‘भाजपला विकास तारेल की हिंदुत्व?’ हा ‘लालकिल्ला’ सदरातील लेख (२३ सप्टेंबर) वाचला. जनसंघाचे नामांतर करून १९८० मध्येच पंचनिष्ठा तत्त्वांवर ठाम राहून, भाजपने राजकीय वाटचाल सुरू केली. १९८४ मध्ये इंदिरा गांधींच्या हत्येने सार्वत्रिक निवडणुकीचे वारे बदलले. निराश झालेल्या भाजपने बस्तान गुंडाळण्याची भाषा केली, परंतु पुढे १९८९ ते २००९ पर्यंत चढत्या क्रमाने जागा मिळवत २०१४ला पहिल्यांदा सत्तेचा सोपान चढून २०२४ पर्यंत सत्ता कायम राखली. भाजपच्या या चढत्या क्रमाला मुख्यत्वे हिंदुत्वाची, देशप्रेमाची किनार होती. अनेक वर्षे विरोधात काम केल्यामुळे विजयासाठीच्या प्रयत्नांत जे सातत्य होते ते आता हळूहळू कमी होत सत्तेची नशा चढू लागली आहे.
२०१४ मध्ये एकहाती सत्ता मिळविल्यावर भाजपने अनेक लोकोपयोगी कामांचा धडाका लावला. जनतेप्रती निष्ठेचा क्रम बदलत गेला. सत्तेच्या पहिल्या पर्वात विरोधी पक्षांना तुच्छ लेखले गेले. व्यक्तिपूजा सुरू झाली. राज्याराज्यांत अकारण घटनात्मक पेच निर्माण केले गेले. सीबीआय, ईडीच्या धाकावर व्यक्तींना लक्ष्य करत पक्षांतरे घडवली गेली आणि इथेच खरी वाताहत सुरू झाली. त्याची कडू फळे २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत चाखावी लागली. आता खरा प्रश्न असा की, विकास का हिंदुत्व? यातील काहीच भाजपला तारू शकणार नाहीत. यातून बाहेर पडायचे असेल तर आधी विरोधकांना कमी लेखण्याची वृत्ती, व्यक्तीद्वेष, पक्षांची फोडाफोडी, सीबीआय, ईडीचे प्रयोग, पक्षांतर केलेल्यांना पदे देऊन वर्षानुवर्षे कार्य करणाऱ्या निष्ठावंतांना दूर ठेवणे बंद करावे लागेल. पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्र्यांचे सर्व आंतरराज्यीय दौरे थांबवावेत आणि स्तोम न माजवता विकासकामांचे उद्घाटन स्थानिक पातळीवर करावे. जनतेचा पुन्हा विश्वास मिळविण्यासाठी, प्रामाणिकपणा आणि पारदर्शी व्यवहार आवश्यक आहे. नेत्यांच्या वर्तनात असे सकारात्मक बदल दिसले, तर साहजिकच विजयाच्या अपेक्षा वाढतील.- विजय आप्पा वाणी, पनवेल
हिंदुत्वाआधारे फसवणे आता शक्य नाही
‘भाजपला विकास तारेल की हिंदुत्व?’ हा महेश सरलष्कर यांचा ‘लालकिल्ला’ (२३ सप्टेंबर) वाचला. लोकसभा निवडणूक ही भाजपला नामी संधी होती. अनुच्छेद ३७०, राम मंदिर असे मुद्दे हाती होते. भाजपला ते हुकमी एक्के वाटत होते. त्याला जोड होती ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेची, मात्र प्रत्यक्षात देशात इंडिया आघाडीने आणि राज्यात महाविकास आघाडीने वाट बिकट केली. भाजपच्या ‘चारशे पार’ या स्वप्नाचा चक्काचूर झाला. आता महाराष्ट्रासह विविध राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत, होऊ घातल्या आहेत.
