महेश सरलष्कर
राष्ट्रपतींबद्दल आक्षेपार्ह शब्दप्रयोग करण्याची काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी यांची कृती बेफिकीर आणि पुरुषी वृत्तीचे दर्शन घडवणारी होती. त्यांच्या माफीनाम्यासाठी आग्रह धरण्याची भाजपची भूमिका अत्यंत योग्य होती. पण हीच मागणी आक्रस्ताळेपणा टाळूनही करता आली नसती का?
जत्रेत खेळ असतात, वेगवेगळय़ा वस्तू मांडल्या जातात, खाण्या-पिण्याच्या पदार्थाची रेलचेल असते. जत्रेमध्ये कोणीही-कधीही येऊ शकते, आरामात बागडू शकते. तिथल्या गर्दीत कोणी-कोणाला धक्काबुक्की करू शकते, मुद्दय़ाची बाब गुद्दय़ांवर येऊ शकते. जत्रेत काहीही होऊ शकते. जत्रेला शिस्त नसते. समजा संसदेत अशी जत्रा भरली तर, त्याचे स्वरूप कसे असेल, याची झलक गुरुवारी लोकसभेत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी दाखवून दिली! मुद्दा होता मोजके बोलण्याची शिकवण नसलेले, बेफिकीर, त्यात पुरुषी वृत्तीचे असे सगळे वाईट मिश्रण असणारे काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते अधीररंजन चौधरी यांच्या आक्षेपार्ह शब्दप्रयोगाचा. चौधरी राष्ट्रपतींना राष्ट्रपत्नी म्हणाले. इतका मूर्खपणा फक्त अधीररंजन करू शकतात. या कृत्याबद्दल अधीररंजन यांनी माफी मागावी यासाठी भाजप आग्रही असला तर चुकीचे नव्हे. पण, भाजपच्या नेत्यांचा संसदेतील बेशिस्तपणा जत्रेतील गर्दीत शोभणारा होता. इराणी यांच्या या बेशिस्तीबद्दल त्यांचे वरिष्ठ माफी मागतील का, असेही विचारता येऊ शकेल इतका.
अधीररंजन यांना त्यांच्या घोडचुकीची काँग्रेसने शिक्षा द्यायला हवी, त्यांचे गटनेतेपद काढून घेतले पाहिजे, ही भाजपची मागणीही चुकीची नाही. भाजपच्या मागणीचा काँग्रेसने गांभीर्याने विचार केला पाहिजे. चूक अधीर रंजन यांनी केली होती, त्यांना ही चूक करा, असे सोनियांनी सांगितले होते का? तुम्ही राष्ट्रपतीऐवजी राष्ट्रपत्नी असा शब्दप्रयोग करून बघा, असा आदेश सोनियांनी अधीर रंजन यांना कधी दिला? अपशब्दांचा वापर करण्याचे प्रोत्साहन काँग्रेस अध्यक्षांनी कधी दिले? भाजप नेत्यांचा दावा खरा असेल तर, ही गंभीर बाब म्हणायला हवी. मग, भाजपने सोनिया गांधींना जाब विचारला तर ती खचित चूक नसेल. पण, भाजपच्या नेत्यांनी लोकसभेत आरोपांमागून आरोप केले. लोकसभेत सगळेच माफ असते. कुणाचीही बदनामी करता येते. फार तर बदनामी करणारे अपशब्द कामकाजातून काढून टाकले जातात. भाजपच्या नेत्यांचे म्हणणे होते की, अधीररंजन यांनी आक्षेपार्ह शब्दप्रयोग केल्याबद्दल सोनियांनी माफी मागावी; कारण, त्यांनीच अंधीर रंजन यांना आक्षेपार्ह बोलण्यास प्रोत्साहन दिले. माफीनाम्याचा हाच न्याय लागू करायचा तर, भाजपच्या नेतृत्वालाही माफी मागावी लागेल. भाजपच्या ‘कर्तृत्ववान’ नेत्याने ‘गोली मारो..’ असे विधान जाहीरपणे केले होते. हे विधान आक्षेपार्ह नव्हते का? त्याबद्दल संबंधित नेत्याने तरी माफी मागितली का? भाजपच्या नेत्याच्या आक्षेपार्ह विधानाबद्दल उद्या समजा काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी वा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी माफी मागावी असा आग्रह धरला तरी, मोदी-शहांनी माफी मागावी का? महाराष्ट्राच्या राज्यपालांनी मुंबईच्या विकासासंदर्भात मराठी माणसांचा अपमान केला आहे. राज्यपालांच्या कृतीमुळे राज्यातील भाजपच्या नेत्यांनाही त्यांच्या विरोधात भूमिका घ्यावी लागली आहे. आता राज्यपालांच्या कृतीबद्दल राष्ट्रपतींनी माफी मागायची का? राज्यपालांना मराठी माणसांविरोधात बोलण्याला कोणी प्रोत्साहन दिले असेल तर, ते माफी मागतील का? चुकीच्या शब्दप्रयोगाबद्दल अधीररंजन यांनी माफीनामा दिला असताना सोनियांच्या माफीनाम्यासाठी सभागृहामध्ये आक्रस्ताळेपणा कशासाठी करायचा, असा विचार सदसद्विवेक असणारी कोणीही व्यक्ती करू शकेल.
शहाणी माणसे स्वत: एक पायरीदेखील खाली न उतरता समोरच्या व्यक्तीला तिची जागा दाखवून देतात. सोनिया गांधी यांनी सभागृहात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना चपखल उत्तर दिले. भाजपच्या खासदार रमा देवी लोकसभेच्या पीठासीन अधिकारीही आहेत. भाजपच्या गदारोळानंतर लोकसभेचे कामकाज तहकूब झाल्यानंतर त्यांच्याशी सोनियांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या संभाषणामध्ये स्मृती इराणी यांनी एक प्रकारे घुसखोरी केल्याचे प्रथमदर्शनी तरी दिसते. ‘मी तुमच्याशी बोलत नाही, तुम्ही माझ्याशी बोलू नका,’ असे सोनिया गांधी यांनी स्मृती इराणी यांना सांगून संभाषण सुरू होण्यापूर्वी संपवले होते. त्याचा इराणी यांना भलताच राग आलेला होता. पण, सोनियांनी संभाषण वाढवले नाही आणि तोपर्यंत इतर खासदारांनीही भान ठेवून परिस्थिती आटोक्यात आणली. त्यामुळेही बहुधा इराणी यांना फार काही करता आले नाही. अधीर रंजन यांची कृती गैर असल्याचे मान्य केले तरी, इराणी वा भाजप नेत्यांच्या कृतीतून ‘काँग्रेसमुक्त भारत’चे ध्येय ठेवून होत असलेले राजकारण कुठेही लपून राहात नाही. अन्यथा माफीनाम्यांची मागणी अत्यंत ठोसपणे आणि शांतपणेही करता आली असती. ही चूक भाजप कधी मान्य करणार आणि त्याबद्दल माफी मागणार का, असा प्रश्न काँग्रेसवाल्यांनी विचारला तर भाजपचे प्रत्युत्तर काय असेल?
पद दिलेच कशाला व कोणी?
हा झाला भाजपविरोधातील मुद्दा. पण, अधीर रंजनसारख्या अपरिपक्व नेत्याला लोकसभेच्या गटनेतेपदावर बसवण्याची चूक केल्याबद्दल सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडून कोणी स्पष्टीकरण मागितले तर योग्य ठरेल. गेल्या लोकसभेत मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे गटनेते होते. ते कन्नडभाषक आहेत, त्यांचेही हिंदी वा इंग्रजी अस्खलित नाही. त्यांनाही हिंदीमध्ये संवाद साधताना अडचणी येतात. पण, त्यांनी राष्ट्रपतींना राष्ट्रपत्नी म्हणण्यासारखी चूक केलेली नाही. राष्ट्रपतीला राष्ट्रपत्नी म्हणणे ही भाषा न येण्यामुळे होणारी नव्हे, तर पुरुषी वृत्तीने राजकारण करण्यातून होणारी चूक आहे. अधीर रंजन यांची गेल्या अडीच वर्षांतील लोकसभेतील भाषणे ऐकली वा कामकाजातील त्यांचा हस्तक्षेप बघितला तर, त्यांनी संसदेच्या प्रशिक्षण वर्गात सहभागी झाले पाहिजे असे सातत्याने वाटते. संसद सदस्यांसाठी अधिवेशनाच्या काळात प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले जाते. राज्यसभेचे महत्त्व या विषयावर काँग्रेसचे खासदार जयराम रमेश यांचे भाषण ठेवले होते. ते ऐकले तरी, अधीररंजन यांना लोकसभेचे महत्त्व कळले असते, तिथे काय बोलावे आणि बोलू नये, हे समजले असते. राष्ट्रपतींबद्दल त्यांचा आक्षेपार्ह शब्दप्रयोग विजय चौकात पत्रकारांशी बोलताना केलेला होता. पण अशा सैल बोलण्याचे पडसाद लोकसभेत उमटणार हे अधीररंजन यांना माहिती नसेल तर, ते गटनेतेपदी योग्य नाहीत!
