‘गुड्डी’ चित्रपटातील ‘बोल रे पपीहरा’ हे गीत गाणाऱ्या किंवा पं. कुमार गंधर्व यांच्यासारख्या दिग्गजाबरोबर गायलेले ‘ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी’ हे भावगीत गाणाऱ्या कलावती एवढी ओळखही पुरेशी असणाऱ्या वाणी जयराम यांनी भारतीय चित्रपट आणि ललित संगीताच्या क्षेत्रात केलेले काम सहसा कुणाच्या लक्षात येत नाही. परंतु आपल्या आवाजाने अतिशय स्पर्धेच्या जगातही स्वतंत्र ओळख निर्माण करणारी गायिका म्हणून त्यांचे नाव घ्यावेच लागेल. विवाहानंतर मुंबईत येऊन स्थायिक झाल्यानंतर हिंदी चित्रपटांच्या दुनियेला आवाजाच्या एका नव्या पोताची ओळख झाली. ज्या संगीतकारांना ते समजून आले, अशा वसंत देसाई यांच्यासारख्यांनी त्याचा अतिशय सुंदर उपयोग करून घेतला.
‘हमको मन की शक्ती देना’ या प्रार्थनागीताने त्यांची ओळख घराघरांत पोहोचली आणि वाणी जयराम हे नाव झळकायला लागले. पतियाळा घराण्याची रीतसर तालीम घेऊनही त्यांनी ललित संगीताची वाट धरली आणि त्यामध्ये तेलगू, तमीळ, मल्याळम, कन्नड या भाषांतील सुमारे एक हजार चित्रपटांसाठी पार्श्वगायनकेले. तेथील त्यांची कामगिरी अतिशय लक्षणीय ठरली, याचे भान मराठी रसिकांना असणे शक्य नसले, तरी त्यांनाही, भावगीताच्या विश्वात रममाण करण्याचे काम वाणी जयराम यांनी केलेच. एकोणीस भाषांमध्ये गायलेली दहा हजारांहून अधिक चित्रपट गीते, हजारो भक्तिगीते, स्वतंत्रपणे गायलेली गीते, सर्वोत्कृष्ट गायनासाठी तीन वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, आंध्र प्रदेश, ओडिशा, तमिळनाडू आणि गुजरात या राज्यांचे पुरस्कार आणि २०१७मध्ये ‘नाफा’चा न्यूयॉर्कमध्ये मिळालेला सन्मान, अशी त्यांची देदीप्यमान कारकीर्द. मुंबईत वास्तव्यास असूनही महाराष्ट्राने त्यांना जाहीरपणे गौरविण्यात कसूरच केली. तमिळनाडूत जन्मलेल्या वाणी जयराम यांना लहान वयातच मुथुस्वामी दीक्षितार यांच्या रचनांचे आणि नंतर कर्नाटक संगीताचे रीतसर शिक्षण मिळाले.
विवाहानंतर त्या मुंबईत वास्तव्यास आल्या आणि त्यांनी पतियाळा घराण्याची तालीम घेतली. सुरेल गळय़ाबरोबरच भाव व्यक्त करण्याची त्यांची शैली लक्षात राहणारी ठरली. संगीतातून आपले मन कसे व्यक्त करता येते, याचा तो एक वस्तुपाठच ठरला. मराठीमध्ये त्यांनी गायलेल्या गीतांची संख्या डझनभर असेल. ‘उठा उठा हो सूर्यनारायण’, ‘सुखाचे हे सुख श्रीहरी’, ‘टप टप पडती अंगावरती’ यासारख्या गाण्यांनी त्यांची ओळख अधिक गडद झाली, मात्र दक्षिणेतील भाषांमध्ये त्यांचा जेवढा बोलबाला झाला, तेवढा उत्तरेत झाला नाही, हेही खरे. ‘पाकीजा’ चित्रपटातील नौशाद यांची संगीत रचना असो, की मदनमोहन यांच्या ‘एक मुठ्ठी आसमान’ या चित्रपटातील किशोर कुमार यांच्याबरोबरचे युगुल गीत किंवा ओ. पी. नय्यर आणि जयदेव यांच्यासारख्या संगीतकारांच्या रचना असोत, वाणी जयराम यांनी त्या प्रत्येक गीताला न्याय दिला. पं. रविशंकर यांच्यासारख्या तरल कलावंतालाही ‘मीरा’ या चित्रपटासाठी ‘मेरे तो गिरधर गोपाल’ या गीताबरोबरच बारा भजने वाणी जयराम यांच्याकडून गाऊन घेण्याचा मोह झाला, यातच त्यांच्या श्रेष्ठतेचे गमक दडलेले आहे. गेल्याच आठवडय़ात त्यांना मिळालेल्या पद्म पुरस्काराने आनंदित झालेल्या त्यांच्या चाहत्यांसाठी, त्यानंतर लगेच झालेले त्यांचे निधन ही एक अतिशय वेदनादायी घटना ठरते.