गिरीश कुबेर
फ्रान्सचे धडे – २
फुलझाडांच्या एका रांगेची सुरुवात गुलाबी फुलांची, पण या रंगात असा अलगद बदल होत होत याच रांगेतल्या शेवटच्या झाडांवरची फुलं हलक्या जांभळय़ा रंगाची! एखादी रागमालाच. तोडीत सुरू होऊन मुलतानीपर्यंत गेलेली..
परिकथेत पाहिलेलं असेल असं घर. त्याकडे जाणारी सुगंधी पायवाट. समोर तळं. आणि त्या सगळय़ाला कवेत घेणारे कोटी कोटी फुलांचे ताटवे..
हे गिव्हर्नी नावाच्या चिमुकल्या गावातलं चित्र. पॅरिसला स्पर्श करून ‘आमचा फ्रान्स झाला’ अशी द्वाही फिरवणाऱ्यांच्या साइटसीइंगच्या वाटेत हे गाव लागत नाही. पॅरिसपासनं साधारण ऐंशी किलोमीटरवर आहे हे गाव. रेल्वेनं गेलं तर जेमतेम पाऊण तास. आपल्या बोरीबंदरपेक्षा सुमारे तिप्पट अशा सेंट लझारे स्थानकातनं गिव्हर्नीला जायला दिवसभरात वीसेक गाडय़ा असतील. तर ही गाडी पकडून उतरायचं व्हऱ्नॉन इथं. आपल्याला धक्का बसायला सुरुवात होते ती या व्हऱ्नॉनपासूनच. गिव्हर्नीला जाण्यासाठीच या गाडीतनं शब्दश: शेकडो जण आलेले असतात. हातात चित्रकलेच्या वह्या. स्केचबुक्स. वनस्पतीशास्त्राची पुस्तकं. कॅमेरे. वगैरे वगैरे. बहुतांश सगळे गोरे किंवा कोरियन. आमच्या वेळी तर आम्ही चौघे सोडलो तर भारतीय औषधालाही नव्हता. अर्थात त्यांची उणीव वगैरे भासण्याचा प्रश्न नव्हता. पण ते जाणवलं इतकंच.
तर व्हऱ्नॉन या गावची लोकसंख्या हजारभरही असेल-नसेल. स्टेशनसमोर दिसत होता तितकाच काय तो गावाचा परिसर. एक गोंडस बार होता. स्टेशनसमोर. गावातल्या ज्येष्ठ नागरिकांचा पुंजका जमलेला. त्या बारचीच एक बेकरी. ताज्या पावाचा खमंग वास त्या झोपाळलेल्या वातावरणात तरतरी आणत होता. शेजारी सायकली भाडय़ानं देणारं एक दुकान. एक केशकर्तनालय. नंतर औषधांचं दुकान. की मग संपलं. स्टेशनसमोरचा.. म्हणजे गावातला सगळय़ात मुख्य म्हणता येईल असा हा मुख्य रस्ता रुंदीला जेमतेम पाच-सहा फूट असेल. पण त्यालाही झेब्रा क्रॉसिंग. बुटक्या खांबांवरचे ट्रॅफिक सिग्नल्स आणि लुटुपुटुच्या वाटणाऱ्या या व्यवस्थेला गांभीर्यानं घेणारे. त्यातले बरेचसे वृद्धच. या गावात जे कोणी येतात ते गिव्हर्नीसाठीच हे सगळय़ांना माहीत. त्यामुळे रेल्वेतनं उतरलेल्या या समुदायामुळे गावची शांतता डहुळली गेली तरी स्थानिक काही चिडत नाहीत. या दुकानांच्या पलीकडे गिव्हर्नीला घेऊन जाणारी बस उभी असते. ती फुकट. पण शेजारी फुलराणीसारख्या उघडय़ा मोटारीतनंही जायचा पर्याय असतो. त्यासाठी जाऊन-येऊन १० युरो मोजावे लागतात. वातावरण असं की बसच्या ‘मोफत मोहा’वर सहज मात व्हावी. फुलोत्सवात सहभागी व्हायला वाहनही फुलराणीचं हवं. तीत बसून अवघ्या दोनपाच मिनिटांत व्हऱ्नॉन मागे टाकून आपण कंट्रीसाइडच्या (या कंट्रीसाइडला ‘ग्रामीण’ हा प्रतिशब्द काही योग्य नाही. या शब्दाला दारिद्रय़ाचं अदृश्य अस्तर आहे. असो) एका पायवाटेला लागतो.
..आणि हरखून जायला सुरुवात होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना लाल-भडक पॉपीची फुलंच फुलं. एका गवताच्या कांडीवर एकच फूल. त्याला तीन पाकळय़ा. त्या इतक्या तलम की त्यातनं येणारी सकाळच्या सूर्याची किरणंही लाजून लाल होऊन बाहेर पडत होती. जिथे पॉपी नव्हती तिथं रानफुलं. तेजस्वी पिवळय़ा रंगातली. त्या फुलझाडाचं नाव काय.. असं गाडी थांबल्यावर फुलराणी चालवणाऱ्या आजीबाईंना विचारलं तर मोडक्या इंग्रजीत त्या म्हणाल्या. नो नेम. वाइल्ड. रानटी फुलंही इतकी सुंदर फक्त युरोपातच आढळतील. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना टुमदार घरं. त्यांच्या बागाही फुललेल्या. कोण राहात असतील या घरांत.. असा वेदनादायी विचार यावा इतकी ती घरं सुंदर. आणि त्यांच्या मागे हिरवेगार नुसते माळ. मध्येच कुठे तरी नदीचा प्रवाह गेलेला. तिकडच्या नद्या अशा अंगािपडानं भरलेल्या असतात. धरणं वगैरे बांधून त्यांना सरडय़ासारखं शिडशिडीत तिकडे करत नाहीत की काय, माहीत नाही! असो. पंधरा-वीस मिनिटांत हा सुखद प्रवास संपतो. गाडी थांबते तिथल्या मैदानावर अनेकांच्या गाडय़ा लागलेल्या. काही जणांच्या गाडय़ांना मागे कारावान असतात. हे उत्साही तिथे मोकळय़ा मैदानात राहायलाच आलेले. काही निवांत खुर्च्या टाकून सैलावलेले. अन्य सगळे मात्र एकाच दिशेने निघतात. कुठे जायचं वगैरे काही कोणाला विचारावं लागत नाही. एकच घर बघायला सगळे आलेले.
क्लॉड मोने(ट) याचं हे घर. चित्रकलेचा अभ्यास नाही; पण रुची असलेल्या प्रत्येकाला जी काही मोजकी नावं तरी माहीत असतात; त्यातला हा. (आपण सरसकट त्याचा उच्चार मोनेट असा करतो. पण त्याच्या नावातल्या ‘टी’ला अनुल्लेखानं टाळायचं असतं. फ्रेंच उच्चार मोने असाच. पण मराठीत तसं लिहिलं तर सदरहू इसमावर इथला कोणी मोने दावा सांगायचा. असो) चित्रकलेतल्या ‘इम्प्रेशनिस्ट’ नावानं ओळखल्या जाणाऱ्या शैलीचा प्रणेता. ही शैली त्याच्या नावाशी जोडली गेली त्याचाही एक किस्साच आहे. मोनेनं काढलेल्या चित्रांवर त्या वेळी समीक्षकांनी सडकून टीका केली. त्याचं एक अत्यंत लोकप्रिय चित्र आहे सूर्योदयाचं (ते मूळ चित्र पॅरिसच्या कलादालनात आढळतं.) त्यावर एका समीक्षकानं लिहिलं : हे कसलं चित्र. त्यात सूर्योदयाचं इंप्रेशन आहे असं जास्तीत जास्त म्हणता येईल. त्यामुळे मोनेची ओळखच इंप्रेशनिस्ट अशी झाली.
तर गिव्हर्नीत त्याचं घर आहे. तो मूळचा काही इथला नाही. फिरता फिरता या गावात आला आणि इथलाच झाला. गाव खूप आवडलं त्याला. ही घटना १८९३-९४ ची. घर बांधलं. आसपासची जागाही त्यानं घेतली. मोनेच्या चित्रांत खूप फुलं दिसतात. ती सगळी इथली. त्याला फुलांची खूप आवड. आयुष्यातली सगळी कमाई मी फुलझाडात घालवली, असं म्हणण्याइतकं त्याला झाडाचं वेड होतं. व्हॅन गॉगच्या चित्रात दिसणारी सूर्यफुलं मॉनेटचा गुच्छही सामावून घेतो. या फुलझाडांच्या लागवडीसाठी त्यानं आसपासची इतकी जागा घेतली की त्यात एखादं गाव वसेल. आपल्या बागेचे मग त्यानं दोन भाग केले. दुसऱ्या बाजूला कृत्रिम तलाव, कालवा असं काही केलं. त्यात कमळंच कमळं. जपानी चित्रांमध्ये त्यानं आडव्या कंसासारखे दिसणारे टुमदार पूल पाहिलेले होते. तसे लाकडी पूल या कालव्यांवर बांधून घेतले. वरती वीपिंग विलोजचे झुपकेच्या झुपके. एका बाजूला फक्त वेगवेगळय़ा रंगांतल्या, आकारांच्या, पोताच्या वॉटर लिलीज.
उद्यानं आपण खूप पाहिलेली असतात. किमान वृंदावन गार्डन तरी. या सगळय़ात भूमिती भरपूर असते. सगळं काही सममितीत. सिमेट्रिकल. डावीकडचं आणि उजवीकडचं झाड अगदी एकाच आकाराचं असं. या सिमेट्रीतही सौंदर्य असतं. पण ते अगदी आखीव-रेखीव. गणिती पद्धतीनं जोपासलेलं. निसर्ग असा गणिती नसतो. तिथं आढळतो तो मुक्तछंद. मोनेला अशा गणिती वृक्षलागवडीत रस नव्हता. त्यामुळे त्यानं झाडं लावली ती त्यांच्या फुलांच्या रंगसंगतीचा विचार करून.
आणि त्यातून जे काही आकाराला आलंय ते अद्भुत म्हणावं असं आहे. पांढरा बहावा वाटेल अशा लहान मोत्यांच्या मुंडावळय़ांचे गुच्छच्या गुच्छ लगडलेली झाडं. जांभळय़ा रंगाची मलमलीसारख्या स्पर्शाची कर्दळ. आणखी कोणाला फ्लुरोसंट किरमिजी गुच्छ लगडलेले. गवतात एकच एक दांडा आणि त्याच्या टोकावर पांढराशुभ्र एग्झोरा उभा. त्या पांढऱ्या चेंडूंचा शिष्टपणा अगदी लक्षवेधी असा. एक फुलझाडांची रांग तर अशी की तिची सुरुवात गुलाबी फुलांनी होत होती आणि या रंगात असा अलगद बदल होत गेला की त्या रांगेतल्या शेवटच्या झाडांवरची फुलं हलक्या जांभळय़ा रंगाची! एखादी रागमालाच. तोडीत सुरू होऊन मुलतानीपर्यंत गेलेली. यातल्या एकाचंही नाव इथं लिहिलेलं नाही. पण मोनेच म्हणायचा तसं ‘‘टु सी वुई मस्ट फर्गेट द नेम ऑफ द थिंग वुई आर लुकिंग अॅट.’’ बागेतच मोनेचं घर आहे. त्याचा स्टुडिओ. जेवायचं टेबल. कुठून कोणती फुलं दिसायला हवीत याबाबतही तो अगदी चोखंदळ होता. त्याच्या ‘त्या’ नजरेतनं त्या फुलांकडे पाहणं हाही एक अनुभव.
आणि हे सगळं पाहणं उत्साहानं पाहायला आलेल्या हजारो कलासक्त कलाप्रेमींचे फुललेले चेहरे फुललेल्या बागेशी स्पर्धा करत होते. ती बाग सोडताना; फुलं, त्यांच्यावर असं वेडं प्रेम करणारा आणि या वेडय़ा प्रेमिकाचं कौतुक करणारा समाज एक वेगळाच ओरखडा मनावर उमटवत होते. फुलांची अशी टोचणी कधी अनुभवली नव्हती.
girish.kuber@expressindia.com
@girishkuber