दुबईत भरलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या वार्षिक जागतिक हवामान परिषदे (कॉप- २८) मध्ये हवामानविषयक गंभीर विषयावर चर्चा सुरू असताना अचानक एक चिमुरडी पळत पळत व्यासपीठावर येते आणि ‘‘जीवाश्म इंधनाचा अतिरेकी वापर थांबवा. आपला ग्रह आणि आपले भविष्य वाचवा.’’ हा फलक झळकवत एक छोटेखानी भाषण करते.. वेगवेगळय़ा पर्यावरणविषयक संघटना, राजकीय पक्ष, कामगार संघटना यांना निदर्शने करायला मज्जाव आणि कठोर निर्बंध असताना, १२ वर्षांच्या चिमुरडीच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
हेही वाचा >>> व्यक्तिवेध : शोभा भागवत
ग्रेटा थनबर्ग या चिमुरडय़ा स्वीडिश कार्यकर्तीबरोबर तुलना होत असलेली ही लिसिप्रिया कांग्जुआम भारतातली, त्यातही गेले सहाआठ महिने होरपळत असलेल्या मणिपूरमधली आहे हे आणखी विशेष. तिच्या या धाडसानंतर उपस्थित प्रेक्षक टाळय़ा वाजवत असतानाच तिला तिथून ‘उचलले’ गेले आणि घटनास्थळापासून दूर नेऊन ३० मिनिटांनंतर सोडून देण्यात आले. पण त्यामुळे असा काय फरक पडणार होता? ग्रेटा थनबर्गच्या या ‘भारतीय अवतारा’ने साधायचा तो परिणाम साधला होता.
लिसिप्रिया कांग्जुआमने या घटनेची दृश्यफीत ‘एक्स’वर शेअर करून म्हटले आहे की त्यांनी मला कॉप- २८ मधून हाकलून दिले आहे. माझा गुन्हा इतकाच होता की मी आजच्या हवामान प्रश्नाला कारणीभूत असलेल्या जीवाश्म इंधनाचा वापर थांबवा अशी मागणी केली. ती पुढे म्हणते सरकारांनी या मुद्दय़ावर काम केले पाहिजे. कारण आज तुम्ही जे करणार आहात, त्यावर आमचे म्हणजे पुढच्या पिढीचे भविष्य ठरणार आहे. स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी आणि स्वच्छ पृथ्वी हा आमचा अधिकार आहे.’ इतक्या लहान वयात इतक्या जागरूकपणे विचार करणाऱ्या लिसिप्रियाचा जन्म २ ऑक्टोबर २०११चा. वयाच्या सहाव्या- सातव्या वर्षांपासूनच तिने हवामान बदल या विषयावर आवाज उठवायला सुरुवात केली. हवामान बदलाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी काम करणारी ती सगळय़ात तरुण कार्यकर्ती मानली जाते. २०१९ मध्ये स्पेनमध्ये माद्रिद इथे झालेल्या कॉप २५ मध्ये तिने भाषण करून हवामानाचा प्रश्न गांभीर्याने घेण्याचे आवाहन जागतिक नेत्यांना केले होते. तिच्या कामासाठी तिला जागतिक पातळीवरचे पर्यावरणविषयक पुरस्कार मिळाले आहेत. ग्रेटा थनबर्गबरोबर आपली तुलना होणं लिसिप्रियाला अजिबात रुचत नसलं तरी ग्रेटा हे तिचे प्रेरणास्थान आहे.