दूरचित्रवाणी हे संवाद-संज्ञापनाचे माध्यम म्हणून पहिल्यांदा खऱ्या अर्थाने विकसित झालेल्या अमेरिकेसारख्या प्रगल्भ लोकशाही देशाला दूरचित्रवाणी मुलाखतकारांची, संवादकांची, सादरकर्त्यांची समृद्ध परंपरा लाभली आहे. दूरचित्रवाणी पत्रकारिता हे क्षेत्र हे इतर अनेक क्षेत्रांप्रमाणे टप्प्याटप्प्याने उत्क्रांत होत गेले. प्रस्थापितांच्या मक्तेदारीभंजनाचे काही ठळक टप्पे या प्रवासात आढळून येतात. प्रसिद्ध संवादक आणि मुलाखतकार बार्बारा वॉल्टर्स या टप्प्याच्या निव्वळ साक्षीदारच नव्हे, तर सहभागीदारही. १९६०च्या दशकात पुरुष संवादकांचे अनभिषिक्त साम्राज्य असलेल्या काळात या बाईंनी जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर स्वत:चे स्वतंत्र स्थान निर्माण केले. कित्येक वर्षे अवमान आणि अन्याय सोसूनही त्यापासून पलायन न करता, प्रस्थापितांनाच प्रवाह बदलण्यास भाग पाडले. नुकताच ९३ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला, पण त्याच्या कितीतरी आधी बार्बारा वॉल्टर्स दंतकथा बनल्या.
बॉस्टनमध्ये सेलेब्रिटी संपर्कदूत असलेल्या पित्याच्या घरात त्यांचा जन्म झाला. त्या क्षेत्रातील अस्थैर्याचे चटके सुरुवातीला बार्बारा यांनाही बसले. बीए ही पदवी मोठय़ा कष्टाने संपादित केल्यानंतर त्यांनी सुरुवातीला जनसंपर्क क्षेत्रात काम केले. लेखनकौशल्याच्या जोरावर त्यांना ‘एनबीसी’ वाहिनीच्या ‘टुडे’ या कार्यक्रमात संधी मिळाली. तेथे सुरुवातीला संहिता लेखन, मग कार्यक्रमनिर्मिती असे टप्पे ओलांडत बार्बारा यांचा प्रवास सुरू झाला. ‘टुडे’ कार्यक्रमात त्या सातत्याने झळकू लागल्या. त्या वाहिनीवरील प्रमुख सादरकर्ते फ्रँक मॅकगी यांच्याकडून त्यांना सातत्याने विरोध व्हायचा. परंतु निराश न होता आत्मविश्वासाने त्यांनी जम बसवला. १३ वर्षांनी त्यावेळच्या विक्रमी १० लाख डॉलर पगारावर ‘एबीसी’ या प्रतिस्पर्धी वृत्तवाहिनीने त्यांना करारबद्ध केले. येथे सायंकाळच्या वृत्तविषयक कार्यक्रमात झळकणाऱ्या त्या पहिल्या महिला सादरकर्त्यां ठरल्या. याही ठिकाणी त्यांचे सहयोगी हॅरी रिझनर यांनी त्यांचा अपमान जाहीरपणे करण्याची एकही संधी सोडली नाही.
पुढे सादरकर्ती आणि पत्रकार यापेक्षाही मुलाखतकार म्हणून बार्बारा नावारूपाला आल्या. फिडेल कॅस्ट्रो, यासर अराफात, मार्गारेट थॅचर, मोहमार गडाफी, सद्दाम हुसेन, बोरिस येल्त्सिन, मोरारजी देसाई, व्लादिमीर पुतिन, अन्वर सादात अशा अनेक नेत्यांच्या मुलाखती त्यांनी घेतल्या. रिचर्ड निक्सन ते डोनाल्ड ट्रम्प अशा सर्व अध्यक्षांनी त्यांच्या कार्यक्रमात सपत्नीक हजेरी लावली. मायकेल जॅक्सन, मोनिका ल्युइन्स्की अशा सेलेब्रिटींनाही त्यांनी बोलते केले.
‘र’ आणि ‘ल’ स्पष्टपणे उच्चारता येत नसल्याबद्दल त्यांची अनेकदा टिंगल केली गेली. मुलाखतींच्या वेळी बार्बारा फारच भावुक आणि खासगी प्रश्न विचारतात, अशीही टीका झाली. पण बार्बारा वॉल्टर्सनी सतत त्यांना योग्य वाटते, तेच केले. मुलाखत घेणाऱ्याने नेहमीच स्वत:ची शैली आणि विचारसरणी याविषयी १०० टक्के आश्वस्त असावे, हे तत्त्व त्यांनी काटेकोरपणे पाळले.