‘महाराष्ट्राच्या ऱ्हासाची सात ऐतिहासिक कारणे’ हा लेख (रविवार विशेष, १५ डिसेंबर) वाचला. त्या सातही कारणांमध्ये कोणीतरी स्वकीयांनी आपल्याच माणसांविरोधात घेतलेली भूमिका, त्याचा परकीयांनी चतुरपणे करून घेतलेला वापर यांचा वाटा खूप मोठा आहे. ही वृत्ती केवळ मराठी लोकांनीच नव्हे तर उत्तरेत राजपुतांनीही दाखवली होती. ब्रिटिशांना भारताची सत्ता मराठी राज्यकर्त्यांना हरवल्यानंतरच काबीज करता आली होती. भारतीय जनतेचे खरे हित नक्की कोण आणि कसे जपू शकते आणि नेमके तेच कसे होऊ द्यायचे नाही याचे उत्तम नियोजन ब्रिटिशांनी केलेले दिसते. तात्कालिक स्वार्थाचे आमिष दाखवून फंद-फितुरी घडवून आणणे, जातीपातींमध्ये वैरभाव कसा कायम राहील हे पाहणे, जगात सर्वच धर्मांत व संस्कृतींमध्ये अस्तित्वात असणारे दोष फक्त इथल्याच मातीत कसे आहेत हे समाजमनावर ठसवणे, हे सारे त्यांनी उत्तम प्रकारे साधले. त्याचा परिणाम इतका खोलवर झाला आहे की जगात भारत, आणि भारतात महाराष्ट्र, अजूनही त्यातून बाहेर येऊ शकलेले नाहीत. ब्रिटिशांची हीच कावेबाज खेळी आपण आज यशस्वीपणे वापरतो असे ज्यांना वाटते त्यांना ते स्वत:च त्याची शिकार आजही कसे होत आहेत हेही समजत नाही, इतके ते नियोजन अचूक आणि परिणामकारक ठरले आहे! तात्कालिक छोट्यामोठ्या स्वार्थाच्या मोहात अडकून आपला खराखुरा स्वार्थ नक्की कशात आहे आणि तो कोण व कसा साध्य करून देईल हेच न ओळखता येण्याची मनोवृत्ती आजही तशीच टिकून आहे हे पदोपदी अगदी स्पष्टपणे दिसून येते. त्या सातही कारणांमध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे डोकावणारे तेच ऱ्हासाचे खरे कारण वाटते.- प्रसाद दीक्षित, ठाणे
निवडणूक रखडली का? होणार कशाने?
‘एक देश, एक निवडणूक’ विधेयक आता केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यामुळे लोकसभेत येत्या आठवड्यातच मांडले जाण्याची शक्यता आहे, परंतु याबरोबरच अनाकलनीय कारणांनी लांबणीवर पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याच्या राजकीय तयारीविषयीच्या बातम्याही (लोकसत्ता- १३ डिसेंबर) सध्या दिल्या जात आहेत. करोनाकाळापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडण्याचे खरे कारण स्पष्ट होत नाही. खरोखरच मराठा- ओबीसी आरक्षणसंबंधी अडचण आली म्हणावी तर त्याचे निराकरण निव्वळ महायुतीला पुन्हा बहुमत मिळाल्यामुळे कसे होणार, याबद्दलही स्पष्टता नाही. महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर या संदर्भात मायबाप जनतेला यांची माहिती देण्याची गरजच वाटत नसल्याचे दिसून येत आहे. ‘माझा अभ्यास होऊन पहिला नंबर येण्याची खात्री जेव्हा होईल तेव्हाच परीक्षा घेण्यात यावी’ असे परीक्षार्थींना ठरवण्याची मुभा असल्यासारखे तर नसेल ना?-गायत्री साळवणकर, कोल्हापूर
मंदिरावरून राजकारण नको!
प्रार्थना स्थळ – मग ते कोणत्याही धर्माचे असो- ते सार्वजनिक हिताच्या आड येत असेल, तर ते त्या ठिकाणाहून इतरत्र हलवणे हेच योग्य ठरते. मात्र दादर पूर्व रेल्वे स्थानकालगतचे हनुमान मंदिर हलवण्याबाबत रेल्वे प्रशासनाने नोटीस दिल्याबरोबर दोन प्रमुख राजकीय पक्षांकडून त्याला विरोध करण्याचे राजकारण सुरू करण्यात आले ते दुर्दैवी म्हटले पाहिजे. हे मंदिर ८० वर्षांपासून असल्याने ते हलवू नये या युक्तिवादात काही अर्थ नाही. ८० वर्षांपूर्वीची गर्दीची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. हे मंदिर वाहने आणि प्रवाशांच्या रहदारीस अडथळा ठरत असून रेल्वे पुनर्विकासाच्या कामातही अडथळा येत आहे हे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे महत्त्वाचे आहे. राजकीय दबावामुळे नोटिसीला रेल्वे प्रशासनाकडून लगेच स्थगितीदेखील देण्यात आली. विकासाऐवजी राजकारण महत्त्वाचे या भूमिकेचे कधीही समर्थन करता येणार नाही.- अॅड. सुरेश पटवर्धन, कल्याण
प्रार्थनास्थळांसाठी विकास थांबवायचा का?
‘दादरमधील हनुमान मंदिर हटवण्याच्या नोटिशीला स्थगिती’ ही ( लोकसत्ता- १५ डिसेंबर) बातमी वाचली. वस्तुत: याआधी अनेक मंदिरांची पुनर्स्थापना करण्यात आलेली आहे. पवई तलावासमोरील रस्त्यावर मध्यभागी एक मोठं मंदिर होते. काही वर्षांपूर्वी वाहतुकीला अडचण होते म्हणून ते हटवून अन्यत्र त्याची स्थापना करण्यात आली. पुण्यामध्ये तर चौक-चौकात मंदिरे असतात. तिथेही रस्तारुंदीत यापैकी अनेक मंदिरांची पुनर्स्थापना झालेली आहे. अयोध्या, काशी येथे कॉरिडॉर करताना अनेक जुन्या मंदिरांना हटवले गेले. उजनी धरणातील पाणी जेव्हा पूर्णपणे आटते तेव्हा पाण्याखाली गेलेली प्राचीन मंदिरे आपण पाहू शकतो. म्हणजेच एक गोष्ट स्पष्ट आहे की जर विकास हवा असेल तर गल्लीबोळांमध्ये असलेल्या प्रार्थनास्थळांच्या बाबत आपल्याला फार हळवे होऊन चालणार नाही.- निशिकांत मुपीड, कांदिवली (मुंबई)
ही चपराक योग्य ठिकाणी लागावी…
‘दक्षिणेतला दिग्विजयी’ हे शनिवारचे संपादकीय डी. गुकेश याच्या यशाचे उत्तम विश्लेषण करतेच, पण महाराष्ट्राच्या क्रीडा संस्कृतीवर एक चपराकच त्यातून लगावली गेली आहे. अठराव्या वर्षी अठराव्या जागतिक स्पर्धेत ग्रँडमास्टर ठरलेल्या गुकेशने जगभरात भारताची मान उंचावली आहेच. परंतु बुद्धिबळ क्षेत्रात असणारे मराठी खेळाडूंचे अग्रस्थान हळूहळू दक्षिणेकडे जात आहे. महाराष्ट्र राज्याला खेळाडूंसाठी विशेष निधीची गुंतवणूक करावीच लागेल, त्याशिवाय प्रतिभावान खेळाडू महाराष्ट्राची उज्ज्वल परंपरा राखण्यासाठी अपयशी ठरतील. महाराष्ट्राच्या क्रीडा संस्कृतीवर लगावलेली चपराक, महाराष्ट्रातील संघटक, क्रीडाविषयक पुरस्कर्ते आणि राजकारणी यांना कळते की नाही, यावरच महाराष्ट्रीयचे क्रीडा भविष्य ठरेल!- शंकर शहाणे, परभणी
जागतिक सन्मानांनंतरच आपल्याला जाग!
‘दक्षिणेतला दिग्विजयी’ हे संपादकीय (१४ डिसेंबर) वाचले. आपल्याकडे क्रिकेटच्या भल्या मोठ्या सावलींत ,इतर खेळांची वाढ तशी खुंटलेलीच राहिली. ही जाणीव प्रत्यक्षपणे समाजमनाने व माध्यमप्रमुखांनी तीव्रपणे खोडून काढावयांस हवी. अर्थात, डी. गुकेश असो वा आपले ज्ञान, अनुभव पणाला लावणारे पर्यावरणवादी, कर्मयोगी डॉ. माधव गाडगीळ (‘ड्यूरेबल ऑप्टिमिस्ट’ १३ डिसें.), जागतिक पातळीवर मोहोर उमटवल्यावरच आपल्याला त्यांचा अभिमान वाटतो का, याचाही एकदा नव्याने विचार व्हावा!- विजय भोसले, घणसोली (नवी मुंबई)
बुद्धिबळ हे एक व्यसनही आहे…
‘दक्षिणेतला दिग्विजयी’ हे संपादकीय (१४ डिसेंबर) वाचले. एक बुद्धिबळप्रेमी म्हणून गुकेशच्या विजयाचा आनंद आहेच. बुद्धिबळ खेळात प्रचंड स्पर्धा आहे आणि जबरदस्त मेहनतीची आवश्यकता आहे ज्यामध्ये तुमच्या उमेदीचे आयुष्य खर्ची पडू शकते. तुम्ही जर आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर होऊ शकत नसाल तर नोकरी व्यवसाय सोडून या खेळामागे जाऊन काय साध्य होईल हेही लक्षात घेतले पाहिजे. जर तुमची आवड आणि मेहनत याबरोबरच ऐपत असेल तरच बुद्धिबळाच्या मागे लागण्यात अर्थ आहे अन्यथा तुम्हाला कोणी विचारत नाही हे वास्तव आहे. क्रिकेटमधे रणजी किंवा आयपीएलमधे जरी निवड झाली तर आयुष्याचे कल्याण होते. मुलांनी आणि तरुणांनी गुकेश आणि आनंद यांच्यासारखे बुद्धिबळपटू होण्याचे ध्येय जरूर ठेवून त्यासाठी मेहनत घ्यावी पण जर ते ध्येय गाठता नाही आले तर नोकरी व्यवसायाचा विकल्प हाती असावा अशी माझी मध्यमवर्गीय मानसिकता सांगते.- भीमण्णा कोप्पर, भांडुप पश्चिम (मुंबई)
सहानुभूती तरी मिळवा…
मुंबई- गोवा</strong> राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ चे रुंदीकरण व बांधकाम गेली १७ वर्षे सुरू आहे. या कालावधीत देशातील अनेक महामार्ग नव्याने सुरू झाले.पण कोकणातून गोव्याकडे जाणारा हा एकमेव महामार्ग पूर्ण होण्यास आणखी किती वर्षे लागतील हे सांगता येणार नाही. रस्त्याचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत पनवेलपासून पुढल्या रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे बुजवून वाहनचालक, प्रवाशांची गैरसोय दूर करून सहानुभूती तरी मिळवा, अशी विनंती केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री नितीन गडकरी यांना करणेच आता सामान्यजनांच्या हाती आहे.- महादेव गोळवसकर, कुर्ला (मुंबई)