छोट्या गल्ल्या. लहान, बसकी घरं. वातावरणात एकदम कलात्मक असं काहीतरी. छोट्या वाड्यांच्या दारांवर चित्रं रेखाटलेली. ग्राफिटी नाही. त्याची खरी चित्रं…
स्पॅनियार्ड कार्लोस अल्काराझनं फ्रेंच ओपन जिंकणं, चँपियन्स लीगमधे रिअल माद्रिद अजिंक्य ठरणं आणि या दोन विजयांनंतर युरो कप सुरू होणं यातल्या नेमक्या बेचक्यात बार्सिलोनात पोचणं हा सुखद योगायोग. त्यासाठी आपल्या निवडणूक आयोगास धन्यवाद द्यावेत तितके थोडे. आयोगाच्या निवडणूक आयोजन औदार्यामुळे मे महिन्यातली वार्षिक सुटी जूनमधे सरकणार हे नक्की झालं आणि मग स्पेन-पोर्तुगालवर एकमत झालं.
या दिवसात युरोपमध्ये सूर्य ‘सातच्या आत घरात’ वगैरे काही नियम पाळत नाही. त्यात स्पेनवर तो आणखीन एक तास जास्त रेंगाळतो. दिवेलागण दहा-सव्वादहाच्या आसपास आणि संध्याकाळचे मावळतीचे रंग तर रात्री अकरा-साडेअकरापर्यंत आकाशात रेंगाळत असतात. परत सकाळी साडेपाचच्या आसपास हा उगवायला तयार! आपल्याकडेही यंदा ऊन पाहून या इतक्या प्रकाशाचं करायचं काय हा प्रश्न पडायचा. पण आपल्याकडच्यापेक्षा तिकडचं ऊन अगदी ‘जाडों की नर्म धूप’ नाही, तरी त्रासदायकही नव्हतं.
हॉटेलात स्थिरस्थावर झाल्यावर नेहमीच्या रिवाजाप्रमाणे रिसेप्शनिस्टकडे चौकशी करायला गेलो तर तिला वाटलं ‘हॉप ऑन हॉप ऑफ’ वगैरेची माहिती हवीये. तिनं भराभरा मागची पँप्लेट्स काढली. त्यातला नकाशा घेऊन तिला म्हटलं पिकासो म्युझियम कुठे तेव्हढं सांग. ‘‘ओ… मुसे पिकासो…’असं काहीतरी ती म्हणाली आणि नकाशावर खाणाखुणा करून दिल्या. परत स्वत:च नकाशा घेऊन बाहेर आली आणि रस्त्याकडे एका दिशेला बोट दाखवून म्हणाली… सरळ जा… पोहोचेपर्यंत चालत राहा.
हेही वाचा >>> बुकमार्क: समाजमाध्यम काळातील अस्वस्थ पिढी…
जाणवलं हा तर पॅरिसच्या शाँझ द लिझेसारखा आनंदाचा राजपथ. दोन्ही बाजूंना एकाच आकारात, एकाच उंचीत वाढवलेली आणि वातावरणामुळे आनंदानं वाढलेली झाडं. बरीचशी मेपल्सचीच. गच्च पोपटी हिरव्या पानांची. ती वरून इतकी मोठी होती की एका बाजूच्या झाडाच्या वरच्या फांद्यांनी समोरच्या बाजूच्या झाडांच्या फांद्यांशी हातमिळवणी केलेली. त्यांची लांब रस्ताभर एक कमान झालेली. या झाडांच्या मागे इमारती. एकसमान उंचीच्या. स्थानिक फ्लिंट स्टोनपासनं बनवलेल्या. कुठेही अजागळपणा औषधालाही सापडणार नाही. तळमजल्यावर झारा, स्वारोस्की वगैरे शोरूम्स. अशा दुकानांबाहेर दरवळणारा एक मंद सुगंध वातावरणात शिरलेला. अशा रस्त्यावरनं चालण्यासारखा आनंद नाही…आणि परत आपल्याकडच्या मुख्य रस्त्यांपेक्षा रुंद फुटपाथ!
शोधत निघालो पिकासोला. या भव्य रस्त्याच्या दुसऱ्या टोकाला एक महाप्रचंड चौक आहे. आपल्या संसदेसमोरच्या चौकापेक्षाही मोठा. पर्यटक चहुबाजूंनी दुथडी भरून वाहतायत. यात पिकासो कुठला असायला! दुकानदारांना विचारलं तर त्यांनी इंग्रजी आणि पिकासो दोन्हींकडे दुर्लक्ष केलं. शेवटी एका ऑपेराच्या पायाशी पर्यटक माहिती केंद्र दिसलं. तिथं विचारलं. उत्तर देताना त्याच्या चेहेऱ्यावरचा आनंद अगदी लक्षात येत होता. आमच्या हातातला नकाशा घेत, आपल्या खिडकीच्या बाहेर येत त्यानं उत्साहानं पत्ता ‘काढून दाखवला’. एक मोठं सिनेमागृह आहे तिथं. त्याला वळसा घालून जा म्हणाला…
त्याप्रमाणे केलं तर एकदम नाटकातला सेटच बदलावा तसं दृश्य. आधुनिक बार्सिलोना एकदम गायब. छोट्या गल्ल्या. लहान, बसकी घरं. घरांच्या खिडक्यांत आडव्या आयताकृती कुंड्या आणि त्यात पिवळ्या, गर्द निळ्या रंगांची फुलं फुललेली. वातावरणात एकदम असं काहीतरी कलात्मक. छोट्या वाड्यांच्या दारांवर चित्रं रेखाटलेली. ग्राफिटी नाही. खरी चित्रं. प्रत्येक वाडा म्हणजे एखादा आर्ट स्कूल असावा असं दृश्य. कुठे मूर्तीकाम सुरू आहे. तर कुठे दिव्यांची लोभस नक्षी. इतकंच काय स्थानिक कलाकारानं बनवलेल्या चपला, सँडल्सवरही दाली आणि पिकासो ! हे असं बघत बघत ‘मुसे पिकासो’ एकदाचं लागलं…!
जुनी, पिवळ्या रंगाची मजबूत वाड्यासारखी इमारत. एक मजली. पहिल्या मजल्यावरच्या खोल्यांची कलादालनं केलेली. क्रमांचे बाण. काऊंटरवर माहिती दिली… चार हजार चित्रं आहेत इथं. मग सुरू झाली विसाव्या शतकातल्या एका गूढगहन, प्रसंगी वादग्रस्त मॉडर्निस्ट कलाकाराची शोधयात्रा.
हे पिकासोचं बार्सिलोनातलं पहिलं घर. त्याच्या आईवडिलांच्या फार लवकर लक्षात आले आपल्या पोराचे कलागुण. ‘‘यानं उच्चारलेला पहिला शब्द होता पेन्सिल’’, असं त्यांच्या आईनं लिहून ठेवलंय. सातव्या वर्षी त्याचं चित्रकलेचं शिक्षण सुरू झालं. वडील शिक्षक. ते छंदोबद्ध कवीसारखे. पण पाब्लोला छंद-वृत्ताच्या चौकटीच मान्य नव्हत्या. ते बिचारे अमुक-तमुकचं ‘डिट्टो’ चित्र काढणाऱ्यांच्या कुळातले. चिरंजीवांना हे घराणंच मान्य नाही. त्यामुळे त्याचे आणि वडिलांचे खटके उडायचे. अखेर वडिलांनी स्वत:ऐवजी नवेच गुरू दिले. कौतुक आहे त्यांचं. वयाच्या १३ व्या त्यांनी पाब्लोचं एक चित्रं पाहिलं आणि थक्क होत पाब्लोच्या आईला म्हणाले: ‘‘याची चित्रं पाहिल्यावर लाज वाटतीये मला माझी… मला नाही वाटत मला यापुढे काही रेखाटता-रंगवता येईल’’.
नंतर पिकासो पॅरिसला गेला. तिथं त्याला ‘तो’ सापडला.
ही विसाव्या शतकाची सुरुवात. पुढे पहिलं महायुद्ध झालं, दुसरं झालं, मध्ये स्पॅनिश वॉर. पिकासोची युद्धविरोधी भूमिका त्याच्या चित्रांतनं दिसत होती. पॅरिसमध्ये तर नाझी गेस्टापो त्याला एका चित्रासाठी ( Guernica, १९३७) पकडणार होते. त्यानं कुठं युद्धविरोधी भाषणं वगैरे केली असं नाही. पण त्याची चित्रंच शब्दांपेक्षाही प्रभावी असणार. स्वत:च्या स्पेन देशात जेव्हा फ्रांकोची हुकूमशाही राजवट आली तेव्हा या पठ्ठ्यानं आपली महत्त्वाची चित्रं अमेरिकेत पाठवून दिली. ‘‘जोपर्यंत या देशात पुन्हा लोकशाही नांदू लागत नाही, तोपर्यंत ही चित्रं तिकडेच बरी’’, असंही कळवलं.
या संग्रहालयात त्याची बरीच मूळ चित्रं आहेत. पिकासोनं आपली ९०० रेखाचित्रं या संग्रहालयाला भेट दिली. एक भिंतच्या भिंत या चित्रांनी भरलीये. त्याच्या अनेक प्रेमिकांपैकी एक असलेल्या ऑलिव्हिआ फर्नांडे हिचीही अनेक चित्रं तिथं आहेत. ‘या’ आघाडीवर पिकासो तसा चांगलाच वादग्रस्त. ‘‘हा एकाही मुलीला सुख देणार नाही’’, असं त्याच्या साक्षात मातोश्रींचंच मत. खरं आहे. त्याच्या चारपैकी दोन पत्नींनी आत्महत्या केल्या आणि दोन मनोरुग्ण झाल्या. त्याच्या असंख्य चाहत्यांना त्याचा हा इतिहास माहीत आहे आणि तरीही चित्रकार पिकासोच्या चाहत्यांची, अभ्यासकांची संख्याही दिवसेंदिवस जगभरात वाढती आहे. आताही अनेक जण केवळ पिकासोसाठी बार्सिलोनाला आलेले असतात.
चारेक तासांनी बाहेर पडता पडता इथनं एकाचा फोन आला. त्याला माहीत नव्हतं मी बार्सिलोनात आहे ते. उत्साहानं म्हटलं आताच पिकासो म्युझियममधनं बाहेर पडतोय. तर त्यानं विचारलं… तो जरा बायकांबाबत भानगडबाजच होता ना…?
मी फोन तोडला. आठवलं रशीद खान यांच्यावरचा मृत्युलेख वाचून हाच म्हणाला होता… ते तंबाखू फार खायचे ना?
कोणाचं काय घ्यायचं हे कळणंसुद्धा संस्कृतीतनंच यावं लागतं.
(केवळ योगायोग. दोनच दिवसांनी ‘द गार्डियन’मधे डोरा मार या पिकासोच्या एका उत्कट चित्रकार-छायाचित्रकार मैत्रीण-पत्नीवर एक अप्रतिम लेख होता. डोरा स्वत: उत्तम कलाकार. तिनं पिकासोला सोडलं. काही वर्षांनी एका पत्रकारानं तिला विचारलं… किती काळ अशी एकटी राहणार? नवा जोडीदार शोधणार की नाही. डोरा म्हणाली : माझे पर्याय दोनच. परमेश्वर किंवा पिकासो.)
girish.kuber
@expressindia.com @girishkuber