‘अमेरिकेच्या कानफटात…’ हे संपादकीय (१६ जुलै) वाचले. हा गोळीबार सर्वार्थाने मजबूत असलेल्या अमेरिकेच्या मनगटावरीलच हल्ला म्हणावा लागेल. आजघडीला जगातील सर्वांत श्रीमंत आणि बलाढ्य अशी महासत्ता असलेल्या अमेरिकेला तितकेच बलवान, चाणाक्ष, खमके आणि राजकारणात कसलेले राष्ट्राध्यक्ष लाभणे गरजेचे असताना, एक उमेदवार वयोवृद्ध व आजारी तर दुसरे उथळ विचारसरणीचे, हेकेखोर, हास्यास्पद धोरणे आखणारे, भाष्ये करणारे, विक्षिप्त आहेत. यांपैकी कोणाचेही राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होणे, केवळ अमेरिकेसाठीच नव्हे, तर जगासाठीही धोक्याचे ठरणार आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जितके कमकुवत असतील, तेवढेच चीन, रशिया, इराण, उत्तर कोरिया मजबूत होतील. त्यांचेच वर्चस्व प्रस्थापित होईल. असे होणे जगासाठी धोकादायक आहे, हे नक्कीच!
● बेंजामिन केदारकर, नंदाखाल (विरार)
ट्रम्प यांना सहानुभूती मिळेल?
‘अमेरिकेच्या कानफटात…’ हे संपादकीय (१६ जुलै) वाचले. ट्रम्प यांच्यावरील हल्ल्यामुळे अमेरिकेतील वातावरण ढवळून निघाले आहे. लोकशाही राष्ट्रांमध्ये मतभेदांच्या मुद्द्यावर वैचारिक प्रतिवाद व्हावेत आणि त्यातून मंथन होऊन समंजस विचारांना स्थान मिळावे, अशी अपेक्षा असते. अमेरिकेची लोकशाही ही त्या दृष्टीने प्रगल्भ असल्याचे मानले जात असले तरी, अध्यक्ष, माजी अध्यक्ष किंवा इतर नेत्यांवर हल्ले होण्याची ही पहिलीच वेळ नाही. आता या हल्ल्यातून अमेरिकेने आपल्या देशातील हिंसाचाराची कारणे गंभीरपणे शोधण्याची गरज आहे.
ट्रम्प हे वादग्रस्त अध्यक्ष होते. अमेरिकन काँग्रेसने दोन वेळा महाभियोग प्रस्ताव मंजूर केलेले ते एकमेव अध्यक्ष आहेत. तरी त्यांना पुरेशी सुरक्षा पुरविणे हे सरकारी यंत्रणांचे कर्तव्य आहे. या हल्ल्यानंतर संपूर्ण रिपब्लिकन पक्ष ट्रम्प यांच्यामागे उभा राहिला. हल्ल्यातून वाचल्यावर रक्तबंबाळ स्थितीत ट्रम्प यांनी मोठ्या हिमतीने उभे राहत लढण्याचा निर्धार व्यक्त केला, त्यामुळे विद्यामान अध्यक्ष बायडेन यांचे आव्हान अधिक अवघड होणार असले, तरी रिपब्लिकन पक्षाला सहानुभूती मिळेल का, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
● सुनील कुवरे, शिवडी (मुंबई )
यात जगन्नाथांचा उल्लेख करणे हास्यास्पद
‘अमेरिकेच्या कानफटात…’ हा अग्रलेख (१६ जुलै) आणि ‘जगन्नाथामुळे ट्रम्प बचावले : इस्कॉन’ ही बातमी वाचली. या हल्ल्याबाबत भारतीय भक्तांनी हे लक्षात घेतले पाहिजे की ट्रम्प यांच्यावर हल्ला झाल्यानंतर तिथे जमलेल्या गर्दीत चेंगराचेंगरी होऊन तसेच या हल्ल्याच्या विरोधात देशभरात हिंसक दंगली उसळून जीवित-वित्तहानी झाली नाही की जनजीवन विस्कळीत झाले नाही.
