‘प्रजासत्ताकाचा पायाच पोकळ’ हा अग्रलेख (३१ जानेवारी) वाचला. शहरी आणि निमशहरी भागातील सर्वच व्यवस्थांची कशी दुर्दशा झाली आहे हे गेल्या काही दिवसांतील बातम्यांमुळे सतत प्रकर्षाने पुढे येते आहे. ‘महापालिका हद्दीतील गावांना शहरातील इतर भागांसारखा बंद नळाद्वारे शुद्ध पाणीपुरवठा का नाही?’ असा प्रश्न लेखात उपस्थित केला आहे. परंतु वास्तव असे आहे की शहरांतील अत्यंत महागड्या भागांतही गृहसंकुलांना टँकरचे पाणी नियमितपणे घ्यावेच लागते व त्यासाठी आवश्यक ती कायमस्वरूपी जोडणी रस्त्यालगत करूनच ठेवलेली असते! ज्या यंत्रणांनी या अनागोंदीला आवर घालावा वा शिस्त लावावी अशी अपेक्षा असते त्या यंत्रणा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सामील वा टोकाच्या अलिप्त असल्याशिवाय अशी स्थिती निर्माण होऊ शकत नाही.- प्रसाद दीक्षित, ठाणे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तरीही जास्त मुले जन्माला घाला

प्रजासत्ताकाचा पायाच पोकळ’ हे संपादकीय वाचले. या आजारात दूषित पाणी किंवा अन्नामुळे पचनसंस्थेत बिघाड होऊन मज्जासंस्थेवरही त्याचे परिणाम होतात. याला प्रशासनातील अनास्थाच कारणीभूत आहे. पुण्याचे पालकमंत्री खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत. आम्हाला जनतेची काळजी आहे. आम्हाला राज्याचा विकास करायचा आहे, या वल्गना दररोज केल्या जातात, पण लोकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा प्रशासन करू शकत नाही. दररोज हजारो उंच इमारती राजकीय आशीर्वादाने उभ्या राहत आहेत, पण प्रशासनाला नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवणे अशक्य होऊन बसले आहे. याला कारण मतांच्या राजकारणासाठी सगळ्यांना खूश ठेवायचे असते. पर्यायाने महापालिका तिजोरीत खडखडाट होतो. लोकसंख्येचा भस्मासुर अक्राळविक्राळ होत असताना, नागरिकांना सोयी-सुविधा पुरवण्यास प्रशासन असमर्थ असतानासुद्धा सरसंघचालक मोहन भागवत म्हणतात, ‘प्रत्येक जोडप्याने तीन किंवा त्यापेक्षा जास्त अपत्यांना जन्म द्यायला हवा. तरच आपला धर्म बळकट होईल.’ केवढा हा दैवदुर्विलास! सामान्य माणसाला रोजचे जगणे असह्य करून सोडणाऱ्या प्रशासनाला केव्हा जाग येणार आहे?- उर्मिला पाटीलकल्याण

हे शासन-प्रशासनाचे वाभाडेच

प्रजासत्ताकाचा पायाच पोकळ’ हा अग्रलेख (३१ जानेवारी) वाचला. नागरीकरण करताना पायाभूत समस्यांवर तोडगा काढण्याऐवजी तात्पुरती मलमपट्टी करण्यातच प्रशासन व शासन धन्यता मानत आहे हे उचित नाही. आपण नुकताच ७६वा प्रजासत्ताक दिन साजरा केला. त्यानिमित्ताने अजूनही पायाभूत सुविधांची वानवा शासन व प्रशासनाचे वाभाडे तर काढतेच पण प्रजासत्ताकतेचा पाया कमकुवत असल्याचे सिद्ध करते. जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशाप्रमाणे आजही आपण आघाडीवरील राष्ट्रांच्या तुलनेत कैकपटीने मागे आहोत.- नंदकिशोर भाटकरगिरगाव, मुंबई</p>

दोन्हीही मन:शांतीसाठी आवश्यक

योग आणि भोग, की दोन्हीही?’ हा सुहास सरदेशमुख यांचा ‘लोकलौकिक’ या सदरातील लेख (३१ जानेवारी) वाचला. त्यातील उदाहरणे आपापल्या जागी परंतु स्वतंत्रपणे बरोबर आहेत. पण या उदाहरणांमध्ये नमूद घटना म्हणजे धर्म नाहीत. तो धर्माचा केवळ एक घटक आहे. कोणत्याही धर्माचे तीन मुख्य घटक आहेत कर्मकांड, शाश्वत सत्यावरील विश्वास आणि दैनिक आचरण. यातील सर्वात अर्वाचीन आणि दुर्दैवाने भ्रष्ट झालेला घटक म्हणजे कर्मकांड. अनिष्ट रूढी आणि परंपरा येथेच आढळतात. यांचे निर्मूलन व्हायलाच हवे. मात्र या घटकालाच धर्म म्हणणे हे योग्य नाही. पं. नेहरू ‘भारत एक शोध’ पुस्तकात म्हणतात, ‘काही मानसशास्त्रीय कल्पनांवर योगशास्त्राची उभारणी आहे. या विश्वाच्या शाश्वत सत्याबाबत काही कल्पना ठरवून काढलेला सिद्धांत म्हणजे योगशास्त्र नसून ज्याने त्याने स्वत:चे सत्य शोधून काढण्याचा मार्ग शिकवणे एवढाच त्या शास्त्राचा हेतू आहे.’’ असो, योग आणि भोग हे दोन्हीही मानवी विकासासाठी आणि मन:शांतीसाठी आवश्यकच आहेत.-अॅड. किशोर रमेश सामंतभाईंदर, ठाणे</p>

दुसरी कारकीर्द मनमानी!

आरोग्याच्या मुळावर शेखचिल्लीची कुऱ्हाड!’ हा अग्रलेख (३१ जानेवारी ) वाचला. डोनाल्ड ट्रम्प आणखी काय काय करणार याची चिंता आता जगाने करावी अशी परिस्थिती आहे. गरीब देशांच्या पाचवीला पुजलेल्या आजारांना रोखण्यासाठी ‘हू’ प्रयत्न करत असते. पण त्यांना यासाठी अमेरिकेवर अवलंबून राहावे लागते कारण अब्जावधी रुपयांचा निधी अमेरिका देते. पण एकंदरीत ट्रम्प युगाची सध्याची विचारधारा पाहिली तर आपली दुसरी कारकीर्ददेखील ट्रम्प मनमानी पद्धतीने चालवणार आहेत.-सुनील समडोळीकरकोल्हापूर