ऑक्टोबर क्रांतीबद्दलचा लेख सीताराम येचुरींनी ‘लोकसत्ता’च्या दिवाळी अंकासाठी (२०१७) लिहिला, तेव्हा तोवरचा औपचारिक संवाद अनौपचारिक झाला. मग अनेकदा येचुरींशी संपर्क व्हायचा. प्रत्येक संवाद पुढच्या गप्पांची ओढ निर्माण करायचा…
अन्य राजकारण्यांच्या तुलनेत सीताराम येचुरी आयुष्यात तसे उशिराच आले. एक तर त्यांचं दिल्लीत असणं हे एक कारण. आणि आधी मी अर्थविषयक नियतकालिकात असताना आणि ‘‘भाड मे गया स्टॉक एक्स्चेंज’’ असं मत त्यांच्यातल्याच एकानं व्यक्त केलेलं असताना येचुरी यांच्याशी जवळीक किती होईल हा प्रश्नच होता. त्यांची भाषणं मात्र आवर्जून ऐकायचो. कधी मुंबईत आले तर भेटी व्हायच्या. पण वरवर. लग्नाच्या रिसेप्शनमध्ये होतात तशा. त्यांचं मैत्र म्हणता येईल ते जुळू लागलं ‘लोकसत्ता’ दिवाळी अंकासाठी त्यांच्याशी संपर्क साधायची वेळ आली तेव्हा. विषय होता रशियातल्या ‘ऑक्टोबर क्रांतीची शताब्दी’. त्यासाठी येचुरी यांच्यासारखा उत्तम, वाचकस्नेही दुसरा लेखक असणं अशक्य. संपादकीय विभागात सगळ्यांचंच येचुरी यांच्या नावावर एकमत झालं.
मोबाइलवर त्यांना मेसेज केला. बरेच दिवस उत्तरच नाही. मग एकदा दिल्लीत सीमा (चिश्ती, त्यांची पत्नी) भेटली. ती तेव्हा ‘इंडियन एक्स्प्रेस’मध्ये होती. एक्स्प्रेसच्याच कार्यक्रमात समोर आली. सांगितलं काय काय झालं ते. तिची प्रतिक्रिया : गिरीश, यू नो हौ सीता इज…! लक्षात आलं लेखाची आशा सोडून द्यायला हवी. ती सोडता सोडता तिला म्हटलं, तरी एकदा तू आठवण करून बघ. ती म्हणाली: त्याचा काहीही उपयोग होणार नाही. त्याला लिहायचं असेल तर तो लिहीलच लिहील… आणि नसेल तर मी सांगूनही काही करणार नाही. बरं म्हटलं.
हेही वाचा : अन्वयार्थ: ‘फेडरल रिझर्व्ह’ने करून दाखवले!
थोड्या दिवसांनी मध्यरात्री एकच्या आसपास फोनवर मेसेजचा अॅलर्ट आला. बघितलं तर सीताराम येचुरी. ‘आर यू अवेक’. मी थेट उलट फोन केला. म्हटलं : सर्वसाधारणपणे या वेळी झोपलेलं असणं अपेक्षित असतं, नाही का? ते जोरदार हसले. त्याही वेळी त्यांच्या हातातली सिगरेट जाणवत होती. लहानसा ठसका लागला. म्हणाले: ते सर्वसाधारणपणे… स्वत:ला त्या सर्वसाधारणात तू गणतोस की काय? आता मी हसलो. सिगरेटशिवाय ठसका लागला. मग जरा काही अशीच थट्टामस्करी झाली. ते सांगू लागले… त्रिपुरात होतो, खूप मीटिंगा-मीटिंगा वगैरे. म्हटलं दिल्लीला गेल्यावरच तुझ्याशी बोलावं. मी पुन्हा विषय सांगितला. ‘‘त्या क्रांतीबद्दल तुला आणि वाचकांना अजूनही रस आहे, म्हणजे कमाल आहे… मग लिहायलाच हवं’’, त्यांचं म्हणणं. लेखाचा आकार-उकार सांगितला. कधीपर्यंत लेख हवाय ते सांगितलं.
