पी. चिदम्बरम
होमो सेपियन्स ही पृथ्वीवरची सगळ्यात प्रगत अशी मानवी प्रजाती मानली जाते. त्यांच्याही आधी होती ते निएंडरथल्स. त्यांच्या तुलनेत होमो सेपियन्स अधिक प्रगत आणि बुद्धिमान मानले जातात. होमो सेपियन्सचाच पृथ्वीवरचा वावर सुरू होऊन हजारो वर्षे लोटली. पण असे असले तरी आपण मूळच्या निएंडरथल्सपेक्षा फारसे वेगळे नाही आहोत, असे मला वाटते. ते लढाया नियमांशिवाय लढले आणि आपणही नियम न पाळताच युद्धे लढत आहोत.
मानवी इतिहासात कधी तरीही युद्धाचे नियम होते का? नेट्टीमयर या प्राचीन तमीळ कवींनी यांनी त्यांच्या एका कवितेत तमिळ राजांमधील युद्धाचे मूलभूत नियम मांडलेआहेत. त्यात म्हटले आहे, युद्ध करण्याचा इरादा असलेला राजा पूर्वसूचना देईल:
हेही वाचा >>> अन्वयार्थ : महाराष्ट्राच्या जातगणनेचा प्रश्न
आवुम, आनियार परपना माकलूम,
पेंडिरम, पिनियुदाइयेरम, पेनी
थेनपुलम वाझनार्ककु अरुंगदन इरुक्कुम
पोनपोर पुडलवर पेराथीरम,
एम अम्बु काडीविदुथुम, नुन अरण सेर्मिन
या ओळींचा ढोबळ अनुवाद असा
गायी, पुजारी, स्त्रिया, आजारी लोकांनो,
अंतिम संस्कार करण्यासाठी ज्यांना मुलंबाळं नाहीत अशा लोकांनो
आमचे बाण वेगाने नेम धरत आहेत,
तुम्ही लौकर तुमच्या सुरक्षित ठिकाणी पोहोचा
रणांगणांवर सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत सैनिकांमध्ये लढाया होत असत. दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी लढाई पुन्हा सुरू झाली. तमिळमध्ये रामायण लिहिणारे महान कवी कंबन यांच्या काव्यात राम थकलेल्या रावणाला सांगतोे, ‘आज तू जा आणि युद्ध करण्यासाठी उद्या परत ये.’
जमिनीसाठी घेतलेले बळी
प्राचीन युद्धे खरोखरच सुसंस्कृत पद्धतीने आणि काही नियमांनुसार लढली गेली. पण आधुनिक काळात तसे होत नाही. आज रशिया आणि युक्रेन तसेच इस्रायल आणि हमास यांच्यात जी युद्धे लढली जात आहेत ती अत्यंत क्रूरपणे लढली जात आहेत. अंदाधुंद बॉम्बस्फोट झाले आहेत. युक्रेन आणि गाझामध्ये शहरे आणि गावे गाडली गेली आहेत. रुग्णालये आणि शाळा उद्ध्वस्त झाल्या आहेत. लहान मुले, महिला, वृद्ध आणि रुग्णांसह हजारो लोकांचा बळी गेला आहे. विस्थापितांना छावण्यांमध्ये ठेवण्यात आले आहे. तिथे मूलभूत सुविधाही मिळू शकत नाहीत अशी परिस्थिती आहे. हजारो बेघर लोकांना शेजारच्या देशांत स्थलांतरित व्हावे लागले आहे. वीज आणि पाणीपुरवठा खंडित झाला आहे. अन्नपुरवठा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाला आहे. औषधांचा तुटवडा आहे. मदत साहित्य घेऊन जाणारे ट्रक थांबवण्यात आले आहेत.
हे युद्ध कशासाठी सुरू आहे? रशिया-युक्रेन युद्धात वर्चस्वाचा मुद्दा आहे. युक्रेन १९२२ ते १९९१ दरम्यान सोव्हिएत युनियनचा भाग होता. रशियन वंशाचे हजारो लोक युक्रेनच्या काही भागात स्थायिक झाले आणि हळूहळू त्यांचे वर्चस्व वाढत गेले. ते प्रबळ होत गेले. स्वातंत्र्यानंतर, युक्रेन हा देश नाटोमधले देश आणि रशिया यांच्यातील बफर क्षेत्र होता. युक्रेन नाटोमध्ये सामील झाले तर तो नाटोचे सैन्य आपल्या सीमेपर्यंत आणेल अशी भीती रशियाला वाटत आहे. म्हणून, रशियाला युक्रेन एक ‘तटस्थ’ देश असायला हवा आहे. युक्रेनच्या ज्या भागात रशियन वंशाचे लोक स्थायिक झाले आहेत, तो भाग रशियाला जोडून घ्यायचा आहे. जमिनीचा काही भाग जोडण्यासाठी आणि बाकीच्या गोष्टी मार्गस्थ करण्यासाठी, हे जमिनीवरचे युद्ध आहे.
इस्रायल-हमास युद्धातही जमिनीच्या मुद्द्यावरूनच संघर्ष सुरू आहे. ज्यू लोकांनी आपली जमीन बळकावली आहे, असा सर्व पॅलेस्टिनींचा विश्वास आहे. त्यातले काही हमासचे प्रतिनिधित्व करतात. त्या भूभागाला पॅलेस्टाईन असे म्हटले जात असे आणि त्यावर अरब, ज्यू आणि ख्रिाश्चनांचा ताबा होता. इस्रायल या देशाची निर्मिती संयुक्त राष्ट्रांच्या आदेशानुसार झाली आणि ज्यू लोक १९४८ पासून त्या भूभागावर स्थायिक झाले. आधुनिक इस्रायल हा एक शेजारच्या शत्रूपासून स्वत:चा बचाव करण्याची क्षमता असलेला बलवान देश आहे. इस्रायल ही या परिसरातील एकमेव अणुशक्ती आहे. इतिहास कदाचित पॅलेस्टिनींच्या बाजूने असेल पण वास्तव हे आहे की इस्रायल हा देश पृथ्वीवरून पुसला जाऊ शकत नाही.
शक्तीहीन संयुक्त राष्ट्रे
संयुक्त राष्ट्रे ही एक हतबल संघटना आहे. त्यांच्या सनदेची उद्दिष्टे भलेही उदात्त असतील, पण ते ती अमलात आणू शकत नाहीत. ‘‘आम्ही संयुक्त राष्ट्रांच्या लोकांनी पुढच्या पिढ्यांना युद्धाच्या संकटापासून वाचवण्याचा निर्धार केला आहे. या युद्धांनी आपल्या आयुष्यात दोन वेळा मानवजातीला अगणित दु:ख दिले आहे. आणि आम्ही हमी देतो की सशस्त्र ताकदीचा वापर केला जाणार नाही.’’ असे शब्द या सनदेमध्ये आहेत.
असे असूनही संयुक्त राष्ट्रे ही संघटना युद्धाच्या संकटापासून पुढील पिढ्यांना वाचवण्याच्या आणि शस्त्रांचा वापर होणार नाही याची हमी देण्याच्या आपल्या ध्येयामध्ये ढळढळीत अपयशी ठरली आहे. याशिवाय युद्धाचे स्वरूपही बदलले आहे. माणूस आता माणसाशी लढत नाही, हातांनी लढणे हा आता इतिहास झाला आहे. आता यंत्रे यंत्रांशी लढतात. ड्रोन क्षेपणास्त्रांना तोंड देतात. क्षेपणास्त्रे क्षेपणास्त्रविरोधी शस्त्रांचा सामना करतात.
जगाला जमिनीसंदर्भातले तंटे सोडवण्याचा मार्ग सापडला नाही तर युद्धे अपरिहार्य आहेत. भारत आणि पाकिस्तानातील वादही जमिनीच्या मुद्द्यावरूनच आहे. टोकाच्या उजव्या विचारसरणीच्या व्यक्तींना हा हिंदू- मुस्लीम वाद असल्याचे भासविणे सोयीस्कर वाटते. मात्र हा एक खोडकर सिद्धांत आहे. दोन्ही देशांनी फाळणी स्वीकारली होती. पाकिस्तानचा जमिनीचा हव्यास हे या वादामागचे कारण आहे. भारत आणि चीनमधील वादही जमिनीचाच आहे, मात्र तो थोडा अधिक गुंतागुंतीचा आहे. कारण बऱ्याच ठिकाणी सीमारेषा स्पष्ट नाही आणि दोन्ही बाजूंनी या भूभागावर दावा केला जात आहे. पण त्याबाबत युद्धातून नाही, तर वाटाघाटीतूनच मार्ग निघू शकतो. ‘हे युद्धाचे युग नाही.’ असे पंतप्रधानांनी म्हटलेच आहे.
न्यायाधिकरणाचा अभाव
पोप फ्रान्सिस यांनी रशिया आणि युक्रेन तसेच इस्रायल आणि हमास यांना शांततेसाठी वारंवार आवाहन केले आहे, परंतु कोणीही त्यांचे ऐकणार नाही. त्याच्या पूर्वसुरींपैकीही एकाने ‘‘आता युद्ध नको, पुन्हा कधीही युद्ध नको’’ असे कळकळीचे आवाहन केले होते. मात्र त्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. ही पृथ्वी अनेक युद्धांत बेचिराख होत आली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या समुद्रविषयक कायदा परिषदेला (१९८२) १५०हून अधिक देशांनी मान्यता दिली होती. आंतरराष्ट्रीय समुद्र कायदा न्यायाधिकरणाने आजवर अनेक वाद सोडविले आहेत. त्यात भारत आणि इटलीमध्ये ‘एन्रिका लेक्सी’ या टँकरवरून निर्माण झालेल्या वादाचाही समावेश आहे. याच धर्तीवर जमीनविषयक वाद सोडविण्यासाठीही आंतरराष्ट्रीय न्यायाधिकरण असावे, असे वाटते. अशा न्यायाधिकरणाची स्थापना जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत युद्धे आणि मृत्यू होतच राहतील…