ट्रम्प यांनी ४८ वर्षांपूर्वी रथयात्रेस केलेल्या मदतीची परतफेड म्हणून त्यांना जगन्नाथाने वाचवले असा बादरायण संबंध जोडणारा दावा ‘इस्कॉन’ने करण्याची काहीही गरज नव्हती. ‘इस्कॉन’च्या या दाव्यावर काही प्रश्न उद्भवतात. जगन्नाथांची एवढी कृपा असतानासुद्धा मुळात ट्रम्प यांच्यावर हल्ला झालाच कसा? गेल्या अध्यक्षीय निवडणुकीत ट्रम्प हरलेच कसे? ‘कॅपिटॉल हिल’वर सशस्त्र हल्ला करण्यापासून तसेच हिंसेस उत्तेजन देणाऱ्या बंदूक धोरणास समर्थन देण्यापासून ट्रम्प यांना जगन्नाथांनी का रोखले नाही? पुढे ट्रम्प निवडून आल्यावर त्यांनी बेबंदपणे कारभार सुरू केल्यास जगन्नाथ त्यांना रोखणार याची खात्री आहे काय? या प्रश्नांची उत्तरे देणे ‘इस्कॉन’ला अवघड जाऊ शकते. अशा प्रकारची अविवेकी वक्तव्ये करून जगन्नाथांविषयी अंधश्रद्धा पसरवण्याचा आणि अमेरिकेतील राजकारणात जाणते-अजाणतेपणे जगन्नाथांस गोवण्याचा हास्यास्पद प्रयत्न ‘इस्कॉन’ने करू नये ही अपेक्षा आहे.
● उत्तम जोगदंड, कल्याण
अजित पवार यांची वेळ चुकली?
‘रविवारी टीका, सोमवारी भेटीला’ ही बातमी (लोकसत्ता १६ जुलै) वाचली. शरद पवार यांनी स्वकष्टाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा केला. नेते, कार्यकर्ते घडवले. पुढे यातील अनेकांनी शरद पवार यांची साथ सोडली आणि पक्षही बळकावला. शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीचा वाद अद्यापही सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. शिंदे आणि अजित पवार यांनी ज्या पद्धतीचे राजकारण केले त्याचे पडसाद लोकसभा निवडणुकीत उमटले.
राष्ट्रवादीत फूट पडल्यापासून सारे काही आलबेल आहे असे दिसत नाही. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे आडूनआडून नाराजी व्यक्त करत आहेत. विधानसभा निवडणुकीपर्यंत कोण साथ देईल कोण सोडेल याचा भरवसा नाही, अशी स्थिती आहे. भाजपच्या वाटेने जे गेले त्यापैकी अनेकांच्या मागील यंत्रणांचा ससेमिरा थंडावला आहे. अनेकांच्या चौकशा थांबल्या, कोणाची फाइलच हरवली, काहींची ईडीने जप्त केलेली संपत्ती मोकळी झाली, आजारपणामुळे नबाब मलिक यांना जामीन मिळाला तो वारंवार वाढविला जात आहे, त्याच वेळी अरविंद केजरीवाल यांना मात्र वारंवार तुरुंगात डांबले जात आहे. दोन दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांनी बारामतीत जाऊन शरद पवारांवर टीका केली मात्र दुसऱ्याच दिवशी ते शरद पवारांच्या भेटीस गेले. त्यावर ज्यांना जायचे त्यांनी जावे नवीन नेतृत्व निर्माण करू असे अजित पवार म्हणत आहेत. शरद पवार यांची साथ सोडण्यासाठी अजित पवारांनी साधलेली वेळ चुकली का?
● अनंत बोरसे, शहापूर (ठाणे)
कुरघोडीला छेद देण्यात गैर ते काय?
