‘तो परत आलाय…’ हा संपादकीय लेख वाचला. जगाचा जो कट्टरतावादाकडे प्रवास सुरू आहे, त्याचे टोक या पुढच्या काळात गाठले जाईल. उदारमतवाद- जो राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर आर्थिक, सामाजिक, राजकीय प्रगतीचे पर्याय देतो त्यालाच ग्रहण लागले आहे. उदारमतवादी लोकशाही व मुक्त बाजारपेठेवर आधारित भांडवलशाहीतील स्वायत्तता धोक्यात आली आहे. माणसांचे समुदाय विखंडित झाले असून सर्वत्र मोठ्या प्रमाणात संशय आणि असुरक्षितता आहे. त्याचाच फायदा घेऊन ट्रम्प यांच्यासारखे उजव्या विचारसरणीचे नेते पुन्हा सत्तेवर विराजमान होऊ शकतात.

ट्रम्प यांच्या विजयाने अमेरिका अधिकाधिक संकुचित वृत्तीकडे वळू शकते. तसे होणे जगाला परवडणारे नाही. स्थानिक जनतेला आकृष्ट करण्यासाठी त्यांनी ‘अमेरिका प्रथम’ची शक्कल लढवली आहे. अमेरिकेचा सुवर्णकाळ परत येणार असून देशाच्या जखमा मी भरून काढेन हे वक्तव्य हिटलरच्या वक्तव्याची आठवण करून देणारे आहे. इतिहासाची सातत्याने पुनरावृत्ती होते ती अशी. अमेरिकेतील कर्मठ वृत्तींचा ट्रम्प यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला आहे. सहिष्णुतेकडे सुरू असलेला प्रवास रोखणारे सत्ताधीश जगभरात विजयी होत आहेत. या पार्श्वभूमीवर हे दिवसही सरतील, ही आशाच तारू शकते.- सायमन मार्टिनवसई

Loksatta editorial Donald Trump victory in the US presidential election
अग्रलेख: अनर्थामागील अर्थ!
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Loksatta editorial Donald Trump won US presidential election
अग्रलेख: तो परत आलाय…
Loksatta editorial about investment decline in Maharashtra
अग्रलेख: महाराष्ट्र मंदावू लागला…
loksatta editorial Donald Trump 2024 presidential campaign
अग्रलेख: सुज्ञ की सैतान?
loksatta editorial Supreme court verdict on madrasa
अग्रलेख: मदरसे ‘कबूल’
india s economy slowing down
अग्रलेख : मध्यमवर्ग मेला तरी…
mharashtra total registered voters
अग्रलेख : अवघा हलकल्लोळ करावा…

जगाची सद्या:स्थिती सूचित करणारा निकाल

तो परत आलाय…’ हा अग्रलेख वाचला. अमेरिकन निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय जगासाठी चिंताजनक आहे. बेभरवशी व अस्थिर ट्रम्प यांच्या विजयामुळे कट्टर प्रतिगामी इराणपासून अत्यंत पुरोगामी अमेरिकन गर्भपात-हक्कवादी ते जागतिक पर्यावरणवाद्यांपर्यंत साऱ्यांच्याच पोटात भीतीचा गोळा आला असावा. अगदी भारताचा विचार केला तरी व्यापार धोरणकर्त्यांपासून स्थलांतरित भारतीयांपर्यंत अनेकांची गाळण उडणे स्वाभाविक आहे. ट्रम्प यांच्या पुनरागमनाने मनापासून आनंदी झालेले गट म्हणजे धार्मिक पुराणमतवादी, कट्टर श्वेत-श्रेष्ठतावादी तसेच नेतान्याहूंसारखे युद्धखोर नेते आणि मुस्लीम द्वेषाने भारलेले अन्य होत. जगातील बहुतेक राष्ट्रांत गोंधळलेले निष्प्रभ पुरोगामी आणि विक्षिप्त पण धडाकेबाज प्रतिगामी या प्रकारच्या नेतृत्वांत संघर्ष होत आहे आणि यात बहुधा प्रतिगाम्यांची पाठराखण जनता करते, असे निराशाजनक चित्र दिसते. बायडेन व ट्रम्प त्या दोन नेतृत्वप्रकारांचे आदर्श प्रतिनिधित्व करतात. कमला हॅरिस स्त्रीत्व व गौरेतरत्व या दोन मुद्द्यांमुळे राष्ट्राध्यक्ष स्पर्धेत कमजोर होत्याच; त्यात त्यांच्या पुरोगामी तुच्छतागंडामुळे ‘शवपेटीत शेवटचा खिळा’ ठोकला गेला. ट्रम्प यांच्यासारख्या विचित्रांचेही शिरोमणी असलेल्या नेत्यासमोर बुद्धिमान हॅरिस यांचा लीलया पराभव अमेरिकेचीच नव्हे तर जगाची सद्या:स्थिती सूचित करतो. जगासमोर युद्धे, पर्यावरणीय अरिष्ट, आर्थिक मंदी अशा भेडसावणाऱ्या गंभीर समस्या असताना बड्या राष्ट्रांत पुतिन, ट्रम्प व जिनपिंग यांसारखे आत्मकेंद्री, स्वदृष्टी व स्वार्थासाठी कोणत्याही टोकाला जाऊ शकणारे नेतृत्व असणे काळजी वाढवणारे आहे. त्यातही अमेरिका महासत्ता असल्याने ट्रम्प यांच्या धोरणांचा (किंवा त्यांच्या धरसोडीचा) परिणाम भारतासह साऱ्या जगावर होणे अपरिहार्य आहे.- अरुण जोगदेव, दापोली

लैंगिक समतेविषयीचा दृष्टिकोन अधोरेखित

अमेरिकी स्त्रीला वेशभूषेबाबत जेवढे स्वतंत्र्य आहे, त्याच्या शतांशदेखील स्वातंत्र्य सामाजिक व राजकीय विचारांबाबत नाही. २००८ साली डेमोक्रॅट्सचे कचखाऊ धोरण हिलरी क्लिंटन यांच्यासाठी घातक ठरले होते. नेमक्या याच धोरणाचा फटका कमला हॅरिस यांनाही बसला. जो बायडेन हे वयोमानामुळे निष्प्रभ ठरत आहेत हे स्पष्ट दिसत असताना आणि त्याच वेळी कमला हॅरिस यांच्यासारखा समर्थ उमेदवार हाताशी असतानाही अध्यक्षपदासाठी त्यांचा विचार केला नाही. तो तसा केला असता तर किमान आता झाला तितका दारुण पराभव तरी झाला नसता.

अमेरिकी नागरिकांची आणखीन एक वृत्ती अधोरेखित झाल्याचे दिसते. पुरुषाच्या बाहेरख्यालीपणाबाबत आपण भारतीय जेवढा बाऊ करतो, तेवढा अमेरिकी मतदार करत नाहीत. ट्रम्प यांचे पॉर्न स्टारला पैसे देण्याचे प्रकरण मतदारांनी मनावर घेतलेले दिसत नाही. ट्रम्प यांची निवड भारतातील दोन प्रमुख राजकीय नेत्यांना आपले स्थान बळकट करण्यासाठी निश्चितच फायदेशीर ठरणार आहे. कॅनडातील निज्जर आणि पन्नू यांच्या हत्याकांडात कॅनडा सरकारने एकाचे नाव घेतल्याने ते चिंतेत होते आणि दुसरे नेते त्यामुळे आपली आंतरराष्ट्रीय छबी बिघडल्यामुळे नाराज होते. आता ‘माय फ्रेंड ट्रम्प’ पुन्हा निवडून आल्यामुळे दोघेही निश्चिंत झाले असणार.- अॅड. एम. आर. सबनीस,अंधेरी (मुंबई)

बायडेन यांचा निष्क्रियपणा हॅरिस यांना भोवला

तो परत आलाय…’ हे संपादकीय (लोकसत्ता- ७ नोव्हेंबर) वाचले. एक गोष्ट निश्चितपणे लक्षात येते ती म्हणजे डेमोक्रॅट्सनी आपल्या कर्माने ही निवडणूक घालवली. ट्रम्प यांच्या २०१६ ते २०२० या काळातील वादग्रस्त निर्णयांच्या पार्श्वभूमीवर २०२०च्या निवडणुकीत मतदारांनी डेमोक्रॅट्सचे जो बायडेन यांना संधी दिली. २०२०-२४या काळातील बायडेन यांचा कारभार मतदारांचा पूर्णपणे अपेक्षाभंग करणारा होता. २०२४च्या निवडणुकीची तयारी ट्रम्प यांनी खूप आधीपासून केली होती. डेमोक्रॅट्सनी प्रचंड गोंधळ घातला. ऑगस्टपर्यंत बायडेन गुडघ्याला बाशिंग बांधून उभे होते. प्रचारासाठी निधी देणाऱ्यांनी आणि पक्षातील वरिष्ठांनी जनतेच्या मनातील बायडेन यांच्या विस्कळीत कारभाराबद्दलचा वाढता असंतोष वेळीच ओळखला आणि त्यांना माघार घ्यायला लावून उपाध्यक्षपदी असलेल्या कमला हॅरिस यांची उमेदवारी जाहीर केली, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. हॅरिस यांनी प्रचारात सुरुवातीला चांगली आघाडीही घेतली होती पण बायडेन सरकारच्या अत्यंत खराब कामगिरीचा फटका त्यांना बसला. चार वर्षे सत्तेत असताना भरीव काहीच केले नाही आणि प्रचारात मात्र नव्या अमेरिकेसाठी भरपूर आश्वासने या हॅरिस यांच्या प्रचारतंत्राला मतदारांनी साफ नाकारले.

बायडेन यांचा कार्यकाळ ट्रम्प यांना व्हिलन ठरवण्यातच गेला. त्यांना अनेक खटल्यांत अडकवण्यात आले आणि त्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावण्यात आला. डेमोक्रॅट्सची निवडणूक प्रचार नीती प्रभावी ठरली नाही, कारण त्यांच्या कारभाराविषयी अमेरिकन नाखूश होते. डेमोक्रॅट्सनी याकडे साफ दुर्लक्ष केले. सगळा प्रचाराचा रोख हा ट्रम्प पुन्हा निवडून आल्यास अमेरिकेसाठी ते किती धोकादायक ठरेल यावरच होता. या ‘नॅरेटिव्ह’ला मतदारांनी साफ नाकारले. सामान्य अमेरिकी मतदारांपासून गेल्या चार वर्षांत डेमोक्रॅट्स खूप दूर गेले होते त्याचे दर्शन लाजिरवाण्या पराभवातून घडले. अमेरिकेतील महत्त्वाची आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक संस्थाने डेमोक्रॅट्सच्या वजनदार आसामींनी बळकावली आणि मनमानी कारभार केला त्याचा फटकाही हॅरिस यांना बसला. मतदारांनी संधी दिल्यावर तिचे वाटोळे करायचे आणि पुन्हा सत्ताप्राप्तीसाठी भुरळ घालायची हे या निवडणुकीत मतदारांनी अजिबात चालवून घेतले नाही. डेमोक्रॅट्स आता आपल्या कोषातून बाहेर येऊन ‘ग्राउंड झिरो’चे प्रामाणिक विश्लेषण जेव्हा कधी करतील तेव्हा त्यांना हे लक्षात येईल की बायडेन सरकारच्या ढिसाळ आणि अकार्यक्षम कारभाराने कमला हॅरिस यांचा पराभव झाला आहे.-प्रा. डॉ. गिरीश नाईक, कोल्हापूर

आपलेही घोडामैदान दूर नाही

राजकारणात नेतेपदी असणारी व्यक्ती कशी असावी याबद्दलच्या पारंपरिक अपेक्षा आता फोल ठरत असल्याचे अमेरिकेतील बहुसंख्य जनतेने डोनाल्ड ट्रम्प यांना निवडून देऊन दाखवून दिले. महाभियोग, फौजदारी खटले, बुद्धिजीवींची टीका, महिलांविषयी हीन टिप्पणी, हत्येचे प्रयत्न हेच यशस्वी राजकारण्याचे गुण ठरू लागल्याचे दिसते. अमेरिकेत असो वा भारत, याबद्दल आक्रोश करण्यात अर्थ नाही हे आपण अनुभवत आलो आहोत. राजकारणात प्रवेश करणाऱ्या अशा व्यक्तींची संख्या सातत्याने वाढत आहे. आपलेही घोडामैदान जवळ आहे. विधानसभेचे निकाल जाहीर झाल्यानंतर पुन्हा हेच लिहावे लागण्याची आणि अपेक्षाभंग होण्याची भीती आहेच.- प्रफुल्ल चिकेरूर, नाशिक

संकुचित वृत्तीचे राज्यकर्ते आज जगभर

बहुप्रतीक्षित अमेरिकी अध्यक्षीय निवडणूक संपन्न झाली. उदारमतवाद्यांना अपेक्षित असा निकाल काही लागला नाही. पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांची निवड झाल्याने जगभरातील आर्थिकदृष्ट्या उभारी घेत असलेल्या देशांसमोर प्रश्न निश्चितच उभे ठाकले आहेत. याचा वेध ‘लोकसत्ता’ने सातत्याने घेतला आहे. मुळात अमेरिकी समाज उदारमतवादी आणि लोकशाहीचा पुरस्कर्ता मानला जातो. व्यावहारिक पातळीवर मात्र त्यांच्यात कट्टरतेची बीजे किती खोलवर रुजली आहेत याची साक्ष ट्रम्प यांची भूमिका आणि त्याची पाठराखण करणाऱ्या समर्थकांचे वर्तन यातून मिळते. २०१६ (हिलरी क्लिंटन) आणि २०२४ (कमला हॅरिस) या दोन्ही निवडणुकांत त्यांनी महिला प्रतिस्पर्ध्याला पराभूत केले. यातून अमेरिकी समाज महिलांना सर्वोच्चपदी विराजमान होण्याची संधी नाकारतो, हेसुद्धा अधोरेखित झाले ‘अमेरिका फर्स्ट’ ही घोषणा संकुचित वृत्ती दर्शविते, असे विचारवंत म्हणत असले तरी जनमानसावर त्याचा प्रभाव पडताना दिसत नाही. अशा संकुचित वृत्तीचे राज्यकर्ते आज जगभर आहेत. स्वत:च्या प्रेमात पडलेल्या या व्यक्तींचा अजेंडा फक्त स्वत:चे गुणगान गाणे हा असतो. भ्रम, भीती निर्माण करणे, धार्मिक मुद्दे कायम चर्चेत ठेवणे, परंपरा मानणाऱ्या वर्गाला गोंजारत राहणे अशी त्यांची वाटचाल असते. उद्याोगात भरभराटीची अपेक्षा बाळगून असणाऱ्या स्वार्थी शक्ती त्यांची पाठराखण करतात. अशा प्रवृत्तींचा लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही पद्धतीने कारभार करण्याकडे कल असतो. उदारमतवाद्यांचा आवाज कट्टरपंथी समाजात नेहमी क्षीण असतो यामुळे संकुचित वृत्तीचे नेहमीच फावते, याची प्रचीती देणारा हा निकाल आहे.-अनिरुद्ध कांबळे,राजर्षीनगर (नागपूर)

परत यायला नको होता

गेल्या दशकापासून देशात आणि जगात संकुचित मनोवृत्ती, उजवी विचारसरणी आणि धर्मांध नेत्यांची चलती आहे. अशाच मनोवृत्तीची एक जोडगोळी भारतातही राज्य करतच आहे आणि आता अमेरिकेतही त्यांच्याशी दोस्ताना असलेले डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्यापेक्षाही अधिक पुरुषसत्ताक वृत्ती असलेले त्यांचे जोडीदार उपाध्यक्ष जेडी व्हान्स ही जोडी अमेरिकेला कोठे नेऊन ठेवेल हे पाहण्यापलीकडे कोणाच्याही हाती काहीही नाही. स्थलांतरितांवर नियंत्रण आणण्याची घोषणा करून ट्रम्प महाशय पुन्हा अमेरिकेचे अध्यक्ष झाले. किमान मैत्रीच्या न्यायाने तरी भारतीयांच्या ‘एचवनबी’ व्हिसा संख्येला कात्री लागणार नाही अशी अपेक्षा ठेवू या. संपादकीयात म्हटल्याप्रमाणे ‘ट्रम्पुल्या पापी’ बुडणे गरजेचे होते. तो परत यायला नको होता.- डॉ. राजेंद्र कांकरिया, पुणे

राष्ट्रीय उद्यानांतील अतिक्रमणांवरही नियंत्रण हवे

एकाच वेळी दहा हत्तींच्या मृत्यूचे कारण काय?’ हे विश्लेषण (७ नोव्हेंबर) वाचले. कोडो मिलेट हत्तींव्यतिरिक्त इतर प्राण्यांनीसुद्धा खाल्ले असेल, तर त्यांच्यावर काही परिणाम झाला का, केवळ हत्तींचाच मृत्यू कसा झाला, या प्रश्नांची उत्तरे वन्यजीव रक्षकांकडे आहे का? बांधवगडमध्ये स्थलांतरित झालेले ४० हत्ती २०१८ पासून तिथे वास्तव्यास आहेत. असे असताना कोडो मिलेटमुळे मृत्यू होणे पटण्यासारखे नाही. सरकारने वन विभागाच्या अधिकाऱ्यांना निलंबित करणे, ही तात्पुरती मलमपट्टी आहे. वन विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार वर्षानुवर्षे चालढकल करत आहे, मनुष्यबळाच्या अभावी वन व्यवस्थापनात असंख्य त्रुटी राहतात. वाघ, सिंह, हत्ती या प्राण्यांच्या संगोपनासाठी सरकारने वन्य प्राणी दत्तक योजना आणली आहे. अशा प्रकारे एखाद्या धनिकाने प्राणी दत्तक घेतल्यास मोठा गाजावाजा होतो, ‘लाडली बेहनां’ना पैसे वाटणाऱ्या मध्य प्रदेश सरकारकडे वन्य प्राण्यांच्या आहारासाठी पैसे नाहीत?

दिवाळीच्या काळात गणेशाचे रूप असलेल्या हत्तींचा मृत्यू वगैरे भावनिक मुद्द्यांना हात घालण्यापेक्षा विरोधकांनी राष्ट्रीय उद्यानांच्या परिसरातील मानवी अतिक्रमणांना आळा घालण्यासाठी सरकारवर दबाव आणावा. केवळ घटना घडली की टीका न करता सातत्यपूर्ण पाठपुरावा करावा. राष्ट्रीय उद्याने, व्याघ्रप्रकल्प यांच्या आसपास अनेक अनधिकृत मानवी वस्त्या वाढत आहेत. त्यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष वाढला आहे. राजस्थानातील रणथंबोर व्याघ्र प्रकल्पाच्या आवारात गावकऱ्यांनी एका वाघास दगडाने ठेचून मारले होते. बकऱ्या चारण्यासाठी व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरात आलेला एक गावकरी वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्यानंतर गावकऱ्यांनी हे अमानुष कृत्य केले. भारतातील हत्ती, वाघ यांच्या अवयवांना जगभर मागणी आहे. ती पूर्ण करण्यासाठी शिकारीही टपून बसलेले असतात. बांधवगड येथील हत्तींच्या मृत्यूला शिकारी कारणीभूत असल्याच्या संशयात तथ्य असूही शकते.- प्रशांत कुळकर्णी, मुंबई

आरोग्य विम्यावरील जीएसटी रद्द करा

या महिन्यात होणाऱ्या जीएसटी परिषदेमध्ये आरोग्य विम्यावरील जीएसटी १८ टक्क्यांवरून कमी करण्यासंबंधी निर्णय होणे अपेक्षित आहे. मंत्रिगटाने ज्येष्ठांव्यतिरिक्त इतरांसाठी पाच लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेच्याच आरोग्य विम्याच्या हप्त्यांवर १८ टक्के जीएसटी आकारण्याची शिफारस केली आहे. वैद्याकीय खर्चात दिवसेंदिवस होणारी वाढ लक्षात घेता सरकार ‘आयुष्मान भारत’ योजनेअंतर्गतच्या विम्याची पाच लाख रुपयांची मर्यादा वाढवण्याचा विचार करत आहे. अशा परिस्थितीत वरील शिफारस अन्यायकारक वाटते. खरेतर सरकारने आरोग्य विम्याच्या हप्त्यांवरील जीएसटी पूर्णपणे रद्द करून जनतेस दिलासा द्यावा.- mबकुल बोरकर, विलेपार्ले (मुंबई)

सदाभाऊ खोत एकमेव नाहीत!

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर महायुतीतील घटक पक्ष असलेल्या रयत क्रांती संघटनेचे नेते, विधान परिषद सदस्य सदाभाऊ खोत यांनी जाहीर प्रचार सभेत असभ्य टीका केली. सार्वजनिक जीवनातील भाषेचा स्तर खालावला आहे. नेते म्हणवणारे, जाहीर सभांमधून अश्लाघ्य भाषा वापरतात. हे आताच होत आहे असेही नाही.

पुण्यात प्र. बा. जोग नावाचे एक वादग्रस्त गृहस्थ होते. नामांकित वसंत व्याख्यानमालेत बोलू दिले नाही म्हणून स्वत:ची ‘पसंत’ व्याख्यानमाला चालवत. कधी लहर आली की शनिवारवाड्यावर एक सभा घेत. स्वत:च हिंडून त्याची जाहिरात करत. अशाच एका सभेत…

अभिनेत्री भक्ती बर्वे यांनी शफी इनामदार या अभिनेत्याशी लग्न केले होते. भक्ती बर्वे या ब्राह्मण होत्या आणि शफी इनामदार मुस्लीम. दोघेही नामांकित कलाकार. त्यांच्याविषयी हे गृहस्थ अत्यंत अश्लील रीतीने बोलत होते. पुण्यातील एका नामांकित दैनिकाचे कार्यालय बुधवार पेठेत आहे. ही पेठ शरीर विक्रय करणाऱ्या महिलांच्या वस्तीमुळे अधिक ओळखली जाते. त्यावरून टवाळी करत होते. इतरही अनेकांबाबबत ते असेच बोलत होते. लोक दाद देत होते.

खोत यांनी शरद पवार यांच्याबाबत केलेले वक्तव्य ऐकून त्या जोग यांच्या सभेचा संदर्भ आठवला. हे गृहस्थ पुण्याचे नगरसेवक आणि एकदा उपमहापौरही झाले होते अशी माहिती इंटरनेटवर दिसते. विशिष्ट समूहातील लोकांना उद्याुक्त करणारी वक्तव्ये ते करीत. अशांना दलित, मुस्लीम आणि स्त्रीविरोधी वक्तव्ये आवडतात. नुकतेच वसंत देशमुख यांनी नगर जिल्ह्यातील निवडणूक प्रचार सभेत एका महिला नेत्याबद्दल केलेले वक्तव्य याच पठडीतील!

दिवंगत समाजवादी नेते एस. एम. जोशी यांच्या ‘मी एसेम’ या आत्मचरित्रात त्यांच्या तरुण वयातील एक प्रसंग आहे. एस. एम. जोशी त्या वेळी पुण्यात शिकत होते. ‘भालाकार’ भोपटकर हे हिंदुत्ववादी पुढारी होते. त्यांच्या लिहिण्या-बोलण्यात भयंकर शिवराळपणा असे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी त्यांचे कायमचे वाद झाले. ‘अस्पृश्यता बाळगण्यात चुकीचे काय?’ असे त्यांचे मत होते. त्यासाठी त्यांनी एक सभा आयोजित केली होती. ‘अस्पृश्यांना तर सोडाच, आमच्या कुटुंबातील बायकांनासुद्धा आम्ही मासिक पाळीच्या काळात शिवत नाही!’ असा दावा त्यांनी त्या सभेत केला. त्यावर त्या सभेस उपस्थित असलेल्या भोपटकरांच्या चाहत्यांनी (भक्तांनी) जबरदस्त दाद दिली.

त्या सभेस उपस्थित असलेल्या एस. एम. जोशी यांना राहवले नाही. ते उठून उभे राहिले आणि म्हणाले, ‘…तीन दिवसांनंतर जवळ किती घेता तेही सांगून टाका…’ साहजिकच सभेत गोंधळ झाला आणि एस. एम. जोशी यांना मारहाण करण्यासाठी सगळे धावून आले. नेते आणि त्यांच्याभोवतीचे लोक हा समाजातला पुरातन आकृतिबंध आहे. आजही याचे अनेक दाखले आपल्यासमोर आहेतच. सदाभाऊ खोत हे सध्याच्या काळातील जिवंत उदाहरण!- पद्माकर कांबळे

धोरणे मूठभरांच्याच फायद्याची

भयमुक्त व्यापार उद्याोग करण्याची संधी…’ हा राहुल गांधी यांचा लेख वाचला. मूठभर श्रीमंत हे श्रीमंतच होत चालले आहेत. भारतातील गरिबीच्या सीमा विस्तारतच चालल्या आहेत. हे कधी संपणार याचे उत्तर कोणतेही सरकार देत नाही. येणारी सरकारे मागच्यांनी नुकसान केले म्हणून गळा काढत बसतात. आपल्या उद्याोगांत निकोप स्पर्धा नाही. धोरणे सतत बदलतात आणि ती केवळ मूठभर बड्या उद्याोजकांच्या फायद्याची असतात. राहुल गांधींनी ज्या कंपन्यांची नावे नमूद केली आहेत त्या सर्व स्वबळावर उभ्या राहिलेल्या आहेत. त्यामुळेच त्या सत्ताधीशांच्या मेहरबानीवर व्यवसायवृद्धी करत आहेत, असा संशय व्यक्त होत नाही. आणखी एक मुद्दा म्हणजे नफाक्षमता आणि कंपन्यांची वाटचाल पाहून कर्जे मंजूर करण्याची शिस्त बँकांना लागणे गरजेचे आहे.- नीता शेरे, दहिसर (मुंबई)

Story img Loader