‘अधिसूचनेचा अर्धानंद’ (२८ जानेवारी) या विशेष संपादकीयाचे शीर्षक खरेतर ‘अधिसूचनेचा अज्ञानानंद’ असायला हवे होते. आंदोलनाअखेर जेव्हा दोन्ही बाजूंनी गुलाल उधळला जातो तेव्हाच मागण्या व उपाय हा ठरवून खेळलेला खेळ होता, हे समजण्यासाठी वेगळय़ा पुराव्याची आवश्यकता उरत नाही. आरक्षण मिळाले तरी नोकऱ्या मिळण्याची शक्यता किती? गेल्या दहा वर्षांत शिक्षक भरती नसताना आहे त्याच तुटपुंज्या शिक्षक वर्गाला सर्वेक्षणास जुंपणे समर्थनीय आहे काय? परीक्षा तोंडावर आल्या असताना शिक्षक गायब केल्याने कुणाच्या पाल्यांचे नुकसान होणार आहे? सरकारचे खासगीकरण आणि कंत्राटी कामगार भरतीला उत्तेजन देणारे धोरण आरक्षणाच्या मुळावर येत नाही काय? केंद्र सरकार एवढय़ा मोठय़ा चळवळीची सुतराम दखल का घेत नाही? असा एकही प्रश्न आंदोलनात सहभाग घेणाऱ्यांना पडत नाही. कारण सर्वसाधारण समाजाची विचार करण्याची क्षमताच सत्ताधीशांनी हिरावून घेतली आहे. अशा वेळी मागण्या मान्य झाल्या हा केवळ देखावा आहे, अतिघाईने सुरू केलेले सर्वेक्षण निर्थक आहे, नोकऱ्या निर्माण केल्याविना आरक्षण हा भ्रमाचा भोपळा आहे हे समजण्याची कुवत नसलेल्यांनी फटाके वाजवणे हा अज्ञानानंदच नव्हे काय? -वसंत शंकर देशमाने, परखंदी (ता. वाई, जि. सातारा)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा