‘नरसंहाराची नशा!’ हा अग्रलेख (लोकसत्ता- ८ एप्रिल) वाचला. हमासच्या हल्ल्याला उत्तर म्हणून प्रतिहल्ला करून जीवित- वित्तहानीच्या सर्व मर्यादा ओलांडणाऱ्या इस्रायलच्या प्रतिहल्ल्याचे कदापिही समर्थन होऊ शकत नाही. पॅलेस्टाइनमधील निरपराध नागरिक मोठय़ा संख्येने बळी पडत आहेत. त्यातच इस्रायलची जनता सातत्याने नेतान्याहू यांच्याविरोधात लाखोंच्या संख्येने निदर्शने करत आहेत. याचाच अर्थ जनतेची दिशाभूल करणारा अतिरेकी राष्ट्रवाद सामान्य नागरिकांना अजिबात मान्य नाही, मात्र स्वत:चे भ्रष्ट आणि मदमस्त सरकार टिकविण्यासाठी नेतान्याहू अखेरची धडपड करत आहेत.

‘न्यूनगंडातून आक्रमकता’ हा नेतान्याहूंचा स्वभावधर्म आणि स्थायीभाव झाला आहे, मात्र इस्रायलची सदैव पाठराखण करणारी महासत्ता अमेरिका आता सावध झाली आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी नेतान्याहू यांना त्यांच्या अतिरेकी आक्रमकतेसंदर्भात जाब विचारला आहे आणि इस्रायलला यापुढे पाठीशी घालण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. हमाससारख्या अतिरेकी संघटना आणि त्यांना पािठबा देणाऱ्या इस्लामी जगताचे कायमचे शत्रुत्व नेतान्याहूंनी ओढवून घेतले आहे. इस्रायलच्या विनाशाचा एक मोठा खड्डा त्यांनी खणून ठेवला आहे, ज्याची किंमत नजीकच्या भविष्यात इस्रायलला आणि तेथील सामान्य जनतेला मोजावी लागणार, असे दिसते. इस्रायलचे हेच विधिलिखित आहे.-  डॉ. विकास इनामदार, पुणे</p>

जेरुसलेममध्ये कॉरिडॉर ठेवता येईल

Iran Israel Conflict
“बिन्यामिन नेतान्याहू २१ व्या शतकातील हिटलर”, इराणच्या भारतीय राजदूतांची टीका; भारताकडे मागितली मदत!
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
attack on Prithvi deshmukh
धक्कादायक! ठाकरे गटाच्या आमदार पुत्रावर सशस्त्र हल्ला; कायदा व सुव्यवस्था…
Israel army chief has signaled preparations for a military incursion into Lebanon
लेबनॉनमध्ये सैन्य घुसवण्याची तयारी,इस्रायल लष्करप्रमुखांचे संकेत; हेजबोलाचा क्षेपणास्त्राने हल्ला
yuvasena s dipesh mhatre
कडोंमपाच्या नाममुद्रेचा दिपेश म्हात्रेंनी गैरवापर केल्याची भाजपची आयुक्त डॉ. जाखड यांच्याकडे तक्रार; कायदेशीर कारवाईची मागणी
aimim tiranga yatra marathi news
‘एमआयएम’ कडून मुस्लीम मतपेढीला साद
Mercedes-Benz, Supriya Sule, Supriya Sule latest news,
मर्सिडिज बेंझला नोटीस देण्याच्या टायमिंगवर शंका; खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, “शासनाने…”
Hezbollah commander killed marathi news,
इस्रायलच्या हल्ल्यात हेजबोलाचा प्रमुख कमांडर ठार

‘नरसंहाराची नशा!’ हा अग्रलेख (लोकसत्ता- ८ एप्रिल) वाचला. यहुदींची भूतकाळात जी ससेहोलपट झाली त्याचा बदला म्हणून वर्तमानात आपली खोड काढण्यात अग्रेसर असणाऱ्या हमासला धडा शिकवायचाच, धुंदीत निरपराधांची कत्तल होत आहे, याचे भान नेतान्याहूंना राहिलेले नाही. या प्रश्नाला विस्तृत इतिहासाची पार्श्वभूमी आहे, तथापि इतिहासात किती मागे जायचे याचा विवेक नेतृत्वाला ठेवावा लागतो. आपल्या आसनाला सुरुंग लागेपर्यंत जर बाण सोडत राहिलो तर एक वेळ अशी येईल, की प्रत्यंचा मोडून पडेल आणि तसेच होत आहे. तेव्हा कैरो येथे होणाऱ्या बैठकीत केवळ शस्त्रसंधी होऊन भागणार नाही. द्वेषाची आग धुमसतच राहील. कधीतरी कायमस्वरूपी उपाय शोधला पाहिजे. पॅलेस्टिनी जनतेला त्यांची स्वतंत्र भूमी देणे किंवा त्यांच्याशी शांततामय सहजीवनाचा मार्ग शोधणे हे पर्याय असू शकतात. जेरुसलेम ही दोघांचीही पवित्र भूमी आहे; तिथे कॉरिडॉर ठेवता येईल. अमेरिकेला याबाबत कुशल मध्यस्थी करता येईल. मध्य-पूर्वेतील तणाव त्वरित संपणे अशक्य असले तरी त्या दिशेने प्रगती होत आहे. कायम शस्त्रसंधीची अट घालून आणि गरज पडल्यास संयुक्त राष्ट्र फौजा ठेवून शांतता साध्य करता येईल. -श्रीकृष्ण फडणीस, दादर (मुंबई)

प्रोपगंडाला बळी पडता कामा नये

‘नरसंहाराची नशा!’ हा अग्रलेख वाचला. राजकीय स्वार्थासाठी किंवा आपले अपयश झाकण्यासाठी जगभरात अनेक लोकशाही देशांतील राज्यकर्ते हुकूमशाहीच्या मार्गाने जात आहेत. या सर्वात एक समान धागा आढळतो, तो म्हणजे देशातील जनतेच्या मूलभूत समस्यांवर तोडगा काढण्यात आलेले अपयश. लोकशाहीत निवडणुकांच्या माध्यमांतून लोकांकडे घटनात्मक मार्गाने अशी मुजोर सत्ता उलथून टाकण्याचे अधिकार आहेत. जनमानसाच्या आत्मीयतेशी जोडलेल्या गोष्टींची सत्ताधाऱ्यांना जाणीव असते. त्यामुळे लोकांच्या राष्ट्रभक्तीला गोंजारणे, अन्य एखाद्या देशावर युद्ध लादणे, अर्धसत्य सांगून लोकांना अंधारात ठेवणे किंवा भविष्यातील विकासाचे स्वप्न दाखवणे, अशा विविध मार्गानी हुकूमशाही प्रवृत्तीचे सत्ताधीश प्रोपगंडा पसरवतात. या प्रोपगंडाला बळी पडून सर्वसामान्य लोक अशा सत्ताधाऱ्यांना पुन्हा सत्ता देतात. अशा अमर्यादित सत्तेमुळे लोकशाही देशांचे परिवर्तन हुकूमशाहीत होताना जग पाहत आहे. प्रोपगंडाला बळी न पडता सदसद्विवेकबुद्धी जागृत ठेवून लोकशाहीची हानी करणाऱ्या सत्ताधीशांना धडा शिकवणे हे नागरिकांचे कर्तव्य आहे. -विशाल चांगदेव कोल्हे, संगमनेर

खरगेंच्या हाती सूत्रे देण्याची हीच योग्य वेळ

‘खरगे विरुद्ध मोदी लढाईचे काय झाले?’ हा महेश सरलष्कर यांचा लालकिल्ला सदरातील लेख वाचला. काँग्रेस पक्षात बेरजेचे राजकारण करणारे खरगे यांच्या हाती राहुल गांधी यांनी काँग्रेसची धुरा दिल्यास, भाजप व मोदी यांच्या प्रचारातील अर्धी हवा निघून जाईल. पुढील प्रचार सभेत सोनिया गांधी यांनी खरगे हेच इंडियाचे नेते असल्याची आठवण करून द्यावी, याआधीही त्यांनी ऐन वेळी मनमोहन सिंग यांना पंतप्रधान केल्याचे अधोरेखित करावे. अद्याप वेळ गेलेली नाही, उलट हीच वेळ योग्य वाटते. मोदींविरुद्ध तगडी लढत देण्यासाठी तगडा उमेदवार म्हणून खरगे हाच उत्तम पर्याय आहे. अमेठीतून हरलेले व पुन्हा निवडून येण्याची शाश्वती नसलेले राहुल गांधी यांनी गांधी घराण्याचा गैरफायदा घेऊन गोंधळ घालू नये असे वाटते. असे केल्यास मोदी विरुद्ध राहुल गांधी या भाजपला अपेक्षित असलेल्या लढतीतील हवा निघून जाईल. काँग्रेस नेत्यांनी राहुल यांच्याविषयी स्पष्ट मते व्यक्त केली नाहीत तर पुन्हा एकदा दारुण पराभवाला सामोरे जावे लागेल. –  श्रीनिवास स. डोंगरे, दादर (मुंबई)

अशाने ‘इंडिया’चे भले कसे होणार?

‘खरगे विरुद्ध मोदी लढाईचे काय झाले?’ हा लेख वाचला. मल्लिकार्जुन खरगेंनी मतदारसंघात जाऊन, जनमताचा कानोसा घेऊन, मतदारांच्या मनावर विरोधकांच्या भूमिकेची मोहर उमटविण्याची गरज आहे, पण राहुल गांधीच मोर्चा सांभाळताना दिसतात. विरोधकांनी एकत्रित प्रचाराचा नारळ फोडला असता आणि खरगे यांच्या नेतृत्वाखाली राज्याराज्यांतून एक मंच, एक विचार अशा प्रचारकी थाटात विरोधक एकत्र असल्याचा संदेश दिला असता, तर त्याचा लाभ ‘इंडिया’ला झाला असता. राहुल यांनी अमेठीऐवजी वायनाडला पसंती दिल्याने त्यांना जिंकण्याची उमेद नसल्याचा संदेश जाण्याची दाट शक्यता आहे. अशाने ‘इंडिया’चे भले कसे होणार?

खरगे मैदानात उतरले असते तरीही मोदींनी प्रचाराच्या तोफा राहुल यांच्या ताफ्याकडेच वळविल्या असत्या. भाजपला राहुल यांचाच धोका अधिक वाटत असल्याचे दिसते. ‘इंडिया’तील पक्षांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी मात्र खरगेंसारखे नेतृत्व अधिक श्रेष्ठ ठरले असते. त्यांच्या नावावर माकप, द्रमुक, जनता दल आदी पक्षांच्या नेत्यांनी सहमती दर्शविली होती. निवडणुकांचे रण तापू लागेल तसे विरोधक एकत्रित येऊन सभा घेऊ शकतात. केजरीवाल यांना तुरुंगात टाकल्याने, दिल्लीत आप आणि काँग्रेसचे प्राबल्य राहील असे दिसते. महाराष्ट्रातही महाविकास आघाडीत सारे आलबेल नाही. त्यातच वंचितने हडेलहप्पी सोडून मिळेल ते पदरात पाडून घेण्यातच सर्वाचे भले आहे. काँगेसच्या जाहीरनाम्यातील रोजगाराभिमुख किमान वेतनाची हमी महत्त्वपूर्ण ठरेल.-डॉ. नूतनकुमार सी. पाटणी, छत्रपती संभाजीनगर

‘ती’ सीडी दाखवायची राहून गेली

‘जयंत पाटलांच्या अनुकूलतेनंतरच भाजपप्रवेशाचा निर्णय’ ही बातमी (लोकसत्ता ८ एप्रिल) वाचली. खडसे यांनी फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्याविषयी नाराजी व्यक्त करत ऑक्टोबर २०२० मध्ये त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. भाजप सोडताना त्यांनी केंद्रातील एकाही नेत्याला न दुखावण्याचा शहाणपणा दाखवला. तो आज त्यांच्या कामी आला. दरम्यानच्या काळात त्यांची ईडी चौकशी सुरू होती. त्यांनी भाजपला ‘तुमच्याकडे ईडी आहे तर, माझ्याकडे सीडी आहे’ लवकरच ती मी प्रसारित करणार आहे, असा इशारा दिला होता. त्यावेळी पवारही अगदी मनापासून खळखळून हसले होते. सीडीबद्दल सर्वानाच उत्सुकता होती. आज ना उद्या ती आपल्याला पाहायला मिळेल, असे सर्वानाच वाटत होते. ४० महिने उलटले; पण सीडी काही प्रसारित झाली नाही.

आता तर नाथाभाऊंनी कोलांटीउडी मारली आहे, त्यामुळे सीडी दिसण्याची शक्यताच नाही. नाथाभाऊंनी राष्ट्रवादीत प्रवेश केला, तेव्हा राष्ट्रवादी सत्तेत होती. आपल्यावर दाखल गुन्ह्यांवर काही उपाय निघेल, असा विचार त्यांनी केला असावा. परंतु, थोडय़ाच दिवसांत सत्ता गेली. आतातर राष्ट्रवादीही फुटली आहे. खडसे तिथेही नाराज आणि एकटे पडल्याचे दिसत होते. येथे आपले भविष्य नाही, याचा साक्षात्कार त्यांना झाला असावा; आणि भाजप आता सत्तेत आहे. आपल्या गुन्ह्यांवर तोडगा निघेल, हाच विचार करून त्यांनी कोलांटीउडी मारली आसावी, असे दिसते. खडसेंना हिरवा कंदील ही भाजप श्रेष्ठींनी फडणवीस आणि गिरीष महाजनांसाठी वाजविलेली धोक्याची घंटा तर नव्हे? -प्रदीप व्ही. खोलमकर, नाशिक