प्रत्येक मतदान केंद्रावरील मतदानाची आकडेवारी ४८ तासांत प्रसिद्ध करण्याची मागणी करणारी ‘एडीआर’ची याचिका सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने शुक्रवारी (२४ मे) रोजी फेटाळल्यावर लगोलग शनिवारी (२५ मे) रोजी निवडणूक आयोगाने चालू निवडणुकीच्या पूर्ण झालेल्या पाच फेऱ्यांची सदरची आकडेवारी सार्वजनिक केली. आयोगाने तत्पूर्वी एडीआरच्या या मागणीला विरोध करताना कोर्टात अनेक कारणे दिली होती. आयोगाकडून प्रामुख्याने असे सांगण्यात आले होते की, ही माहिती सार्वजनिक करण्यात, माहितीचा गैरवापर होऊन चालू असलेल्या निवडणूक प्रक्रियेत चुकीच्या शंका निर्माण करणे, खोडसाळ आरोप करणे व गोंधळ माजविण्याचा प्रयत्न होऊ शकतो. मात्र कोर्टात असा दावा करणाऱ्या आयोगाकडून आता ही आकडेवारी जाहीर करताना सदर माहितीचा कोणी दुरुपयोग करू नये म्हणून काय खबरदारी घेण्यात आली ते काही ऐकिवात आले नाही. तसेही, आता मिळालेल्या आकडेवारीनुसार, चालू निवडणुकीच्या पूर्ण झालेल्या पाच फेऱ्यांत, आयोगाकडून त्या त्या फेरीअंती जाहीर केलेली मतदानाची टक्केवारी व आताची अंतिम टक्केवारी यातील फरकानुसार, एकूण मतदानात जवळजवळ सव्वा कोटी मतांची वाढ झालीच आहे. ही वाढ ‘माहिती गोळा करण्याच्या प्रक्रियेस लागलेल्या वेळामुळे’ असल्याचे आयोगाचे म्हणणे आहे. म्हणजे प्रक्रियेत वेळ जेवढा जास्त तेवढी एकूण मतदानात जास्त वाढ?! तसे असेल तर आता हा तणावाखालील आयोग, सातव्या फेरीनंतर संपूर्ण निवडणुकीची एकत्रित मतदान आकडेवारी जाहीर करायला किती वेळ घेईल व त्या ‘प्रक्रियेला लागणाऱ्या वेळानुसार’ एकूण मतदानात किती वाढ होणार, हा एक मोठय़ा कुतूहलाचा विषय आहे. निवडणूक आयोगाने आकडेवारी जाहीर करताना असेही म्हटले आहे की, ही माहिती – मतदान संपता वेळीच प्रत्येक बूथमधील उमेदवारांच्या निवडणूक प्रतिनिधींना अधिकृतरीत्या (फॉर्म १७ – क) देण्यात येत असते! असे जर असेल तर आज संगणक युगात आयोगाला या माहितीचे एकत्रीकरण करण्यास पाच/ दहा/ अकरा दिवस का लागावेत? म्हणजे शेवटी माहिती गोळा करण्याच्या प्रक्रियेस जेवढा अधिक वेळ तेवढे एकूण अधिक मतदान, हेच खरे का? -विनोद सामंत, दादर (मुंबई)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा