स्लोअर शहाणेनं गोदो म्हणजे काय असेल, याची काही उत्तरं रोजच्या रोज रोजदिनीत लिहायला सुरुवात केली. तोवर, महाविद्यालयात पहिल्याच वर्षी राज्यशास्त्रात शिकलेल्या मार्क्सवादातील बूर्झ्वा आणि प्रोलिटेरिएट संघर्षामुळे निष्पर्ण वृक्षाच्या नेपथ्याचे आणि नाटकात मध्येच बग्गीतून येणाऱ्या सरंजामशाहीचे संदर्भ त्याला हळूहळू उमगू लागले होते. त्यात मग भर पडली, ती इंग्रजी विषयाला पाठ्यक्रम म्हणूनच लावलेल्या जॉर्ज ऑर्वेलच्या ‘अॅनिमल फार्म’मधील पात्रांची. स्लोअर शहाणे नोंदी करू लागला, ‘गोदो म्हणजे सर्व खलनायकांना पुरून उरणारा अमिताभ बच्चन आहे का? का तो पृथ्वीचे कल्याण करण्यासाठी जन्म घेणारा कुणाचा तरी अवतार आहे?… पण गोदो म्हणजे एखादी व्यक्तीच असेल असं काही नाही. गोदो म्हणजे उज्ज्वल भविष्यकाळ असू शकतो किंवा ती सामाजिक क्रांती असू शकते. किंवा ते माणसानं आशावादी राहण्यासाठी दिलेलं एक निव्वळ आश्वासन असू शकतं… किंवा कसंही!…’
‘किंवा कसंही’ हे दोन शब्द लिहिल्यानंतर स्लोअर शहाणेला त्याच्या मध्यमवर्गीय असण्याची दरदरून जाणीव झाली – दरदरून विशेषण तो घाम फुटण्याला न लावता मानवी भावनेलाच लावत असे. खळखळून हसण्याऐवजी वळवळून हसण्यासारखंच हे हास्यापद असलं, तरी! नव्वदच्या दशकात तोवर स्व-मदत अर्थात सेल्फ हेल्प पुस्तकांची फारशी छपाई होत नसल्यानं ‘अॅसर्टिव्ह’ या शब्दाला तितकंसं ‘मूल्य’ आलेलं नव्हतं. परिणामी, स्लोअर शहाणेची सकारात्मक शहाणीव विकसित होऊ शकली नाही. ‘हे बरोबर आहे, असं वाटतंय, पण म्हणून ते चुकीचं असेल असं नाही आणि ते जर चुकीचं नसेल, तर हे बरोबर आहे, असं चुकूनही कसं म्हणता येईल,’ या अवस्थेनं स्लोअर शहाणेला ‘किंवा कसंही’ म्हणायला शिकवलं होतं. गोदोनं जरा आशेचा किरण दाखवलेला असताना, ‘किंवा कसंही’च्या या अनिर्णित अवस्थेनं स्लोअरला निराशेच्या गर्तेत ढकलायला सुरुवात केलीच होती, तोच त्याच्या आयुष्यात एक महत्त्वाची घटना घडली. स्लोअरच्या वडलांनी (तो १८ वर्षांचा होऊनही अजूनही त्याच्या वतीनं त्याचे आई-वडीलच निर्णय घेत होते) त्याला एका शिबिराची माहिती दिली. शिबिराचं नाव होतं, ‘शोध स्वत:चा… समाजाचा’. स्लोअर थोडा उमजअक्षम असल्यानं ‘समाजाचा’ऐवजी त्यानं ‘समजेचा’, असं वाचलं आणि त्याला वाटलं, की हे बरंय. हे स्वत:चा शोध असं नुसतं ढोबळ काही तरी नसून, त्याच्या पुढे जाणारं आहे. आपल्या समजेचाही शोध घेता येत असेल, तर हे खरंच बरंय. वडलांनी नोंदणी केली (स्लोअर नको म्हटला असता, तरी ती त्यांनी केलीच असती. किंबहुना स्लोअरला हो-नाही म्हणायचा तसा काही पर्यायच नव्हता म्हणा ना! अर्थात, त्या काळात वाढणाऱ्या कोणत्या मुलांना होता?) आणि स्लोअरनं शिबिराला जायची तयारी सुरू केली. ती करताना त्याला आपली वाचनातील चूक लक्षात येऊन तो शोध ‘समजेचा’ नसून ‘समाजाचा’ आहे, हे समजलं. पण, काही का असेना, हे शिबीर आपल्या आयुष्यात गोदोसारखं आलंय, तर सामोरं जाऊ, असा विचार करून स्लोअरनं मनाची तयारी केली. ती करताना, त्यानं आपल्या जवळच्या मानलेल्या काही मित्रांनाही शिबिरात येता का, म्हणून विचारलं, किंबहुना गळच टाकली म्हणा ना! ‘एक से भले दो,’ असं वाटण्याचा भाबडा काळ अजून सरायचा होता आणि संगीतातील एकल वादनापासून एकल सहलींना अजून वलय यायचं होतं. अर्थात, तरीही ते जवळचे मानलेले मित्रं शिबिराला येतील, याची स्लोअरला अजिबात खात्री नव्हती. पण, ते तयार झाले. आश्चर्यमुग्ध स्लोअरनं त्यांच्या होकाराचं कारण शोधता त्याला लक्षात आलं, की पाच दिवसांचं राहून-खाऊन शिबीर असूनही शुल्क फक्त २५ रुपये असल्यानं ते तयार झाले होते. ते तरी काय करणार! तेही मध्यमवर्गीयच. तेव्हाच्या काळी, म्हणजे नव्वदच्या दशकात साध्याशा खाणावळीतही २५ रुपयांत पूर्ण जेवण क्वचित काही ठिकाणी मिळत असे! असं असताना एका शिबिरात २५ रुपयांत दहा जेवणं आणि दहा नाश्ते, शिवाय चहा वेगळा, असं मिळत असेल, तर का सोडा, असा साधाच विचार त्यांनी केला. तो काळच ‘साधेपणाचा’ हो! असं ‘साधेपण’ हीच मध्यमवर्गीय असण्याची खूण आणि हिशेबीपणा हा त्याचा स्थायीभाव. सगळं कसं गोग्गोड!
