‘लोकप्रियतेचे रिपब्लिक’ हा अग्रलेख (२६ एप्रिल) वाचला. अमेरिकेतील फॉक्स वृत्तवाहिनीवरील टकर कार्लसन व इतर वार्ताहरांनी डॉमिनियन कंपनीच्या मतमोजणी यंत्रांवर बिनबुडाचे व खोटे आरोप केले होते व त्यामुळे फॉक्स वृत्तवाहिनीला मोठा दंड भरावा लागला व शेवटी कार्लसन यांची नोकरी गेली. परंतु या सर्वानी – किंबहुना डोनाल्ड ट्रम्प यांनीसुद्धा- अमेरिकेत एका मोठय़ा वर्गात खदखदत असलेल्या राग, असंतोष व अस्वस्थतेचा (गैर)फायदा घेतला हा मूळ मुद्दा आहे. अमेरिकेत एक मोठा वर्ग हिंसाचार व बंड करून का उभा राहिला व स्वत:च्याच लोकप्रतिनिधीगृहावर का चालून गेला? या राग, असंतोष व अस्वस्थतेला आर्थिक, सामाजिक व धार्मिक पैलू आहेत. एकेकाळी, हायस्कूल शिकलेले अमेरिकन नवराबायको स्वत:चा छोटा व्यवसाय वा कारखान्यात नोकरी करून तीन बेडरूमचे घर, दोन मोटारी, वर्षांतून एकदा सफर व मुलांचे शिक्षण करू शकत असत. आज ते दुरापास्त झाले आहे. आपल्या (गोऱ्या) पूर्वजांनी ज्या (मुख्यत: ख्रिश्चन धर्मावर आधारित) तत्त्वांसाठी अमेरिका स्थापन केली, त्यांना धोका निर्माण झाला हे असे या गटाला वाटते (खरेतर, अमेरिका निधर्मी आहे). जवळपास मूलभूत हक्काप्रमाणे गृहीत धरल्या जाणाऱ्या स्त्रियांच्या गर्भपाताच्या हक्कावर नुकतीच अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने जी बंदी घातली हा उजव्या सनातनी चळवळीच्या प्रतिक्रियेचाच (बॅकलॅश) एक भाग आहे असे वाटते. शिवाय समिलगी संबंधांना मान्यता हाही एक संघर्षांचा मुद्दा आहे (भारतात सध्या समिलगी विवाहांना जे आक्षेप घेण्यात येत आहेत, ते अमेरिकेत वीसएक वर्षे आधी घेण्यात येत असत). अमेरिकेत वर्णद्वेष होता व आजही काही प्रमाणात आहे. शिवाय, कायदेशीर व बेकायदा या दोन्ही मार्गानी स्थलांतरित येतच आहेत. ते आपल्या नोकऱ्या घेतात आणि त्यांची संस्कृती, आचारविचार, भाषा, इ. आणतात ही (कल्चरल डायल्यूशन/ इरोजन) चिंता उजव्या लोकांना जाणवते. चीन, भारत, इंडोनेशिया, इ. देश विविध क्षेत्रांत प्रगती करत आहेत; त्यामानाने अमेरिका मागे पडत चालली आहे व दिवसेंदिवस त्यांतील अंतर कमी होत आहे असेही एक दृश्य आहे. त्यामुळे, असुरक्षिततेची भावना आहे. चीन, भारत, इ.तील उद्योग पर्यावरणाची, कामगारहिताची (किमान वेतन, आरोग्यविमा, इ.) काळजी करत नाहीत; त्यामुळे त्यांना स्वस्तात माल बनविणे शक्य होते व तो माल ते अमेरिकेत ‘डम्प’ करतात हा आक्षेप सतत ऐकू येत असतो. अशा भावना या मुख्यत: कमी शिकलेल्या, ग्रामीण (अमेरिकन हार्टलँड) व आर्थिकदृष्या निम्न मध्यमवर्गीय गोऱ्या समाजवर्गात आहेत असा समज होता, परंतु काही उच्चशिक्षित व आर्थिक सुस्थित लोकांतही त्या आहेत हे वॉशिंग्टनमधील ६ जानेवारीच्या दंगलींवरून स्पष्ट झाले. अमेरिकेत स्थलांतरितांवर आहे, तसाच राग भारतातही दिसतो. अमेरिकेत जे होते, ते इतरत्र काही वर्षांनी होते; त्यामुळे आपण सजग राहणे आवश्यक आहे. -हर्षवर्धन वाबगावकर, मुंबई
लोकमानस: अमेरिकी आक्रस्ताळेपणातून काय शिकणार?
‘लोकप्रियतेचे रिपब्लिक’ हा अग्रलेख (२६ एप्रिल) वाचला. अमेरिकेतील फॉक्स वृत्तवाहिनीवरील टकर कार्लसन व इतर वार्ताहरांनी डॉमिनियन कंपनीच्या मतमोजणी यंत्रांवर बिनबुडाचे व खोटे आरोप केले होते
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 27-04-2023 at 01:09 IST
मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lokmanas loksatta readers reaction loksatta readers opinion amy 5