कारण न देता सभागृह तहकूब केल्याचा मुद्दा अडचणीचा ठरतोय हे लक्षात येताच पक्षाच्या चाणक्य मंडळाची बैठक तातडीने बोलावण्यात आली. प्रश्न सभागृहाचा असल्याने अध्यक्षांनासुद्धा निरोप दिला गेला. तो मिळताच धावतपळतच ते हजर झाले. याचे मूळ आहे ते विरोधी पक्षनेता अथवा सदस्यांचे अशोभनीय वर्तन. त्याची नवीन नियमावली तयार करण्याचे काम लगेच हाती घेण्यात आले. सध्या सर्वत्र नारदासारखा संचार करणाऱ्या आयटीच्या प्रमुखाने स्वत:च तयार करून आणलेला मजकूर वाचायला लगेच सुरुवातसुद्धा केली. ‘काही विरोधक सभागृहाच्या आत व आवारात सुरू असलेल्या सरकारी प्रक्षेपणाचा आधार घेऊन आपण किती प्रेमळ आहोत, बहिणीची किती काळजी घेतो अशी प्रतिमा जनमानसावर ठसवण्याचा प्रयत्न करत आहेत. ही चलाखी वेळीच लक्षात आल्याने अध्यक्षांना तहकुबीची कृती करावी लागली.
या माध्यमातून प्रचार करण्याचा मक्ता केवळ आपलाच व त्यातल्या त्यात विश्वगुरूंचा आहे. त्यावर अतिक्रमण होत असल्याचे लक्षात आल्याने आता सभागृहात कुणीही कुणाला मिठी मारणार नाही असा नियम करायला हवा. याशिवाय कुणाला कुणाची विचारपूस करायची असेल तर दोन फुटाचे अंतर राखूनच ती करावी लागेल. त्यांच्यातले नाते कोणतेही असो, जवळ जात, हनुवटीला हात लावत विचारपूस करणे अशोभनीय समजले जाईल. एकमेकांशी हितगूज करताना दाढीला हात लावता येणार नाही. सदस्यांचे एकमेकांशी असलेले नाते वैयक्तिक पातळीवर जोपासावे, त्यासाठी सभागृहाचा वापर करणे नियमभंग ठरवला जाईल. नात्याची प्रतिष्ठा जपणे सभागृहाची अप्रतिष्ठा समजली जाईल. सभागृहात डोळा मारता येणार नाही. डोळ्यांना काही झाले असेल तर ते मिचकावता येतील पण अध्यक्षांनी विचारले तर तसे सबळ कारण द्यावे लागेल. सभागृह सुरू असताना एकमेकांच्या कानाला लागणे गैरवर्तन समजले जाईल. वैयक्तिक भावभावनांचा आधार घेत प्रतिमासंवर्धनाचा कुठलाही प्रयत्न हा नियमभंगाचाच प्रकार समजला जाईल. सदस्यांना एकमेकांशी हस्तांदोलन करता येईल पण मिठी मारता येणार नाही.
सभागृहाचे सदस्य हे सार्वजनिक जीवनात वावरणारे म्हणून ओळखले जातात. त्यामुळे केवळ सभागृहच नाही तर बाहेरही त्यांचे वर्तन सभागृहाच्या नियमानुसारच असायला हवे. त्यामुळे बाहेर कुणी काही अशिष्ट वागले तर त्याची दखल घेत सभागृह तहकूब करण्याचा अधिकार अध्यक्षांना असेल. ही दखल घेण्यासाठी वेळेचे कोणतेही बंधन अध्यक्षांवर नसेल. सभागृह हे भावा-बहिणींचे, पती-पत्नीचे प्रेम ऊतू जाण्याची जागा नाही याचे भान प्रत्येक सदस्याला ठेवावे लागेल. अशा नाजूक मुद्द्यावरून काही गैरवर्तनाचा प्रकार उघडकीस आला तर विरोधी पक्षनेत्याला बोलू न देण्याचा अंतिम अधिकार केवळ आणि केवळ अध्यक्षांकडे असेल. त्यावर कुणालाही आक्षेप नोंदवता येणार नाही.’ एवढे वाचून दमलेले आयटीवाले थांबले तसे उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या. मग अध्यक्षांनी एक शंका उपस्थित केली. नियमाप्रमाणे हे वर्तनप्रारूप विरोधकांकडे पाठवावे लागेल. ते मंजूर करतील काय? त्यावर सर्वांनी पाठवून तर द्या, पुढे काय करायचे ते बघू असे म्हटल्यावर लगेच एका दूताला धाडण्याचा निर्णय झाला. तो दोन तासातच परतला व विरोधकांनी सुचवलेले मुद्दे सांगू लागला. ‘विश्वगुरूंचे भाषण सुरू असताना अध्यक्षांना त्यांचा चेहरा स्थिर ठेवावा लागेल. विश्वगुरूंना लवून नमस्कार करण्याची पद्धतसुद्धा गैरवर्तन समजले जाईल.’ हे मुद्दे यात समाविष्ट करावेत की नाही यावरून बैठकीत जी घनघोर चर्चा सुरू झाली ती थांबायचे नाव घेईना!