‘जुगाडांच्या पलीकडे…’ हा अग्रलेख (१२ ऑगस्ट) वाचला. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने ७ पदके मिळवली होती, त्यात एक सुवर्णपदक असल्याने भारताचा क्रमांक ४८वा होता, परंतु यावेळी ६ पदके आणि त्यात एकही सुवर्णपदक नसल्याने भारताचा क्रमांक ७१वा म्हणजे २३ अंकांनी खाली आला. ही कामगिरी वाईटही नाही आणि चांगलीही नाही असेच म्हणावे लागेल. एकच सुवर्णपदक जिंकले तरी पाकिस्तानचा क्रमांक ६२वा, आपल्यावर, लागला आहे महत्त्व किती आहे हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने यावेळी भालाफेकीत ९० मीटरच्या पार भालाफेक करून ऑलिम्पिक विक्रम नोंदवला. हा विक्रम तोडण्यासाठी नीरज चोप्राला भरपूर मेहनत घ्यावी लागेल एवढे नक्की. भारत पाकिस्तान यांच्यामध्ये खेळांमध्ये, मैदानावर, विशेषत: क्रिकेटमध्ये कितीही दुष्मनी असली तरी नीरज चोप्रा आणि नदीम यांच्या आयांमध्ये काहीही दुश्मनी नाही ही गोष्ट किती चांगली आहे!
भारतीय ऑलिम्पिक संघात ११७ खेळाडू आणि १४० सपोर्ट स्टाफ होता याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. भारतीय संघाचे आणखी एक महत्त्वाचे दुखणे म्हणजे चौथ्या क्रमांकाची कामगिरी. एक नाही दोन नाही तर चार चार खेळांमध्ये हे चौथ्या क्रमांकाचे दु:ख सहन करावे लागले. पुढील अमेरिकेतील लॉस अँजेलिस ऑलिंपिकच्या वेळी खेळाडूंची मानसिक तयारी करून घेताना या चौथ्या क्रमांकाच्या दु:खाची विशेष काळजी घेणे, लक्ष देणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे देखील पदकांच्या संख्येत निश्चितच वाढ होईल. शालेय शिक्षणामध्ये फक्त शारीरिक शिक्षणाचा तास असून उपयोग नाही. शालेय वयापासूनच ऑलिम्पिकसाठीची तयारी करून घेणे महत्त्वाचे आहे. २०३६चे ऑलिम्पिक भरवण्याचे स्वप्न बाळगणाऱ्यांनी याकडे लक्ष देणे महत्त्वाचे ठरेल? ऑलिम्पिकमध्ये भाग घेतलेल्या सर्व भारतीय खेळाडूंनी परदेशांत जाऊन सराव केला. असे का? आपल्या देशातील किती सेलेब्रिटीज ऑलिम्पिक बघावयास गेले होते? जुगाडांच्या पलीकडे पाहायची सवय राजकर्त्यांना, खेळातील प्रशासकांना लागणे महत्त्वाचे आहे.शुभदा गोवर्धन, ठाणे
मिरवण्यात आपले सत्ताधारी सर्वांत पुढे
‘जुगाडांच्या पलीकडे…’ हा अग्रलेख वाचला. पदकसंख्येत भारताची झालेली घसरण चिंतेची बाब आहे.परंतु ज्याप्रमाणे सरकारी व्यवस्थेत भ्रष्टाचार बोकाळलेला आहे तसाच तो क्रीडा क्षेत्रातही फोफावल्याचे दिसते. राज्यस्तर असो वा राष्ट्रस्तरावर निवड होण्यासाठी दबावतंत्राचा व आमिषांचा वापर केला जातो. सर्वोत्तम खेळाडूच निवडला जाईल याची शाश्वती नसते. गुणवत्ता असूनही वरदहस्ताअभावी निवड न झालेल्या खेळाडूंची मुस्कटदाबी होते. मोठ्या लोकसंख्येच्या तुलनेत भारत पदक संख्येत मागे पडतो, त्यामागे हीच कारणे आहेत. बाकी मिरवण्यात तर आपल्या सत्ताधाऱ्यांचा हात कोणीही धरू शकत नाही. एक नवीन ट्रेन सुरू करतानासुद्धा झेंडा दाखवण्यासाठी खुद्द पंतप्रधान उभे राहातात याला काय म्हणावे.- दीपक सांगळे, शिवडी (मुंबई)
क्रीडा संस्कृतीचा विकास आवश्यक
‘जुगाडांच्या पलीकडे…’ हे संपादकीय वाचले. सिमॉन बाइल्सने आपल्या अविश्वसनीय प्रतिभेने आणि धैर्याने सर्वांना चकित केले. तिचा हा विजय केवळ पदकांच्या संख्येपुरता मर्यादित नाही, तर तिने व्यक्तिगत संघर्षावर मात करून मिळवलेला आहे. दुसरीकडे, भारताची कामगिरी निराशाजनक आहे. टोकियो ऑलिंपिकच्या तुलनेत भारताचा क्रमांक खूपच खालावला. आपली क्रीडा पद्धती, प्रशिक्षण आणि पायाभूत सुविधांचा अभाव ही त्यामागची कारणे असू शकतात. ऑलिंपिक हे केवळ पदके जिंकण्यापुरते मर्यादित नाही. ते देशाची क्रीडा संस्कृती, खेळाडूंचे मानसिक स्वास्थ्य आणि समाजातील समता या गोष्टींचेही प्रतीक आहे. सिमॉन बाइल्सच्या यशातून आपण हे शिकू शकतो की, कठीण परिस्थितीतही आपण आपले लक्ष्य साध्य करू शकतो. भारताला ऑलिम्पिकमध्ये यशस्वी होण्यासाठी, आपल्याला आपल्या क्रीडा पद्धतीत मूलभूत बदल करणे आवश्यक आहे. खेळाडूंच्या शारीरिक आणि मानसिक विकासावर भर देणे, त्यांना उत्तम प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून देणे आणि क्रीडा संस्कृती विकसित करणे ही काही महत्त्वाची पावले उचलावी लागतील.- लक्ष्मणराव तरवटे, परभणी
समाजाला एकत्रितपणे पुढे न्यावे लागेल
‘कानउघाडणी करणारी स्थगिती’ हा ‘अन्वयार्थ’ (१३ ऑगस्ट) वाचला. धर्मनिरपेक्षता व आधुनिक मूल्यांच्या निकषावर देशाची उभारणी करण्याचा संकल्प संविधान अस्तित्वात आले, तेव्हाच केला गेला होता. मात्र तो सिद्धीस जाण्याच्या मार्गातील एक मोठा अडथळा धर्माच्या नावाखाली रूढी, परंपरा, नियम आणि कर्मकांडांमुळे होणारे शोषण हा आहे. देशात सध्या धर्माच्या नावाने अतिरेकी विचारधारा फोफावताना दिसते.
या विचारांचे वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात दडपशाहीचे व असुरक्षितेचे वातावरण निर्माण केले जात आहे. यामध्ये शिक्षण क्षेत्रासारख्या पवित्र संस्थेने सामील व्हावे हे फारच दु:खदायक आहे. जिथे धर्म, रूढी, परंपरा प्रगतीच्या आड येतात तिथे ती अडचण दूर करून मानवी प्रगती साधण्यासाठी सर्व धर्मांतील उदारमतवादी घटकांनी योग्य मार्गदर्शन व धर्मचिकित्सा करून समाजाला एकत्रितपणे पुढे घेऊन जाणे हा एक सुंदर मार्ग आहे. पण यासाठी अतिरेकी नियम न घालता संविधानाच्या मार्गाने जाणे योग्य ठरेल. धर्मग्रंथ अपरिवर्तनीय शाश्वत असे अजिबात नाहीत. सर्व धर्म धर्मग्रंथांवर अवलंबून आहेत. त्या धर्माने काळाच्या एका चौकटीत अध्यात्माने त्याला जे सांगितले ते लोकांना समजावून देण्यासाठी धर्मग्रंथ निर्माण झाले. काळाची ही चौकट बदलली तर त्या चौकटीत धर्माने काय सांगितले असते हे धर्मग्रंथांनी सांगितले पाहिजे, मात्र तसेही होताना दिसत नाही. शेवटी विवेकानंदांच्या शब्दांत सांगायचे म्हणजे आपल्या समोरची खरी अडचण समजून जगातील सर्व धर्म निर्जीव विडंबनाच्या रूपात उरले आहेत. सर्व धर्मांना आज जळजळीत शब्दांची आणि त्याहूनही जळजळीत परिवर्तनीय कृतीची आवश्यकता आहे.- पायस मच्याडो, नंदाखाल (वसई)
हे धर्मांधतेला प्रोत्साहनच
‘कानउघाडणी करणारी स्थगिती’ हा ‘अन्वयार्थ’ (१३ ऑगस्ट) वाचला. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीच्या आदेशाचा आदरच आहे. लेखात असा उल्लेख आहे की महाविद्यालयाने केवळ मुस्लीम मुलींना हिजाब परिधान करून येण्यास बंदी घातली, परंतु महाविद्यालयाने केवळ हिजाब परिधान करण्याबाबत बंदी घातली नव्हती तर विशिष्ट धर्माची ओळख दाखवणारे कोणतेही कपडे अथवा वस्तू या बाबत ती बंदी होती. स्थगिती घटनेने दिलेल्या मूलभूत अधिकाराला बळ देणारी आहे, असे जरी लेखात म्हटले असले तरी सदसद्विवेकबुद्धीने विचार केल्यास धर्माच्या आणि विशिष्ट विचारसरणीच्या पगड्यामुळे हिजाब परिधान करणे अथवा धार्मिक ओळख दाखवता येईल अशा वस्तू वापरणे या गोष्टी केल्या जातात ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.-अॅड. सुरेश पटवर्धन, कल्याण
तीन तिघाडा होऊ शकतो
‘इकडे पवार तिकडे चाणक्य’ हा ‘लाल किल्ला’ (१२ ऑगस्ट) वाचला. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर चाणक्यांच्या चाणक्यनीतीला काहीसा ब्रेक लागला आहे, तर शरद पवार सध्या मविआसाठी रणनीती आखत आहेत. महाराष्ट्राबरोबरच, हरयाणा, झारखंड या राज्यांतील विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत, दोन्ही बाजूंनी जोरदार तयारी सुरू आहे, मात्र आता ‘मोदी की गॅरंटी’ जवळपास संपली असल्याने मोदींच्या नावावर मते मागितली जाणार का, याबाबत साशंकताच आहे. चाणक्य त्यांच्या राज्यातील ‘वंडरबॉय’च्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविणार आहेत, पण ‘वंडरबॉय’ देवेंद्र फडणवीस यांची २०१४-१९ च्या काळात जी प्रतिमा होती ती त्यांनी २०२२ मधे केलेल्या नसत्या उठाठेवीमुळे बिघडली आहे. भलेही त्यांनी राज्यात यशस्वीरीत्या सत्तांतर करून दाखवले असले तरी सत्ता मिळवूनदेखील त्यांना ना मुख्यमंत्रीपद मिळाले ना त्यांची प्रतिमा उंचावली. सध्या महायुती आणि मविआ दोन्ही आघाड्यांमध्ये कधी तीन तिघाडा काम बिघाडा होईल, हे सांगता येत नाही. महायुतीमध्ये अजित पवारांवरून बरीच नाराजी आहे, मध्यंतरी दिल्लीतील ‘चाणक्य’ पुण्यात आले आणि त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली, त्यामुळे तर अजितदादा गट अस्वस्थ झाला होता. भ्रष्टाचाराबाबत चाणक्य अमित शहा यांनी बोलणे हाच एक मोठा विनोद भासतो.- अनंत बोरसे, शहापूर (ठाणे)