‘भंगती शहरे, दुभंगता विकास!’ हा अग्रलेख (१८ सप्टेंबर) वाचला. याप्रकरणी सार्वत्रिक उदासीनता दिसते. उत्सव हे उन्माद प्रदर्शित करण्याचे माध्यम झाले आहे. जनतेला अफू चारणारे राजकारणी मतदारांना ब्रेन डेड समजतात व वृत्तवाहिन्या त्याला खत-पाणी घालतात. दुचाकीची विक्री कमी होणे व आलिशान गाडय़ांना वेटिंग लिस्ट असणे हे मोठय़ा आर्थिक विसंगतीचे चिन्ह आहे. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनातील वाढ फक्त मर्यादित लोकांचे दरडोई उत्पन्न वाढवीत आहे. लोकसंख्येच्या मोठय़ा भागाला जिथे आहे तिथेच टिकून राहण्यासाठी धावावे लागत आहे. जिम, स्विमिंग पूल आणि क्लब हाऊस असलेल्या कॉम्प्लेक्सच्या जाहिराती हेच सत्य अधोरेखित करतात की तुलनेने समृद्ध असा एक वर्ग आज वास्तविकतेकडे केवळ डोळेझाक करत नाही, तर त्यातून स्वत:ला ‘इंसुलेट’ करायची धडपड करत आहे. जेव्हा या विषमतेचा स्फोट होईल तेव्हा आपण सर्वच त्यात होरपळणार याचे भानच नाही. त्यांना वाटते, की पैशांनी सर्व काही साध्य होऊ शकते. पत्रकार शंकर अय्यर यांच्या ‘द गेटेड रिपब्लिक’ या पुस्तकात या वस्तुस्थितीचे विस्तृत वर्णन आहे. कुठलेही शहर लोकांना राहण्याजोगे वाटण्यासाठी सर्वप्रथम तेथील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था व्यापक असणे आवश्यक आहे. आज प्रगत देशांत खासगी वाहने वापरण्यापासून लोकांना परावृत्त केले जाते. मुंबईतील मेट्रो तर एक रहस्य कथाच आहे. कधीतरी ती चालू होईल पण कुठल्या पिढीला ती नीट वापरत येईल ते बघूया. या दुरवस्थेला केवळ राज्यकर्ते जबाबदार नाहीत. शेवटी इंग्रजीतील एका म्हणीची सुधारित आवृत्ती इथे वापरावीशी वाटते ‘‘पीपल गेट द गवर्नन्स दे डिझर्व’’.-श्रीरंग सामंत, ठाणे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा