‘लोकप्रियतेचे रिपब्लिक’ हा अग्रलेख (२६ एप्रिल) वाचला. अमेरिकेतील फॉक्स वृत्तवाहिनीवरील टकर कार्लसन व इतर वार्ताहरांनी डॉमिनियन कंपनीच्या मतमोजणी यंत्रांवर बिनबुडाचे व खोटे आरोप केले होते व त्यामुळे फॉक्स वृत्तवाहिनीला मोठा दंड भरावा लागला व शेवटी कार्लसन यांची नोकरी गेली. परंतु या सर्वानी – किंबहुना डोनाल्ड ट्रम्प यांनीसुद्धा- अमेरिकेत एका मोठय़ा वर्गात खदखदत असलेल्या राग, असंतोष व अस्वस्थतेचा (गैर)फायदा घेतला हा मूळ मुद्दा आहे. अमेरिकेत एक मोठा वर्ग हिंसाचार व बंड करून का उभा राहिला व स्वत:च्याच लोकप्रतिनिधीगृहावर का चालून गेला? या राग, असंतोष व अस्वस्थतेला आर्थिक, सामाजिक व धार्मिक पैलू आहेत. एकेकाळी, हायस्कूल शिकलेले अमेरिकन नवराबायको स्वत:चा छोटा व्यवसाय वा कारखान्यात नोकरी करून तीन बेडरूमचे घर, दोन मोटारी, वर्षांतून एकदा सफर व मुलांचे शिक्षण करू शकत असत. आज ते दुरापास्त झाले आहे. आपल्या (गोऱ्या) पूर्वजांनी ज्या (मुख्यत: ख्रिश्चन धर्मावर आधारित) तत्त्वांसाठी अमेरिका स्थापन केली, त्यांना धोका निर्माण झाला हे असे या गटाला वाटते (खरेतर, अमेरिका निधर्मी आहे). जवळपास मूलभूत हक्काप्रमाणे गृहीत धरल्या जाणाऱ्या स्त्रियांच्या गर्भपाताच्या हक्कावर नुकतीच अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने जी बंदी घातली हा उजव्या सनातनी चळवळीच्या प्रतिक्रियेचाच (बॅकलॅश) एक भाग आहे असे वाटते. शिवाय समिलगी संबंधांना मान्यता हाही एक संघर्षांचा मुद्दा आहे (भारतात सध्या समिलगी विवाहांना जे आक्षेप घेण्यात येत आहेत, ते अमेरिकेत वीसएक वर्षे आधी घेण्यात येत असत). अमेरिकेत वर्णद्वेष होता व आजही काही प्रमाणात आहे. शिवाय, कायदेशीर व बेकायदा या दोन्ही मार्गानी स्थलांतरित येतच आहेत. ते आपल्या नोकऱ्या घेतात आणि त्यांची संस्कृती, आचारविचार, भाषा, इ. आणतात ही (कल्चरल डायल्यूशन/ इरोजन) चिंता उजव्या लोकांना जाणवते. चीन, भारत, इंडोनेशिया, इ. देश विविध क्षेत्रांत प्रगती करत आहेत; त्यामानाने अमेरिका मागे पडत चालली आहे व दिवसेंदिवस त्यांतील अंतर कमी होत आहे असेही एक दृश्य आहे. त्यामुळे, असुरक्षिततेची भावना आहे. चीन, भारत, इ.तील उद्योग पर्यावरणाची, कामगारहिताची (किमान वेतन, आरोग्यविमा, इ.) काळजी करत नाहीत; त्यामुळे त्यांना स्वस्तात माल बनविणे शक्य होते व तो माल ते अमेरिकेत ‘डम्प’ करतात हा आक्षेप सतत ऐकू येत असतो. अशा भावना या मुख्यत: कमी शिकलेल्या, ग्रामीण (अमेरिकन हार्टलँड) व आर्थिकदृष्या निम्न मध्यमवर्गीय गोऱ्या समाजवर्गात आहेत असा समज होता, परंतु काही उच्चशिक्षित व आर्थिक सुस्थित लोकांतही त्या आहेत हे वॉशिंग्टनमधील ६ जानेवारीच्या दंगलींवरून स्पष्ट झाले. अमेरिकेत स्थलांतरितांवर आहे, तसाच राग भारतातही दिसतो. अमेरिकेत जे होते, ते इतरत्र काही वर्षांनी होते; त्यामुळे आपण सजग राहणे आवश्यक आहे. -हर्षवर्धन वाबगावकर, मुंबई

भक्तिरसात न्हालेला ‘आधारस्तंभ’

‘लोकप्रियतेचे रिपब्लिक!’ हे संपादकीय वाचले. रिपब्लिक इंडियात (भारतात) सुद्धा काही पत्रकार स्वत:ला ‘रजत’, ‘सुदर्शन’धारी विष्णूचा अवतार मानू लागले असावेत. ‘जगातील सगळय़ात मोठा घोटाळ्यां’ (टूजी स्पेक्ट्रम, कोळसा)बद्दलचे ‘कॅग’ अहवालही जर-तर च्या भाषेत होते. ‘लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभा’तले अनेकजण सध्या भक्तिरसात न्हाऊन, शिंगे मोडून नाचण्याचे काम करीत आहे. भक्तिरसाचे झरे प्रत्येक देशात वाहतात पण त्या रसाचे रसायन अति प्रमाणात झाले की खाविंदचरणी लोटांगण घालण्याचे काम सुरू होते आणि राजकीय विरोधकांमध्ये देशद्रोही दिसू लागतात. अशा पत्रकारांसंदर्भात, जहीर कुरेशी यांच्या गझलमधील एक ओळ आठवते,
‘‘मैं कैसे मान लूं वो लोग हो गए है निडर, जो बार बार किसी डर की बात करते है।’’-परेश प्रमोद बंग, मूर्तिजापूर (अकोला)

four online scams
डिजिटल अटक ते रोमान्स स्कॅम : ऑनलाइन घोटाळ्यांना लोक कसे बळी पडत आहेत? काय आहेत फसवणुकीचे नवीन प्रकार?
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
maval assembly constituency
मावळ मतदारसंघात नाट्यमय घडामोडी
GST tax evasion of Rs five to eight thousand crore through fake documents Main facilitator arrested from Gujarat
बनावट कागदपत्रांद्वारे पाच ते आठ हजार कोटी रुपयांची जीएसटी कर चुकवेगिरी; गुजरातमधून मुख्य सूत्रधार अटकेत
Arvind Kejriwal
Attack On Arvind Kejriwal : दिल्लीतल्या पदयात्रेत अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, आपचा भाजपावर गंभीर आरोप
elon musk is a donald trump campaigner offers voters 1 million dollar a day
विश्लेषण : इलॉन मस्क बनला डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रचारक… ‘लाडक्या मतदारां’ना देतोय १० लाख डॉलर!
Zeenat Aman Raj Kapoor krishna kapoor
“मला त्या अवतारात बघून…”, झीनत अमान यांनी सांगितली राज कपूर यांच्याविषयी आठवण; म्हणाल्या, “मूठभर सोन्याच्या…”
Abhishek Bachchan Video viral amid divorce rumours
Video: ऐश्वर्या रायशी घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान वैतागलेला अभिषेक बच्चन कॅमेऱ्यासमोर हात जोडून म्हणाला…

तिथे प्रवृत्ती ठेचली तरी गेली..

‘लोकप्रियतेचे रिपब्लिक’ या अग्रलेखामध्ये वर्णन केलेली फॉक्स न्यूज या अमेरिकी वाहिनीची व भारतातील काही तथाकथित सुप्रसिद्ध वाहिन्यांची तुलना केली असता यामध्ये काही गुणात्मक फरक जाणवत नाही. परंतु व्यवस्थात्मक फरक मात्र नक्कीच नजरेत भरतो. भारतामध्ये बातम्या देणे म्हणजे एका विशिष्ट पक्षाची तळी उचलणे हे समीकरण काही सन्माननीय अपवाद वगळता सर्वास लागू पडते. जिथे लोकशाही मजबूत आहे व जनता त्याबद्दल जागृत आहे अशा अमेरिकेसारख्या देशात कार्लसनसारख्या प्रवृत्ती या वेळीच ठेचल्या जातात, याच्या अगदी उलट परिस्थिती भारतामध्ये दिसून येते. लोकशाहीबद्दल एवढी जागरूकता आपल्याकडे येईल तो सुदिन म्हणावा. –किरण शिंदे, पुणे</strong>

आपुलकी, संवाद यांतच खरे सौख्य!

‘कुटुंबप्रमुखाचे हितगुज!’ हा विनय सहस्रबुद्धे यांचा लेख (२६ एप्रिल) वाचला. त्यांचे बोलणे व लिहिणे खूप मनापासून, खरे, पटणारे वाटते. हल्लीच्या राजकारणी लोकांच्या चालूपणाच्या गर्दीत असे स्पष्ट लिखाण भावते. ‘मन की बात’ मी काही वेळा ऐकले आहे, पण या लेखामुळे त्याचा एक संक्षिप्त आढावा मिळाला. उदाहरणांमुळे लेख रोचक झाला आहे. भारतीय विचासरणीप्रमाणे खरे सुख भौतिक गोष्टींमध्ये नसून दुसऱ्यांशी आपुलकी, संवाद यात आहे. आपले पंतप्रधानही सर्वसामांन्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत हा स्तुत्य उपक्रम आहे. – मंदार पारखी, पुणे

‘लोकांशी संवाद’ तसा संसदेतही संवाद हवा

‘कुटुंबप्रमुखाचे हितगुज!’ हा विनय सहस्रबुद्धे यांचा लेख वाचला. आजवरच्या ९९ ‘मन की बात’ मध्ये अनेक लोकांचा उल्लेख पंतप्रधानांनी केलेला दिसत आहे परंतु लोकांच्या शंकाकुशंका चर्चा करून दूर केल्या जातात, त्या संसदेचे मागील अधिवेशन संवादाविना झाल्याचे दिसते. संसदेत चर्चा हवी अशी लोकांची अपेक्षा असते. अनेक लोकप्रिय नेत्यांनी संसदेमध्ये लोकांच्या शंका दूर केलेल्या आहेत. दर महिन्याला लोकांशी संवाद होतो, तसेच दर अधिवेशनामध्ये संपूर्ण काळ उपस्थित राहून संसदेमध्येदेखील संवाद अपेक्षित आहे. –युगानंद गुलाबराव साळवे, पुणे

हितगुज शतकाची थोरवी काय वाणू!

पत्रकार परिषद घेण्याच्या प्रथेला छेद देत ‘कुटुंबप्रमुखाचे हितगुज’ या स्वरूपाच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाची सुरुवात करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न बोलता वृत्तपत्रांना त्यांची जागा दाखवून दिली आहे, ही पतेकी बात सहस्रबुद्धे यांनी कदाचित विनयाने नोंदली नसावी! अवघड प्रश्न सोडून सोपे प्रश्न प्रथम सोडवा हे शाळेत शिकलेले शाहणपण पुढे उपयोगी पडते, याचे उदाहरण म्हणून या कार्यक्रमाचे महत्त्व आहे. (या पत्रासाठी सुचलेल्या शीर्षकास ‘करुणाष्टकां’ची चाल लागते, हा एक योगायोगच!) -गजानन गुर्जरपाध्ये, दहिसर पश्चिम (मुंबई)

समाजहित की ‘समूहस्वार्थ’?

‘बातम्या देत राहणं महत्त्वाचं!’ हा पार्थ एम.एन. यांचा लेख (चतु:सूत्र- २७ एप्रिल) वाचला. आपण एकमेकांकडे माणूस म्हणून कमी, पण जात, धर्म आणि वर्ग म्हणून बघत आहोत आणि इथूनच द्वेषाची बीजे पेरीत आहोत. यामध्ये समूह स्वार्थ ही समाजाची संकल्पना होताना दिसत आहे. त्यामुळे आपण आपापल्या जाती- धर्मात आणि वर्गात खुशाल आहोत.. इतरत्र काय सुरू मला काही देणेघेणे नाही, हा दृष्टिकोन समाजमनात खोलवर रुजताना दिसतो आहे. म्हणूनच आम्हाला नाही माहिती रामनवमीच्या दिवशी कुठे तणाव निर्माण झाला. आम्ही आमच्या भोपळय़ात खुशाल आहोत –शिल्पा सुर्वे, पुणे

राजकीय दबाव जबरदस्त; क्रीडामंत्रीही गप्प

‘कुस्तीपटूंची फसवणूक?’ हा ‘अन्वयार्थ’ (२६ एप्रिल) वाचला. महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणासारखे आरोप काही प्रशिक्षकांवर आणि उत्तर प्रदेशातील खासदार ब्रिजभूषण सिंह या मातब्बर राजकारण्यावर करण्यात आले होते, परंतु त्याच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीने या आरोपांऐवजी संघटनेच्या कार्यपद्धतीचीच छाननी केली. याचा अर्थ ब्रिजभूषण यांनी या समितीतील नामनिर्देशित खासदार पी.टी. उषा आणि माजी खासदार मेरी कोम यांनाही गुंडाळून ठेवले आहे. मेरी कोम आणि पी. टी. उषा समितीत असल्याने आपल्याला न्याय मिळेल असे कुस्तीपटूंना वाटले होते; परंतु शेवटी या कुस्तीपटूंना सर्वोच्च न्यायालयाची पायरी चढावी लागली. खरे तर या महिला कुस्तीपटू लैंगिक शोषणाबाबतच्या सगळय़ा गोष्टी सार्वत्रिकपणे जाहीर करू शकत नाहीत असेच वाटते. आता क्रीडामंत्री अनुराग ठाकूर याबाबत काही बोलत नाहीत ही गोष्ट आश्चर्यकारक म्हणावी लागेल. एकंदरीत आपल्या कुस्तीपटूंना परदेशात आणि देशांतर्गत स्पर्धेत पदके मिळवण्याचे आणि सराव करण्याचे लक्ष्य न ठेवता स्वत:वरील अन्यायाविरुद्धच दोन हात करावे लागत आहेत, पोडियमऐवजी फुटपाथवर उतरून लढावे लावत आहे, ही गोष्ट जागतिक पातळीवर लाजिरवाणी आहे. –शुभदा गोवर्धन, ठाणे</strong>