‘एकतेचा महाकुंभ ही नव्या युगाची पहाट!’ हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लेख (२८ फेब्रुवारी) वाचून त्यांच्या काही दाव्यांबाबत प्रश्न पडतात : याआधी देशात जे कुंभ/महाकुंभ झाले ते निष्प्रभ, अंधकार निर्माण करणारे होते असे म्हणायचे आहे काय? ‘देशाची जाणीव’, ‘अधीनतेच्या जोखडातून मुक्तता’ झाल्याचा परिणाम महाकुंभमध्ये पाहायला मिळाला हे मोदी यांचे म्हणणे धर्माला देशाशी नाहक जोडणारे आणि धर्मनिरपेक्षतेच्या विरोधात आहे. तसेच आपल्याच देशवासीयांचा, या पूर्वी- देशाची जाणीव नसलेले- असे संबोधून, अवमान करणारे आहे. हिंदू या महाकुंभपूर्वी नक्की कोणत्या अधीनतेच्या जोखडात होते?

महाकुंभमध्ये स्नान करण्यासाठी हिंदू बांधव आले ते पुण्यप्राप्तीसाठी. मोदी म्हणतात तसे विकसित भारतासाठी नव्हे. गंगेच्या विष्ठा-जिवाणूमिश्रित अत्यंत प्रदूषित पाण्यात, केलेल्या स्नानामुळे पुण्यप्राप्ती झाली असे मानले तरी राष्ट्रीय जाणीव जागृत होण्याशी, देशाच्या विकासाशी त्याचा काय संबंध? स्वातंत्र्योत्तर काळात या शक्तीची ताकद ओळखली गेली असती तर तिचा उपयोग सर्वांच्या कल्याणासाठी झाला असता. परंतु दुर्दैवाने तसे केले गेले नाही असा ठपका ते ठेवतात. हा त्यांच्या सवयीचा भाग असला तरी तो राजकीय स्वरूपाचा आणि त्यांच्या पदाला शोभेसा नाही. चेंगराचेंगरी, प्रवासाचा ताप, नाना अडचणी आदी दिव्ये सहन करूनसुद्धा आध्यात्मिक उत्साहात हा महाकुंभ पार पडला असताना मोदी यांनी लेखात राजकारण आणण्याचा प्रयत्न हा महाकुंभच्या धार्मिकतेला गालबोट लावणारा ठरतो.- उत्तम जोगदंड, कल्याण

दिशाभूल करणारी विधाने!

नुकत्याच पार पडलेल्या महाकुंभमेळ्याला ‘भारताच्या नव्या युगाची पहाट’ म्हणणारा, पंतप्रधानांचा लेख (२८ फेब्रुवारी) वाचला. देशाच्या सर्वोच्च नेतृत्वाचा वैचारिक भुसभुशीतपणा त्यातून स्पष्ट होतो. नित्यनेमाने येणाऱ्या एखाद्या धार्मिक सोहळ्याला मेगा इव्हेंटचे स्वरूप देऊन त्यात स्वत:च्या कर्तृत्वाचे ढोल पिटणे यात नवीन काहीच नाही. परंतु हे करताना दिशाभूल करणारी विधाने देशाचे पंतप्रधान करतात हे दु:खद आहे.

‘कुंभमेळ्याने राष्ट्रीय जाणीव बळकट केली, तेथे जमा होणारे संत (!), अभ्यासक आणि विचारवंत हे समाजाच्या स्थितीवर विचार करून देशाला आणि समाजाला नवी दिशा देत होते’ अशा विधानांच्या समर्थनार्थ उदाहरणे दिली असती तर बरे झाले असते. नदी प्रदूषित करून, त्यात डुबकी मारून पुण्य कमावणारे लोक, अशी आपली प्रतिमा होणे कोणासाठी फायद्याचे? चेंगरून मृत्युमुखी पडलेल्या श्रद्धाळूंची आठवणही पंतप्रधानांना येत नाही. प्रत्येक गोष्टीकडे प्रतिमा संवर्धनाच्या दृष्टीनेच पाहण्याची वृत्ती या लेखातून स्पष्ट होते. कुंभमेळा हिंदुत्वाची लिटमस टेस्ट असल्यागत प्रचार या काळात झाला. धार्मिक उन्मादाने प्रदूषित केलेल्या गंगेत समूहाच्या सारासार विवेकाचे विसर्जन करून आता त्यावर नवीन भारत उभा राहतो आहे, त्याची दिशा स्पष्ट करणारा हा लेख होता.- डॉ. रत्नप्रभा मोरे, ठाणे

अजित पवार यांची भूमिका दुटप्पी

महाराष्ट्र की मिर्झापूर?’ हे संपादकीय (२८ फेब्रुवारी) वाचले. एवढी गंभीर घटना घडल्यानंतरही तिच्या मुळाशी जाऊन पुढे खबरदारी घेण्याऐवजी परस्परांवर दोषारोप सुरू झाले आहेत. अजित पवार एकीकडे धनंजय मुंडेंवरील आरोप सिद्ध झाल्याशिवाय त्यांचा राजीनामाही घेणार नाही, असे म्हणतात आणि इथे मात्र आरोपी सापडलाही नसताना त्याला फाशीची शिक्षा देण्यासाठी आग्रही भूमिका घेतात. सर्वच आस्थापनांची, महामंडळाची वृत्ती निव्वळ कागदी घोडे नाचवण्याची. मुळात ५०हून अधिक नादुरुस्त बस आगारात पडून राहिल्याच कशा? का नाही अद्याप भंगारात काढल्या? पीडितेवर संबंधित बसबाबतची विचारणा आरोपीकडे करण्याची वेळ का आली? पहाटे साडेपाचच्या सुमारास स्वारगेट एसटी स्थानकात ‘माहिती घोषणा कक्ष’ कार्यान्वित होता की नाही? अनेक सीसीटीव्ही कॅमेरे धुळीने माखल्याने चित्रीकरण अस्पष्ट दिसते तर काही कॅमेरेच सदोष होते. त्यांच्या देखभालीची जबाबदारी कोणाची आहे? खासगी सुरक्षारक्षकांना पुरेसे प्रशिक्षण दिले होते का? स्थानकातील संवेदनशील भागात गस्तीची काय व्यवस्था होती? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अपेक्षित आहेत.- अॅड. एम. आर. सबनीस, अंधेरी (मुंबई)

स्वच्छतागृह का म्हणावे?

स्वारगेट बस स्थानकातील घटनेच्या पार्श्वभूमीवर बस स्थानकांतील गैरसोयींबद्दल बरेच काही लिहिले जात आहे. मी १९७२ मध्ये बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला तेव्हा पाच वर्षे एसटीने प्रवास केला. त्यानंतर ही कायमच एसटीने आवर्जून प्रवास करत आहे, पण गेल्या ५० वर्षांत न बदललेली गोष्ट म्हणजे बस स्थानकांची अवस्था. तिथल्या (अ)स्वच्छतेबद्दल काय सांगावे? स्वच्छतागृह का म्हणावे हा प्रश्नच आहे. स्वारगेट बस स्थानक हा या सर्व बस स्थानकांचा मेरुमणीच!-स्वाती टिकेकर

Story img Loader