महेश सरलष्कर

‘जागतिक’ प्रतिमा निर्माण केली जात असताना पुन्हा कुणा नूपुर शर्मामुळे जगाला स्पष्टीकरण द्यावे लागू नये, यासाठी काळजी घेतली जाते आहे. याचा अर्थ भाजपने धर्माधिष्ठित राजकारणापासून फारकत घेतली असा होत नाही.

Ajit Pawar clarification on the Beed case pune news
पक्ष न पाहता दोषींना कठोर शिक्षा; बीड प्रकरणी अजित पवार यांची स्पष्टोक्ती
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Slower shahane  Middle class awareness Daily
लोक-लोलक: ‘स्लोअर शहाणे’च्या जाणिवांच्या प्रदेशात…
committee has been formed under chairmanship of sub-divisional officer of Daryapur to investigate after Kirit Somaiyas allegations
किरिट सोमय्यांच्‍या आरोपानंतर खळबळ… अमरावतीत आता बांगलादेशींच्या…
India GDP growth rate
भारताचा जीडीपी विकासदर मंदावण्याचा अंदाज चिंताजनक, पण धक्कादायक नाही! असे का?
Ramesh Bidhuri vs cm atishi marlena
Ramesh Bidhuri: ‘तिने तर बापच बदलला’, प्रियांका गांधी वाड्रा यांच्यानंतर भाजपा नेते रमेश बिधुरींचे मुख्यमंत्री आतिशींबाबत अश्लाघ्य विधान
Loksatta editorial on allegations on dhananjay munde in beed sarpanch santosh Deshmukh murder case
अग्रलेख: वाल्मीकींचे वाल्या!
recession in grains market recession still hangs over agricultural economy
क कमॉडिटीचा – कडधान्य मंदीच्या विळख्यात

मध्यमवर्गातील विविध स्तरांतील लोकांनी भाजपला सढळ हाताने पाठिंबा दिलेला आहे. नवमध्यमवर्ग, कनिष्ठ मध्यमवर्ग, उच्च मध्यमवर्ग या सगळय़ांना कुठल्या ना कुठल्या कारणांसाठी काँग्रेस आघाडीचे सरकार नको होते. त्यांनी २०१४ मध्ये मनमोहन सिंग सरकारचा पराभव केला आणि भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) सरकार स्थापन करण्याची संधी दिली. या मध्यमवर्गाने भाजपच्या हाती सत्ता दिली, कारण त्यांच्यापैकी अनेकांना काँग्रेसचा कथित भ्रष्टाचार नको होता, काहींना काँग्रेसवाले मुस्लिमांचा अनुनय करत आहेत, बहुसंख्य हिंदूंच्या हक्कांकडे, त्यांच्या संस्कृतीकडे दुर्लक्ष करत आहेत, असे वाटत होते. काहींना काँग्रेसने जातीअंतर्गत राजकीय प्रतिनिधित्व न दिल्याचा राग आला होता. हा मोठा मध्यमवर्ग राष्ट्रवादी होता, भाजपच्या राष्ट्रवादाला त्यांनी प्रतिसाद दिला होता. पण याशिवायही एक विशेष समूह होता, जो भाजपच्या हिंदूत्ववादी अजेंडय़ावर पोसला गेला आणि आता तो अक्राळविक्राळ झालेला आहे. या समूहाला आवरण्याची भाजपला निकड भासू लागली आहे. दिल्लीमध्ये झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून आक्रस्ताळी प्रवृत्तीच्या गटांना दिलेला इशारा हेच सांगतो. अलीकडच्या काळात या गटांकडून झालेल्या नाहक शांतताभंग करणाऱ्या आणि आसपासचे वातावरण गढूळ करणाऱ्या अनेक कृतींची दखल मोदींनी घेतली. मोदींनी या गटांना सबुरीचा सल्ला किंवा सूचना दिलेल्या नाहीत वा आवाहन केलेले नाही. त्यांनी थेट चपराक दिलेली आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रात सत्ता आल्याच्या आठ वर्षांनंतर भाजपला डोक्यात अतिरेकी विचारांचे खूळ घेऊन सातत्याने हिंसक वातावरण निर्माण करणाऱ्या घटकांना आवरण्याची गरज का भासली असावी, हा प्रश्न भाजपमधील शहाण्यांना पडू शकेल.

