‘आकसते बिस्किट, पसरता टीव्ही!’ हा अग्रलेख (३१ मार्च) वाचला. अज्ञान म्हणा वा नाईलाज, पण कर्जाच्या सापळ्यात सापडणाऱ्या लोकांचे प्रमाण वाढत चालले आहे. करोनामुळे नोकरी गेली, पगार पुरत नाही, दुसरे कर्ज फेडायचे आहे, अशा विविध कारणांसाठी कर्ज घेतले जाते. ते फेडता येत नसल्याने आपले पतमानांकन (क्रेडीट स्कोअर) घसरत जाते, त्यामुळे दुसरे कर्ज सहजासहजी मिळत नाही.

सर्वसाधारणपणे बँका शिक्षण, गृहखरेदी सोडून इतर वैयक्तिक कर्जांवर वार्षिक १२ ते १५ टक्के व्याज आकारतात. परंतु क्रेडिट कार्ड वापरून केलेल्या व्यवहारांची विशिष्ट मुदतीत परतफेड केली गेली नाही, तर तब्बल ३६ ते ४२ टक्के (किंवा त्यापेक्षा अधिक) वार्षिक व्याज आकारले जाते! बँका हात आखडता घेत असल्याने क्रेडिट कार्ड अथवा भुरळ पाडणाऱ्या जाहिरातींद्वारे तथाकथित लोन अॅपवरून झटपट कर्जे मिळण्याची सोय झाली आणि गरजू खोल गर्तेत गेले. या भीषण वास्तवाची कल्पना असूनही नियामक रिझर्व्ह बँक तसेच अर्थ मंत्रालयाने कर्ज देणाऱ्या काही अॅपवर बंदी घालण्यापलीकडे फार काही केले नाही. मूळ दुखण्यावर इलाज शोधला गेला नाही. खरे तर रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार प्रत्येक बँकेने ‘कर्ज समुपदेशन’ करणे (म्हणजेच जी व्यक्ती कर्जाची परतफेड करू शकत नसेल, तिच्याशी संवाद साधून काही मार्ग निघतो का बघणे) आवश्यक आहे. कर्जदाराला त्याची माहिती दिली जात नाही. वर्षानुवर्षे खात आलेल्या पार्ले जी, मारी, बिस्किटांचा आकार कसा कमी कमी होत गेला आणि एके काळी छोट्या असलेल्या टीव्हीच्या पडद्याचा आकार भिंत कसा व्यापू लागला हे कळलेच नाही.- अभय दातारऑपेरा हाउस (मुंबई).

कर्जफेडीच्या ऐपतीचा विचारच नाही

आकसते बिस्किटपसरता टीव्ही!’ हा अग्रलेख वाचला. मध्यमवर्गीयांनी घेतलेल्या कर्जापैकी ६७ टक्के वैयक्तिक स्वरूपाचे आहे. कर्ज हे नेहमीच उत्पादक स्वरूपाचे असले पाहिजे, पण जागतिकीकरणानंतर जो मोठा बदल मध्यमवर्गामध्ये दिसतो तो हाच की चैनीच्या तसेच दिखाव्याच्या वस्तूंचा मोठ्या प्रमाणावर वापर होऊ लागला आहे. अर्थव्यवस्थेसाठी हे धोक्याचे निशाण आहे, कारण ग्राहक ऐपत नसताना ईएमआयवर सर्व चैनीच्या वस्तू खरेदी करू लागले आहेत. अशा वेळी घेतलेल्या कर्जाची परतफेड करता येईल की नाही, याचा विचार अनेकदा दूर सारला जातो. बँका आणि सरकारनेही याचा विचार करणे गरजेचे आहे. केवळ मध्यमवर्गावर ढकलून मोकळे होता येणार नाही.-डॉ. संजय धनवटेवर्धा

क्रेडिट कार्डच्या नादात तरुण कर्जबाजारी

आकसते बिस्किटपसरता टीव्ही!’ हा अग्रलेख वाचला. सहज मिळणारे कर्ज आणि नंतर ते फेडताना होणारी आर्थिक ओढाताण याचा बहुसंख्य मध्यमवर्गीयांना आज सामना करावा लागत आहे. आधुनिक युगात क्रेडिट कार्ड हे आर्थिक व्यवहारांचे सुलभ साधन म्हणून वापरले जाते. मात्र, याच क्रेडिट कार्डच्या अतिवापरामुळे अनेक तरुण कर्जबाजारी होत आहेत.

क्रेडिट कार्डचा योग्य प्रकारे वापर न केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात. बँका आणि आर्थिक संस्थांकडून दिल्या जाणाऱ्या विविध ऑफर्स आणि सवलती तरुणांना क्रेडिट कार्ड वापरण्यास प्रवृत्त करतात. ‘आता खरेदी करा आणि नंतर पैसे भरा’ या संकल्पनेमुळे तरुण विनासंकोच खर्च करतात. मात्र, हेच खर्च पुढे त्यांना अडचणीत आणतात. अनेक तरुण क्रेडिट कार्ड वापरताना स्वत:च्या उत्पन्नाची आणि आर्थिक स्थैर्याची योग्य गणना करत नाहीत. त्यामुळे व्याजदर आणि दंडात्मक शुल्कामुळे त्यांचे कर्ज फुगत जाते. वेळेवर बिल न भरल्यास मोठी आर्थिक अडचण निर्माण होते. आजचे तरुण चैन करण्यास महत्त्व देताना दिसतात. समाजमाध्यमांच्या प्रभावामुळे आणि दिखाऊपणाच्या प्रवृत्तीमुळे अनेक जण आपल्या ऐपतीपेक्षा जास्त खर्च करतात. या सवयीमुळे क्रेडिट कार्डवरील कर्ज वाढत चालले आहे.- डॉ. योगेश खेडेकरबल्लारपूर (चंद्रपूर)

जमाखर्चाचा मेळ महत्त्वाचा

अजित पवार यांच्या म्हणण्याचा अर्थ’ हा ‘अन्वयार्थ’ (लोकसत्ता- ३१ मार्च) वाचला. अर्थमंत्री या नात्याने अजित पवार यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा विचार नंतर होईल, आधी थकीत कर्जाचे हप्ते भरा, असे स्पष्टपणे सांगितले हे योग्यच केले. राज्याची आर्थिक परिस्थिती खालावत चालली असल्याने जमाखर्चाचा मेळ कसा घालायचा हा प्रश्न अजित पवार यांच्यापुढे असणार. विधानसभेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनीही लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळण्यासाठी पाच वर्षे वाट पहावी लागेल असे म्हटले. त्यांचे हे विधान राज्याच्या खालावलेल्या आर्थिक परिस्थितीचीच साक्ष देते. अर्थमंत्र्यांना पैसा उभा कसा करायचा याची चिंता असणारच.

याबाबतीत अजित पवार यांनी सूतोवाच केलेच आहे. आता त्यांनीच या सर्व मोफत योजना बंद करण्याचा निर्णय घेऊन एकदाच काय ते कडू होऊन जावे. जनता सुरुवातीला नाराज जरूर होईल. पण त्यांच्या हातात अजून जवळपास साडेचार वर्षे आहेत. मोफत योजना बंद केल्यानंतर उपलब्ध होणारा निधी त्यांनी राज्याच्या विकासावर खर्च करून विकासकामे करावीत. शेतकऱ्यांना कर्ज देण्यापेक्षा त्यांनी पिकवलेल्या उत्पादनाला रास्त भाव कसा मिळेल आणि त्यामुळेच तो कर्जमुक्त कसा होईल यासाठी प्रयत्न करावेत.- अशोक साळवेमालाड (मुंबई)

कोणत्या बेड्या तुटल्या?

संघामुळे गुलामीच्या बेड्या तुटल्या!’ हे वृत्त (लोकसत्ता- ३१ मार्च) वाचले आणि प्रश्न पडला की संघामुळे कोणत्या बेड्या तुटल्या? स्वातंत्र्यलढ्यात संघाचे योगदान काय आहे? इंग्रजांविरुद्ध संघाने ठोस भूमिका घेतलेल्याचे कधी वाचनात आले नाही. ज्या महात्मा गांधींनी स्वातंत्र्यलढा उभारला, तो देशभर पोहोचवला अशा महान व्यक्तीला संघाच्या स्वयंसेवकाने गोळ्या घातल्या व त्याचा संघाने कधी साधा निषेधसुद्धा केला नाही. तरीही पंतप्रधान सांगत आहेत की देशासाठी संघाचे मोठे योगदान आहे. पंतप्रधानांनी संघाची देशासाठी योगदानाची काही उदाहरणे सांगितली असती तर बरे झाले असते.- बालाजी कापसेमानवत (परभणी)

चार्वाक आणि एपिक्युरसच्या विचारांत साम्य

लोकसत्ता’तील ‘तर्क-विवेक’ या सदरातील शरद बाविस्कर लिखित ‘एपिक्युरियन सुखवाद वि. बाजारू भोगवाद’ हा लेख (लोकसत्ता- ३१ मार्च) वाचताना सतत चार्वाकाची आठवण येत राहते. चार्वाकाचे जे तत्वज्ञान होते तेच तत्त्वज्ञान ग्रीक तत्वज्ञ एपिक्युरसने मांडले आहे. एपिक्युरस आणि चार्वाक हे जवळजवळ समकालीन होते असे म्हणण्यास हरकत नाही. भारतीय तत्त्वज्ञानात चार्वाक दर्शन हे जसे इहवादी नास्तिक दर्शन म्हणून ठळकपणे समोर येते त्याच्याशी जवळजवळ शंभर टक्के सहमती दर्शवणारे एपिक्युरसचेसुद्धा विचार होते, हे हा लेख वाचताना लक्षात येते.

‘यावज्जीवेत सुखं जीवेद ऋणं कृत्वा घृतं पिवेत, भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुत:॥’ हा चार्वाकांनी उद्धृत केलेला इहवादी विचार ज्याप्रमाणे ‘ऋण काढून सण साजरे करा, खा, प्या मजा करा’ अशा विकृत पद्धतीने सनातन्यांनी लोकांच्या मनावर ठसवला, तसेच एपिक्युरसच्या विरोधकांकडून त्याच्या तत्त्वज्ञानाचा विपर्यास फक्त ‘खा, प्या, मजा करा’ अशा उथळ भोगवादात केला गेला. एपिक्युरसचे इहवादी अन्य विचारसुद्धा कॅथलिक चर्चच्या सनातन्यांनी विकृत पद्धतीने लोकमानसावर ठसवले त्यामुळे सामान्यजनांकडून एपिक्युरस तिरस्कृत झाला. परिणामी, जसे चार्वाकांचे सर्व ग्रंथ भारतात वैदिक सनातन्यांकडून जाळले गेले तसेच तिकडे एपिक्युरसचेसुद्धा तीनशेच्यावर ग्रंथ जाळले गेले. तेव्हा आता जर आपल्याला चार्वाकांचे विचार शोधायचे असतील तर वैदिक सनातन्यांच्या ग्रंथातून पूर्वपक्ष म्हणून त्यांनी लिहिलेल्या मांडणीतून शोधावे लागतात. तद्वतच एपिक्युरसचे विचारही त्याच्या विरोधकांच्या ग्रंथात सोयीने पूर्वपक्ष म्हणून केलेल्या मांडणीतून शोधावे लागतात. जगभरच्या सनातन्यांकडून अशा प्रकारे विरोधकांचे वैचारिक साहित्य नष्ट करणे हा निश्चितच योगायोग म्हणता येणार नाही. हा लेख वाचताना असे सतत वाटत राहते की, लोकांना इहवादी तत्त्वज्ञान पचण्यास जड जाते, तर पारलौकिक तत्त्वज्ञानाच्या भ्रामक जगात जगणे आवडते.- जगदीश काबरेसांगली