सचिन रोहेकर

व्यवस्थापनशास्त्रात ‘लीडर’ हा अत्यंत पावन शब्द ठरतो. त्यावर या क्षेत्रात विपुल साहित्य, ग्रंथसंपदाही उपलब्ध आहे. अग्रणी, नायक, कर्णधार, सेनापती, पुढारी, नेता असे लीडरला वापरात असलेले पर्यायी शब्द. जे सूचित करतात की नायक नेहमी बिनीला राहून त्याच्या तुकडीचे नेतृत्व करीत असतो. सेनापतीने अग्रभागी राहून सैनिकांची ढाल व्हावे आणि त्यायोगे त्यांना लढाईला प्रेरित करावे, असे सामरिकशास्त्रही सांगते. पण या रुळलेल्या धारणेच्या विपरीत, तुकडीच्या पाठीमागे राहून तिचे नेतृत्व करण्याच्या शैली आणि तंत्राला अलीकडे वजन मिळताना दिसत आहे. ही वेगळी वाटच आपल्या व्यापार-व्यवसाय संस्कृतीसाठी सुयोग्य प्रारूप ठरेल, असे तब्बल पाच दशकांची यशसिद्ध उद्यम कारकीर्द असलेले रवी कांत त्यांच्या ‘लीडिंग फ्रॉम द बॅक टू अचीव्ह द इम्पॉसिबल’ या पुस्तकातून मांडतात.

Maharashtra Growth Momentum Fadnavis Updates at NITI Aayog
राज्याच्या विकासाचा वेग कायम राखण्यासाठी आराखडा महत्वाचा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Udayanraje Bhosale angry on actor rahul solapurkar
“… त्याला गोळ्या घातल्या पाहिजेत”, राहुल सोलापूरकरच्या विधानावार खासदार उदयनराजे भोसलेंची संतप्त प्रतिक्रिया
upsc exam preparation tips in marathi
यूपीएससीची  तयारी : पदांचा पसंतीक्रम
Viral Video Of Desi Jugaad
कामगाराला बाहेर काढण्यासाठी लावलं भन्नाट डोकं; Video तील जुगाड पाहून तुम्हीही म्हणाल, ‘चुकूनही देशाबाहेर… ‘
Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
Demolition drive against illegal chawls in Titwala-Manda
टिटवाळा-मांडामध्ये बेकायदा चाळींच्या विरुध्द तोडकामाची मोहीम
Sanjay raut on all part mps meeting
खासदारांच्या बैठकीला मुहूर्तच मिळेना; नवीन खासदारांची एकही बैठक नाही

‘टाटा मोटर्स’चे तब्बल १५ वर्षे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक असलेले कांत यांना या कामी हॅरी पॉल आणि रॉस रेक यांचे लेखनसाहाय्य लाभले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे परस्परांना प्रत्यक्ष भेटणे अवघड ठरलेल्या करोना टाळेबंदीच्या काळात हा लेखनप्रपंच या त्रयींनी झूमसारख्या दूरसंप्रेषण व्यासपीठाचा वापर करून पूर्ण केला आहे.

हेही वाचा >>> खेळ, खेळी खेळिया: पाकिस्तान : क्रिकेटग्रस्त, भारतग्रस्त संस्कृती!

एक व्यवस्थापक त्याच्या कामात कितीही हुन्नरी असला तरी तो प्रवीण नेता बनेलच असे सांगता येत नाही. नेता, कर्णधार चांगला असणे म्हणजे काय? तर तो एक तर यशस्वी असावा. त्याच्या यशाचे परिमाण हे की, अशक्यप्राय भासणाऱ्या प्रसंगातून शक्यतेचा मार्ग सुकर करणारा असावा. सर्वात मुख्य म्हणजे यशस्वी नेत्याने चांगल्या लोकांचा संघ निवडावा. त्यांना घेऊन त्याला मजबूत संघटना बांधता यायला हवी. कोणतेही जडजंबाळ सिद्धांत आणि व्यवस्थापनशास्त्रातील पुस्तकी धडे न गिरवता या पुस्तकातून आपल्यापुढे उमद्या नेत्याची मानके आणि नेता घडविला जाण्याच्या पायऱ्या आणि निकष उलगडत जातात.

पुण्यातील एका बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपनीत, त्या कंपनीचा कधी तरी ‘सीईओ’ होईन अशा महत्त्वाकांक्षेने दाखल झालेल्या शिव कुंद्रा नावाच्या नवपदवीधर अभियंत्याची ही खरे तर गोष्ट आहे. तेजस्वी, उत्साही, हरहुन्नरी शिवचा लौकिकच असा की, नेमून दिलेल्या प्रकल्पांना तो अपेक्षेपेक्षा सरस परिणामांसह व ठरलेल्या वेळेआधीच पूर्ण करत असे. यातून मोठय़ा व्यापाची, तुलनेने मोठी आर्थिक आणि कार्मिक गुंतवणूक असलेली कामे त्याला सोपवली गेली. तथापि हाताखालील प्रत्येक घटकावर नियंत्रण ठेवण्याची आणि त्यांच्या प्रत्येकाच्या हालचालींवर बारीक लक्ष केंद्रित करण्याची त्याची ‘लीिडग फ्रॉम फ्रंट’ धाटणीची व्यवस्थापन शैली आडवी आली. त्यातच तो इतका गुरफटत गेला की, प्रकल्प नियोजित वेळेपेक्षा खूप मागे पडत गेले आणि अंदाजापेक्षा जास्त खर्चीक होत गेले. शिवच्या पुढारपणात आवश्यक असलेल्या दुरुस्त्या, फेरबदलांचे त्याच्या हितचिंतकांच्या साथीने सुरू झालेले प्रयत्न हे या पुस्तकाचे कथासार आहे.

हेही वाचा >>> अन्वयार्थ : ‘वाचन-प्रेरणे’ची कप्पेबंदी..

देव शर्मा (खरे तर स्वत: लेखक रवी कांतच म्हणा!) यांच्यासारख्या अनुभवी प्रशिक्षकांच्या मदतीने मानसिक, भावनिक अडथळे पार करून आणि काही नवीन युक्त्या शिकून घेत, शिव कुंद्राकडून पाठीशी राहून नेतृत्व करण्याच्या शैलीचे धडे गिरवले जातात. आठवडाभराच्या या संवादरूपी प्रशिक्षणातून जे शिकून घेतले त्याची अंमलबजावणी शिव त्याच्या प्रकल्प आणि संघात करून पाहतो आणि जे शक्य होईलसे वाटत नव्हते ते घडतानाही दिसून आले.

कथा किंबहुना बोधकथेचे रूप, पण व्यावहारिक जगतातील अस्सल उदाहरणांची जोड देऊन झालेली मांडणी, ही या पुस्तकाची अजोड बाब ठरते. त्यामुळे सुबोधतेचा गुण त्यात आपोआपच उतरला आहे. करिअरच्या प्रवासात मध्यावर अडकलेली गाडी पुन्हा रुळावर आणून वेग पकडायची झाल्यास या पुस्तकाच्या वाचनासाठी दिलेला दोन-अडीच तासांचा वेळ आयुष्यभरासाठी कारणी लागलेला दिसून येईल. केवळ उद्योजक-व्यावसायिकांनाच नव्हे, तर राजकारण, समाजकारण, संस्थाकारणात गुंतलेल्यांनाही व्यवस्थापक वा कार्यकर्त्यांतून नेते घडवण्यासाठी हे पुस्तक नक्कीच उपयुक्त ठरेल.

‘लीडिंग फ्रॉम द बॅक टू अचीव्ह द इम्पॉसिबल’

लेखक : रवी कांत, हॅरी पॉल, रॉस रेक

पेंग्विन बिझनेस, पृ. : १५०,

किंमत – २९९ रुपये

sachin.rohekar@expressindia.com

Story img Loader