तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी रॅडिकल डेमॉक्रॅटिक पक्ष विसर्जनानंतर काँग्रेसच्या स्वातंत्र्योत्तर कालखंडातील नव्या धोरणाकडे आकर्षित झाले. ते काँग्रेसमध्ये पुन्हा सक्रिय होऊन भाषणे देऊ लागले. १९५१-५२ची लोकसभा निवडणूक समोर होती. सातारा काँग्रेसला खंद्या प्रचारकाची गरज होती. १९५२च्या महाराष्ट्र प्रांतिक निवडणुकीत तर्कतीर्थ काँग्रेसचे सदस्य म्हणून निवडले गेले. पुण्यातील काँग्रेस भवनमधील पहिल्या बैठकीत तर्कतीर्थ व्यासपीठावर परंतु मागच्या रांगेत बसले. हे लक्षात येताच यशवंतराव चव्हाण म्हणाले, ‘‘पुढे या, पाठीमागे का?’’ तर्कतीर्थांनी समजाविले, ‘‘मी पाठीशी राहण्याकरताच आलो आहे.’’ हे वाक्य तर्कतीर्थांनी भविष्यात तंतोतंत जपले.

‘माझ्या शब्दात मी’ शीर्षक आत्मपर लेख तर्कतीर्थांनी ‘पाक्षिक रुद्रवाणी’च्या १५ जानेवारी, १९७२च्या अंकात लिहिला आहे. त्यात त्यांनी काँग्रेस प्रवेशविषयक आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, ‘‘१९३० सालापासून मी राजकारणाच्या रिंगणात उतरलो. त्या वर्तुळातून कधीच बाहेर पडू शकलो नाही. मी १९३५ सालापासून मार्क्सवाद व रॉयवाद यांचा अभ्यास करू लागलो व जागतिक साम्यवादी क्रांतीचा उपासक बनलो. १९४० साली काँग्रेसमधून बाहेर पडलो, त्यावेळी दुसरे जागतिक महायुद्ध सुरू झाले. जागतिक क्रांतिकारक एम. एन. रॉय यांची विचारसरणी मला मान्य झाली होती. त्यामुळे हे युद्ध फॅसिझम विरुद्ध लोकशाही, अशा स्वरूपाचे असल्याने या युद्धास पाठिंबा दिला पाहिजे, असे माझे मत बनले. मी रॉयवादी बनल्यामुळे महात्मा गांधी व माझा जो जिव्हाळ्याचा संबंध अनेक वर्षे होता, तो तुटला. त्यामुळे माझे मन व्यथित झाले. विचार व आध्यात्मिक भावना यांचा संग्राम झाला. विचाराची बाजू मी पकडली. बुद्धिवाद आणि आध्यात्मिक अनुभव, त्यांचा अंतर्विरोध मिटणे अशक्य असते. माझ्याबाबतीत अजून मिटला नाही.

‘‘१९५० साली मी पुन्हा काँग्रेस प्रवेश केला. किसनवीर व विशेषत: यशवंतराव चव्हाण यांच्याशी माझा स्नेहबंध १९३० पासूनचा. या मित्रमंडळींच्या ध्येयवादी निष्ठेचा कस अनेक वेळा लागलेला असल्याने मी त्यांच्याबरोबरच सहकार्य करण्याचे ठरविले. राजकीय लोकशाहीच्या अधिष्ठानावर झालेली समाजवादी क्रांतीच अंतिम साम्यवादाकडे द्रुतगतीने यात्रा करू शकते, अशी धारणा झाल्यामुळेच भारतीय लोकशाहीचा पाया घालणाऱ्या काँग्रेसमध्ये जाणे हे मला प्राप्त कर्तव्य वाटते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत यशवंतराव चव्हाण यांचे व माझे विचार-आचार समान होते, म्हणून त्यांचा नि माझा स्नेहसंबंध घट्ट झाला.

‘‘भारतात समाजवादी क्रांती होऊन तिचे साधन म्हणून काँग्रेसचा उपयोग होईल काय, या प्रश्नाचे उत्तर बुद्धिवादाने देणे कठीण आहे. साम्यवादी पक्षांनी रशियात, पूर्व युरोपात आणि चीनमध्ये तथाकथित साम्यवादी क्रांती केली आहे. परंतु, व्यक्तिस्वातंत्र्यावर आधारलेला समाजवाद व साम्यवाद तेथे उभारला जात आहे काय, या प्रश्नाचे होकारार्थी उत्तर मिळत नाही. बंधमुक्त मानवाचे साम्यवादी जग हा आदर्श पृथ्वीपासून, मानवी जगापासून अनंत अंतरावर असलेला दिसतो. बलाढ्य राजकीय सत्तांच्या बंधनात मानवसमाज अडकून पडला आहे. तो आदर्श अंतिम नैतिक ध्येय आहे. हे ध्येय महात्मा गांधी, योगी अरविंद घोष व एम. एन. रॉय यांनी आपापल्या विशिष्ट शब्दावलीत प्रकट केले आहे. या ध्येयाकडे जाणारी माणसे नैतिक स्वातंत्र्याच्या निष्ठेची पाहिजेत. नैतिक स्वातंत्र्यनिष्ठा ही ऐहिक सत्ता व संपत्ती यांच्या भोगवासनेपासून मुक्त असलेल्या मानवालाच लाभते.

‘‘माझी जीवनदृष्टी ही बुद्धिवाद व आध्यात्मिक अनुभववाद यांनी घडलेली आहे. आधुनिक विज्ञाने ही बुद्धिवादावर अधिष्ठित आहेत. इंद्रियांनी येणारे अनुभव या बुद्धिवादाचा आधार आहे व तर्कशुद्ध विचार हे तिचे स्वरूप आहे. आत्मा, परमात्मा, अमरत्व इत्यादी वैज्ञानिक दृष्टीचे विषय नव्हेत. हे अध्यात्मदृष्टीचे विषय आहेत. आध्यात्मिक अनुभव शब्दाने व वाक्याने सांगता येत नाही, तो सूचित होतो. तो अनुभव अनिर्वचनीय आहे. वैषयिक वासनेतून मुक्त मनालाच आध्यात्मिक अनुभव येण्याची शक्यता आहे. परंतु, हे विधानसुद्धा बुद्धिवादाच्या दृष्टीने विवाद्या ठरते. बुद्धिवादाला विवाद्या काय नाही? नैतिकदृष्ट्या नैतिक आत्मस्वातंत्र्य ज्याला प्राप्त झाले, त्यालाच आध्यात्मिक अनुभवाची पात्रता येते.’’

drsklawate@gmail.com

Story img Loader