त्याउलट, योगींकडे स्वत:ची ताकद आहे. त्यांची ओळख भाजपवर वा संघावर अवलंबून नाही. योगी त्यांना हवे असेल तेव्हा ‘हिंदू युवा वाहिनी’ला अख्ख्या उत्तर प्रदेशात सक्रिय करू शकतात. योगींसारख्या सक्षम ठाकूर नेत्याकडून मुख्यमंत्रीपद काढून घेणे म्हणजे २०२७च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने उत्तर प्रदेश गमावणे असाही अर्थ निघू शकतो. अतिआत्मविश्वासामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपला जागा गमवाव्या लागल्या, असे योगींचे म्हणणे आहे. योगींचा अंगुलीनिर्देश शहांकडे असण्याची शक्यता आहे. तसे असेल तर योगींनी शहांना आव्हान दिले असे म्हणता येऊ शकेल. ‘मोदींनंतर योगी’ असा नारा योगींचे समर्थक देत असतील तर योगींना पंतप्रधान होण्याची महत्त्वाकांक्षा असू शकते ही बाब नाकारता येत नाही. त्यामुळेही कदाचित योगींविरोधातील गटाला सक्रियही केले जात असावे.

महाराष्ट्रात शहांचे निष्ठावान

शहा, योगी, फडणवीस यांच्यातील समान धागा म्हणजे त्यांचे वय. तिघेही अजून पन्नाशीत आहेत; त्यांना पुढील वीस-पंचवीस वर्षे राजकीय क्षेत्रात हरहुन्नरी करता येऊ शकते. त्यामुळे योगींप्रमाणे देवेंद्र फडणवीसांनाही राजकीय महत्त्वाकांक्षा असू शकतात. राज्यातील सत्तापरिवर्तनामध्ये मोदी-शहांनी फडणवीसांना पुन्हा मुख्यमंत्री होऊ दिले नाही, त्यांच्याऐवजी शिंदेंना मुख्यमंत्री केले. लोकसभा निवडणुकीतील अपयशाचे खापर योगींप्रमाणे फडणवीसांवर फोडले गेले तर उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊ करण्याचा मार्ग त्यांनी स्वीकारला. पण शहांनी फडणवीसांचा हा प्रस्ताव फेटाळला आणि त्यांना सरकारमध्येच बांधून ठेवले. विधानसभा निवडणुकीमध्ये मोकळेपणाने काम करण्याची संधी फडणवीसांना हवी होती; पण तीही शहांनी नाकारली असे दिसते. विधानसभा निवडणुकीची सर्व सूत्रे शहांचे निष्ठावान भूपेंद्र यादव यांच्या हाती जाऊ लागली आहेत. ते आता राज्यात ठिय्या मारून बसणार आहेत. तसे झाले तर फडणवीसांच्या हाती राहिले तरी काय? भाजपमधील सत्तेच्या स्पर्धेमध्ये फडणवीस नसते तर शहांनी राज्य फडणवीसांच्या हाती सोपवले असते. पण योगी जशी टक्कर देत आहेत तशीच फडणवीसही देत असल्याचे दिसते. फडणवीसांऐवजी प्रदेश भाजप अन्य नेत्याकडे सोपवण्याचे धाडसही दाखवता आलेले नाही. आत्ता शहा दिल्लीत बसून एकाच वेळी योगी आणि फडणवीस यांच्याशी दोन हात करताना दिसतात. मोदींनंतर कोण, या सत्तास्पर्धेत भाजपमध्ये घमासान सुरू झालेले असल्याची वस्तुस्थिती जमेल तेवढी नाकारणे, हेच सध्या भाजपमधील पक्षनिष्ठांच्या हाती आहे.

mahesh.sarlashkar@expressindia.com