तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या जीवनातील शेवटच्या भाषणास ऐतिहासिक संदर्भमूल्य आहे. २० व २१ मे, १९९४ रोजी पारशी जिमखाना, महाबळेश्वर (जि. सातारा) येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने आपल्या कार्यकर्त्यांसाठी द्विदिवसीय राज्यव्यापी चिंतन, प्रशिक्षण शिबीर योजले होते.

या शिबिरात विचार व्यक्त करताना तर्कतीर्थांनी स्पष्ट केले होते की, राज्य कसे असावे, याचा विचार करावा. सत्ता असावी; पण ती तत्त्वनिष्ठांच्या हातात असली पाहिजे. अलीकडे निवडणुकांमध्ये पैशांचा वापर होतो. मतदार पैशांचा वापर करतो, हे फार वाईट आहे. तात्पुरता दीडदमडीचा स्वार्थ आडवा येतो आणि तुम्ही मतदान करता. हे पैशाचे राजकारण बाजूला काढले पाहिजे. त्याकरिता विवेकबुद्धी साफ असली पाहिजे. जीवनामध्ये ध्येयवाद असला पाहिजे. असा ध्येयवाद नसेल, तर आपले जीवन नेहमी कोणत्या तरी पापाने ग्रासले जाईल, म्हणून विवेकभ्रंशाचा धोका संभवतो. तसे होता कामा नये. विवेकबुद्धी चांगली राहावी, राखावी म्हणून उच्च दर्जाचे शिक्षण दिले गेले पाहिजे. उच्च दर्जाचे शिक्षण कसे मिळेल, याचा विचार केला पाहिजे.

आपण लोकशाही स्थापन केलेली आहे. दर पाच वर्षांनी आपण सत्ता बदलतो, हे चांगले आहे. त्यामुळे एकदा सत्तेवर आलेला कायम सत्तेत राहात नाही. पूर्वीची राजेशाही वंशपरंपरागत होती. राजा कसलाही असला, तरी प्रजा तो स्वीकारत असे, तसा काळ आता नाही. हा काळ अधिक चांगला आहे. प्राचीन युगापेक्षा हे युग अधिक चांगले आहे.

दक्षिण आफ्रिकेत नेल्सन मंडेलांचा विजय झाला, ही स्वागतार्ह बाब आहे. आज जो मानवी स्वातंत्र्याचा इतिहास घडत आहे, त्यादृष्टीने हे वर्ष महत्त्वाचे आहे. कृष्णवर्णीयांनासुद्धा मतदानाचा हक्क प्राप्त झाल्याने ही किमया घडली. हेगेल म्हणाला होता की, ‘इतिहासाला मानवी स्वातंत्र्याची प्रेरणा आहे. मानवी मूल्यांची शक्ती विवेकाने भरलेली नि भारलेली असते.’ अलीकडे धर्माचा विचार होऊ लागला आहे. धर्माचे तत्त्व गूढ असते. इस्लामबरोबर आहे की ख्रिास्ती धर्म की हिंदू धर्म, या विचारापेक्षा विवेकाचा विचार खरा विचार आहे. सर्व जाती-धर्मांनी एकत्र यायचे, हा खरा विचार आहे. आज सर्व धर्म, सर्व संस्कृती एकत्र येत आहेत, म्हणून परंपरेची नीट छाननी होणे गरजेचे आहे. तिच्यातले लोकभ्रम आहेत, ते टाकले पाहिजेत. त्यातील संकुचित निष्ठा टाकल्या पाहिजेत, अशा रीतीने विवेकयुक्त जीवन प्रत्येकास जगता आले पाहिजे.

राज्यसत्ता ही तत्त्वनिष्ठांच्या हाती असली पाहिजे. सत्ताधारी तत्त्वभ्रष्ट झाला, तर तो पदभ्रष्ट झाला पाहिजे. भिन्नभिन्न संस्कृती एकत्र येण्याचा हा काळ आहे. हे युग मागील युगापेक्षा वेगळे आहे. ते सर्व मानवी जातींना एकत्र आणणारे आहे. आपल्याला उच्च व उदात्त संस्कृती निर्माण करायची आहे. परंपरागत संस्कृतीचे विसर्जन केले पाहिजे. जातिभेदाची संस्कृती विसर्जित करावी लागेल. जात व्यक्तीला बांधून टाकत आहे. भारतामध्ये जात गेल्या तीन-चार हजार वर्षांत कुठे, केव्हा आणि का टिकली, यावर विचार व्हायला हवा. पूर्वी जातींचे निर्बंध मोडणाऱ्याला बहिष्काराची शिक्षा दिली जात असे. एका जातीतील बहिष्कृतास अन्य जातीही बहिष्कृत मानत. आता जात कायद्याने गेली आहे. फार चांगल्या रीतीने आपण समतेचा नियम अमलात आणत आहोत.

तर्कतीर्थांचे अशाच आशयाचे आणखी एक भाषण आहे. त्याचे शीर्षकच आहे ‘आत्मशुद्धीच्या कामाला लागा’. ते साप्ताहिक ‘साधना’मध्ये २२ जानेवारी, १९४९ रोजी प्रसिद्ध झाले होते. सेनापती बापट यांच्यासारखी मंडळी नवभारताच्या उभारणीचा गंभीर विचार स्वातंत्र्योत्तर काळात करीत होती. त्या वेळी तर्कतीर्थ म्हणत होते की, ‘साऱ्या संस्कृती बहिणी-बहिणी आहेत. संस्कृती भिन्न असल्या तरी त्यांच्यात सुसंवाद निर्माण व्हायला हवा. साऱ्या वाद्यांत आपण मेळ आणतो, साऱ्या सुरांत आणतो, तसेच हे. सांस्कृतिक संवादित्व निर्माण करायचे साधन म्हणजे बुद्धी व आत्मा. हिंदू धर्मात आत्मा जर जागा झाला, तर हे काम तो करू शकेल. त्यासाठी आपण आत्मशुद्धीच्या कामाला लागले पाहिजे.’

drsklawate@gmail.com

Story img Loader