‘बुल्स इन चायना शॉप्स!’ हा अग्रलेख वाचला. रस्त्यावर न्याय हा अन्यायच आहे. बदलापूर चकमक प्रकरण गंभीरच आहे. चकमकीनंतर फटाके फोडणे, पेढे वाटणे ही कसली संस्कृती? जंगलराजमुळे महाराष्ट्र बिहार, उत्तर प्रदेशच्या वळणावर जातो आहे की काय? असा सवाल उपस्थित होतो. राज्याच्या राजकारणाने न्यूनतम पातळी गाठली आहे. अशी प्रकरणे घडत राहिली तर जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडेल. शासन, प्रशासन आणि पोलीस यंत्रणेने याची गंभीर दखल घ्यावी अन्यथा पुरोगामी, सुसंस्कृत महाराष्ट्राचे मातेरे होऊन तो रसातळाला जाईल. बुलेट, बुलडोझर संस्कृतीचे उदात्तीकरण करणे निषेधार्हच आहे.- डॉ. वि. हे. इनामदार, पुणे

काळ सोकावण्याची शक्यता दाट

Loksatta editorial Yogi Adityanath order to eateries should display the names of the owners in uttar Pradesh
अग्रलेख: …ते देखे योगी!
25th September Rashi Bhavishya & Panchang
२५ सप्टेंबर पंचांग व राशीभविष्य: ग्रहमानाच्या साथीने दिवस…
Loksatta editorial Narendra modi statement Karnataka govt arrested ganesh murti congress
अग्रलेख: कर्मभूमीतील धर्मकसोटी!
loksatta editorial on noise pollution marathi news
अग्रलेख: नेमके काय साजरे केले?
Anura Disnayake
अग्रलेख: दक्षिणेचा ‘वाम’पंथ!
loksatta editorial marathi news
अग्रलेख : दोन ध्रुवांवर दोघे
loksatta editorial on National Science Awards
अग्रलेख : नंदीबैल नगरी!
loksatta editorial one nation one election
अग्रलेख: होऊन जाऊ दे…!

कायदा हातात घेऊन नैसर्गिक न्यायाच्या मर्यादा ओलांडल्या जातात, संशयाला प्रचंड अवकाश दिला जातो, गुन्ह्यातील सहआरोपींना मोकळे सोडल्याचे दिसते आणि जनतेला अक्षम्यरित्या गृहीत धरले जाते तेव्हा ‘म्हातारी मेल्याचं दु:ख नाही पण काळ सोकावतो’ ही म्हण आठवते. घटनेच्या चौकटीत राहून, सर्व सहआरोपींचीही चौकशी झाली असती आणि त्यानंतर संबंधितांना फाशी वा अन्य शिक्षा सुनावली गेली असती व तिची अंमलबजावणी झाली असती, तर तो खरा न्याय ठरला असता. पण तसे झाले नाही. अशा स्थितीत समस्येचे समूळ उच्चाटन झाले, असे म्हणता येत नाही. घटनेनंतर ज्या पद्धतीने आनंद साजरा केला गेला, तो काळ सोकावण्यास मदत करणाराच आहे. समाज म्हणून आपण हे वेळीच समजून घेतले नाही, तर तो काळ आपल्याला क्षमा करणार नाही.- डॉ. संजय साळुंखेसांगली

हा तर न्यायाचाच एन्काउंटर

बुल्स इन चायना शॉप्स!’ हा अग्रलेख (१५ सप्टेंबर) वाचला. ही घटना घडल्या घडल्या भाजप आणि शिवसेनेच्या आयटी सेलने तिचा राजकीय लाभ घेणाऱ्या पोस्टचा आणि जाहिरातींचा जोरदार धडाका सुरू केला. भाजपचे कायदेपंडित उज्ज्वल निकम हेही या घटनेच्या समर्थनार्थ लगोलग माध्यमांसमोर आले. अतिवाचाळतेमुळे शिवसेनेचे प्रवक्ते शिरसाट यांच्याकडून या घटनेच्या चौकशीच्या मागणीचा चुकून प्रमाद घडला असला, तरी सत्ताधारी या घटनेची भडकपणे जाहिरात करून ज्या प्रकारे राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न करत आहेत; हे पाहिले तर सत्ताधाऱ्यांची कीव करावीशी वाटते. लहान मुलीवर अत्याचार करणाऱ्या या नराधमाबद्दल कुणालाही सहानुभूती असण्याचे कारण नाही; परंतु आचारसंहिता जाहीर होण्यास काही दिवस बाकी असताना आरोपीचा एन्काउंटर करून सनसनाटी निर्माण करायची आणि हरलेल्या सामन्यात शेवटच्या बॉलवर सिक्स मारून आपल्या समर्थकांना दिलासा देण्याचा प्रयत्न यात दिसतो आहे. विरोधकांना महिलाविरोधी ठरवून स्वत:ला लाडक्या बहिणींचे तारणहार ‘सिंघम भाऊ’ म्हणवून घेण्याची ही धडपड नव्हे का, याचे उत्तर लाडक्या बहिणींना द्यावेच लागेल.- किशोर बाजीराव थोरातनाशिक

सत्तेत राहण्यासाठी कायदा हाती?

बुल्स इन चायना शॉप्स!’ हा अग्रलेख (१५ सप्टेंबर) वाचला. पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार करून आरोपीचे एन्काउंटर करणे ही संस्कृती दीर्घकाळ सत्तास्थानी असलेल्या काँग्रेसने रुजवली. आता तो वारसा सर्वपक्षीय सत्ताधारी चालवत आहेत. कायदा हातात घेणे हा सर्वसामान्यांसाठी गुन्हा ठरतो परंतु कुंपणच शेत खात असेल तर जाब कोणाला विचारायचा? येत्या काळात हाही एन्काउंटर सबळ पुराव्यांअभावी फाइलीत बंद होईल, यात शंका नसावी. इस्रायली नेतृत्वाने सत्तेसाठी लेबनॉनवर लादलेले युद्ध असो वा बदलापूरच्या सत्ताधाऱ्यांनी कायदा सहज हाती घेत घडवून आणलेला बनावट एन्काउंटर यात कायदा डावलून शॉर्टकट घेत सत्तेत राहण्याची आस दिसून येते.-प्रवीण आंबेसकरठाणे

व्यथित पितृहृदयाचा एकांगी आलाप

एकांगी कल्पनाविलास’ या पत्रात (लोकमानस, २५ सप्टेंबर) ‘४२ वर्षांच्या, प्रगल्भ आणि विधानसभेवर निवडून आलेल्या आमदाराचा उल्लेख अग्रलेखात ‘बाल’, ‘कु. नितेश’, ‘चिमखडे बोल’ अशा शब्दांत केला आहे,’ याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली आहे, जी आदर्शवादी जगात योग्यच म्हणता येईल. पण प्रत्यक्षात ही नाराजी व्यक्त करणारे सध्या ज्या पक्षात आहेत त्या पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वापासून सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांनी एका ५० वर्षांच्या विरोधी पक्षनेत्याला पप्पूपासून काय काय म्हणून हिणवले ते त्यांनी जरा आठवून पाहिले तर ही नाराजी योग्य संदर्भाच्या चौकटीत बसवता येईल. पत्रात ‘लोकसभा निकालांमध्ये काँग्रेस, उबाठा शिवसेना आणि शप राष्ट्रवादी यांच्या बाजूने मुस्लीम मतदारांनी एकगठ्ठा मतदान केले,’ असे मत मांडत ‘हिंदुत्व हा भारतीय जनता पक्षाचा मात्र आत्मा आहे,’ असेही प्रतिपादन करण्यात आले आहे. पण मग जम्मू-काश्मीरमध्ये अतिरेक्यांबरोबर बिर्याणी खाणाऱ्या (अमित शहांच्याच जम्मूमधील रविवारच्या प्रचार सभेतील भाषणानुसार) मुफ्ती कुटुंबाच्या पीडीपीबरोबर मांडीला मांडी लावून अडीच वर्षे सरकार चालवताना आणि पीडीपीच्याच दबावाखाली सुरक्षा दलांवर पहिल्यांदा दगडफेक करणाऱ्यांना माफी देणे, रमझानमध्ये सुरक्षा दलांच्या कारवाया स्थगित करणे असे निर्णय घेताना त्या हिंदुत्ववादी वगैरे आत्म्यावर बुरखा चढवला होता का? वर नमूद पत्र मात्र तद्दन एकांगी युक्तिवादाचा किंवा व्यथित पितृहृदयाच्या आलापाचा नमुना वाटतो.- प्रवीण नेरुरकरमाहीम, मुंबई</p>

फार्मसिस्टना प्रवाहात आणावेच लागेल

रुग्णांना तारकडॉक्टरांना पूरक’ हा प्रा. मंजिरी घरत यांचा लेख (लोकसत्ता- २५ सप्टेंबर) वाचला. औषध विक्री दुकानांमध्ये फार्मसिस्ट असणे बंधनकारक करण्याचा नियम करावा लागणे हेच मुळी दुर्दैवी आहे. कारण डॉक्टर्सनंतर रुग्णांच्या सर्वाधिक जवळचा व विश्वासार्ह घटक म्हणजे फार्मसिस्ट. मात्र या क्षेत्रात वाढत्या चुरशीमुळे त्याचे महत्त्व फार टिकून राहिलेले नाही.

वैद्याकीय क्षेत्रातील डॉक्टर्स – रुग्णालयांची औषधांच्या ठरावीक ब्रँडला प्राधान्य देण्याची भूमिका, औषधांचे ऑनलाइन मार्केट, प्रिस्क्रिप्शनशिवाय होत असलेली औषध विक्री यामुळे हा व्यवसाय मंदावला आहे. याचा फटका एके काळी उच्चविद्याविभुषित मानल्या जाणाऱ्या फार्मसिस्टना बसत आहे. आपला व्यवसाय नॉनफार्मसिस्ट कामगारांच्या हातात सोपवून स्वत: इतर व्यवसायांकडे वळण्यापर्यंत परिस्थिती निर्माण झालेली आहे. खरे तर फार्मसिस्ट हा आरोग्य व्यवस्थेचा अविभाज्य भाग आहे व त्याला वैद्याकीय क्षेत्रातील मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावेच लागतील.- वैभव मोहन पाटीलघणसोली (नवी मुंबई)

अकाली मृत्यूपूर्वी मोलाची कामगिरी

हनीफ कुरेशी यांच्याविषयीचा ‘व्यक्तिवेध’ (२५ सप्टेंबर) वाचला. अशा अनेक कलाकारांनी आपल्या प्रयत्नांतून सामाजिक जीवन आणि विचारशैली यांना आकार दिला, दिशा दिली आणि त्यात रंजकताही आणली. त्या अर्थी या कलाकारांच्या कलाकृती अजर आहेत, अभंग आहेत! भावी पिढीस त्या कायम सर्जनाची प्रेरणा देत राहतील.

हा लेख वाचताना पथनाट्यकर्मी दिवंगत सफदार हाश्मी यांची आठवण झाली. ‘जननाट्य मंच’ या त्यांच्या पथनाट्य संस्थेद्वारे ते अनेक सामाजिक विषयांवर प्रभावी जनजागृती करत राहिले. परिणामी १९८९ साली त्यांची दिवसाढवळ्या भर रस्त्यात निर्घृण हत्या झाली, तीही पथनाट्य सादरीकरणादरम्यान! आजवर त्यांचे मारेकरी सापडलेले नाहीत. दिवंगत चित्रकार मकबूल फिदा हुसेन यांनी त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘फ्रीडम : अ ट्रिब्युट टू हाश्मी’ ही कलाकृती साकारली. गोव्याचे जागतिक कीर्तीचे चित्रकार दिवंगत मारिओ मिरांडाही त्यापैकीच एक. महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या प्राथमिक कक्षांच्या बालभारतीतील गोष्टी, पात्रे साकारत कधी त्यांनी आमचे भावविश्व समृद्ध केले हे समजलेच नाही! कलाकार, कलाकृती आणि कलाविष्कार यांचे सामाजिक उत्क्रांतीतील योगदान बऱ्याचदा उपेक्षितच राहते. त्या दृष्टीने अकाली आलेल्या मृत्यूपूर्वी मोलाची कामगिरी करणाऱ्या हनीफ कुरेशी आणि त्यांच्या कलाविष्कारांना ही निश्चितपणे समर्पक मानवंदना आहे.-भूषण सरमळकरदहिसर