विसाव्या शतकाच्या मध्यास परंपरेने हिंदुस्तानातील समाजास हिंदी समाज संबोधले जायचे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी ‘नवभारत’ मासिकाच्या सप्टेंबर १९४९ च्या अंकात हा लेख लिहिला तेव्हा त्याचे शीर्षक होते, ‘हिंदी समाजाची नैतिक अधिष्ठाने’. वर्तमान संदर्भाने सांगायचे तर तर्कतीर्थांनी या लेखात भारतीय समाजाच्या नैतिक अधिष्ठानासंदर्भात विचार व्यक्त केले आहेत.

कोणत्याही अधिष्ठानाचा ऱ्हास अथवा पतन ही शतकभराच्या प्रक्रियेची परिणती असते. भारतीय समाजातील नैतिक पतन ही यंत्रयुगाने आलेल्या आधुनिक नागरी समाजनिर्मितीची परिणती होय. पारंपरिक भारतीय समाज बंदिस्त होता. सामाजिक नियमनाचा आधार कर्मफल होते. ही भावना हिंदू आणि मुस्लीम दोन्ही धर्मीय समाजांची होती. कालौघात यंत्रयुग, विज्ञानयुग अवतरले. त्याचा आधार शिक्षण होते. शिक्षणाने समाजावरची ईश्वरदत्त सत्ता, धर्माचे अपौरुषत्व, रूढी व परंपरांची शक्ती खिळखिळी केली. एका अर्थाने पारलौकिक सत्तेच्या समाजावरील अमलाची जागा भौतिक व ऐहिक विचारांनी घेतली. तत्पूर्वीचा समाज जात, धर्मतत्त्वांचा अंमल मानणारा होता. विज्ञान, यंत्र, शिक्षणाद्वारे जे पाश्चात्त्य तत्त्वज्ञान भारतात आले, ते आधुनिक होते. त्यातील स्वातंत्र्य, विवेक इत्यादी तत्त्वे भारतीय समाजाची आकर्षण बनली. जुन्या नैतिक कल्पनांच्या जागी नवी नैतिक व्यवस्था इथे निर्माण न होता, नैतिक अधिष्ठानाची पोकळी तयार झाली. भारतीय समाजाच्या स्वातंत्र्योत्तर गतिमान नैतिक पतनास ही पोकळी कारणीभूत ठरली. नवशिक्षित समाजाने विश्वदृष्टी (वर्ल्ड आऊटलूक) स्वीकारली, असे न होता जुन्या सामाजिक, धार्मिक विवेकाची जागा नवराष्ट्रवादी विचारांनी घेतली. नवभारत उभारणीचे स्वप्न या राष्ट्रवादामागे होते; पण आपण स्वीकारलेला राष्ट्रवादी विवेक हा आधुनिक संस्कृतीच्या मूलभूत व्यापक प्रेरणांशी विसंगत होता. आंतरिक प्रेरणांची बाह्य परिस्थितीशी विकोपात्मक विसंगती ही मनोविकृती निर्माण करते. विरोध व प्रकोपासारखी साधने ही राष्ट्रवाद नियंत्रक असतात. नैतिक विवेकाचा संबंध मानवी व वैश्विक नीतिशास्त्राशी असतो. राष्ट्रवाद नैतिक विवेकबुद्धीचा चिरंतन पाया निर्माण करू शकत नाही.

समाजपरिवर्तन करू पाहणाऱ्या समाजवाद, साम्यवाद यांसारख्या विचारधारा नैतिक भावनामूलक असल्या तरी त्या नियतीवादी (डिटरमिनिस्टिक) असतात. या विचारसरणीतील मानवी विवेक सामाजिक परिस्थितीबद्ध असतो. इच्छा स्वातंत्र्य हे जुन्या उच्चतर धर्माचे वा नव्या ऐहिक नीतीशास्त्राचे मूलभूत गृहीतकृत्य होय. मानवी स्वातंत्र्य हा नीतीशास्त्राचा पाया आहे. समुदायप्रधान तत्त्वज्ञान अहिंसाप्रधान व मूलभूत तर्कप्रधान परिणती देऊ शकत नसते. ती भ्रामक मनोविकार निर्माण करते. आधुनिक जगातील नैतिक बेबंदशाहीचे हे कारण होय. त्यामुळे मानवी शील व विवेक निर्माण करणाऱ्या नव्या नीतीशास्त्राचा पाया घालणे आवश्यक झाले आहे. जुन्या मूल्यांच्या आधारावर नवविचारांची पारख करणे चुकीचे असते. नवविज्ञानाधारित नवे नीतीशास्त्र काळाची गरज बनली आहे. मानव-हित अंतिम मानणाऱ्या नवनीतीशास्त्राची निर्मिती हे आपल्यापुढील खरे आव्हान आहे. स्वार्थ-परमार्थ, पाप-पुण्य, नैतिक-अनैतिकाचा विचार पूर्वसंदर्भात करत राहणे म्हणजे नवबदलांना नाकारण्यासारखेच ठरते. मानवी प्राथम्य व श्रेष्ठत्व कालसंगतीने ठरत असते. आळस, भोगलालसा, लोभ, मत्सर, वंचनावृत्ती, आक्रमण इत्यादींमुळे नैतिक अधिष्ठान लोप पावते. मानवाला आत्मस्वातंत्र्य, जीवननिष्ठा यांसारख्या गोष्टी पूर्व वा पश्चिमेकडून मिळणार नाहीत. भूतकाळ याबाबतीत काहीच करू शकणार नाही. वर्तमान मानवास त्याचे ईप्सित वा आदर्श केवळ नि केवळ आत्मबल आणि आत्मज्ञानानेच मिळणार आहे. त्यासाठी माणसाने स्वत:त विधायक सृजनशीलतेचा विकास करायला हवा. त्यासाठी त्याला आपले नैतिक जगात, अधिष्ठान स्वत: घडवायला हवे. ही जगातील त्याची स्वत:ची जबाबदारी राहील. ‘जुने जाऊ द्या मरणा लागुनि’ इतकेच ‘सावध ऐका पुढल्या हाका’ही महत्त्वाचे!

नीती हे मानवी जीवनाचे सौंदर्य आहे. मानवी व्यवहाराचे संगीत आहे. नैतिक अधिष्ठान मानवास सुसंस्कृत व समाजास सभ्यता प्रदान करते.

drsklawate@gmail.com