साथी एस. एम. जोशी यांचा षष्ट्यब्दीपूर्ती सत्कार समितीतर्फे एक गौरव ग्रंथ प्रकाशित करण्यात आला होता. त्याचे संपादन सर्वश्री वि. स. खांडेकर, अनंत काणेकर, अनंत भालेराव, चंद्रशेखर धर्माधिकारी, ग. प्र. प्रधान, अ. भि. शहा, मधु पानवलकर, पन्नालाल सुराणा या मान्यवरांनी केले होते. त्यात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा ‘सत्याग्रह, समाजवाद व लोकशाही’ शीर्षक लेख प्रकाशित झाला होता. या एका लेखातील तीन तत्त्वांचा स्वतंत्र विचार आपण या स्तंभात क्रमश: करणार आहोत. इथे त्यांपैकी ‘सत्याग्रह’ तत्त्वाचा विचार होत आहे.

भारतीय राजकारणात सत्याग्रह तत्त्वाला सर्वप्रथम स्थान महात्मा गांधींनी दिले. ‘सत्याग्रह’ या शब्दातील ‘सत्य’ या शब्दाचा अर्थ नैतिकदृष्ट्या शुद्ध असे ध्येय व त्या ध्येयाचा शुद्ध साधनमार्ग असा होतो. हा अर्थ वैज्ञानिक सत्यापेक्षा वेगळा आहे. नैतिकदृष्ट्या योग्य हा त्याचा खरा अभिप्रेत अर्थ होय. पाश्चात्त्य तत्त्वज्ञ ब्रुनो याने सत्य सांगितल्याने त्याला जाळून मारण्यात आले. कारण, त्याने पारंपरिक धार्मिक सत्याच्या जागी वैज्ञानिक सत्य मांडले होते. विश्व अलौकिक प्रकाशाने नाही, तर सूर्य, चंद्र, तारे, ग्रह यांमुळे प्रकाशित असते, हे त्याने स्पष्ट केले होते. मानवी जीवनातील सर्वप्रकारचा अहिंसात्मक, नैतिक लढा हा सत्याग्रह संज्ञेत येतो. मानवी इतिहास हा नैतिक (व अनैतिकही!) जीवनाचा इतिहास असल्याने सत्याग्रहास शाश्वत अढळपद प्राप्त झाले आहे. त्यास भारतीय स्वातंत्र्यलढ्यात राजकीय नैतिक अधिष्ठान महात्मा गांधींनी प्राप्त करून दिले.

सत्याग्रहामुळे ब्रिटिश साम्राज्यशाहीस हुकूमशाहीचे स्वरूप न येता उदारमतवादी राज्यपद्धतीचे रूप प्राप्त झाले. ब्रिटिश संसदेतही त्याकाळी भारतातील ब्रिटिश राज्यपद्धतीवर टीका होत असे, त्यामुळे ‘कायद्याचे राज्य’ ही संकल्पना अस्तित्वात आली. त्यातून सत्याग्रहास पोषक असे वातावरण भारतात निर्माण झाले. त्यामुळे भारतात हिंसात्मक प्रतिकार किंवा सशस्त्र उठावाची शक्यता मावळली. यातून नि:शस्त्र प्रतिकार चळवळीस बळ मिळाले. ब्रिटिश प्रशासनाने नैतिक सत्य तत्त्वत: स्वीकारल्याची स्थिती होती. त्यामुळे सत्याग्रहास अनुकूल सामाजिक व राजकीय परिस्थिती निर्माण होणे शक्य झाले. लोकजागृती व संघटनेची कायदेशीर साधने यातून उदयाला आली. इथे राजकीय व सामाजिक सत्याचे उभयसंमत स्वरूप होते व अहिंसेवर श्रद्धा असलेले प्रतापशील साधुत्वाचे नेतृत्वही होते.

सामाजिक व राजकीय नैतिक सत्याला व ध्येयाला अनुसरून राज्यकर्त्यांचे हृदयपरिवर्तन करून राज्यपद्धतीत बदल करणे, हा उद्देश राजकीय सत्याग्रह आंदोलनाचा असतो. ज्यांच्या हातात राजकीय सत्ता असते, त्यांच्याविरुद्ध हा सत्याग्रह संग्राम उभारला जातो. सत्ताधारी पक्षाचे हृदयपरिवर्तन करून राजकीय परिवर्तन घडवून आणणे, हा सत्याग्रहाचा यशाकडे जाण्याचा मार्ग होय. या मार्गात मानव्यावरील नितांत श्रद्धा प्रेरक ठरते. शत्रूसुद्धा नैतिक विवेकास पात्र आहे आणि त्याला आपला नैतिकदृष्ट्या मित्र बनविणे शक्य आहे, असा या मानव्यावरील श्रद्धेचा अर्थ असतो. मानव्यावरील निरपवाद प्रेम हा या श्रद्धेचा आविष्कार होय. म्हणून सत्याग्रहामध्ये ज्यांच्याविरुद्ध लढा चालतो, त्या शत्रूवरही प्रेम असावे लागते.

सत्याग्रह या कल्पनेला राजकारणात प्रमुख स्थान प्रथम महात्मा गांधींनी दिले. माणसांच्या आणि राष्ट्रांच्या राजनैतिक आंदोलनात सत्याग्रह या साधनाला राजनैतिक महिमा महात्मा गांधींच्या अंतरदर्शी प्रज्ञेनेच प्राप्त करून दिला. म्हणून सत्याग्रह या साधनाची उपयुक्तता व त्याचा संपूर्ण अर्थ समजून घ्यावयास महात्मा गांधींचे यासंबंधीचे विचार व महात्मा गांधी यांनी घडवून आणलेला भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास याचीच मीमांसा मुख्यत: उपयुक्त ठरते.

महात्मा गांधींनी सत्याग्रहाबद्दल जे विचार मांडले होते, ते तर्कतीर्थांच्या या लेखांशाचा आधार होते. गांधीजींनी स्पष्ट केले होते की, ‘‘सत्याग्रह म्हणजे शुुद्ध आत्मबल होय. जेव्हा ज्या प्रमाणात शस्त्र किंवा शारीरिक बळाची शक्यता असते, तिथे आत्मबलास कमी वाव असतो. सत्याग्रह व बलप्रयोग ही विरोधी तत्त्वे होत. सत्याग्रहाच्या अस्तित्वामुळे हिंसा किंवा बळाच्या विरोधाची जाणीव माणसात निर्माण होते. सत्याग्रह मानवी जीवनातील जिवंत नियम होय. हा नियम योग्य प्रकारे कार्य करेल, जसा गुरुत्वाकर्षणाचा नियम कार्य करतो.’’