‘रविवारी टीका, सोमवारी भेटीला’ ही बातमी वाचली. एका मंत्र्याने विरोधी पक्षातील ज्येष्ठ, अनुभवसंपन्न पक्ष नेत्याची भेट घेणे, ही सकारात्मक राजकारणाची सुरुवात असल्यासारखे वाटते. राजकीय पक्षांनी कायमच एकमेकांवर कुरघोडी करत, जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करावयाचे, या स्थितीला छेद देणारे, म्हणून हे पाऊल स्वागतार्ह आहे. नागरी प्रश्नांबाबत सर्वच राजकीय पक्षांनी एकमेकांत सुसंवाद साधणे, भविष्यात महाराष्ट्राला सूसंवादातून समृद्धीकडे नेण्याचा योग्य मार्ग ठरणार आहे.
● प्रदीप करमरकर, नौपाडा (ठाणे)
त्यांना इथवर आणणारेही कौतुकास पात्र
‘लाभांश : हा १७ आणि तो २१!’ हे विशेष संपादकीय (लोकसत्ता १६ जुलै) वाचले. सर्वसाधारण विचार केला तर जागतिक पातळीवर भारतही महासत्तेच्या दिशेने झेपावना दिसतो, पण क्रीडा क्षेत्रात आपण जेमतेमच आहोत. वैयक्तिक पातळीवर ऑलिम्पिकमध्ये खाशाबा जाधव यांनी पहिले कांस्य पदक प्राप्त केले तेही स्वकष्टांतून. अलीकडील काळात जरा प्रगती होईल असे वाटत असताना आपण काही मूळ खेळांना मात्र जमेत धरेनासे झालो. हॉकीमध्ये आपण १९८० नंतर गत ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक प्राप्त केले. २५ जून १९८३ला क्रिकेटमधील पहिले विश्वविजेतेपद मिळाले म्हणून आपण त्याचा अभिमान बाळगतो. युरो कप असो अथवा फुटबॉल विश्वचषक मेस्सी, रोनाल्डो यांची नावे भारतीयांच्या तोंडी असतात, मात्र आपलाच सुनील छेत्री अनेकांना माहीत नसतो. युरो स्पर्धेत पात्रता फेरीपासूनच श्रेष्ठ संघ सहभागी असतात, त्यामुळेच लोक त्या गांभीर्याने पाहतात. अल्काराझ आणि यमाल या स्पॅनिश युवकांना इथवर येण्यासाठी ज्यांनी प्रोत्साहन दिले तेही यासाठी नमन करावे असेच आहेत
● सुनील समडोळीकर, कोल्हापूर
भाजपला घरचा अहेर
‘भाजपकडून काश्मिरी पंडितांचा वापर; ‘पनुन काश्मीर’चा आरोप’ ही बातमी (लोकसत्ता १६ जुलै ) वाचली. सोमवारी पनुन काश्मीर संघटनेने भाजप नेतृत्वावर टीका केली आणि भारतीय जनता पक्षाने काश्मिरी पंडितांच्या विस्थापित होण्याच्या प्रकरणाचा वापर विरोधकांना दोष देण्यासाठी आणि संपूर्ण देशातील हिंदूंची मते मिळविण्यासाठी केला, असा आरोप केला. काश्मिरी पंडितांच्या हक्कांसाठी लढा देणाऱ्या या संघटनेने दावा केला की, भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने गेल्या दहा वर्षांत विस्थापित झालेल्या या समुदायाकडे पूर्ण दुर्लक्ष केले. केंद्र सरकारने जम्मू- काश्मीर राज्याची दोन केंद्रशासित प्रदेशांत विभागणी केली, परंतु काश्मिरी पंडितांबाबत उदासीनता कायम राहिली. जम्मू आणि काश्मीर हे वेगवेगळे केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आल्यावरही काश्मिरी पंडितांच्या हत्यांचे सत्र सुरूच आहे. यावरून केंद्र शासनाचा अनुच्छेद ३७० रद्द करण्यामागील उद्देश वेगळा होता का, असा प्रश्न पडू शकतो. हिंदुत्वचा उघड पुरस्कार करणाऱ्या व ऊठसूट हिंदुहिताचा दावा करणाऱ्या भाजपला हा घरचा अहेर नव्हे काय?
● प्रा. एम. ए. पवार, कल्याण