‘डाव्या विचारसरणीला रोखण्यासाठी प्रखर राजकीय विचारसरणी महत्त्वाची’ ही बातमी (१८ सप्टेंबर) वाचली. मुळात डावी विचारसरणी सर्व संपत्ती राष्ट्राची आणि सर्वासाठी, धर्म जात लिंग आधारे भेदभाव न करता सर्व मानव समान, सर्वाना कामाचा योग्य मोबदला अशा सामाजिक आणि आर्थिक मांडणीवर आणि राजकीय विचारांवर आधारलेली आहे. विसाव्या शतकाच्या अखेरीस भांडवलशाहीच्या अतिरेकामुळे डाव्या राजकीय शक्तींची पिछेहाट झाली आणि त्याचा परिणाम म्हणून जगभरात धर्माध शक्ती प्रबळ होत गेल्या. सत्याचा आधार घेतला तर काही ऐतिहासिक सत्य मान्य करावी लागतील. जसे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वातंत्र्यलढय़ात सहभाग नव्हता, भारताचा राष्ट्रध्वज अनेक वर्षे संघाने आपला मानला नाही, लोकशाही आणि राज्यघटना यांच्या विरोधात त्यांनी वेळोवेळी घेतलेली भूमिका. सरसंघचालकांना डावी विचारसरणी जगभराला पोखरणारी वाटत असेल, तर संघाने शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू अशा हजारो कम्युनिस्ट क्रांतिकारकांविषयी भूमिका स्पष्ट करावी. जागतिक पातळीवर हिटलरच्या फॅसिझमचा रशियाच्या लाल सेनेने केलेला पराभव, व्हिएतनामने बलाढय़ अमेरिकेचा केलेला पराभव, क्युबाने अमेरिकेची दडपशाही झुगारून केलेली प्रगती याचा विचार करता डावी विचारसरणी ही पोखरणारी नसून सर्वसामान्य जनतेच्या योगदानातून राष्ट्र उभारणी करणारी आहे, असेच म्हणावे लागेल.अॅड. वसंत नलावडे,सातारा
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा