‘राजेशाही म्हणावी आपुली…’ हा अग्रलेख (१ एप्रिल) वाचला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रिगन व ब्रिटिश पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांनी कल्याणकारी लोकशाही मोडीत काढून मुक्त बाजारपेठेचे स्वप्न दाखवत ‘जागतिक व्यापार संघटना’ स्थापनेत पुढाकार घेतला. साम्यवादी व्यवस्थेची पीछेहाट आणि नव्या मुक्त व्यापाराचा उधळलेला वारू यांमुळे भांडवलाने राज्यव्यवस्थेवर लीलया वर्चस्व प्रस्थापित केले. आज तीन दशकांनंतर मात्र याच आर्थिक भांडवलाने राज्यव्यवस्था बटीक केल्याचे अनुभवास येते. देशोदेशीच्या धनदांडग्यांमध्ये नैसर्गिक साधनसंपत्ती ओरबाडण्याची विकृत स्पर्धा सुरू आहे. त्यामुळे पर्यावरणाचा कमालीचा ऱ्हास झाला. नफ्यासाठीची अमानवीय स्पर्धा, अस्मितेचे राजकारण, सततची युद्धे आणि स्थलांतर, दहशतवाद, यांमुळे लोकशाहीला ग्रहण लागले. सर्व शक्तिमान राज्यकर्ते स्वत:ला राजे समजू लागले. नैतिक मूल्यांचा झपाट्याने ऱ्हास होत आहे. अराजकानंतर सक्षम पर्याय मिळत नसल्याने (श्रीलंका, बांगलादेश) सामान्य जनता असहाय आहे. सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर तेथील जनतेला अर्थपूर्ण लोकशाहीऐवजी प्रत्यक्षात हुकूमशाही मिळाली. ब्रिटनसह विविध युरोपीय देशांमध्येही लोकशाहीचा दर्जा घसरला. इलॉन मस्क, रशियामधील उद्याोगपती, अंबानी, अदानी यांच्यासारखे पडद्याआडचे धोरणकर्ते लोकशाहीचा वेगाने संकोच करण्याच्या प्रयत्नात आहेत. राज्यकर्ते नाममात्र तर मोजके भांडवलशहा हे खरे धोरणकर्ते आणि कदाचित नव्या युगाचे राजे झाले आहेत.- अॅड. वसंत नलावडे, सातारा

सत्ताधाऱ्यांचा यंत्रणांवर विश्वास नाही?

संविधानाला विनोद ठरवणारा स्वैराचार’ हा लेख वाचला. एका विदूषकाने टोपी हवेत उडवली आणि त्यात स्वत:चे डोके घालून आता ही मंडळी थयथयाट करत आहेत. मुळात कुणाल कामराने काही आक्षेपार्ह विधान केले असेल तर त्यासाठी कायदेशीर कारवाईची प्रक्रिया आहे. सत्ताधारी पक्षालाच बहुतेक या प्रक्रियेवर विश्वास नसावा. अन्यथा त्यांनी कायदा हातात घेऊन नाहक त्या स्टुडिओचे नुकसान करणे, कामराला धमक्या देणे असे उद्याोग करून या उद्याोगांना राजमान्यता दिली नसती. लोकशाहीत सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याचा अधिकार फार मौलिक आहे. टीकेचे स्वागत करण्याचा उमदेपणा दाखवणे हेच प्रगल्भ लोकशाहीचे लक्षण आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच जे खडे बोल सुनावले आहेत ते फार महत्त्वाचे आहेत. हाच असंतोष छत्रपती शिवाजी महाराजांविषयी गरळ ओकणाऱ्या सोलापूरकर, कोरटकर यांच्याविरोधात का दिसला नाही? संविधान तरतुदींची एवढी काळजी आहे तर महाराष्ट्र ते सुरतमार्गे गुवाहाटीला जाणे आणि सत्तांतर करणे यामुळे संविधानाची कोणती प्रतिष्ठा राखली गेली? एकंदरीतच सत्तेच्या जोरावर विरोधातील आवाज दडपण्यासाठी प्रसंगी कायदा हातात घेणारे लोक आणि संविधानाची ढाल करून नक्राश्रू ढाळणारे दांभिक नेते हेच खऱ्या अर्थाने संविधानाचे मारेकरी आहेत.- डॉ. रत्नप्रभा मोरेठाणे

लोकशाहीची चौकट मोडण्यावर बोट

संविधानाला विनोद ठरवणारा स्वैराचार’ हा नरेश म्हस्के यांचा लेख (१ एप्रिल) वाचला. त्यातील सर्वच मुद्दे काहीसे एकतर्फी, तर्कहीन वाटतात. विनोदकार कुणाल कामराने कोणाचेही नाव न घेता महाराष्ट्रातील वर्तमान राजकारणावर मार्मिक भाष्य करणारी व्यंगात्मक गाणी सादर केली. त्यामुळे संविधान विनोद कसे काय ठरू शकते, याचे उत्तर लेखातील युक्तिवादात सापडत नाही. ‘खोटे बोल पण रेटून बोल’ ही नीती वापरून लेखक वाचकांची दिशाभूल करत आहेत. भारतीय संविधानातील ज्या अनुच्छेदाचा दाखला दिला आहे त्यातील कुठल्याही तरतुदीचा भंग कामरा यांच्या गाण्यातून होत नाही. गाण्यातून व्यक्त आशय संविधानप्रणीत संसदीय लोकशाहीची मूल्यात्मक चौकट तोडणाऱ्या प्रवृत्तींवर बोट ठेवतो. कामरा यांनी कोणाचेही नाव घेतलेले नसतानाही त्यांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी करणे आणि त्यांना विरोधी पक्षाची फूस असल्याचा दावा करणे योग्य नाही. या निमित्ताने ‘कलेने अराजकीय असण्याचा अर्थ कलेने सत्ताधारी वर्गाची बाजू घेणे’ या जर्मन नाटककार बर्टोल्ट ब्रेष्ट यांच्या विधानाची प्रचीती येथे येते.- प्रा. डॉ. ज्ञानेश्वर डिगोळे बोर्डेकरनांदेड

टायर’, ‘थर्ड डिग्री’ची भाषा समर्थनीय आहे?

संविधानाला विनोद ठरवणारा स्वैराचार’ हा नरेश म्हस्के यांचा लेख वाचला. लेखाच्या सुरुवातीसच म्हस्के म्हणतात, ‘कुणाल कामराने एकनाथ शिंदे यांच्याविरोधात द्वेषमूलक वक्तव्य केले, स्वाभाविकच शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या गेल्या व त्याची प्रतिक्रिया राज्यभरात उमटली.’ दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात ज्या प्रकारे सत्तापालट झाला त्याने कुणाल कामरादेखील व्यथित झाला असावा व त्याच्या हाती जे शस्त्र होते ते वापरून त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या असाव्यात. त्याचा तो अधिकार नाकारण्याचा अधिकार शिवसैनिकांना कसा मिळाला? सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असताना सत्ताधारी आमदारांनी कुणाल कामरा महाराष्ट्रात आल्यास त्याच्याविरुद्ध ‘टायर’ किंवा ‘थर्ड डिग्री’ वापरण्याची भाषा करणेदेखील (हीदेखील भावना दुखावल्याची प्रतिक्रिया?) समर्थनीय नाही. गतसप्ताहात सर्वोच्च न्यायालयानेदेखील, ‘एखाद्या कलाकृतीने धक्का बसावा एवढे प्रजासत्ताक कमकुवत नाही’ असे भाष्य केले होते. कारणे काहीही असली तरी शिवसैनिकांनी कायदा हातात घेणे समर्थनीय नाही. अनेक वर्षांपूर्वी एका बंदप्रकरणी झालेल्या नुकसानीच्या भरपाईपोटी शिवसेनेस न्यायालयाने दंड ठोठावला होता. रामदास फुटाणे यांच्या राजकीय वात्रटिका अनेक राजकारण्यांच्या टोप्या उडवितानाही महाराष्ट्राने पाहिले आहे. मग आताच काय झाले?- शैलेश पुरोहितमुंबई

तोडफोड स्वीकारार्ह नाहीच

संविधानाला विनोद ठरवणारा स्वैराचार’ (१ एप्रिल) हा लेख वाचला. अनेक प्रश्न उभे राहिले. सर्वप्रथम अशा प्रकारचे प्रस्थापित राजकीय व्यवस्थेविरोधातले विनोद, विडंबन आपल्याला नवीन नाही. त्याची फार मोठी परंपरा देशाला आहे. दुसरे, कुणाल कामराने उच्चारलेले शब्द हे सध्याच्या राजकीय क्षेत्रात परवलीचेच असून, महाराष्ट्राच्या गढूळ व खालच्या स्तराला गेलेल्या राजकारणाचे ते प्रतिबिंब आहे. ज्यावर राजकीय पक्षांनी आत्मचिंतन करणे अपेक्षित आहे. एखाद्या व्यक्तीवर पातळी सोडून टीका करणे, हे जसे अभिव्यक्तिस्वातंत्र्यात अपेक्षित नाही तसेच त्यावर इतक्या आक्रमकपणे प्रतिक्रिया देऊन, स्टुडिओची तोडफोड करणे हेही स्वीकारार्ह नाही!-प्रसाद कदमपुणे

नाव न घेता टीका कधी झालीच नव्हती?

संविधानाला विनोद ठरवणारा स्वैराचार’ हा नरेश म्हस्के यांचा लेख वाचला आणि प्रश्न पडला की आजवर कोणावर नाव न घेता टीका झालीच नव्हती का? यापूर्वीही अशी टीका होतच होती, पण ती खिलाडूपणाने घेतली जात असे. अभिव्यक्ती वा विचार ठेचण्याची वृत्ती दिसत नसे. बाळासाहेब ठाकरेंनी शरद पवारांवर व्यंगचित्रांतून मारलेले फटकारे, आचार्य अत्रेंनी यशवंतराव चव्हाणांना काढलेले बोचकारे मराठी जनांना आठवत असतील. राजकीय मुद्द्यांना धरून टीका करण्याचा संकेत शक्यतो जपला जात असे. एखाद्याची प्रतिमा कायमस्वरूपी डागाळेल अशा टिप्पणीपासून दूर राहण्याचे तारतम्य सर्वच समाजघटकांनी बाळगले पाहिजे.-श्रीपाद कुलकर्णीपुणे

सर्वसामान्य हिंदू मुस्लीमद्वेष्टे नाहीत

चित्रपटाने जागे होणारे हिंदू काय कामाचे?’ हे वृत्त (लोकसत्ता- ३१ मार्च) वाचले. खरे तर सर्वसामान्य हिंदूंना अफजल खानाची कबर उखडून टाकण्यात काहीच रस नाही. नागपुरात झालेल्या दंगलींत जे हिंदू सहभागी झाले, ते सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते होते. नागपूर हे सहिष्णू शहर आहे. ताजुद्दिनबाबाच्या दर्ग्यावर मन्नत मागण्यासाठी जाणारे जेवढे मुस्लीम आहेत, तेवढे हिंदूही आहेत. नागपूरमध्ये जेव्हा मोहरमचा उत्सव असतो तेव्हा किती तरी सवाऱ्या (ताबूत) घेऊन नाचणारे हे हिंदू असतात. विदर्भात अनेक दर्गे आहेत, उदा. गिरडवाले फरीदबाबा हे ठिकाण हिंदू – मुस्लीम ऐक्याचे प्रतीक समजले जाते. अनेक हिंदू कुटुंबांत लग्नप्रसंगी कुटुंबातील व्यक्ती फकीर बनून पाच घरी भिक्षा मागून कंदुरी करतात. फरिदबाबाच्या नावाने कोंबडा कापून लग्नापूर्वी गृहशांती केली जाते. हिंदू हे चित्रपट बघून जागे होणारे नाहीत. त्यांची भूमिका जागल्याचीच असते.- रमेश परचाकेकल्याण