हेही वाचा :अन्वयार्थ : हा रमणा थांबवा!
स्लोअर शहाणे शिबिरात गेला मात्र; त्याच्या पूर्वआकलनाचे पापुद्रे निघून, त्याला आपल्या आत काही तरी निबर-नितळ जाणवू लागलं. तिथं त्याला गरीब वस्तीतल्या मुलांबरोबर राहायला लागलं, वावरायला लागलं, मिसळायला लागलं, शिबीर ज्या शाळेत भरलं होतं, त्या वर्गाऐवजी वर्गाबाहेरच्या ओट्यावर त्यांच्याबरोबर रात्री झोपावं लागलं… आणि समाजात व समजेत एकच एक मध्यमवर्ग असलेला स्लोअर जरा ‘शहाणे’ झाला! शिबिरात आलेल्या वक्त्यांनी त्यांच्या घडण्याबद्दल सांगितलं. शिबिरात झालेल्या मित्रांनी त्यांच्या‘बि’घडण्याबद्दल सांगितलं. नवनवे विषय कळत गेले, श्रमदान, साफसफाई, महात्मा गांधी, विनोबा, चळवळ, आंदोलनं याबद्दल बरचसं कानावर पडत गेलं. शिबिरात स्वयंसेवक म्हणून आलेल्या एका कार्यकर्त्यानं केलेल्या भाषणानं स्लोअर भारावूनही गेला. कार्यकर्ता भाषणात म्हणाला, ‘आम्ही गावाकडचे उपेक्षित लोक, आमच्या बहुतेकांच्या नावांत कायम ‘दास’ असतंच. का असं?’ स्लोअरनंही विचार करून पाहिला. पाच दिवसांच्या शिबिरात त्याच्या जवळच्या मानलेल्या मित्रांनी मात्र धमाल केली. त्यांना २५ रुपयांत पाच दिवस व्यवस्थित पार पडल्याचं भलं थोर अप्रूप वाटलं होतं. त्यांच्या चेहऱ्यावरची समाधानाची रेषा आपल्या चेहऱ्यावर का उमटेना, असा प्रश्न स्लोअर शहाणेला पडला आणि त्यानं घरी गेल्या गेल्या या शिबिराबद्दलच्या नोंदी रोजदिनीत लिहायचं पक्कं ठरवून टाकलं.
स्लोअर शहाणे शिबीर संपवून घरी आल्याच्या रात्रीच रोजदिनीत लिहिता झाला. ‘शिबिरात जाणवलं, ते फक्त नितळ नाही, तर निबर-नितळ होतं. म्हणजे, दारिद्र्याची जाणीव झाली, पण ते घालविण्यासाठीच आता आयुष्य समर्पित, असं काही वाटू शकलं नाही. का असं झालं असेल? आपल्याला कुणाचंच काही पडलेलं नाही का? का पडलं आहे, पण त्याचं काय करायचं कळत नाहीये? का त्यानं काय फरक पडणार आहे, हे कळत नाहीये? का नुसतं असं एक शिबीर पुरेसं नाहीये? का २५ रुपयांत पाच दिवसांचा शोध, तर आयुष्यभराच्या शोधासाठी किती रुपये, हे त्रैराशिक आपल्याला मांडता येत नाहीये? सगळा नुसता गोंधळ आहे…’
हेही वाचा :व्यक्तिवेध : मोहन हिराबाई हिरालाल
रोजदिनीत हे लिहिलेल्याला काहीच दिवस झाले असतील, लुनावरून चाललेल्या स्लोअर शहाणेला रस्त्यात अचानक शिबिरातला तो भाषण करणारा कार्यकर्ता भेटला. स्लोअरनं थांबून त्याला ‘कुठे निघालात,’ असं विचारलं. तो म्हणाला, ‘एका स्वयंसेवी संस्थेच्या नव्या स्वयंसेवकांसाठी भाषण द्यायला.’ ‘कुठं?’ स्लोअरनं विचारलं. ‘अमुक पंचतारांकित हॉटेलमध्ये.’ तिथपर्यंत लुनावरून सोडू का, असं स्लोअर विचारणार, तेवढ्यात एक ‘एनई ११८’ चारचाकी गाडी येऊन थांबली आणि कार्यकर्ता त्यातून हसत निघून गेला. स्लोअरनं घरी आल्यावर रोजदिनीत नोंद केली, ‘शिबिराच्या नावातील ‘शोध समाजाचा’ हे शब्द वाचताना ‘शोध समजेचा’ असे वाचले, त्याला आता भूतकाळ म्हणावे का? का तो वर्तमानकाळ आहे? का भविष्य?… का चिरकाळ?… म्हणा काहीही… बरोबर, चूक, किंवा कसंही!’