अहमदनगर शहराचे नामकरण आता ‘अहल्यादेवी नगर’ होणार असल्याचे वृत्त (१ जून) वाचले. मलिक नाईब निजाम-उल मुल्क हा मूळचा विजयनगरचा ब्राह्मण. पुढे त्याने इस्लाम स्वीकारला. त्याचा मुलगा ‘अहमद’ याने १४९६ मध्ये बहामनी साम्राज्यातून फुटून अहमदनगर येथे निजामशाही स्थापन केली. दौलताबाद ते जुन्नर या मार्गावर ‘बिंकर’ हे एक खेडे होते. त्याच्या मध्यवर्ती ठिकाणास ‘अहमदनगर’ हे नाव देऊन माळीवाडा, मोरचूदनगर, नालेगाव, सर्जेपुरा, चाहुराणा इ. खेडय़ांना सांधून अहमदशाहने हे शहर वसविले. एक प्रकारे अहमदनगर शहराचे नाव स्वयंभू होते. त्याला औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांप्रमाणे इस्लामी आक्रमकांची शेखी मिरवण्याची पार्श्वभूमी नाही.
गोपीचंद पडळकरांनी अहमदनगरच्या ‘नामांतराचे पिल्लू’ सोडण्यापूर्वी त्याची पुसटशीही चर्चा इथल्या सामान्य नागरिकांमध्ये नव्हती. एखाद्या शहराला पुण्यश्लोक अहल्यादेवींचे नाव दिले जात असेल तर तो त्या शहराचा गौरव आहे. मात्र इतिहास नाकारून एका बकाल शहराला राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक असणाऱ्या अहल्यादेवींचे केवळ नाव देऊन आपण या लोकविलक्षण राणीचे वारस म्हणवण्यास पात्र ठरू शकत नाही. आपल्या दुर्दैवी सामाजिक प्रथेप्रमाणे ‘सध्या’ अहल्यादेवी केवळ ‘धनगर’ समाजाच्या आहेत! या समाजाला निवडणुकीपूर्वी वाढीव आरक्षणाचे गाजर दाखवले, पण ते कायदेशीररीत्या पूर्ण करता येऊ शकत नाही याची जाणीव झाली, की मग त्या-त्या समाजांतील महापुरुष शोधून त्यांचा सरकारी पातळीवरून जयजयकार केला जातो. जातीपातींच्या राजकीय कप्प्यांत बंदिस्त करून आपण या महान पूर्वजांचा दररोज अपमान करत आहोत.
शहरात झालेला पहिला उड्डाणपूल पहायला जवळपास दोन महिने आम्ही नगरकर गर्दी करत होतो, एवढे आम्ही विकासापासून दूर आहोत. केवळ राजकीय डाव म्हणून शहराचे नामकरण करण्याऐवजी (यामुळे होणारा करोडोंचा प्रशासकीय खर्च वेगळाच!) शिंदे-सरकारने अहमदनगर शहरातील खड्डय़ांत लपलेले दोनेक रस्ते शोधले असते तर ते शहरवासीयांच्या दुवांचे मानकरी ठरले असते. येत्या निवडणुकांपूर्वी पुण्याचे ‘जिजाऊ नगर’ आणि महाराष्ट्राचे ‘भगवेराष्ट्र’ झाल्यास आश्चर्य वाटायला नको. –किरण बाबासाहेब रणसिंग, अहमदनगर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा