‘एकीचा आकार!’ हे संपादकीय (३० मे) वाचले. तुर्कस्तानात सन २००३ पासून सत्तेत असलेल्या रेसेप तय्यिप एर्दोगान यांनी सत्तेवर कशी पकड बसवली हे वाचताना, ‘इस्तम्बूल प्रारूप’ तसेच भारतातील ‘गुजरात प्रारूप’ यांतील साम्य दिसू लागले. दोघांचे वक्तृत्व अफाट व लोकांना मोहवून टाकणारे व आकर्षित करणारे. एर्दोगान यांनी धर्मनिरपेक्ष वास्तूत धार्मिक कृत्यांना आश्रय दिला, हे आपल्याकडे नवीन संसद उद्घाटन कार्यक्रमात सर्वधर्मीय या गोंडस नावाखाली होमहवन, धार्मिक कर्मकांड करण्यातून दिसले, तेव्हा एक धर्मनिरपेक्ष वास्तू पुन्हा धर्माच्या प्रभावाखाली आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत असे वाटण्यास वाव मिळाला. ज्याप्रमाणे तुर्कीत विरोधकांना नामोहरम करण्याची पद्धत वापरली गेली तीच पद्धत भारतात वापरात आहे. पुतिन यांनी जे केले तेच तुर्कस्तानात २०२३ नंतर होण्याची शक्यता, पण भारतात २०२४ नंतर असे घडू नये. भारतीय लोकशाही धर्मनिरपेक्षता, समता, स्वातंत्र्य, बंधुता या मूल्यांसहित जिवंत राहावी असे वाटते, यासाठी भारतातील एकीचा आकार मोठा असावा. याला भारतातील सुज्ञ जन निश्चित साथ देतील यात तिळमात्र शंका नाही. -वसंत नेरकर, धुळे
देवळाच्या भव्यतेला महत्त्व!
‘एकीचा आकार!’ हे अन्योक्तीसारखे संपादकीय स्पष्टीकरणाशिवाय समजायला अवघड नाही. तरीदेखील येथील ‘अर्क’ तिथल्या ‘तुर्का’कडून काही शिकतील असे वाटत नाही. देवळाच्या भव्यतेला, प्रेक्षणीयतेला देवापेक्षाही महत्त्व देणाऱ्या भक्तांचे, देव असलाच तर त्याने रक्षण करावे. मे गॉड सेव्ह देम!- गजानन गुर्जरपाध्ये, दहिसर पश्चिम (मुंबई)
धर्म व प्रगतीची सांगड, म्हणून नेत्यांमागे एकी!
निधर्मीवादाचे कोणी कितीही कौतुक केले तरी जगभरातील बहुतेक देशांतून धर्म आणि धार्मिकता नष्ट झालेली नाही- ती आहेच. आणि एककल्ली किंवा व्यक्तिकेंद्री राजकारणाच्या बाबतीत म्हणाल तर, लोकशाहीत अगदी तळापासून हेच दिवसेंदिवस घट्ट होत जाताना दिसते आणि त्यात लोकांनाही काही गैर वाटेनासे झाले आहे. ‘धर्माला बाद न करता, विज्ञानाची कास धरून, मानवी जीवन सुखी- समाधानी करणे शक्य आहे’ हे जेव्हा लोकांना दिसून येते, त्या वेळी अशा नेतृत्वाच्या मागे असणारा एकीचा आकार कमी झाला तरीही तो टिकून राहातो, राहील. –मोहन गद्रे, कांदिवली (मुंबई)
..तर हुकूमशाहीचा पैस आक्रसेल
‘एकीचा आकार!’ हे संपादकीय (३० मे ) वाचले. धर्माची सांगड राजकारणाशी घातल्याने देश कसा रसातळाला जातो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे एर्दोगान यांचे तुर्कस्तान होय! २०१३ साली स्वधर्मप्रेम, आर्थिक स्वयंपूर्णता, विदेशी अर्थव्यवस्थेपासून मुक्ती आदी नानाविध गाजरांना भुलून एर्दोगानसारख्या अर्थ-शून्यांच्या मागे डोळेझाकपणे फरफटल्याने तुर्की जनता अर्थविपन्नावस्थेच्या खाईत आपसूकच लोटली गेली. तिसऱ्यांदा एर्दोगान यांना निसटता विजय मिळाला असला, तरी तुर्कीविरोधकांची अभूतपूर्व एकी यापुढेही अशीच टिकून राहिली तर आणि तरच एर्दोगान यांच्या हुकूमशाही वर्तनाला बराचसा पायबंद बसू शकेल, यात शंका नाही! –बेंजामिन केदारकर, विरार
‘एकीचा आकार’ घडवून आणण्याची गरज
‘एकीचा आकार!’ हे संपादकीय वाचताना असे लक्षात आले की तुर्की आणि भारत हे दोन्ही देश रशियाचे मित्र आहेत, यावरून जे रशिया आणि तुर्कीमध्ये सध्या घडते आहे ते भविष्यात आपल्या देशातही घडू शकते; पण आपल्या देशात जर ‘एकीचा आकार’ घडवून आणला तर मात्र आपल्या देशातील लोकशाही पुन्हा वाढीस लागेल. –हेमंत तागडे, अंतरगाव (ता. राळेगाव, जिल्हा यवतमाळ)
लैंगिक शोषणाची ओरड निव्वळ राजकीय
‘लोकमानस’मध्ये मंगळवारी (३० मे) प्रकाशित झालेल्या पत्रांच्या लेखकांना संसद भवन उद्घाटनप्रसंगी पुण्यवान अशा सर्वधर्मीय संतांचा नव्या संसदेतील वावर खटकला; पण जुन्या संसदेत झालेला चिदम्बरम, राहुल-सोनिया गांधी, शरद पवार यांसारख्या पापी आणि भोंदू लोकांचा वावर मात्र हरकत घेण्यासारखा वाटलेला नाही. महिला कुस्तीपटूंची लैंगिक शोषणाची ओरड निव्वळ राजकीय आणि येणाऱ्या निवडणुकीत भाजपवर किटाळ आणण्यासाठी केलेली आहे. ज्या वेळी हे तथाकथित शोषण होत होते त्या वेळी या ‘पदकविजेत्या’ महिलांना एका उतारवयीन ढेरपोटय़ा पुरुषाला चार रट्टे हाणता आले नाहीत? काय फायदा यांच्यावर देश करत असलेल्या खर्चाचा?-श्रीराम बापट, दादर (मुंबई)
‘आरोप खोटे’ हे सिद्ध करणे अद्याप अवघड
‘शोषणकर्त्यांना अभयच द्या’ हे पत्र वाचले. यात कळीचा प्रश्न असा की जर कुस्तीपटूंचे आरोप हे खोटे किंवा राजकीय हेतूने प्रेरित असतील तर ‘सर्वशक्तिमान’ केंद्रीय सरकारला हा खोटेपणा सिद्ध करणे आणि लोकांसमोर खरी बाजू आणणे अजिबात अवघड नाही. मग प्रश्न चिघळतो का आहे? की सुज्ञांनी योग्य तो अर्थ घ्यावा? –के. आर. देव, सातारा
मागणी ऐकूच येत नाही, तर..
कुस्तीगिरांच्या कथित लैंगिक शोषणाची चौकशी व्हावी ही मागणी जर केंद्र सरकारला, संसद सदनाला ऐकू येत नाही तर मग जनसामान्यांची काय गत? सामान्यांच्या व्यथा, समस्या, अडचणी केंद्र सरकारला ऐकू येतील? समजतील? चीन आणि पाकिस्तानला शह देण्याचा दावे करणारे केंद्र सरकार राजकीयदृष्टय़ा बलाढय़ मानल्या जाणाऱ्या ब्रिजभूषण सिंहविरोधात कारवाई करण्याचे धाडस करायला घाबरत आहे असेच चित्र यातून दिसते! –भूषण सरमळकर, दहिसर (मुंबई)
सावरकरांच्या विज्ञाननिष्ठेचे विकृतीकरण
इयत्ता ११ वी ही ‘एसएससी’ असण्याच्या काळात, सन १९७० मध्ये मराठी भाषा या विषयाच्या पाठय़पुस्तकात ‘मंत्रबळ नव्हे यंत्रबळ’ या शीर्षकाचा एक धडा होता. असे शीर्षक असलेल्या त्या निबंधाचे लेखक होते वि. दा. सावरकर. वैज्ञानिक विचारांचा पुरस्कार करणाऱ्या त्या निबंधात सावरकरांनी असे लिहिलेले होते की ‘कोणत्याही प्रकारचे मुहूर्त न पाहता आणि कोणत्याही प्रकारची वास्तुशांत अथवा पूजाअर्चा न करता बांधले गेलेले बर्मिगहॅम पॅलेस आमच्यावर राज्य करतात. तर शास्त्रशुद्ध वास्तुपूजा करून बांधले गेलेले आमचे शनिवारवाडे जमीनदोस्त होतात.’
सावरकर जयंतीच्या मुहूर्तावर होत असलेल्या नवीन संसद भवन उद्घाटन सोहळय़ांमधले धार्मिक विधी, देशाच्या विविध भागांतून आलेल्या साधूंचा वावर इत्यादी गोष्टी पाहात असताना मनात शंका येत होती की सावरकरांच्या नावाचा उदोउदो करणाऱ्यांना तरी सावरकर ज्ञात आहेत काय? सावरकरांच्या विचारांचे काय हे विकृतीकरण. (प्रस्तुत पत्राचा हेतू सावरकरांचे राजकीय विचार, त्यांना विरोध किंवा त्यांचे समर्थन हा नसून केवळ त्यांच्या विज्ञाननिष्ठेला सलामी हा आहे.) –डॉ. कैलास कमोद, नाशिक
महिलांच्या हत्यांमागची ‘मालकी हक्काची प्रेरणा’
‘दिल्लीत अल्पवयीन मुलीची लोकांसमोर निर्घृण हत्या’ (लोकसत्ता- ३० मे) हे वृत्त वाचताना वाटले की, याची जबाबदारी समाजावर सामूहिकरीत्या येते. मध्यंतरी पुरोगामी विचारांचा म्हणवणाऱ्या महाराष्ट्रातील हिंगणघाट येथे एकतर्फी प्रेमातून एका माथेफिरूने प्राध्यापिकेस दिवसाढवळय़ा पेट्रोल टाकून पेटवून दिले होते. त्यापाठोपाठ औरंगाबाद येथे अशीच घटना घडली होती. तसेच सुसंस्कृत शहर म्हणवणाऱ्या पुणे शहरातील बिबवेवाडीत एकतर्फी प्रेमातून एका शाळकरी मुलीचा ४० वार करून खून केल्याची घटना घडली.
असे म्हणतात की एखाद्या देशातील समस्येचे मूळ सदर देशातील संस्कृतीत दडलेले असते. त्यामुळे अशा प्रकारच्या अमानुष घटना समाजव्यवस्थेशी निगडित आहेत.. ‘मला नाही तर कुणालाच नाही’, या पुरुषसत्ताक मालकी हक्क प्रेरणेतूनच अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. स्त्रियांवर होणारे जीवघेणे हल्ले थांबण्यासाठी सामाजिक, कौटुंबिक, वैयक्तिक आणि राजकीय पातळीवर वेगळय़ा सामूहिक प्रयत्नांची आणि कृतिशील धोरणांची गरज
आहे. – बाळकृष्ण शिंदे, बिबवेवाडी (पुणे)