गेटवेसमोरच्या पाच मैलांच्या समुद्र परिघाला इनर अँकरेज म्हणतात. या भागात असंख्य महाकाय मालवाहू जहाजे, मासेमारी ट्रॉलर्स, सप्लाय बोटी, टग बोटी, खासगी यॉट्स, प्रवाशी लाँच यांची वर्दळ असते. त्यापलीकडे बीएफएल म्हणजेच खुला समुद्र असतो. तिथे ही वर्दळ विरळ होत जाते. बीपीटीने नौदलाच्या स्पीड बोटीला इनर अँकरेजच्या अशा भाऊगर्दीत चाचणी घेण्याची परवानगी कशी दिली? या परिघात ताशी ४५ किलोमीटर वेगाने बोट चालवणे म्हणजे अपघाताला आमंत्रणच होते. या स्पीड बोटीत नक्की काय बिघाड झाला होता? गियर बॉक्स जाम झाले होते की रडर (सुकाणू) निकामी झाले होते? स्पीड बोट नक्की कोण चालवत होता? सारंग (हेल्म्समॅन) की त्याचा कोणी हौशा-नवश्या खलाशी मित्र? आपल्याकडे ट्रक ड्रायव्हरने क्लीनरला स्टीयरिंगसमोर बसवणे नवीन नाही. दुर्घटना घडल्यावर आपल्या सरकारी यंत्रणा नेहमीप्रमाणे जाग्या होतात व कोणी बळीचा बकरा मिळाला की त्याच्या डोक्यावर नारळ फोडतात. लाइफ जॅकेटचा अभाव किंवा क्षमतेपेक्षा जादा प्रवासी हा कधीच चर्चेत न आलेला मुद्दा आता वर आला. मुंबईहून रेवस, मांडवा, उरण, न्हावा-शेवा अशा लाँच सेवा कित्येक दशके विनासायास सुरू आहेत. तसे बघायला गेले तर आपल्या बसेस व लोकल ट्रेन्स तर क्षमतेपेक्षा तिप्पट/ चौपट प्रवासी घेऊन धावतात. वाढत्या अनियंत्रित लोकसंख्येचा हा परिपाक आहे त्याला या प्रवासी फेरी कशा अपवाद असू शकतात? तेव्हा एकट्या फेरी मालकाला दोषी ठरवणे म्हणजे, अपघातग्रस्त गाडीचे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पीयूसी) नव्हते म्हणून हा अपघात झाला असा निष्कर्ष काढण्यासारखे आहे. तेव्हा या संपूर्ण प्रकरणाची नि:पक्षपाती चौकशी होणे गरजेचे आहे.- रणजित आजगांवकर, दादर (मुंबई.)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा