‘टाटा लिटफेस्ट’ हा गेली १३ वर्षं मुंबईच्या ‘एनसीपीए’मध्ये (अर्थात राष्ट्रीय संगीत नाट्य केंद्रात) वाढत गेलेला साहित्योत्सव. दिवंगत लेखक अनिल धारकर यांच्या जिद्दीतून हा ‘लिटफेस्ट’ सुरू झाला आणि वाढू लागला. जयपूर लिटफेस्टसारखं टुरिस्ट आकर्षण किंवा इव्हेन्ट-वलय मुंबईच्या या लिटफेस्टला नसूनही त्यानं हातपाय रोवले आणि गेल्या काही वर्षांत तर महत्त्वाच्या उद्योगसमूहाचं प्रायोजकत्वही मिळवलं. यंदाचा ‘टाटा लिटफेस्ट’ ऑनलाइन स्वरूपात तर २५ ऑक्टोबरपासूनच सुरू झाला आणि सलमान रश्दी, एलीफ शफाक यांच्या झालेल्या मुलाखतींचं ध्वनिचित्रमुद्रण आता पाहाता येईल. रश्दी यांच्या मुलाखतीत ‘लेखक मिथकं बनवतोच, पण या मिथकीकरणाची सुरुवात स्वत:पासून होते’ असं (कबुलीवजा?) वाक्य आहे. मात्र शुक्रवारी, २७ ऑक्टोबरपासून हा लिटफेस्ट प्रत्यक्ष स्वरूपातही सुरू झाला. पहिला दिवस शशी थरूर यांचा होता. उद्घाटनपर भाषण त्यांनी दुपारी केलं आणि संध्याकाळी कृत्रिम बुद्धिमत्तेचा – ‘एआय’चा – साहित्य व्यवहारावर होऊ शकणारा परिणाम काय, याबद्दलच्या परिसंवादातही भाग घेतला. शनिवार आणि रविवार (२८, २९ ऑक्टोबर) हे मुंबईच्या या लिटफेस्टचे अधिक गजबजलेले दिवस असणार आहेत. एकट्या एनसीपीएमध्येच या दोन दिवसांत ३३ निरनिराळे कार्यक्रम ‘लिटफेस्ट’चा भाग म्हणून होत असतील, तेव्हा कुठं जाऊ आणि कुठं नको असं होऊ नये, म्हणून ही ठळक वैशिष्ट्यांची बुकबातमी.

हेही वाचा >>> अन्वयार्थ : लोकसंवादी कीर्तनकार

we the documentary maker Dheeraj akolkar
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: आनंददायी दृश्य-व्यायाम
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Padmashri Physicist Dr Rohini Godbole Memoirs by Researcher Dr Radhika Vinze
विज्ञानव्रती
readers reaction on different lokrang articles
पडसाद : हा तर बुद्धिभेद
jyachi tyachi love story review by sabby parera
ज्याची त्याची लव्ह स्टोरी!
mukkampost bombilwadi mazi ladki janta yojna
मुक्कामपोस्ट बोंबिलवाडीची ‘लाडकी जनता योजना!’, पोस्ट होतेय व्हायरल, काय आहे ही योजना? वाचा…
The first college in Maharashtra
Video : महाराष्ट्रातील पहिले महाविद्यालय आहे पुण्यात! २०० वर्षे जुने हे कॉलेज माहितेय का?
Neelu Phule And Prasad Oak
“मला त्याच वेळेला ऑस्कर…”, निळू फुलेंची आठवण सांगत प्रसाद ओक म्हणाला, “त्यांनी मला फोन केला आणि…”

उद्याोग-व्यापारविश्व, प्रसारमाध्यमं, राजकारण, इतिहास या विषयांवरली भाषणं, मुलाखती किंवा चर्चा यांखेरीज फक्त कथा- कादंबरी वा कविता यांना वाहिलेली सत्रंही इथं भरपूर आहेत.

मनोरंजन ब्यापारी हे तीन भागांतली संघर्षकथा लिहिणारे दलित लेखक, त्यांची मुलाखत शनिवारी सकाळी (१०.३०) हिंदीत होईल. पण बाकीची बहुतेक सत्रं इंग्रजीत असतील. ‘द मेनी हिस्टरीज ऑफ इंडिया’ हे गणेश देवी यांचं व्याख्यान (दुपारी २), ‘बाबासाहेब अनबाउण्ड’ या सत्रात तरुण कवी-संगीतकार आणि ‘अफेअर्स ऑफ कास्ट’चे लेख सुमीत सामोस आणि अशोक गोपाल यांच्याशी ‘व्हाय आय अॅम नॉट अ हिंदू वुमन’च्या लेखिका वंदना सोनाळकर यांची बातचीत (दुपारी ३.३०), संत तुकारामांच्या अभंगांच्या शांता गोखले आणि जेरी पिण्टो यांनी केलेल्या ‘बिहोल्ड- द वर्ड इज गॉड’ या पुस्तकाच्या प्रकाशनानिमित्तानं त्या दोघांच्या गप्पांसह तेजश्री व रतनकुमार इंगावले यांचं अभंग-गायन (सायं. ५), ‘अॅड मॅन- मॅड मॅन’ या जाहिरात क्षेत्रातील दिग्गज प्रल्हाद कक्कर यांच्या आत्मपर पुस्तकानिमित्तानं रवीना टंडन आणि अनुजा चौहान यांच्याशी त्यांची बातचीत (६.३०), ब्रिटिश-अमेरिकी पत्रकार मेहदी हसन (अल जझीरा) आणि राजदीप सरदेसाई यांचा ‘प्रसार आणि प्रचार’ या विषयालाही स्पर्श करणारा ‘टर्न द टाइड’ हा संवाद (रात्री ८ ते ९) असे शनिवारचे काही निवडक कार्यक्रम आहेत. तर ‘टाटा स्टील’चे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि ‘पद्माभूषण’ किताब मिळवणारे जे. जे. इराणी यांचं ‘डॉक्टर स्टील’ हे आत्मचरित्र रविवारी दुपारी १ च्या सत्रात प्रकाशित होईल, त्यानंतरच्या ‘उद्याोगांच्या इतिहासाचे महत्त्व’ या विषयावरल्या चर्चासत्रात उद्याोग क्षेत्रातली अनुभवी मंडळी सहभागी आहेत, पण त्याच वेळी याच एनसीपीए परिसरातील लिटिल थिएटरमध्ये, ‘अराउंड द वर्ल्ड इन ८० गेम्स’ या पुस्तकाचे लेखक मार्कुस द्याु सॉतॉय हे खेळांमागचे गणित उलगडून सांगणार आहेत.

हेही वाचा >>> उलटा चष्मा: औटघटकेचे नाट्य

‘चित्रवाणी माध्यमाला जबाबदारी कळते का?’ अशा अर्थाच्या परिसंवादात फाय डिसूझा, निखिल वागळे, सोहित मिश्र आणि निखिल इनामदार यांचा समावेश (दुपारी २) आहे, पण त्याच वेळी जबाबदार पत्रकारितेतून पुढे ग्रंथलेखनाकडे वळलेले दोघे जण- कल्पना शर्मा (धारावीवरील पहिल्या इंग्रजी पुस्तकाच्या लेखिका) आणि संजय हजारिका यांचा संवाद ऐकण्यासारखा असेल… हजारिका यांनी ईशान्य भारताबद्दल दोन पुस्तके लिहिली असून त्यांचे ताजे पुस्तक भारतीय तुरुंगांच्या अवस्थेबद्दल आहे आणि या संवादाचे निमित्त, हजारिकांना इथेच दिला जाणारा ‘रोटरी रायटिंग फॉर पीस’ पुरस्कार, हे आहे. यानंतर लगेच (दु. ३.३०) सुधा मूर्ती यांचे भाषण, मग यंदाच्या ‘टाटा लिटरेचर लाइव्ह- लाइफटाइम अचीव्हमेंट अॅवॉर्ड’च्या मानकरी- तमिळ लेखिका सी. एस. लक्ष्मी यांचा गौरव सोहळा आणि त्यांच्याशी बातचीत (सायं. ५) आणि त्याच वेळी ‘मुंबई-आधारित गुन्हेकथा : छापील आणि चित्रपटांतील’ हा पीयूष झा यांचा समावेश असलेला परिसंवाद असा कार्यक्रम आहे. या लिटफेस्टची सांगता अर्थातच, लघुयादीतून ऐन वेळी जाहीर होणाऱ्या विविध ग्रंथपुरस्कारांच्या घोषणेने (रात्री ८) होईल, पण त्याआधीचे (सायं. ६.३०) कार्यक्रम निवड करण्यासाठी आणखी कठीण आहेत… एकीकडे ‘सेलिब्रेटिंग विमेन’ या चर्चेमध्ये मीरान चढ्ढा बोरवणकर, शोभा डे आणि फाय डिसूझा आहेत, तर दुसरीकडे भारताबद्दल संवेदनक्षमपणे लिहिणारे गुरुचरण दास यांच्या ‘अनदर सॉर्ट ऑफ फ्रीडम’ या आत्मचरित्राबद्दल त्यांच्याशी बातचीत आहे. थोडक्यात, इंग्रजी वाचणाऱ्या मराठीजनांसाठी शनिवार तुलनेने सोपा, पण रविवार धकाधकीचा आहे.. अगदी नरिमन पॉइंटच्या समुद्राकाठी, ‘एनसीपीए’ परिसरातल्या छान वाऱ्यात, तीन-तीन वातानुकूलित सभागृहांत हा लिटफेस्ट होणार असूनही कार्यक्रमांच्या रेलचेलीमुळे धावपळ होणार आहे!