प्रचलित फौजदारी कायद्यात बदल करण्याच्या उद्देशाने संसदेत सादर होणाऱ्या तीन विधेयकांबाबत पी. चिदंबरम यांचा अभ्यासपूर्ण लेख (२६ नोव्हेंबर २०२३) वाचला. एकदा का एखाद्या माणसाला मला सगळय़ातले सगळे कळते असा अहंगंड निर्माण झाला आणि या अहंगंडाला खतपाणी घालणारे ‘होयबा’ भोवती गोळा झाले की ती व्यक्ती प्रत्येक बाबतीत आपली मनमानी करायला सुरुवात करते. तशी काहीशी परिस्थिती सध्या भारतीय राज्यव्यवस्थेची झाली आहे. इतर स्वायत्त संस्थांवर मोदींनी पकड बसवली आहे, पण न्यायव्यवस्था आणि न्यायालये त्यांना दाद देत नाहीत. भीती, दडपण निर्माण करण्यासाठी व्यक्तीवर फक्त आरोप करून पुरेसे नाही तर त्याला अटक केली पाहिजे, तुरुंगात सडवले पाहिजे तरच आपले ईप्सित साध्य होऊ शकते अशी ठाम धारणा झालेली दिसते. पण सर्वोच्च न्यायालय आणि इतर न्यायालयेसुद्धा आता राज्यपालांची वर्तणूक, जुजबी आरोप, तपासाच्या नावाखाली अटक आणि शेवटी खटलाच मागे घेणे या सगळय़ा मागचा कायदा व न्यायालयीन प्रक्रियेचा होणारा गैरवापर न्यायालये चव्हाटय़ावर आणू लागलेली आहेत. अशा काळात ब्रिटिश कायद्यांची गुलामगिरी हटवण्याच्या नावाखाली, देशभक्तीचा मुलामा देत फौजदारी कायद्यांच्या सुधारणांचा घाट घातला जात असला, तरी नव्या कायद्यांचा आशयही निराळा नाही. कायद्यातील बदलासाठी पूर्वपीठिका (प्रिअॅम्बल) असणे आवश्यक असते. ज्याचा उपयोग त्या कायद्यातील तरतुदींचा वापर करताना वकील वर्ग न्यायालयात करत असतो. अमुक एक कायदा करताना जनमत, संसदीय भूमिका इत्यादींचा ऊहापोह करीत कायद्यातील तरतुदींचे महत्त्व स्पष्ट केले जाते. उदाहरणच द्यायचे झाले तर दिल्लीतील निर्भयाकांडानंतर फौजदारी कायद्यातील बदल न्यायालयानेही मान्य करून घेतला. फौजदारी कायदा, पुरावा कायदा व दंड संहिता तीन विधेयकांबाबत बदल का आवश्यक आहेत याबाबत कोणतीही ठोस कारणमीमांसाच नाही! तरीही मोदी, शहांच्या इशाऱ्यावर तसेच बहुमताच्या जोरावर ही विधेयके मंजूर होतील यात शंकाच नाही. चिदम्बरम आणि त्यांच्यासारख्या वकिलांना शेवटी न्यायालयीन लढाई करूनच हे बदल निरस्त करावे लागतील.-अॅड. एम्. आर. सबनीस, अंधेरी पूर्व (मुंबई)
वादाचे तपशील न पाहता काय दिसते?
‘मारहाणीनंतरची शांतता’ हा ‘अन्वयार्थ’ ( २५ नोव्हेंबर) वाचला. मुक्त विद्यापीठाच्या माजी कुलगुरूंना वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी स्वत:च्याच घरात, कुणा शिक्षकाकडून मारहाण सहन करावी लागणे याचे कोणतेही कसलेही समर्थन करता येणार नाही हे जरी खरे असले तरी सध्याच्या शिक्षण पद्धतीत निर्माण झालेल्या गंभीर रोगांवर कोणीही उपाय शोधत नाही याकडे लक्ष वेधले जात नाही. उदासीन शासन व्यवस्था, अनेक वर्षे चालणारी न्यायव्यवस्था आणि खोटी कागदपत्रे बिनदिक्कतपणे करण्याची मानसिकता आणि धाडस यांचा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेवर होणारा परिणाम यांची दखल कोणीही घेत नाही ही अत्यंत खेदाची बाब आहे. कितीही काहीही झाले तरी शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी संयम सोडू नये हे कितीही खरे असले तरी सध्याच्या व्यवस्थेत या विशेषत: विनाअनुदानित व्यवस्थेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेचा, कुटुंब व्यवस्थेचा शासन विचार करणार आहे की अनागोंदी, अराजकता हीच आपली ओळख बनविणार आहोत?
आदरणीय अशोक प्रधान, संबंधित शिक्षण संस्था व संबंधित शिक्षक यांच्या वादातील तथ्यात मला पडायचे नाही. पण जोपर्यंत आपण शिक्षण, आरोग्य आणि शेती क्षेत्राबाबत राष्ट्रीयीकरणाचा निर्णय घेत नाही तोपर्यंत या देशातील भावी पिढीला भविष्य नाही. -प्रा. डॉ. धनंजय भगवानदास देवी, सातारा</p>
खरोखरच, पराभव जिव्हारी?
‘पराभव जिव्हारी लागला, तरी..’ हा सिद्धार्थ खांडेकर यांच्या ‘खेळ, खेळी, खेळिया..’ या सदरातील लेख (२५ नोव्हें.) वाचला. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अंतिमत: क्रिकेट संस्कृतीचा विजय झाला ही गोष्ट पटणारी आहे. यासाठी ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा व्यावसायिक दृष्टिकोन महत्त्वाचा ठरला. ऑस्ट्रेलियन खेळाडू आपल्याकडील आयपीएलमध्ये मोठय़ा संख्येने खेळत असतात त्यामुळे त्यांना आपल्याकडील मैदानांची, पीचची, अगदी प्रेक्षकांचीदेखील खरी ओळख आहे ही गोष्टच अंतिम सामन्यात दिसून आली. पॅट कमिन्सने टॉस जिंकून पहिल्यांदा बोलिंग घेतली यातच त्यांचा व्यावसायिकपणा दिसून आला. भारतीय खेळाडूंचा व्यावसायिक दृष्टिकोन फक्त भल्यामोठय़ा जाहिरातींमध्ये आणि त्यातून मिळणाऱ्या भरघोस पैशात दिसून येतो. भारताने जर वल्र्ड कप जिंकला असता तर सत्ताधाऱ्यांकडून या विजयाचा राजकीय वापर झाला असताच, पण कदाचित खेळाडूंना ‘देवपण’देखील बहाल झाले असते. हाच महत्त्वाचा फरक आपल्या आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेट संस्कृतीत आहे. भारतीय खेळाडूंचा पराभव, खेळाडूंपेक्षा भाजपला जास्त जिव्हारी लागलेला असावा. येणाऱ्या आयपीएलपर्यंत भारतीय खेळाडू आणि प्रेक्षक आपला पराभव विसरूनदेखील जातील! एकंदरीत, देशभर विजयोत्सव साजरा करता आला नाही म्हणून केवळ पराभव जिव्हारी! -शुभदा गोवर्धन, ठाणे</p>
अभ्यास न केल्यामुळेच हरलो.. तरी?
‘पराभव जिव्हारी लागला, तरी..’ या लेखात नमूद केल्याप्रमाणे अंतिम फेरीत दाखल झालेला आताचा आपला संघ हा १९८३ च्या संघापेक्षा नक्कीच बलाढय़, टॅलेंटेड होता! पण १९८३च्या संघातील खेळडूंची खेळाप्रति असलेली निष्ठा आणि विनम्रता या संघात नाही.
कोहलीने शतकांचे विक्रम याच विश्वचषकात मोडलेच पाहिजेत या अट्टहासाने तो शेवटचे तीन-चार सामने खेळत राहिला. सूर्यकुमारची टी -२० पुरतीच क्षमता आहे हे कळायला विश्वचषकाच्या अंतिम फेरीची वाट बघावी लागावी हे दुर्दैव. त्यात भर म्हणून सामना हरल्यावर समाजमाध्यमांतून, ‘वी आर प्राउड ऑफ यू इंडिया’ची लाट पसरली, फक्त अंतिम फेरीत पोहोचलो म्हणून किती वर्ष ‘प्राउड’ होऊन समाधान मानायचं? प्रत्येक वेळी ऑस्ट्रेलिया संघ जर प्रत्येक खेळाडूचा अभ्यास करून खेळतो तर आपल्याला का नाही जमत ते? कारण आपण अल्पसंतुष्ट वृत्तीने, ‘अंतिम फेरीत पोहोचलो’ यातच धन्यता मानतो, हे म्हणजे वर्षभर अभ्यास करून शाळेतील प्रत्येक परीक्षेत पहिला येऊन शेवटी बोर्डाच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांवर पालकांनी खूश आणि ‘प्राउड’ होण्यासारखे आहे.
भारताची वल्र्डकपमधील हार हा प्रशिक्षक राहुल द्रविड, संघ निवड आणि संघ व्यवस्थापन व खेळाडू यांनी प्रतिस्पध्र्याचा न केलेला अभ्यास याचा परिपाक आहे. -सुजय रानडे, गिरगाव (मुंबई)
काही खेळाडूंची प्रगती उत्तम, पण..
‘पराभव जिव्हारी लागला, तरी..’ आणि ‘क्रिकेट हा केवळ खेळ आहे!’ (रविवार विशेष- २६ नोव्हेंबर) हे दोन्ही लेख वाचले. दुसऱ्या लेखातील एक मुद्दा अगदी मनापासून पटला तो म्हणजे आपल्याभोवती अजिंक्यपदाचे वलय असल्याची भावना आपल्या खेळाडूंना शिथिल करून गेली. ऑस्ट्रेलियाच्या उत्तम क्षेत्ररक्षणामुळे आपण फक्त २४० धावांची उडी मारू शकलो आणि त्यांचा प्रथम गोलदांजीचा निर्णय त्यांना योग्य ठरवू दिला. काही खेळाडूंची प्रगती नक्कीच अतिशय उत्तम झाली, पण संघ कौशल्य कमी पडले हे नक्की. आपल्या खेळाडूंनी क्षेत्ररक्षण आणि संघ म्हणून एकीने खेळणे किती उत्तम असावे हे ऑस्ट्रेलियन खेळाडूंकडून शिकावे. खेळ म्हटला की हार-जीत आलीच.. पण हार होण्याच्या जागी आपणच का?-नीता शेरे, दहिसर पूर्व (मुंबई)
शब्द-जाणिवांमुळे माणसांनाच एकाकीपण जाणवते?
फार प्राचीन काळात जंगलात ऋषीमुनींचे आश्रम राजसत्तेच्या प्रभावातून मुक्त स्वरूपात नांदत होते आणि खरे तर मुलांवर राज्यभार सोपवून वानप्रस्थाश्रम स्वीकारणे हा केवळ राजांच्या जीवनशैलीचा भाग असणार! हल्ली ‘वानप्रस्थ’ हा संस्कृत शब्द वृद्धाश्रमांच्या जाहिरातींत आकर्षण म्हणून देखील वापरला गेलेला आढळत नाही! त्यामुळे ‘वाघांचा वानप्रस्थ’ या शीर्षकाने कुतूहल चाळवले आणि शनिवारचे संपादकीय (२५ नोव्हें.) वाचले. त्यात माया आणि बजरंग या वाघांबद्दल वाचताना, ‘बजरंग’ हे संस्कृतमधील ‘वज्रांग’चे बोलीभाषेत झालेले लोभस, लाडिक रूप असे शांता शेळके यांच्या लेखनातून लक्षात आले तेव्हा झालेला आनंद आज परत अनुभवला.
कदाचित शब्दांमुळे असे विचार आकार घेत असतील.. विचारशक्तीमुळेच एकाकीपण बहुधा माणसांत समस्येचे रूप घेत असेल! एकाकीपणा ही काही केवळ म्हातारपणातली जाणीव नाही. आधीच्या अवस्थांमध्ये देखील मधूनच ती जाणवत राहते पण जगाच्या, बाहेरच्या गलबल्यात आपण तिच्याकडे लक्ष देत नाही एवढेच! वयाने, शरीर थकल्याने आपण बाजूला पडू लागलो की आतल्या एकाकीपणाकडे नाइलाजाने पाहू लागतो.
म्हातारपणात जंगलात आपला आपणच सांभाळ करत केवळ टिकून जिवंत राहणे
(सव्र्हायव्हल) एवढेच वाघाला जाणवत असेल. वाघांना व्याघ्रप्रकल्पही माहीत नसेल, पहिल्यापासूनच वनातच राहात आल्याने वानप्रस्थाचेही कौतुक नसेल. विकलांग वाघाला उपास पडतो, तो उपोषणात सरकारकडून आपल्या मागण्यांबाबत काही अपेक्षा करत नाही! उपोषण करून कोणाकडून काही मिळवण्याचे माणसाने विकसित केलेले तंत्र त्याला अवगत नसावे.- गजानन गुर्जरपाध्ये, दहिसर पश्चिम (मुंबई)