‘अनुपस्थिती की पळवाट?’ हा ‘अन्वयार्थ’ (५ सप्टेंबर) वाचला. १९६२च्या युद्धानंतर चीनने भारतावर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडली नाही. एकीकडे पाकिस्तान तर दुसरीकडे चीनच्या सततच्या बदलत्या धोरणांमुळे सीमा भागातील वातावरण नेहमीच तणावाचे राहते. परिणामी युद्धापासून कोसो दूर असणाऱ्या भारताला मात्र या दोन राष्ट्रांमुळे कमालीचे दक्ष राहावे लागते. भारताच्या ईशान्येकडील काही भूभागावर दावा सांगून आधीच अवाढव्य वाढलेल्या (आकाराने आणि लोकसंख्येने) चीनला आणखीन काय काय हवे, हाच एक मोठा प्रश्न आहे. अनेक परिषदांमधून भारताने चीनच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. जी-२० परिषदेच्या निमित्ताने पुन्हा एकदा चीनला अमेरिकेच्या साथीने कोंडीत पकडण्याची आयती संधी चालून आली होती, मात्र जिनिपग यांच्या आडमुठेपणामुळे ती बारगळली. चीन भारताला नेहमीच दुय्यम वागणूक देतो आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात तर त्यांच्या खिजगणतीतही भारत नसतो. चीनचा हेकेखोरपणा भारतासाठी त्रासदायक असून भारताने चीनकडे कधीही मैत्रीच्या भावनेने हात पुढे न करता चार हात लांब राहून त्यांच्या हालचलींकडे लक्ष ठेवणे यातच खरा शहाणपणा आहे. १९६२ मध्ये भारत गाफील राहिल्याने चीनने जसा दगा दिला होता, त्याची पुनरावृत्ती कधीही होऊ शकते. भारताने आता चीनसमोर प्रश्न उपस्थित करण्याऐवजी त्यांच्या धोरणांना ओळखून त्यांच्यापासून अधिक सावध राहणेच उचित ठरेल.- श्रीकांत शंकरराव इंगळे, पुणे
जी-२०चे अपयश भारताची नामुष्की नव्हे
जी-२० परिषदेचे यशापयश भारताच्या हातात नाहीच. ते तसेही कोणा एका देशावर अवलंबून नाही. पुतिन रशियाबाहेर जात नाहीत. जिनिपग स्वार्थाशिवाय काही पाहत नाहीत. एकंदर यांना जागतिक नेते म्हणणेदेखील योग्य नाही. त्यांना जगाची चिंता नाही. त्यांच्या कृतीने जग चिंताक्रांत आहे. युक्रेन- रशिया, भारत- चीन, चीन- आग्नेय आशियायी देश यांच्या समस्यांत कोणीही पडत नाही. फक्त शाब्दिक इशारे, धमक्या व शांततेचे आवाहन याशिवाय काही नाही. सदस्य देश स्वत:हून समस्या सोडवत नाहीत तोपर्यंत काही फलदायी होईल, अशी आशा नाही. जी-२० परिषदेचे अपयश संघटनेचे आहे त्यात भारताची नामुष्की होण्याचे काहीच कारण नाही.-डॉ. मंगेश नागापूरकर, शिरडशहापूर (हिंगोली)
..तर भारताला एकही मित्र उरणार नाही
‘जिनिपग यांच्या अनुपस्थितीबाबत बायडेन यांची नाराजी!’ ही बातमी (लोकसत्ता- ५ सप्टेंबर) वाचली. पुतिन व जिनिपग जी-२० परिषदेस उपस्थित राहणार नाहीत, ही भारतासाठी चिंतेची व नामुष्कीची बाब आहे. चिंतेची अशासाठी कारण मध्यंतरी क्षी आणि पुतिन यांची युक्रेन युद्धासंदर्भात सविस्तर भेट झाली होती. क्षी स्वत: उठून रशियाला गेले होते. ही भेट सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडल्याचे जाहीर झाले आहे. त्यानंतर आपले पंतप्रधान पुतिन यांना भेटले आणि ‘ही वेळ युद्धाची नव्हे,’ असे सुनवून आले. याबद्दल त्यांच्या भक्तांनी भरपूर ढोल बडवले. पण पुतिन हे अजिबात ऐकून घेणाऱ्यांपैकी नाहीत आणि विसरणाऱ्यांपैकी तर नाहीतच! अलीकडच्या घटना पाहता रशिया हळूहळू भारतापासून दुरावत आहे. बायडेन यांचे धोरण चीनला एकटे पाडण्याचे आहे. पण उद्या जर चीन-रशिया हे दोन देश एकत्र आले तर आपल्यासाठी नामुष्की अशासाठी की इतक्या वर्षांची दोस्ती मातीमोल होणार आहे आणि मग आंतरराष्ट्रीय पातळीवर ठामपणे म्हणता येईल असा एकही मित्र आपल्याकडे राहणार नाही. –अॅड. एम. आर. सबनीस, अंधेरी (मुंबई)
मुंबईच्या गळय़ात हे फुकाचे लोढणे कशाला हवे?
‘हे तर मुंबईचे मारेकरी’ हा आशीष शेलार यांचा लेख (५ सप्टेंबर) वाचला. आशीष शेलार २५ वर्षांचा लेखाजोखा मांडतात, पण या २५ वर्षांतील किमान २० वर्षे हेच भाजपवाले शिवसेनेच्या मांडीला मांडी लावून मुंबई महापालिकेत सत्तेला चिकटून बसले होते तेव्हा कुठे गेला होता ‘राधा सुता तुझा धर्म?’ मुंबईबद्दल एवढेच प्रेम वाटत होते तर मुंबईच्या हक्काचे वित्तीय केंद्र गुजरातला गेले तेव्हा तुम्ही गप्प कसे काय राहिलात बुवा? डहाणूचे सागरी पोलीस प्रशिक्षण केंद्र गुजरातला गेले तेव्हाही तुम्ही हाताची घडी तोंडावर बोट ठेवून होतात. मुंबईत झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प बाळासाहेब ठाकरे यांनी आणला होता, भाजपने नव्हे. झोपडपट्टीवासीयांसाठी शिवसेनेने काहीच केले नाही हे कसे म्हणता? मुंबईच्या बंद गिरण्यांच्या मोकळय़ा जागेवर कोणी पोळी भाजून घेतली याचीही चर्चा करा.
महाराष्ट्रात मुंबई महानगरपालिका, एमएमआरडीए, स्वत: राज्य सरकार समर्थ असताना हा निती आयोग मुंबईची धोरणे ठरवायला हवाच कशाला? इतक्या वर्षांत महाराष्ट्राने स्वत:च स्वत:च विकास करून देशात आदर्श निर्माण केला असताना हे फुकाचे लोढणे कशाला हवे? त्या स्मार्ट सिटीचे काय झाले? फक्त पोकळ घोषणा करायच्या, नामकरण समारंभ केल्यासारखी नावे बदलायची हीच तर सरकारची खासियत! निती आयोगाच्या माध्यमातून संघराज्य व्यवस्थेचा गळा घोटायचा आणि मुंबईला आणि महाराष्ट्राला केंद्रासमोर वाकवून उभे करायचे हाच डाव आहे. मुंबई गुजरातला न मिळाल्याचे शल्य कोणाला टोचत असेल तर मराठी जन तो कुटिल डाव हाणून नक्कीच पडतील. त्यासाठी कुणा राजकीय पुढाऱ्यांची गरज नक्कीच नाही. -अमोल करंगुटकर, वांद्रे (मुंबई)
मुंबईची मेलेली कोंबडी आगीला भीत नाही
‘हे तर मुंबईचे मारेकरी’ हा लेख (५ सप्टेंबर) वाचला. त्यातील मारेकरीह्ण ह्या शब्दप्रयोगात मुंबई मेली आहे याची एकप्रकारे कबुली दिसते. त्याबद्दल कोणत्याच पक्षाने कोणाला बोल लावावेत अशी परिस्थिती नाही. १९८५ सालीच राजीव गांधी यांनी कोलकात्याचे वर्णन ‘डायिंग सिटी’ असे केले होते. त्यानंतर हावरा पुलाखालून आणि मिठी नदीतून इतके पाणी वाहून गेले आहे की, देशातील बऱ्याच शहरांची उसवल्यासारखी स्थिती झाली आहे. मुंबई हे त्याचे प्रतीक म्हणता येईल.
मुंबई विमानतळावर प्रथमच उतरणाऱ्या परदेशी पाहुण्यांना विमान झोपडपट्टीमध्येच उतरत आहे असे वाटून पोटात नक्की गोळा येत असेल. ‘भारत गावों में बसता है’ वगैरे वाक्ये आळवत अर्थव्यवस्थेची इंजिने असणाऱ्या शहरांची अक्षम्य हेळसांड अनेक दशके होत आली आहे. जमिनीवर बकाल शहर, जमिनीखाली चकाचक मेट्रो आणि खालच्या बकालपणाशी आपला संबंधच नाही असे समजून वरून जाणारे महाकाय पूल आणि मुक्तमार्ग असे विचित्र ‘विकासाचे प्रारूप’ अनेक ठिकाणी दिसते. हेच आपले प्राक्तन आहे हे मनोमन स्वीकारलेला मुंबईकर मिळेल तसा प्रवास करून आला दिवस ढकलत असतो. महानगरपालिकेच्या निवडणुका क्षितिजावर दिसू लागल्या की मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार हे तुणतुणे ऐकू येऊ लागते. ती तशी खरोखरच तुटली तर जे काही होईल, अशी भीती घातली जाते ते तर सारे कित्येक वर्षे होतच आले आहे. त्यामुळे आता मुंबईची मेलेली संवेदनाहीन कोंबडी कुठल्याच आगीला भीत नाही आणि स्वत:चे कथित ‘स्पिरिट’ दाखवत घडाळय़ाच्या काटय़ामागे धावत राहते असे वाटते.-प्रसाद दीक्षित, ठाणे</strong>
‘इंडिया’मुळे भाजप गोंधळलेल्या अवस्थेत
विरोधकांची ‘इंडिया’आघाडी अस्तित्वात आल्यापासून भाजपची अवस्था गोंधळल्यासारखी झाली आहे. विरोधकांची वक्तव्ये वा हालचालींमधील लहानसहान चुका शोधून त्यावर टीका करण्यासाठी भाजपच्या नेत्यांमध्ये अहमहमिका लागल्याचे दिसते. त्यासाठी कधी राहुल गांधींना प्रियंकाने राखी न बांधल्याचे, तर कधी उदयनिधी स्टालीनच्या सनातन धर्मावरील वक्तव्याचे कारणही भाजपला पुरते. जगातील सगळय़ात मोठय़ा राजकीय पक्षाचे कट्टर समर्थन लाभलेला सनातन धर्म कुणीतरी टीका केली म्हणून एवढा दुर्बळ कसा काय होऊ शकतो, हे समजण्यापलीकडचे आहे. गेल्या नऊ वर्षांतील महागाई, बेकारी, आर्थिक असमानता आदी अपयशांवरून जनतेचे लक्ष इतरत्र वेधण्यासाठी अशी कारणे पुरतील अशी भाजपची ठाम समजूत झालेली असावी, असे दिसते. पण जनतेला सदासर्वकाळ मूर्ख बनवता येत नाही हेही लक्षात घेणे आवश्यक आहे. –डॉ. किरण गायतोंडे, चेंबूर (मुंबई)
अजित पवार यांची मागणी निव्वळ हास्यास्पद
जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर पोलीस अमानुषपणे लाठीहल्ला करत असल्याची दृश्ये वाहिन्यांमधून दाखवली जात होती व ती लोकांनी पाहिली आहेत. या घटनेवर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले की, ‘‘मी पोलिसांना याबद्दल दोष देत नाही कारण पोलीस हे सरकारी नोकर असतात. वरून आलेल्या आदेशानुसारच ते कारवाई करतात आणि हे सत्य आहे.’’ परिस्थितीचे गांभीर्य जाणून उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीडितांची माफी मागितली. पण उपमुख्यमंत्री अजित पवार गुर्मीत म्हणत होते की वरून आलेल्या आदेशानुसार लाठीमार झाला, हे सिद्ध करून दाखवा. यांचेच सरकार असल्याने असे आदेश वरून दिल्याचे सिद्ध करणे शक्य नसते. त्यामुळे ही मागणी निव्वळ हास्यास्पद आहे. -बकुल बोरकर, विलेपार्ले (मुंबई)