जन्म सिमल्याचा, नृत्यशिक्षण मद्रास (तेव्हाचे नाव) जवळच्या अड्यारमधल्या ‘कलाक्षेत्रा’त, उमेदीची कारकीर्द ‘बनारस हिंदू विद्यापीठा’त आणि तिथून बडोदे इथल्या महाराजा सयाजीराव विद्यापीठात वरिष्ठपद स्वीकारून निवृत्ती… शिवाय भरतनाट्यमच्या कार्यक्रमांनिमित्ताने देशभर आणि जगभर प्रवास अशा कोणत्याही, कितीही ठिकाणी जावे लागले तरी सी. व्ही. चंद्रशेखर हे भरतनाट्यममध्ये पूर्णत: स्थिरावले होते. भरतनाट्यम हाच अभिव्यक्तीचा, अभ्यासाचा, शिकवण्याचा आणि प्रयोग करण्याचा विषय. पत्नी जया यांच्यासह १९५० च्या दशकापासून ते भरतनाट्यमचे सादरीकरण करत; त्यात नंतर दोन मुलींची आणि अलीकडच्या दोन दशकांत नातवंडांची भर पडली. या चंद्रशेखर कुटुंबाने चेन्नईला येऊन मग ‘नृत्यश्री’ ही संस्था काढली, तिथेच नव्वदाव्या वर्षात पदार्पण केल्यानंतर त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
हेही वाचा >>> व्यक्तिवेध : डोनाल्ड सदरलॅण्ड
वडील ब्रिटिश काळातले सरकारी अधिकारी, पण त्यांना कर्नाटक संगीताची निष्ठापूर्वक आवड असल्याने त्यांनी मुलाचा कल जाणून, रुक्मिणीदेवी अरुंडेल यांच्या ‘कलाक्षेत्रा’त संगीत शिकण्यासाठी चंद्रशेखर यांना पाठवले. तिथे दहा वर्षांच्या चंद्रशेखर यांना खुद्द रुक्मिणीदेवींनी ‘भरतनाट्यम शीक उद्यापासून’ असे फर्मावले आणि भरतनाट्यमला आजचे रूप देणाऱ्या त्या संस्थेत चंद्रशेखर संगीतासह नृत्यही शिकू लागले. त्या गुरूंची आठवण चंद्रशेखर प्रत्येक मुलाखतीत काढत. मात्र ‘त्यांनी शिकवले तेच खरे’ असा आग्रह त्यांनी कधीही धरला नाही. उलट, नवे प्रयोग केले पाहिजेत- त्यासाठी वाचन वाढवले पाहिजे आणि अन्य कलाप्रकारांत काय चालले आहे हेही पाहिले पाहिजे, अशी शिकवण त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. हे सारे कशासाठी करायचे? यावर ‘सीव्हीसी सर’ म्हणून विद्यार्थीप्रिय असलेल्या चंद्रशेखरांचे उत्तर, ‘‘सादरीकरणासाठी नव्हे, नृत्यप्रकार अभिजातही राहावा आणि आजचाही असावा यासाठी’’ असे असायचे. जया आणि चंद्रशेखर हे पहिले नृत्य-दाम्पत्य. पण त्यांच्यानंतर लगेच व्ही.पी. आणि शांता धनंजयन भरतनाट्यम सादर करू लागले, अधिक प्रसिद्धीही त्यांना मिळाली आणि चंद्रशेखर विद्यार्थ्यांत रमले. पण अभिनय, ‘टायमिंग’चे भान यांसाठी चंद्रशेखर आजही रसिक/समीक्षकांच्या स्मरणात राहतील. कलानैपुण्यासाठी त्यांना १९९३ (बडोदे येथून निवृत्तीनंतर!) दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळाला, तर २००८ मध्ये मध्य प्रदेशचा ‘कालिदास सम्मान’ आणि २०११ मध्ये ते ‘पद्माभूषण’चे मानकरी ठरले. सादरीकरणाने कला लोकांपर्यंत पोहोचते; पण निरपेक्ष रियाझाविना ती तुमच्यापर्यंत (स्वत: कलाकारापर्यंत) पोहोचू शकत नाही, हा त्यांनी कृतीतून दिलेला गुरुमंत्र आता मागे उरला आहे.