भानुभाई अध्वर्यू हे गुजरातमधील प्रख्यात शिक्षक व पत्रकार. ते तेथील ‘जनसत्ता’ दैनिकात ‘दुनिया: जैसे हमने देखी’ हा स्तंभ लिहीत असत. त्यात ते तेथील वंचित, उपेक्षित, शेतकरी, श्रमजीवी वर्गाच्या प्रश्नांना वाचा फोडत. गुजरातमधील ‘सेंटर फॉर सोशल चेंज अँड अॅक्शन’, ‘गुजरात शेती विकास परिषद’, ‘श्रमजीवी समाज’सारख्या संस्थांनी त्यांच्या कार्याचे स्मरण म्हणून ‘श्री भानुभाई अध्वर्यू स्मारक व्याख्यान श्रेणी’ चालविली होती. ही राष्ट्रीय व्याख्यानमाला होती. भाषणे हिंदी, इंग्रजी, गुजरातीत होत. या व्याख्यान शृंखलेत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे २१ फेब्रुवारी, १९८८ रोजी अहमदाबादमध्ये ‘धर्म व नीती’ या विषयावर हिंदीत भाषण झाले. त्याचे मराठी भाषांतर ‘नवभारत’ मासिकाच्या फेब्रुवारी, १९८८च्या अंकात प्रसिद्ध झाले होते.
यात तर्कतीर्थ म्हणतात, ‘धर्म नाही असा समाज जगात नाही. दळणवळणाची साधने आली. औद्योगिक क्रांती झाली, तरी धर्मसंस्था टिकून आहे. ख्रिाश्चन, इस्लाम, बौद्ध, हिंदू, शिंतो, यहुदी, कन्फ्युशियस, लाओत्से इ. धर्म अद्याप मूळ धरून आहेत. धर्मसंस्थेमुळे समाज वेगळे होतात. राष्ट्रवादामुळे नागरिक इहवादी होतात. आधुनिक वैज्ञानिक व तंत्रज्ञान क्रांतीने जग जवळ आले आहे. आर्थिक व सांस्कृतिक देवाण-घेवाण सुरू झाली आहे. यातून समान संस्कृती उदयाला येत आहे. धर्मनिरपेक्ष संस्कृती त्याचेच उदाहरण होय. नव्या मानवव्यापी संस्कृतीचा विकास होत असून, ती वैश्विक होत आहे. धार्मिक अहंकार व संकीर्णता दूर करणाऱ्या नव्या नीतिशास्त्राची गरज जगास त्यातून वाटू लागली आहे. भाषा मानवास लाभलेली अनुभव देणगी आहे. जगात हजारो भाषा आहेत. भाषांमधील धमदृष्टी व प्रेरणा समान असून, त्यांचे आविष्कार भिन्न आहेत. भाषा, इतिहास, धर्म इ. तत्त्वे परिवर्तनशील होत. अलौकिक शक्तीवर अजून माणसाचा विश्वास आहे. विज्ञान आले तरी तो विश्वास पूर्ण ढळलेला नाही. जीवन परिपूर्ण व कृतार्थ करणारी, हे अपरिपूर्ण, दोषमय, अशांत जीवन बदलून टाकणारी अशी उच्चतम ध्येयाच्या म्हणजे दिव्यत्वाच्या प्राप्तीची पद्धती म्हणजे धर्म होय. ही धारणा समाजात अद्याप टिकून आहे.’

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

जगातील विद्यामान धर्मसंस्था मुख्यत: तीन तत्त्वांवर आधारित आहे. (१) जीवात्म्याचे अमरत्व (जीवाची मरणोत्तर स्थिती), (२) सर्व विश्व निर्माता/शास्ता अर्थात् ईश्वराचे अस्तित्व, (३) मनुष्य आचरणाचे विधिनिषेध. जगातील धर्मतत्त्वे/ आधार एक असून, धर्म वेगळे होत. कारण, त्यांचे विधिनिषेध वेगळे आहेत. प्रत्येक धर्मात ईश्वर असला तरी त्याचे स्वरूप, आराधना, प्राप्ती मार्ग भिन्न आहेत. आधुनिक मानसशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञानींनी धर्माच्या मानसशास्त्रीय स्वरूपाचा अभ्यास केला आहे. फ्राइड, फायरबाख, युंग हे ते मानसशास्त्रज्ञ होत. जगातील सर्व मानवसमुदाय या ना त्या प्रकारे सामाजिक निर्बंधांनी बंदिस्त आहे. धर्म जगण्याची प्रेरणा असल्याचे दिसून आलेले आहे. परंतु, यापुढे सगळ्या राष्ट्रांना आणि समाजांना एकत्र सहकार्याने जगता येईल, सामाजिक समरसता निर्माण होईल, मानवी एकतेचा प्रत्यय येईल, अशा तऱ्हेच्या विवेकबुद्धीला पटणाऱ्या नीतिधर्माच्या योगाने मानव समाजाचे जीवन पृथ्वीतलावर सुसह्य होईल, अशी आता आशा करता येते. कारण, सुधारलेल्या राष्ट्रांची सांस्कृतिक पातळी उदार व एकात्म होत आहे. धर्म विकासाच्या इतिहासात विवेक व बुद्धिप्रामाण्यास बळ मिळणे म्हणजे धर्माचे मूळ नैतिक आचरण पुन:स्थापित होणेच होय. मधल्या काळात चातुर्वर्ण्य, कर्मकांड इत्यादी विविध भेद धर्मात शिरले. त्यांचे प्रस्थ कमी होत जाण्यातून विवेकबुद्धी व नीतिमत्ता यांचे धर्मात पुन्हा अधिष्ठान निर्माण होणे म्हणजे न्याय धर्माची पुन:स्थापना होणे होय.

तर्कतीर्थ त्यांना कळायला लागल्यापासून धर्म व समाज सुधारणांचे समर्थन करत आलेत. हे भाषण गेल्या सहा दशकांच्या त्यांच्या जीवन अनुभव व चिंतनाचे प्रतिबिंब होय. कामविकार, द्वेषबुद्धी, आळस, अस्वस्थता आणि संशय ही पाच अज्ञान कारणे होत. त्यांचा निरास म्हणजे शुद्ध चरित्र व धर्माची खरी निर्मिती मानणारे तर्कतीर्थ भक्तियोगापेक्षा कर्मयोगास महत्त्व देत आल्याने व धर्माचे अंतिम रूप मानव कल्याणी असण्याची त्यांची पक्की धारणा धर्म व नीतीचे अद्वैत अनिवार्य मानते.

drsklawate@gmail.com

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Laxman shastri joshi lecture religion and ethics hindi speech ssb