हिंदूत्वाच्या राजकारणाचा आधार घेऊन भाजप केंद्रात सत्तेत आला आणि त्याच बळावर तो टिकून राहील. त्यामुळे हिंदूत्व सोडून भाजप राजकारण करू शकत नाही. भाजप आपला ‘डीएनए’ कधीही बदलणार नाही. आत्तापर्यंत हिंदूत्व, संस्कृतीरक्षण या विषयावर आक्रमकपणे बोलणाऱ्या अनेक पारंब्यांना ढील दिलेली होती. देशात राहायचे असेल तर जय श्रीराम म्हटलेच पाहिजे, असे नारे देऊन मुस्लिमांना झोडपणारे, गोमांस विक्री केल्याचा केवळ संशय आला म्हणून मारहाण करणारे, झुंडशाहीत सहभागी होणारे, जग जिंकल्याच्या आविर्भावात तुरुंगात जाणारे आणि अशांना जामीन मिळाल्यावर त्यांचा सत्कार करणारे असे अनेक भाजपचे खंदे समर्थक आहेत. या पाठीराख्यांना भाजपच्या नेत्यांनी कधीही अडवल्याचे पाहायला मिळालेले नाही. या संस्कृतीरक्षकांना रोखण्याची भाजपला आजवर कधी गरजही वाटलेली नव्हती. त्यामुळे या पारंब्यांना भाजपचे नेतेही कधी कधी लटकलेले दिसले. ‘पठान’ या चित्रपटातील काही दृश्यांना संस्कृतीरक्षक गटांनी विरोध केल्यावर, त्या विरोधाची सरकारदरबारी दखल घेण्याचे काम मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा करत असतात. कुठल्याशा मॉडेलने कसे कपडे घालावेत याचा परिपाठ राज्यातील भाजपचे नेते देत असतात. अशा छोटय़ा-मोठय़ा अनेक घटना गेल्या आठ वर्षांमध्ये झालेल्या आहेत.

देशातील विरोधी पक्षांकडे केंद्र सरकारवर दबाव आणण्याची ताकद नसल्याने भाजपने या घटनांकडे गांभीर्याने पाहिलेले नव्हते. या संस्कृतीरक्षकांच्या अतिरेकाचा केंद्र सरकारला, प्रामुख्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पहिला जबरदस्त धक्का बसला तो नूपुर शर्मा यांच्या प्रेषित महम्मदांवरील अनुचित टिप्पणीमुळे. या नूपुर शर्मामुळे जगाचे लक्ष पंतप्रधान मोदींकडे वळले. या प्रसंगामुळे मोदींना जागतिक पातळीवरील दबावाला सामोरे जावे लागले होते. नूपुर शर्मा प्रकरणामुळे मोदी कमालीचे संतप्त झाले होते, असे भाजपचे वरिष्ठ नेते खासगीत सांगतात. त्यानंतर कदाचित पारंब्या तोडण्याची वेळ येऊन ठेपल्याची जाणीव भाजपला झाली असावी. या विचारांचे पडसाद कधी तरी उमटणारच होते. आगामी लोकसभा निवडणुकीला दीड वर्ष उरले असल्यामुळे मोदींनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या निमित्ताने चाबूक उगारल्याचे दिसले.

भाजपमध्ये दोन प्रकारचे नेते आहेत, त्यापैकी एका गटाला अतिरेकी हिंदूत्वाचा तिटकारा आहे. या गटातील नेते मोदीभक्त असले तरी, त्यांना मोदींच्या विकासाचा अजेंडा मान्य आहे. पण सातत्याने एककल्ली धार्मिक विचाराने राजकारण करणाऱ्या भाजपमधील गटाला त्यांचा विरोध आहे. त्यांचे म्हणणे आहे की, केंद्र सरकारने आठ वर्षांमध्ये विकासाचा अजेंडा जाणीपूर्वक राबवलेला आहे, आम्ही विकासाचे राजकारण करतो; पण भाजपशी जोडलेला छोटा वर्ग अतिकडवे धार्मिक राजकारण करतो. या छोटय़ा गटाला नियंत्रित करणे हे आमच्यापुढील सर्वात मोठे आव्हान असेल, असे भाजपचे काही नेते-मंत्री म्हणतात तेव्हा विज्ञान-तंत्रज्ञान, संशोधनाच्या आधारे जग बदलत असल्याचे भान त्यांना असल्याचे जाणवते. हिंदू-मुस्लीम मुद्दय़ावर वाद निर्माण करणे, लव्ह-जिहादवरून समाजामध्ये कटुता निर्माण करणे थांबवले पाहिजे, देशाला विकासाच्या मार्गानेच पुढे घेऊन गेले पाहिजे, असे मोदींच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवणारे नेते-मंत्री म्हणत असतील तर, भाजपमधील अंतर्विरोध तीव्र होत असल्याचे स्पष्ट होते. भाजपमधील उजव्यांमधील हे किंचित डावे अल्पमतात असल्याची जाणीवही या नेत्यांना असल्याचे अनौपचारिक गप्पांतून जाणवते. या नेत्यांना-मंत्र्यांना राष्ट्रवाद, हिंदूत्व, त्यावर आधारित संस्कृती, राष्ट्रीय अस्मिता, भाषा असे ‘देशी’ राजकारणच करायचे आहे. त्यांना भाजपचे ‘काँग्रेसीकरण’ करायचे नाही. पण, भाजपवरील अतिकडव्या विचारांच्या लोकांचा प्रभाव कमी झाला तर बरे होईल असे त्यांना वाटते. भाजपला आगामी काळात कुठल्या दिशेने घेऊन जायचे हे या नेत्यांच्या-मंत्र्यांच्या हातात नाही, हे माहीत असल्याने ही मंडळी त्यांच्याकडे पक्षाने आणि सरकारने सोपवलेली जबाबदारी पूर्ण करताना दिसतात. त्यांना कदाचित मोदींच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीतील भाषणाने थोडा आधार मिळू शकेल! या काही नेत्यांमध्ये कदाचित वाजपेयींच्या काळातील भाजपचा धागा टिकवण्याची इच्छा असू शकेल.