अधीररंजन यांनी आक्षेपार्ह शब्दप्रयोग वा विधाने करण्याचीही पहिली वेळ नव्हे. २०१९ मध्ये लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना त्यांनी इंदिरा गांधी आणि नरेंद्र मोदी यांची तुलना केली होती. ‘कुठे मा गंगा, कुठे गलिच्छ नाला’, असे अधीर रंजन म्हणाले होते. भाजपच्या नेत्यांनी आक्षेप घेतल्यावर, ‘माझे हिंदी चांगले नाही, मला नाला नव्हे, पाण्याचा प्रवाह (चॅनल) म्हणायचे होते,’ अशी सावरासावर केली. हिंदी न समजणारी व्यक्ती ‘गंदी नाली’ असा शब्दप्रयोग कसा करेल? हा शब्दप्रयोग अधीररंजन यांनी विचारपूर्वक उच्चारलेला होता. पंतप्रधानांवर टीका करण्यासाठी लोकसभेचा गटनेता म्हणून आपण कोणत्या शब्दांचा वापर करतो, याचेही भान अधीर रंजन यांनी ठेवले नव्हते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना याच चौधरींनी ‘निर्बला’ म्हणजे ‘दुर्बळ’ म्हटले होते. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राजीव गांधी यांनी अत्यंत घृणास्पद विधान केले होते. ‘जेव्हा प्रचंड वृक्ष कोसळतो, तेव्हा भूमिकंप होतो’ असे राजीव गांधी यांनी म्हटले होते. या विधानातून अप्रत्यक्षपणे शीख दंगलीचे समर्थन केल्याचा आरोप त्यांच्यावर झालेला होता. याच वर्षी अधीररंजन यांनी मेमध्ये राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीदिनी हेच वादग्रस्त विधान ट्वीट केले! अधीर रंजन यांची ही विधाने पाहिली तर, ‘काँग्रेसमुक्त भारत’ होण्यासाठी भाजपला काहीही करावे लागणार नाही, याची खात्री पटते.
काँग्रेसपुढे प्रश्नच
अधीररंजन यांच्यासारख्या नेत्यामुळे काँग्रेसचे नुकसान होत असूनदेखील सोनिया गांधी यांनी त्यांची पदावरून हकालपट्टी केली नाही. खरे तर काँग्रेसच्या अपरिपक्व नेत्यांचे काय करायचे, यावरही उदयपूरच्या चिंतन शिबिरात चर्चा करायला हवी होती. लोकसभेमध्ये मनीष तिवारी भाजपधार्जिणे म्हणून बाजूला पडले, शशी थरूर यांचे इंग्रजी समजून घेण्यासाठी लोकांना डोके खाजवावे लागते, त्यांचे हिंदी कोणाला समजणार? शिवाय, अधीररंजनइतकेही हिंदी ते बोलत नाहीत. बाकी बहुतांश खासदार दाक्षिणात्य आहेत, त्यांचे हिंदी चांगले नाही, त्यांचे इंग्रजी उत्तरेतील भाजपच्या खासदारांना समजत नाही. उरले गौरव गोगोई, तेही आसाममधील. हे अधीररंजन चौधरींच्या पश्चिम बंगालच्या शेजारील राज्य. लोकसभेचे गटनेतेपद देण्यायोग्य खासदार असू नये, इतकी काँग्रेसची केविलवाणी अवस्था झालेली आहे. २०१९ मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांना लोकसभेची उमेदवारी देण्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही तयार होते. त्यांनी माघार घेतली नसती तर, ते कदाचित आत्ता लोकसभेचे खासदार असते. त्यांच्याकडे आपसूक लोकसभेचे गटनेतेपद सोपवले गेले असते. पृथ्वीराज चव्हाण यांना ‘जी-२३’ गटातही सहभागी व्हावे लागले नसते आणि काँग्रेसवर लोकसभेत सातत्याने नामुष्की सहन करण्याची वेळ आली नसती. पण आता आहेत त्यांच्यापैकी कोणाकडे तरी गटनेतेपद सोपवावे, एवढी तडजोड तरी काँग्रेस करू शकेल.