दिल्लीत अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा देऊन भाजपला आव्हान देत मतदारांना साकडे घातले आहे. हरयाणातील शेतकरी वर्ग भाजपला खिंडीत गाठू शकतो. महाराष्ट्रात तर मराठा समाज आरक्षणावर ठाम आहे. त्याचा फटका भाजप सहन करेल काय? हिंदुत्वाच्या भावनेचे भांडवल करून जास्त काळ फसवणे शक्य नाही. आगामी काळात विविध राज्यांचे विविध प्रश्न आहेत त्यामुळे आता तरी विकासाचे राजकारण गरजेचे आहे कारण हिंदुत्व हे आता उत्तर प्रदेश सोडून इतर कोणत्याही राज्यात गौण ठरेल. दिल्लीत केजरीवाल भावनिक आधार घेऊन निवडणूक लढवतील, महाराष्ट्रात मतदार पक्ष फोडाफोडी केल्याचा वाचपा काढतील!- सुनील समडोळीकर, कोल्हापूर
आश्वासने पूर्ण न केल्याचा परिणाम
‘भाजपला विकास तारेल की हिंदुत्व?’ हा ‘लालकिल्ला’ सदरातील लेख वाचला. भाजपने सत्तेत आल्यापासून विकासासंदर्भात अनेक वचने दिली. पण प्रत्यक्ष्यात त्यातील किती पूर्ण केली याचा विचार पक्षाने करणे गरजेचे आहे. नागरिकांच्या हाताला काम मिळवून देणे हे सत्ताधाऱ्यांचे कर्तव्य असते. विकासाचा तो अविभाज्य भाग आहे. भाजपच्या सत्ताकाळात बेरोजगारी खरोखरच कमी झाली का, याचे उत्तर नाही असेच द्यावे लागेल. हजार जागांसाठी कित्येक लाख तरुण अर्ज करतात, भरती प्रक्रियेत चेंगराचेंगरी होते, हे वास्तव काय दर्शविते. उद्याोजकांच्या संपतीत वाढ म्हणजे अर्थवृद्धी नव्हे. वस्तू सेवा कर प्रणालीमुळे छोटे उद्याोग मेटाकुटीला आले आहेत, याची जाणीव सरकारला का नाही? २०२४च्या निवडणूक प्रचारात भाजपने हिंदुत्वाचा आधार घेऊन बघितला. रोजगारनिर्मितीत आलेले अपयश लपवण्यासाठी ८० कोटी लोकांना मोफत धान्य दिले आणि गरिबी दूर केल्याचे चित्र निर्माण केले. विरोधकांच्या मागे ईडी, सीबीआय चौकशी लावायची. त्यांना आपल्या कंपूत आणायचे आणि त्यांचा निवडणुकांतील यशाला हातभार लागला नाही की तातडीने दूर सारायचे, हेच सध्या सुरू आहे. वचने पूर्ण न केल्याने काय होते हे २०२४च्या निवडणुकीने दाखवून दिले आहे.- नीता शेरे, दहिसर (मुंबई)
सत्ताप्राप्तीसाठी ‘धर्मकलह कार्ड’
‘कर्मभूमीतील धर्मकसोटी!’ हे संपादकीय (२३ सप्टेंबर) वाचले. महाराष्ट्राच्या राजकारणात जनतेच्या मनातून पार उतरलेल्या सत्तालोलुप भाजपस आगामी विधानसभा निवडणुकीत येनकेनप्रकारेण सत्ताप्राप्तीसाठी विविध भल्याबुऱ्या मार्गांचा अवलंब करावा लागतो आहे, हेच खरे! त्यासाठी सध्याच्या सत्तारूढ महायुतीत वरचढ होण्यास्तव भाजप आपल्यापरीने जातविग्रह, धर्मकलह, समाजद्रोह, आर्थिक-लालूच इत्यादीद्वारे आधीच आखल्या गेलेल्या रेषेच्या बाजूला आणखी मोठी रेषा आखून चाचपणी करण्यात व्यग्र आहे. राज्यात मागील अडीच वर्षांत झालेली अधोगती, स्वपक्षातील केंद्रीय सर्वोच्च नेत्यांचा फिका पडलेला करिष्मा, राज्यातील वाढती महागाई आणि बेरोजगारी, उद्याोगधंद्यांतील मंदी, जाती-जमातींतील वाढती तेढ, जनतेतील वाढता असंतोष यावर ‘लाडकी बहीण’ ही एकमेव उपयुक्त व लोकप्रिय योजना कितीशी तग धरणार? आणि म्हणूनच शेवटी हुकमी एक्का म्हणून विश्वसनीय आणि काळाच्या कसोटीवर सिद्ध झालेल्या ‘धर्म’ या नाजूक व भावनिक मुद्द्याचा आधार घेण्याची वेळ भाजपवर आली आहे. सत्ताप्रेमी भाजप आगामी काळात त्या मुद्द्याचा प्रभावीपणे व चलाखीने वापर करणारच, यात तिळमात्र शंका नाही!- बेंजामिन केदारकर, नंदाखाल (विरार)
सत्तेसाठी प्रतिगामींशी हातमिळवणी
‘सरकार कोणाचेही असो आठवलेंचे मंत्रीपद पक्के’ हे वृत्त (लोकसत्ता- २३ सप्टेंबर) वाचले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या या विधानाने केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या सत्तालोलुप वृत्तीवर चांगलाच प्रकाश टाकला आहे. आठवले हे नेहमी खुशीत गाजरे खाणारे एकमेव राजकारणी आहेत! आंबेडकरी विचारांना तिलांजली देऊन, पाठीराख्यांना वाऱ्यावर सोडून सत्तेसाठी प्रतिगामी, जातीयवादी शक्तींशी हातमिळवणी करणारे आठवले अधूनमधून मोदींवर स्तुतिसुमने उधळत आणि काँग्रेसला लाखोली वाहत आपला सत्तेचा खुंटा अधिक घट्ट करीत असतात! राजकीय वाऱ्याचा अंदाज आपल्या इतका कोणालाच नाही असे ते नेहमी फुशारकीने सांगत असतात! म्हणूनच ‘गुलाल तिकडे चांगभलं!’ या त्यांच्या वृत्तीमुळे उद्या काँग्रेसप्रणीत इंडिया आघाडी सत्तेवर आली तर रामदास आठवलेसुद्धा त्या सत्तेत असतील ही गडकरींनी केलेली टिप्पणी निश्चितच चुकीची नाही.- श्रीकांत मा. जाधव, अतीत (सातारा)
विरोध नाही, म्हणजे मूकसंमतीच!
‘केजरीवाल यांचे संघाला पाच प्रश्न’ ही बातमी (लोकसत्ता- २३ सप्टेंबर) वाचली. कोणत्याही प्रश्नाचे समर्थनीय उत्तर आजपर्यंत मातृसंस्थेला देता आलेले नाही. मुख्यालयावर ५० वर्षे तिरंगा का फडकवला गेला नाही, हा प्रश्न असो वा स्वातंत्र्य आंदोलनात या विचारधारेने उडी का घेतली नाही व पदोपदी विरोध का केला हा असो.
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी संघाला जे पाच प्रश्न विचारले आहेत त्यांची उत्तरे मिळणार नाहीत, हे त्यांनासुद्धा ठाऊक असावे. सदर प्रश्न विचारून जनसामान्यांच्या मनात शंकेची पाल सोडून राजकीय ईप्सित साध्य करणे हा या प्रश्नांमागचा उद्देश स्पष्ट आहे. केजरीवाल यांनी भाजपची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. भ्रष्टाचाराचे आरोप असलेले किंवा तो सिद्धही झालेले अनेक नेते सध्या जगातील सर्वांत मोठ्या पक्षात येऊन पापमुक्तीचा आनंद उपभोगत आहेत त्याला विरोध नाही म्हणजेच मूकसंमती आहे, हे कळण्यासाठी राजकीय पंडिताची आवश्यकता नाही.- परेश संगीता प्रमोद बंग, मूर्तिजापूर (अकोला)