भाजपला सढळपणे पाठिंबा दिलेल्या मध्यमवर्गाच्या मनातील केंद्र सरकारबद्दल असलेल्या विश्वासाला किंचित का होईना तडा गेला असल्याचे कानोसा घेतल्यावर लक्षात येईल. कनिष्ठ मध्यमवर्गाच्या आशा-आकांक्षा पूर्ण होत नाहीत याची जाणीव या वर्गाला झालेली आहे. चार वर्षांसाठी सैन्यभरतीचा ‘अग्निवीर’ प्रयोग केंद्र सरकारने कितीही रेटण्याचा प्रयत्न केला तरी, त्यातून होणारा अपेक्षाभंग लोकांपासून लपून राहिलेला नाही. राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार या हिंदीभाषक पट्टय़ामध्ये तरुणांसाठी लष्करात भरती होणे ही कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेची हमी होती. पस्तिशीमध्ये लष्करातून निवृत्त झाल्यानंतर निवृत्तिवेतन, अन्य विविध सुविधा मिळत होत्या. ‘अग्निवीर’ योजनेने आर्थिक हमीच काढून घेतली जाईल. चार वर्षांनी परत आलेल्या मुलाने काय करायचे, हा गंभीर आर्थिक प्रश्न बनलेला असेल. भाजपने कितीही नाकारले तरी, लोकांना आर्थिक झळ बसू लागली असून बेरोजगारी आणि महागाई त्रासदायक होऊ लागली आहे. कदाचित मोदींच्या प्रेमापोटी, हिंदूत्वाच्या आकर्षणामुळे वा मुस्लिमांविरोधात आपली बाजू घेणारा पक्ष म्हणून लोक अजूनही भाजपसोबत आहेत. पण त्यांना उन्माद नकोसा होऊ लागला आहे हे लोकांशी बोलल्यावर भाजप नेत्यांनाही कळेल. लोकभावनेची जाणीव झाल्यामुळेच कदाचित मोदींनी ‘सर्वसमावेशकते’ची मात्रा भाजपमधील तसेच, पक्षाशी संबंधित कडव्या विचारांच्या मंडळींना पाजलेली दिसते.

राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत मोदींनी पासमांदा गरीब मुस्लिमांपर्यंत पोहोचण्याचा दिलेला संदेश हे त्यांच्या ‘सर्वसमावेशक’ मात्रेचे कवच झाले. प्रत्यक्षात मात्र ही पुन्हा एखादे नूपुर शर्मा प्रकरण निर्माण होऊ नये आणि केंद्र सरकारच्या- मोदींच्या प्रतिमेला धक्का लागू नये, याची घेतलेली दक्षता होती. युक्रेन-रशिया युद्धामध्ये मध्यस्थीच्या तयारीचा केला जातो, तेव्हा मोदींना स्वत:ची प्रतिमा जागतिक स्तरावरील नेत्याची निर्माण करायची असते, ही बाब लपून राहिलेली नाही. जागतिक समस्येमध्ये गंभीर हस्तक्षेप करण्याची ‘क्षमता’ असलेल्या नेत्याला नूपुर शर्मामुळे जगाला स्पष्टीकरण द्यावे लागणे ही नामुष्की असते. म्हणून भस्मासुरांना आवरण्याची भाषा भाजपमध्ये बोलली जाऊ लागली आहे. याचा अर्थ भाजपने धर्माधिष्ठित राजकारणापासून फारकत घेतली असा होत नाही. या राजकारणातील उन्मादावर अकुंश ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे एवढेच.

Story img Loader