‘पराभवापूर्वीचा आकांत’ हा ‘पहिली बाजू’मधील केशव उपाध्ये यांचा लेख वाचनात आला. शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना थेट मानसिक रुग्ण ठरविण्यापर्यंत केशवरावांची मजल गेली आहे असे दिसते. उद्धव यांना ‘बिहेविअरल थेरपी’ आणि ‘कॉग्निटिव्ह थेरपी’ची गरज असल्याचे ते म्हणतात, तरी या दोन्ही थेरपींची गरज भाजपच्या प्रत्येक निष्ठावान नेत्यालाच आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या भाजपच्या मातृसंघटनेबद्दल उद्धव ठाकरे आक्षेपार्ह असे काहीही बोललेले नाहीत. बाहेरून घेतलेल्या नेत्यांची गर्दी पक्षात वाढली आहे व आपल्या हाती काय लागणार याची चिंता आधी केशवरावांनी केलेली बरी. त्यातून अतुल भातखळकर आणि माधव भंडारी यांच्यासारखी गत होण्यापासून त्यांनी स्वत:ला वाचवावे. एकारलेपणाचा धोका शिवसेनेला कधीच नव्हता. उलट उद्या एनडीएतील सर्व साथी एकेक करून सोडून गेले तर भाजपचे काय होईल, याचा विचार केशवरावांनी करावा. लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची आकडेवारी समोर येताच त्यांना उद्धव हे मानसिक संतुलन बिघडलेले वाटत आहेत. शिवसेना फोडण्याचे षङ्यंत्र ज्यांनी रचले ते यात यशस्वी होत नाहीत उलट शिवसेनेला यातून १०० टक्के राजकीय फायदा मिळतो आहे, हे पाहून भाजपच्या अशा अनेक मनोवैज्ञानिकांचे मेंदू आज सैरभैर झाले आहेत.- मिलिंद कोर्लेकरठाणे

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

अवलंबित्व कमी करणे हाच पर्याय

चीन- रशिया मैत्रीचे भारतीय संदर्भ हा ‘अन्वयार्थ’ (२१ मे) वाचला. वास्तविक भारत- रशिया दीर्घकालीन घनिष्ठ मैत्री असली, तरीही सध्याची चीन- रशिया यांची मैत्री हीच खऱ्या अर्थाने सबळ, सर्वंकष आणि नैसर्गिक मैत्री आहे, हे नक्कीच! चीन हा मार्क्सवादी (मार्क्सिस्ट कम्युनिस्ट) तर रशिया हा लेनिनवादी (लेनिनिस्ट कम्युनिस्ट) हाच काय तो दोघांमधील फरक! सध्या भारताची अमेरिकेशी मैत्री स्थापित झाली असली, अमेरिकन राजकारणी आपला राजकीय स्वार्थ साधताच भारतास केव्हाही एकाकी पाडण्यास मागे-पुढे पाहणार नाहीत. भारत रशियावर शस्त्रसामग्रीच्या आयातीसाठी, तर चीनवर व्यापारक्षेत्रातील आयातीसाठी मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. सदर दोन्ही बाबींत भारत लवकरच स्वयंपूर्ण झाला तर ठीक, अन्यथा जो दुसऱ्यांवरी विसंबला, त्याचा कार्यभार बुडाला अशी नामुष्कीची व लाजिरवाणी वेळ येण्याचाच दाट धोका संभवतो. या पार्श्वभूमीवर रशियावरील शस्त्रास्त्र अवलंबित्व कमी करण्यासाठी भारताने युद्धपातळीवर शस्त्रास्त्रनिर्मितीस वाव देणे, तद्वतच चीनमधील आयात घटविणे अत्यावश्यक आहे.-  बेंजामिन केदारकरनंदाखाल (विरार)

चीनला आर्थिक, लष्करी वेसण घालावी लागेल

चीन-रशिया मैत्रीचे भारतीय संदर्भ’ हा ‘अन्वयार्थ’ वाचला. बीजिंगमध्ये अलीकडील पुतिन-जिनपिंग भेटीच्या पार्श्वभूमीवर जारी केलेल्या संयुक्त निवेदनात ‘रशिया-चीनमुळे स्थिरता आणि शांतता’ असे नमूद करण्यात आले आहे. या चोरांच्या उलट्या बोंबा आहेत. गेली २५ वर्षे व्लादिमीर पुतिन रशियात निरंकुश सत्ता राबवत आहेत. त्यांच्या रशियास्थित आणि रशियाबाहेर पलायन केलेल्या विरोधकांना त्यांच्या प्रशासनाने निष्ठुरपणे संपविले. पुतिन यांना १९९१ पूर्वीचा रशिया, युक्रेनसहित १५ देशांचा सोव्हिएत युनियन पुन्हा उभारायचा आहे. मात्र पूर्वीच्या सोव्हिएत युनियनमधून फुटून बाहेर पडलेल्या देशांचा ओढा युरोपीयन युनियन आणि नाटोकडे आहे. हीच पुतिन यांची पोटदुखी आहे. चीनमध्येही क्षि जिनपिंग यांच्याकडे सर्व सत्ता एकवटली असून त्यांचे परराष्ट्रधोरण अधिकाधिक आक्रमक होताना दिसते. रशिया आणि चीन या दोन कम्युनिस्ट, दमनशाही, लष्करशाही, एकाधिकारशाही आणि विस्तारवाद जोपासणाऱ्या देशांचे एकत्र येणे ही अमेरिका, भारत यांच्यासह जगातील लोकशाही देशांसाठी धोक्याची सूचना आहे. रशिया सध्या युक्रेनच्या युद्धात रुतला आहे आणि आता तो चीनच्या जवळ आला आहे. चीनवर अवलंबून आहे. चीनने तैवानवरचा हक्क सोडलेला नाही. रशिया हा भारताचा पारंपरिक मित्र आहे. संरक्षण सामग्री आणि खनिज तेल आपण रशियाकडून आयात करतो. मात्र चीन- रशिया मैत्रीच्या पार्श्वभूमीवर भारताला या दोन्हीही आघाड्यांवर रशियावरील अवलंबित्व कमी करावे लागेल. तसेच ‘ऑकस’ आणि ‘क्वाड’ या राष्ट्रगटांचा सदस्य म्हणून चीनला अनुक्रमे आर्थिक आणि लष्करी वेसण घालण्यासाठी भारताला सक्रिय भूमिका निभावावी लागेल.- डॉ. विकास इनामदारपुणे

आयोग मतदारांना गृहीत का धरतो?

उत्साहाला घोळाच्या झळा!’ ही बातमी (लोकसत्ता २१ मे) वाचली. दुपारी रणरणत्या उन्हाचा त्रास नको म्हणून, अनेकांनी सकाळी सहा- साडेसहापासून मतदान केंद्रावर रांगा लावल्या होत्या. २०१९च्या निवडणुकीत, एका मतदान केंद्रात चार किंवा अधिक कक्ष असत. मात्र या वेळी दोनच खोल्यांचा वापर झाल्याने, मतदारांचे हाल झाले. त्यांना बराच वेळ रांगेत तिष्ठत उभे राहावे लागले. भर उन्हात, घोटभर पाणी तरी मिळेल असे मतदारांना वाटत होते. पण पिण्याच्या पाण्याची सोयदेखील करण्यात आली नव्हती. कोंदट आणि अरुंद जागेत मतदारांना उभे राहावे लागल्यामुळे, व पंख्याची सोय नसल्यामुळे, त्यांची अक्षरश: घुसमट होत होती. वरिष्ठ नागरिकांसाठी वेगळी रांग असते. पण वरिष्ठ नागरिकदेखील, सर्वसाधारण रांगेत उभे होते. शेवटी काही जणांनी पुढे जाऊन, त्यासंबंधी जाब विचारल्यावर, वरिष्ठ नागरिकांना प्राधान्य देण्यात आले. अशा वेळी मतदान केंद्रावर डॉक्टर असणे गरजेचे आहे. अनेकांची मतदान केंद्रे बदलली गेली, तर काहींची घरापासून दूर होती. अनेक ठिकाणी पंखे, पाणी, स्वच्छतागृहांची सोय नसल्याने, आयोगाच्या ढिसाळ कारभारामुळे, संतापून अनेकजण मतदानाविना घरी निघून गेले. निवडणूक आयोगाने मतदारांना गृहीत न धरता, त्यांच्या सोयीला प्रथम प्राधान्य द्यावे.- गुरुनाथ वसंत मराठेबोरिवली (मुंबई)

लोकशाही ही नेतेशाहीत परावर्तित

राज्यात अखेरच्या टप्प्यात पार पडलेल्या मतदानादिवशी मतदानाची टक्केवारी जेमतेम ५४ टक्के म्हणजे कमालीची घटलेली दिसली. मुंबई व राज्यात बऱ्याच ठिकाणी मतदानाची यंत्रे नादुरुस्त झाल्याने तर काही यंत्रे बंद पडल्याने अतिशय मंद गतीने काम सुरू होते त्यामुळे मतदारांना रांगेत तीन-चार तास उभे राहावे लागत होते. एकतर कधी नव्हे इतका कडक उन्हाळा त्यात रांगेत उभ्या असलेल्या मतदारांना ना सावलीत उभे राहायची सोय ना पाण्याची सोय त्यामुळे कित्येक मतदारांना मतदान न करताच परतावे लागत होते. मतदार मतदानाकडे दुर्लक्ष करतात म्हणून त्यांना मतदान करण्यासाठी अनेक माध्यमांद्वारे आवाहन करायचे आणि एखाद्या अपराध्यासारखी वागणूक द्यायची. मतदानाचा टक्का कमी होण्याचे हे एक कारण झाले त्याचबरोबर सुट्टी म्हणजे फक्त मौजमजा, फिरणे हिंडणे इतकेच असा काही लोकांचा समज झालेला आहे. दुसरे म्हणजे ज्या विचारधारेच्या उमेदवाराला आपण मत देतो तो निवडून आल्यावर त्या विचारधारेवर ठाम राहील का याची खात्री कोणत्याही उमेदवाराबाबत राहिलेली नाही. कोण कधी कोणत्या पक्षात जाईल याचा भरवसा मतदारांना राहिलेला नाही. नेत्यांनी त्यांची विश्वासार्हता गमावलेली आहे. म्हणून आपल्या राष्ट्रीय कर्तव्याबाबत जनमानसात इतकी उदासीनता आहे. सध्याची लोकशाही ही नेतेशाहीत परावर्तित झालेली आहे हेच मूळ कारण आहे.- मनमोहन रो. रोगेठाणे

पाणीपुरवठ्याचे वास्तवही तपासले जावे

देशात हर घर जल योजनेचे ७६ टक्के काम पूर्ण’ ही बातमी वाचली. ८५ टक्के एवढी महाराष्ट्रातील टक्केवारी दिली आहे. योजनेचे उद्दिष्ट पाहता प्रगती चांगली होते आहे असे वाटते, मात्र त्याच वेळी प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे याचाही आढावा घेतला गेला पाहिजे. गतवर्षी देशभर अल्प पाऊस झाला, त्यामुळे अनेक भागांत भीषण पाणीटंचाई आहे. टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. शहरात आणि ग्रामीण भागात पाणीपुरवठ्याचे प्रमाण अतिशय व्यस्त आहे. ग्रामीण भागातील रहिवाशांना विशेषत: महिलांना दूरवरून पाणी आणावे लागते. शहरातील पाणीपुरवठ्याची वेळ निश्चित नसल्याने कामधंदा सोडून नळाकडे डोळे लावून बसावे लागते आहे. अशा अनेक योजनांची अंमलबजावणी अतिशय संथ गतीने सुरू आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे संभाजीनगर. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना २०१९ मध्ये १६८० कोट रुपयांचा निधी मंजूर केलेली पाणीपुरवठा योजना, आज पाच वर्षांनंतर तिप्पट-चौपट किमतीची झाली आहे, मात्र ती अर्धा पल्लाही गाठू शकलेली नाही. शहरात १०-१२ दिवसांनी पाणीपुरवठा केला जातो तोही अपुरा. अनधिकृत नळ जोडणी, पाइप फुटणे/फोडणे, फोडून पाणी चोरी, पाणी गळती, राजकीय हस्तक्षेप, टँकरलॉबी इ. कारणांमुळे प्रामाणिकपणे कर भरूनही नागरिकांच्या नशिबी दुष्काळच आहे. बियर कारखान्याला मात्र अखंड पाणीपुरवठा होत आहे. ५० किलोमीटर अंतरावर जायकवाडी धरण असताना अवस्था भीषण आहे.- प्रमोद मुधळवाडकरपुणे

Story img Loader