मुदतीच्या आदल्या दिवशी त्यांचा विस्तृत लेख, अगदी अपेक्षित होता तसा, सांगितल्या आकारात ईमेल बॉक्समध्ये अलगद पडला. त्यांना धन्यवादाचा मेसेज केला. लगेच उलट फोन. कसा झालाय विचारायला. म्हटलं उत्तम. तर म्हणाले : आम्ही डावे लिहायला- वाद घालायला जोरदार असतो. चोख जमतात ही कामं आम्हाला… पक्षही असाच चालवता आला असता तर बरं झालं असतं! ‘‘नॉट मेनी कॅन बीट अस इन आर्टिक्युलेशन.’’ मी म्हटलं : यू आर कॅपेबल ऑफ बीटिंग युवरसेल्फ्स… नो नीड ऑफ अदर्स!
तेव्हा जाणवलं येचुरी यांचं हे असं सलगी देणं! वास्तविक एका मराठी वर्तमानपत्राच्या संपादकाशी इतका मोकळेपणा त्यांनी दाखवण्याची काहीही गरज नव्हती. बरं महाराष्ट्रात त्यांच्या पक्षाचं काही स्थानही नाही. म्हणून जनसंपर्क असावा… असाही विचार त्यांनी केला असण्याची शक्यता नव्हती. मीही कधी डाव्या चळवळीशी संबंधित होतो वगैरे असंही काही नाही. तरीही त्यांचं हे असं वागणं. छान मोकळं!
हेही वाचा : लोकमानस: बाबा-बुवांना पुरस्कार नाहीत, हेच नवल!
येचुरी तेव्हापासून ‘जवळच्या’ राजकीय नेत्यांत अगदी वरच्या रांगेत जाऊन बसले. मेसेजिंग, फोनवर बोलणं, काही विषयासंबंधात संदर्भासाठी त्यांना त्रास देणं वगैरे अगदी सहज सुरू झालं. मग पुढच्या दिल्ली भेटीत गप्पा मारायला भेटायचं ठरलं. संध्याकाळी कार्यालयातच ये म्हणाले सगळी कामं वगैरे संपवून. त्याच दिवशी आधी विख्यात कायदेतज्ज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांच्याबरोबरची मीटिंग लांबली. त्या दिवशी सर्वोच्च न्यायालयात काय झालं ते सिंघवी सांगत बसले. त्यांच्या तोंडून कायद्यातले बारकावे समजावून घेणं हे एक शिक्षणच. त्यामुळे ते ऐकताना वेळेचं भान राहिलं नाही. बाहेर आल्यावर ओशाळं होत येचुरींना महेशनं (सरलष्कर, ‘लोकसत्ता’चा दिल्ली प्रतिनिधी) फोन केला. येऊ ना… विचारलं. येचुरी म्हणाले : म्हणजे काय… मी थांबलोय. कम कम! आवाजात अजिबात त्रासिकपणा नाही. गोल मार्केटजवळच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात पोहोचलो तेव्हा रात्र आणि हवेतली थंडी चांगलीच चढलेली. आम्ही पोहोचलो तर वृंदा करात निघायची तयारी करत होत्या. दोन-चार कार्यकर्ते, कर्मचारी विहरत होते. येचुरींनी गरम-गरम चहा मागवला. तो बहुधा पंधरावा किंवा विसाव्वाही असावा.
नंतर त्यात चार-पाचची भर पडली. ही निवडणुकांच्या बऱ्याच आधीची गोष्ट. येचुरींनी स्वत:ला ‘इंडिया’ आघाडी बांधण्याच्या कामात गाडून घेतलं होतं. मग एकेक राज्य आणि त्या राज्यात काय काय होऊ शकतं हे ते समजावून सांगू लागले. ममतांविषयी ‘धरलं तर चावतं’ हे खरं असलं तरी सोडलं तर पळून जाण्यापेक्षा चावून घेणं कसं आवश्यक आहे यावर त्यांची प्रामाणिक मल्लिनाथी. तास-दीड तास झकास गप्पा झाल्या. ‘‘आम्हा डाव्यांना आता शिवसेनाही जवळची वाटू लागलीये, यातूनच आमची लवचीकता दिसते… काळच तसा आहे… पुस्तकी राहून चालणार नाही. प्रागतिक व्हायला हवं’’, ही त्यांची प्रतिक्रिया. म्हटलं : तुमचा पक्ष कायमच असा प्रागतिक राहिला असता तर…! येचुरी म्हणाले : जाऊ दे ना… इतिहास थोडाच बदलता येतो. आपण वर्तमानाचं आणि भविष्याचं पाहायचं. शेवटी म्हटलं… तुमच्या पक्षानं तुम्हाला आणखी एक टर्म द्यायला हवी होती राज्यसभेत. आता कोण आहे असं इतकं मुद्देसूद बोलणारं! या वाक्यावर त्यांचं केवळ मोकळं हसणं. स्वत:च्या पक्षावर खासगीतही एक चकार शब्दानं त्यांनी टीका केली नाही.
हे असे राजकारणी किती दुर्मीळ असतात याचा अनुभव साधारण चार दशकांच्या पत्रकारितेत भरपूर आलेला. बहुतेकांचा सूर ‘‘पक्षात आपल्या गुणांचं चीज कसं नाही’’ असाच. येचुरी अजिबात तसे नव्हते.
हेही वाचा : संविधानभान: विधिमंडळातील कार्यपद्धती
नंतर अचानक एका पत्रकार मित्राचा मेसेज आला. येचुरींचा मुलगा गेल्याचा. काय करावं कळेना. नुसता मेसेज केला. सांत्वनपर. त्यांच्याकडून थँक्यूची स्माईली आली उत्तरादाखल. अवघ्या काही दिवसांनी दुसऱ्या एका कामासाठी त्यांचा फोन झाला. मलाच अपराधी वाटत होतं. पण येचुरी कामाला लागले होते. भूतकाळात अडकायचं नाही, हे तत्त्व जगून दाखवत होते. पुढे काही दिवसांनी ते मुंबईत येणार होते. म्हटलं : ‘लोकसत्ता’त ‘लोकसंवाद’ कार्यक्रमासाठी याल का? लगेच होकार. त्याप्रमाणे ते आलेही. दुपारची वेळ त्यांनी दिली होती. जेवायला बोलावलं. प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या दिवशी विचारलं : एनी फूड प्रेफरन्स? त्याचं उत्तर आलं : एनीथिंग ईटेबल आणि भरपेट हसणारे स्माईली.
त्या कार्यक्रमात प्रस्तावना करताना मी एक डिस्क्लेमर दिला. ‘‘येचुरी माझ्या आवडत्या राजकारण्यांतील एक आहेत… त्यांच्या पक्षाविषयीही मात्र असं म्हणता येत नाही.’’ त्यावर गडगडाटी हसत त्यांनी बोलायला सुरुवात केली आणि एका अभ्यासू राजकारण्याची मैफल सगळ्यांनी अनुभवली. नंतर जेवण. त्याआधी म्हणाले: इथं स्मोक डिटेक्टर्स कुठे नाहीत? हा प्रश्न आधी कोणी विचारलेला नव्हता. त्यामुळे त्याचं उत्तरही कोणाला माहीत नव्हतं. मग शोधाशोध झाली आणि एक जागा सापडली. समूहाच्या संचालकांच्या कार्यालयात अॅशट्रे म्हणून वापरता येईल अशी काही शोभेची वस्तू मिळाली. येचुरींनी ‘‘हर फिक्र को धुंएमे उडाता चला गया…’’ थाटात एक सिगरेट शिलगावली.
हेही वाचा : व्यक्तिवेध: साल्वातोर स्किलाची
नंतरही अनेकदा निवडणुकीच्या काळात, नंतर येचुरींशी संपर्क व्हायचा. प्रत्येक संवाद पुढच्या गप्पांची ओढ निर्माण करायचा. पण आता येचुरी गेलेच!
मोबाइलच्या फोनबुकातला कधीही कॉल करावा असा आणखी एक नंबर आता गतप्राण झाला. सहज फोनबुकवर नजर टाकली. बातमीशिवाय, कामाशिवाय, राजकीय-विचारधारानिरपेक्ष मोकळ्या गप्पांसाठी सहज फोन व्हायचे असे कित्येक नंबर आता स्मृतिशिला बनलेत. राहुल बजाज, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, विलासराव देशमुख, मनोहर पर्रिकर, शरद काळे, ना. धों. महानोर, नुसता मेल आयडीवाले गोविंदराव तळवलकर, अरूण टिकेकर… झाडांवरच्या पानांप्रमाणे एकेक फोन गळावया…
girish.kuber@expressindia.com