तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी आपल्या जीवनात आलेल्या राजकारण, समाजकारण, धर्मकारण, इतिहास, शिक्षण, साहित्य, चित्रकला, योग, अध्यात्म, पत्रकारिता क्षेत्रांतील मान्यवरांबद्दल वेळोवेळी सुमारे पन्नासएक व्यक्तिलेख लिहिले आहेत. त्यात सातएक लेख यशवंतराव चव्हाण यांच्याबद्दलचे आहेत. यशवंतराव चव्हाण आणि तर्कतीर्थ यांच्यातील बंध लक्षात घेता, तर्कतीर्थ हे यशवंतराव चव्हाण यांचे ‘राजकीय गुरू’ होत, असे बोलले जाते. हे खरे आहे की, यशवंतराव चव्हाण शाळकरी विद्यार्थी असताना तर्कतीर्थांची भाषणे ऐकून प्रभावित होऊन स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय झाले नि अल्पवयातच त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. स्वातंत्र्य चळवळीचा प्रभाव यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनावर इतका होता की, १९४२च्या ‘भारत छोडो’ आंदोलनाच्या रणधुमाळीत त्यांचा विवाह झाला, तेव्हा त्यांच्या लग्नपत्रिकेच्या शीर्षावर अमुक-तमुक देवता प्रसन्न नसून, ‘वंदे मातरम्’ लिहिले होते. ही लग्नपत्रिका जिज्ञासू यशवंतराव चव्हाण स्मृतिसंग्रहालय, महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक येथे आजही पाहू शकतात.
तर्कतीर्थांच्या लेखी यशवंतराव चव्हाण समतोल, समंजस राज्यकर्ते होते. ते त्यांचे राजकीय सहयात्री होते हे खरे; पण शुद्ध चारित्र्याचा प्रज्ञावंत राजकारणी म्हणून तर्कतीर्थ हे यशवंतराव चव्हाण यांचा आदर करीत. तत्त्वचिंतक राजकारणी म्हणून तर्कतीर्थांना त्यांचे आकर्षण होते. संपन्न व्यक्तिमत्त्वाचा आदर्श म्हणून ते त्यांच्याकडे पाहात. तर्कतीर्थांच्या दृष्टीने यशवंतराव चव्हाण हे आदर्शाच्या प्रकाशात विकसित झालेले व्यक्तिमत्त्व होते. आधुनिक महाराष्ट्राचे स्फूर्तिस्थान म्हणून तर्कतीर्थ हे यशवंतराव चव्हाण यांच्याकडे बघत. या साऱ्या गुणवैशिष्ट्यांची नोंद घेत लिहिलेल्या विविध व्यक्तिलेखांतून जे यशवंतराव चव्हाण आपल्याला दिसतात, त्यापेक्षा त्यांचे कितीतरी वेगळे पैलू तर्कतीर्थांची भाषणे, मुलाखती व पत्रव्यवहारांतून लक्षात येतात. उभयता एकमेकांचे चांगले सुहृद होते. दोघे एकमेकांना ‘प्रिय’ संबोधून पत्र लिहीत. यशवंतराव चव्हाण स्वतंत्र विचारांची व्यक्ती होती. तर्कतीर्थांनी सुचविलेली प्रत्येक गोष्ट त्यांनी शिरोधार्य मानली, असे पत्रव्यवहारातून दिसत नाही. यातूनही तर्कतीर्थ त्यांचे राजकीय गुरू असल्याची वदंता फोल ठरते. उभयता एकमेकांचे स्नेही होते. वयोज्येष्ठ तर्कतीर्थांचा सल्ला यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या जीवनातील बिकट प्रसंगात घेतल्याचे दिसते. एकमेकांशी सल्लामसलत करून उभयता आपले जीवन आक्रमत होते, हेही स्पष्ट होते.
उभयतांमध्ये एका पिढीचे अंतर होते. मुंबई इलाख्याचे तसे ते तिसरे मुख्यमंत्री. परंतु द्वैभाषिक महाराष्ट्र राज्य व स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून भारतीय इतिहासात असलेली त्यांची नोंद यशवंतराव चव्हाण यांना नव्या महाराष्ट्राचे शिल्पकार ठरविण्यास पुरेशी आहे. वयाच्या ४३ व्या वर्षी त्यांना मुख्यमंत्री होता आले, हे त्यांचे खरे राजकीय कर्तृत्व. बहुजन समाजाचे राजकीय धुरीणत्व त्यांच्या रूपाने महाराष्ट्रात स्थापन झाले नि स्थिरावले. सामान्यांच्या कल्याणकारी राज्यपद्धतीची पायाभरणी त्यांनी महाराष्ट्रात केली. मराठी भाषा विकासाची द्रष्टी पावले त्यांनी १९५६ ते १९६२ या आपल्या द्वैभाषिक व स्वतंत्र महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात उचलली. त्याचे फळ मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्तीत आपणास आज पाहावयास मिळते. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी १९६० ते १९८० या काळात महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या माध्यमातून जे वैश्विक अभिजात ग्रंथ मराठीत आणले, त्यातून मराठी अभिजात ज्ञानभाषा होणे शक्य झाले.
यशवंतरावांनी आर्थिक मागास समाजासाठी जी मोफत शिक्षणाची सुविधा केली, त्यातून आजचा सुशिक्षित महाराष्ट्र घडला. परिवहन महामंडळ स्थापनेतून खेड्यापाड्यांत वाहतुकीची सोय झाली. राज्य नियोजन व विकासाचा मानवी चेहरा जपण्याचे त्यांचे द्रष्टेपण अनुकरणीय! तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यापुढे मंत्रीपद, राज्यसभा सदस्यत्व असे पर्याय असताना त्यांनी महाराष्ट्राची ज्ञानसाधना करून महाराष्ट्रीय समाजास ज्ञानसमाज बनविले. उभयतांमुळे महाराष्ट्र पुरोगामी, सुसंस्कृतपणा, आधुनिकतेच्या वाटेवर जाऊ शकला. त्यांनी धर्मकारणास बगल देत संथ परंतु सावध राजकारण, समाजकारण केले, म्हणून तत्कालीन महाराष्ट्र भारतीय प्रजासत्ताकातील प्रगतिशील राज्य म्हणून पुढे आले होते, हे कायमचे लक्षात ठेवले पाहिजे.