अभ्यासकांच्या मते ऋग्वेदात गणपती नावाचा उल्लेख असला तरी त्याच्या पूजेचा संदर्भ सापडत नाही. सुमारे पावणेदोन हजार वर्षांपूर्वीपासून – गुप्त राजवटीपासून – गणेश पूजनाची सुरुवात झाली. तेव्हापासून अखंडितपणे गणेश पूजन सुरू झाले आणि हळूहळू त्याला सणाचे रूप आले. गणपतीच्या आगमनाने घराघरांत मंगल वातावरण निर्माण होत असल्यामुळे त्याला मंगलमूर्ती हे साजेसे नाव मिळाले. आपल्या देवाबद्दल कोणी काही टिप्पणी केली तर आपल्या धार्मिक भावना दुखावतात. मग दोन दिवस रस्ते अडवून, उत्सवाच्या नावाने करोडोंची उलाढाल करून, चेंगराचेंगरीत माणसे जखमी करून, सव्वाशे डेसिबलपर्यंत डीजेचे आवाज चढवून, कोणत्या धार्मिक भावनांचं आपण संवर्धन करतो? डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजाने छातीचे ठोके वाढतात, कानाच्या पडद्यावर आघात होतो, जवळपासच्या घरांच्या काचा आणि खिडक्या थरारतात. तातडीच्या कामासाठी बाहेर जाता येत नाही. रात्रंदिवस रस्त्यावर कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस स्त्री-पुरुषांसाठी वॉशरूमची व्यवस्था नसते. मदतीला धावून येणाऱ्या गणरायाला आवडेल असा आपल्या नावाने साजरा होत असलेला उत्सव? आपापल्या घरी सोज्वळ वातावरणात साजरा होतो तो खरा गणेशोत्सव. आणि सगळी नागरी व्यवस्था विस्कळीत करून सार्वजनिक ठिकाणी गणेशमूर्ती स्थापन करून साजरा होतो तो असतो धिंगाणोत्सव.
– शरद बापट, पुणे
नवरात्रात तरी थिल्लरपणा नको..
आता काय गणेशोत्सव संपला आहे. ज्या काही सुधारणा करायच्या आहेत त्या संदर्भात पुढच्या वर्षी बघू, असे म्हणत त्रुटी, चुकांकडे कानाडोळा करणाऱ्यांचे पुढचे वर्ष कधीच येत नसते. कारण आजही त्याच चुका होत आहेत ज्या प्रतिवर्षी होतात. पुढे काही दिवसांवर नवरात्र आहे. त्यात युवा वर्गाचा सहभाग अधिक असतो. एका उत्सवात पाहायला मिळालेला अयोग्य भाग दुसऱ्या उत्सवात पाहायला मिळू नये आणि उत्सवात धार्मिकता असावी, थिल्लरपणा नकोच.
– जयेश राणे, भांडुप (मुंबई)
पांढरपेशा मतदार ‘बघत’च राहणार
‘हे राजकीय स्थित्यंतर पांढरपेशांना कुठे नेणार?’ हा मेधा कुलकर्णी यांचा लेख (११ सप्टेंबर) वाचला. उद्धव ठाकरे सत्तेवर आले तेव्हा इतरांप्रमाणे मलाही सगळा प्रकार हास्यास्पद वाटला होता. मात्र कोणताही प्रशासकीय अनुभव नसताना त्यांनी ज्याप्रकारे कोविडच्या संकटास तोंड दिले आणि लोकांशी फेसबुकवरून संवाद साधला ते पाहून मात्र माझी मते हळूहळू बदलू लागली. शिवसेनेची सूत्रे हातात घेतल्यापासून कधीही त्यांची भडक, द्वेषमूलक वक्तव्ये वर्तमानपत्रातून वाचनात आली नाहीत.
मात्र आता खरी कसोटी आहे. ठाकरेंना सेनेची नव्याने पुनर्बाधणी करावी लागेल. हे आरिष्ट नसून सुसंधी आहे असे मानून अतिशय अलिप्तपणे अनेकांना दूर करून नव्या दमाच्या, सुशिक्षित, तरुण वर्गाला सेनेत येऊन वेगवेगळय़ा जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी साद घालावी लागेल. त्यांना सातत्याने काम द्यावे लागेल. केलेल्या कामाचा आढावा घ्यावा लागेल. सर्वाशी संवाद ठेवावा लागेल. अरिवद केजरीवाल यांनी जेमतेम काही वर्षांत राजकारणात जम कसा बसवला आणि आपल्याला महाराष्ट्रात इतक्या वर्षांत हे का जमले नाही, याचा अभ्यास अहंगंड बाजूला ठेवून करावा लागेल. शेवटी सांगायचे म्हणजे पांढरपेशा वर्ग काहीच करत नाही. सर्वसाधारण मतदार मात्र फक्त बघत असतो.. आणि मनातल्या मनात नोंदी ठेवत असतो!
– अभय विष्णु दातार, ऑपेरा हाऊस (मुंबई)
मौन सोडावे लागेल..
‘हे राजकीय स्थित्यंतर पांढरपेशांना कुठे नेणार?’ (लोकसत्ता ११ सप्टेंबर २०२२) या लेखामधील मेधा कुलकर्णी यांची सूक्ष्म निरीक्षणे, सद्य:स्थितीत डोळे मिटून दूध पिणाऱ्या मध्यमवर्गीयांसाठी अतिशय उद्बोधक आहेत. परंतु नागरिकत्वाची आपली जबाबदारी पार पाडण्याचा सल्ला हा वर्ग खरोखर मनावर घेणार का? हा गहन प्रश्न आहे.
खरेतर भारतीय स्वातंत्र्याच्या लढाईत आणि आणीबाणी विरोधातील आंदोलनात भारतातील याच पांढरपेशा वर्गाने कळीची भूमिका निभावलेली आहे. सद्य काळात मात्र अघोषित आणीबाणीसदृश वातावरणात आणि सदासर्वकाळ सुरू असलेल्या प्रचारी गोंगाटात हा मध्यमवर्ग आपला आवाज हरवून बसला आहे. विशेष म्हणजे माध्यमे, नोकरशाही तथा न्यायव्यवस्थेत कार्यरत असलेला हाच वर्ग निर्विकार स्वाभिमान शून्यतेने दमन यंत्रणा राबविण्यात धन्यता मानतो आहे की काय, अशी शंका घेण्यास जागा आहे. ‘आपल्या अधिकारांबद्दल सजग न राहिल्याने आपण केवळ राजकारण्यांची सर्कस बघणारे प्रेक्षक बनून राहू’ हे लेखिकेचे म्हणणे रास्त आहेच. परंतु त्या पुढे जाऊन, हे असेच होत राहील तर आपण आपले नागरी हक्क कायमचे गमावून बसू, असेही म्हणता येईल. चहूबाजूंनी कोंडी करून मूळ शिवसेना संपली असे ढोल बडवले जात असताना मूळ शिवसेनेला मिळणारा, अल्पसा का होईना, सकारात्मक प्रतिसाद आशादायक आहे. पण त्याहीपेक्षा, पांढरपेशा वर्गाने आपले मौन सोडून हातपाय हलविण्याची वेळ आली आहे.
– वसंत शंकर देशमाने, परखंदी (ता. वाई, जि. सातारा)
निवडणुकीत सेनेचे गणित फिसकटणारच!!!
नव-पांढरपेशातील निवडक ‘बोलक्या’ समर्थकांच्या मदतीने भाजप विरोधी स्थित्यंतर घडवून आणू, हे शिवसेनेचे गणित फिसकटणार आहे हे जवळ आलेल्या निवडणुकांतून सिद्ध होईल. घोडामैदान जवळ आहे.
– श्रीराम बापट, दादर (मुंबई)
केवढी ही ‘कर्तव्य’दक्षता!
‘ना राष्ट्रपती, ना उपराष्ट्रपती, ना नेताजींचं कुटुंब!’ हा ‘चांदणी चौकातून’मधील (लोकसत्ता, ११ सप्टेंबर) किस्सा वाचला. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या समारंभाला वा कार्यक्रमाला येतात, तो त्यांचा सोहळा असतो’ ही गोष्ट तंतोतंत खरी आहे. हाच अनुभव नुकत्याच झालेल्या कोची शिपयार्डमध्ये झालेल्या आयएनएस विक्रांत या भारतीय बनावटीच्या नव्या युद्धनौकेच्या जलावतरण प्रसंगीदेखील जाणवला. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नरेंद्र मोदी यांचे प्रत्येक सोहळय़ातील भाषण निवडणूक प्रचारात केलेले भाषणच वाटते, मग ते पुतळय़ाचे अनावरण असो वा अटल बोगद्याचे उद्घाटन.
हा कर्तव्यपथ इंडिया गेटकडून राष्ट्रपती भवनकडे जातो, याचाही विसर पडला का? स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच आदिवासी समाजातील महिला राष्ट्रपती झालेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्या वेळी दिल्लीतच होत्या, परंतु ऐतिहासिक सोहळय़ाला त्यांना आमंत्रण दिले गेले नाही, हे कसे? नेताजींच्या कुटुंबातील एकही सदस्य या समारंभाला उपस्थित नव्हता, कारण त्यांना अगदी ‘ऐनवेळी’ निमंत्रण दिले होते. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीदेखील, त्यांना या समारंभाचे निमंत्रण उपसचिवामार्फत पाठवले म्हणून फटकारले. एकंदरीत या प्रसंगात किती ‘कर्तव्यदक्षता’ बाळगली गेली याचे हे मूर्तिमंत उदाहरण आहे.
– शुभदा गोवर्धन, ठाणे
मोदींनी ८ वर्षांत संस्था उभारणी काय केली?
‘गुलामीचा ‘राजपथ’ आता इतिहासजमा’ या मथळय़ाखालील बातमीत (लोकसत्ता- ९ सप्टें.) ‘नेताजी सुभाषचंद्र बोस हे अखंड भारताचे पहिले पंतप्रधान होते,’ असे मोदींनी म्हटल्याचा उल्लेख आहे. वस्तुत: नेताजींचा त्याग व व्यक्तिमत्त्व पंतप्रधानपदापेक्षा किती तरी उत्तुंग होते. पण नेहरूंना काहीही करून ‘स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान’ या बिरुदापासून हटवण्यासाठीच ‘अखंड भारताचे’ हा उल्लेख मोदींनी केला असावा. तत्कालीन अखंड भारत हा ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली होता व यांची पितृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ब्रिटिशांना पाठिंबा होता, हे दुर्लक्षित करणे हा तर भाजपच्या ‘सोयीस्कर’ विस्मरणाचा स्थायिभाव आहे.
बातमीत पुढे म्हटले आहे, ‘स्वातंत्र्यानंतर देश नेताजींच्या विचारांच्या मार्गाने गेला असता तर भारताने केवढी तरी प्रगती केली असती’, म्हणजे काय? दहा वर्षांपूर्वीपासून विकसित देशांच्या पंक्तीत बसायला तयार असणाऱ्या भारताची ही बदनामीच आहे. ‘नेताजींचे विचार’ म्हणजे नक्की काय? मोदींनी गेल्या आठ वर्षांत ते विचार अमलात आणून नेहरूंच्या तुलनेत किमान एकदशांश तरी संस्था उभारायला हव्या होत्या. म्हणजे दुसऱ्याची रेघ लहान करण्यासाठी खोटेपणाचा खोडरबर वापरावा लागला नसता. कदाचित बापू आणि लोहपुरुष यांची उपयोगिता संपली असावी म्हणून नेताजी हा नवीन मोहरा त्यांनी राजकीय प्रचारात आणला असावा.
– सुहास शिवलकर, पुणे
ग्रामीण अर्थव्यवस्था सुदृढ झाल्याशिवाय..
‘बेरोजगारी आणि महागाई आवडे कुणाकुणाला..’ हा पी. चिदम्बरम यांचा लेख (११ सप्टेंबर) वाचला. बाजारात पैसा वाढला की महागाई वाढते. पण पैसा वाढला तरी सामान्य माणसाचे उत्पन्न वाढत नाही. यात मुख्यत्वे ग्रामीण भाग कात्रीत अडकतो. कारण बेरोजगारीमुळे तरुणांच्या हाताला काम मिळत नाही आणि महागाईमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती आवाक्याबाहेर जातात. एकाच वेळी बेरोजगारी आणि महागाईचे समर्थन आणि दुसरीकडे भारत महासत्ता, विकसित राष्ट्र होण्याची स्वप्न पाहणे हे विरोधाभासी आहे. त्यामुळे ‘खेडय़ाकडे चला’ या गांधीजींच्या म्हणण्याप्रमाणे ग्रामीण अर्थव्यवस्था सुदृढ झाल्याशिवाय सर्वागीण विकास शक्य नाही.
– ओंकार पिंगळे, औरंगाबाद</p>