‘तीन पिढय़ांचा तमाशा’ या संपादकीयामध्ये लक्ष्मणराव फाटक यांच्या भागीदारावर चिखलफेक केलेली आहे ती ‘लोकसत्ते’ला शोभेशी नाही. वालचंद हिराचंद हे जैन होते म्हणजे अमराठी होते असे जे ध्वनित केले आहे ते चूक आहे. वालचंद हिराचंदांचे कुटुंब त्यांच्याआधी चार पिढय़ा महाराष्ट्रात स्थायिक होते आणि वालचंद हे मराठी माध्यमातूनच शिकलेले होते. त्यांची मातृभाषा, घरी बोलली जाणारी भाषा मराठीच होती, गुजराती नव्हे. त्यांचे वडील हिराचंद नेमचंद हे जैन समाजातील पहिले पत्रकार होते. त्यांनी एकोणिसाव्या शतकात, केसरीनंतर फक्त चार वर्षांनी, सुरू केलेले ‘जैन बोधक’ हे मराठी नियतकालिक आजही सुरू आहे. याउलट कल्याणी किंवा किर्लोस्कर हे तर कानडी होते. आजही वालचंद समूहाचे कार्यालय महाराष्ट्रात आहे, किर्लोस्कर बंगळूरूला गेले. फाटक हे ब्राह्मण होते असे आपण लिहिले का? नाही, तर मग वालचंद हिराचंद हे जैन होते आणि त्यांनी भागीदारी करून फाटक यांना फसवले असे का ध्वनित करावे? टाटा, म्हैसूरचे महाराज, शिंदे सरकार अशांशी भागीदारी करूनच वालचंद यांनी पृथ्वी (कार कारखाना), जल (जहाजबांधणी आणि वाहतूक) आणि आकाश (हिंदुस्थान एरोनॉटिक्स हा विमानबांधणीचा कारखाना) असे तिन्ही आपल्या कर्तृत्वाने पादाक्रांत केले होते. वालचंद यांच्यावर अमराठी असल्याचा आरोप त्यांच्या हयातीतच झाला होता. पण त्या सभेतच त्यांनी वाचलेल्या मराठी पुस्तकांची आणि त्यांना अवगत असलेल्या मोडी लिपीचीही साक्ष देऊन बोलणाऱ्यांची तोंडे बंद केली होती. मराठीतील पहिला शिलालेख हा श्रवणबेळगोळच्या बाहुबली मूर्तीवर आहे आणि मराठी जैन साहित्य हे ज्ञानेश्वरीइतकेच जुने आहे.
मराठी माणूस उद्योगधंद्यात मागे आहे यात शंका नाही. पण म्हणून वालचंद हिराचंद यांच्यासारख्या कर्तृत्ववान मराठी पुरुषावर चिखलफेक का करावी? ते जैन होते म्हणून? कर्मवीर भाऊराव पाटील हे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापकही जैन होते. जैन हे निव्वळ मारवाडी, गुजराती नसतात आणि महाराष्ट्राच्या उभारणीत, विशेषत: सत्यशोधक महाराष्ट्राच्या उभारणीत भाऊराव पाटील आणि त्यांच्याआधी अण्णासाहेब लट्ठे यांच्यासारख्या सत्यशोधक जैन नेत्यांचा सहभाग आहे हे सोयीस्कररीत्या विसरले जाते हे बघून दु:ख झाले. महाराष्ट्रातील मराठी जैन हे इतर मराठी जनांसारखेच मराठी आहेत आणि त्यांचे गुणदोषही मराठीच आहेत. -अमित जोहरापूरकर
त्यासाठी तत्त्वज्ञानही पोलादी हवे..
‘तीन पिढय़ांचा तमाशा!’ हा अग्रलेख (२९ मार्च) वाचला. ‘उच्च विचार, उच्च भाषा आणि उच्च वर्तन’ या पारशी (झोरोस्ट्रियन) धर्माच्या ब्रिदवाक्याच्या तत्त्वज्ञानावर टाटा साम्राज्य आजही भक्कमपणे उभे आहे ! ‘लिव्ह लाइफ डेंजरसली..’ असे जमशेदजी टाटा म्हणत. याच तत्त्वावर हे साम्राज्य पुढे गेले आणि जगभर विस्तारले ! तसे भक्कम पोलादी तत्त्वज्ञान मराठी मराठी म्हणतात त्या ‘धर्मा’ला मिळाले नाही असेच म्हणावे लागेल. मराठी माणसाने फाटक्या गरिबीचा स्वाभिमान मिळविण्यात आणि मिरविण्यातच धन्यता मानली! ‘मोडेन पण वाकणार नाही’ ही विचारशैली मराठी माणसाच्या मुळावर आली, तरी त्यात फरक पडला नाही. मराठी भाषेच्या आणि प्रांताच्या अस्मितेचे राजकारण आणि गप्पा यात तो गुरफटून गेला. ‘इन्फोसिस’सारखी कंपनी काढावी ही कल्पना एखाद्या मराठी आयटी – अभियंत्याला का सुचली नाही, याच्या उत्तरातच मराठी उद्योग विचारांचे चिरंजीवित्व लपले आहे. -अनिरुद्ध गणेश बर्वे, कल्याण</p>
जे उद्योगात तेच कारखानदारीतही!
‘तीन पिढय़ांचा तमाशा..’ या संपादकीयात महाराष्ट्रातल्या कारखानदारीची परिस्थिती योग्य प्रकारे मांडली आहे. कल्याणी, किर्लोस्कर वगैरे उल्लेखिलेले उद्योग पुण्याशी संबंधित आहेत. कोल्हापुरातही याच्यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. इथे तर एक-दीड पिढीचाच तमाशा दिसतो. आम्ही लहानपणापासून पाहत, ऐकत आलेले शिवाजी उद्यमनगरातील (एक-दोन अपवाद वगळता) अनेक जुने, खूप नाव कमावलेले उद्योग एक-दीड पिढीतच संपलेले आहेत. त्यानंतर निर्माण झालेली आधुनिक कारखानदारीसुद्धा एखाद्या पिढीतच संपुष्टात आल्याची उदाहरणे दिसतात. चार ते पाच समूहांचे अपवाद वगळता, जेथे सध्या दुसरी पिढी आहे, तिथे असे अपयशच दिसते. म्हणजे मराठी माणूस कारखानदारीसाठी देखील लायक नाही असेच म्हणावयाचे का? यावर काहीच उपाय नाही का?-अविनाश महेकर, कोल्हापूर</p>
साळवे यांना ताबडतोब कायदामंत्री करा..
भारताच्या सर्वोच्च न्यायमूर्तीना अत्यंत नावाजलेल्या कायदेतज्ज्ञांनी अतिशय कळकळीने पाठवलेल्या पत्राची बातमी वाचली. त्यानुसार या कायदेतज्ज्ञांनी सर्वोच्च न्यायमूर्तीना अज्ञात असलेल्या राजकीय आणि व्यावसायिक दबाव गटांविषयी सावध करण्याचा प्रयत्न केला, कारण या दबावगटांपुढे न्याययंत्रणेने झुकून न्यायदान केल्यास लोकशाहीच्या स्तंभास हादरे बसून न्याय व्यवस्थेवरील लोकांच्या विश्वासास मोठा तडा जाईल. पण बातमीनुसार, या पत्रामध्ये हे दबावगट कोण याचा शोध सर्वोच्च न्यायमूर्तीनी घ्यावा असे सूचित केल्यासारखे वाटते. तसेच सध्याच्या काही निकालांमुळे जनतेत ‘आरोपी’ऐवजी’ न्यायव्यवस्थेची बदनामी होण्याची भीती सर्वोच्च न्यायमूर्तीच्या निदर्शनांस आणण्याचे क्रांतिकारक पाऊलही या पत्रलेखनाने उचलले गेल्याचा आभासही निर्माण केल्यासारखे वाटते. पण ही ‘क्रांती’ कोणाचीही नावे न सांगता ‘शांती’त करण्याचा कायदेशीर विचार दोन ओळींच्या मधे ( between the lines)प्रतीत झाल्यासारखा वाटतो. अर्थात पत्र लिहिणारे कायदेतज्ज्ञ असल्याने ‘नरो वा कुंजरो वा’ म्हणत कोणीही सत्ताधारी असले आणि झाले तरी त्यांची कृपादृष्टी आपल्यावर राहील याची तंतोतंत काळजी घेतलेली दिसते. ‘झाकली मूठ’ किती कायदेशीर आणि फायदेशीर याचा अंदाज लावणे सर्वोच्च न्यायमूर्तीना काही कठीण नाही. या पत्राबद्दल भारत सरकारने साळवे यांना ताबडतोब कायदामंत्री केले तर हा पत्रप्रपंच सार्थकी लागून ‘सब का विकास’ची सरकारी आणि न्यायिक ‘हमी’पूर्तीही होईल. -सुधीर गोडबोले, दादर, मुंबई
तुम्हें बहुत शौक था सबको नीचा दिखाने का..
‘असा एकही बुरुज नाही की ज्यात घोरपड लावता येत नाही’, असे राम गणेशांचे राजसंन्यास सांगते. आपल्या प्रतिस्पध्र्याविषयी संशय निर्माण करणे हा कोणत्याही खेळाचा भाग आणि राजकारण त्यास अर्थातच अपवाद नाही. ‘जर तर’च्या भरवशावर भ्रष्टाचार झाल्याचे आरोप करायचे, प्रतिमा मलीन करून आपले प्रतिमा संवर्धन करायचे आणि मतांच्या बाजारात आपली बाजू भक्कम करायची. थकलेला प्रतिस्पर्धी आपले राजकीय मरण होऊ नये यासाठी जीवनदान मागतो, तेव्हा भगवे उपरणे त्यांच्या गळय़ात घालून पापमुक्तीचा आनंद उपभोगण्यास मुभा देऊन उपकृत करायचे. मग सदर आनंदापायी नारायण राणेंपासून छगन भुजबळ, अजित पवार, नवाब मलिक, हसन मुश्रीफ, भावना गवळी, प्रताप सरनाईक आणि आता प्रफुल्ल पटेल जगातल्या सगळय़ात मोठय़ा पक्षाच्या छत्रछायेखाली निवांत झोपू शकतात. ज्यांच्यावर आपण पातळी सोडून टीका केली, त्यांना जेव्हा आपल्या छत्रछायेखाली निर्दोषत्व प्राप्त होते, तेव्हा आपल्यावर असणारा विश्वास कुठेतरी आपण खंडित करत असतो आणि आपणही कमी जास्त प्रमाणात त्यातलेच आहोत अशी संकल्पना दृढ होण्यास हातभार लावतो.
अपनी ही नजरों में गिर गए हो आज,
तुम्हें बहुत शौक था सबको नीचा दिखाने का।-परेश प्रमोद बंग, मूर्तिजापूर (अकोला)
पैसे नाहीत, हे फक्त सांगायचे कारण
‘पैसे नसलेल्या अर्थमंत्री’ हा उलटा चष्मा (२९ मार्च ) वाचला. भाजपने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राज्यसभेतील अनेक खासदारांना निवडणुकीत उतरविले आहे. निर्मला सीतारामन यांच्यासमोर आंध्र प्रदेश किंवा तमिळनाडू हे पर्याय ठेवले आहेत. पैसे नसल्याने लोकसभा निवडणूक लढवू शकत नाही, असे त्यांनी सांगितले आहे. पण आज ज्या पक्षाची अवस्था ‘कमळावर लक्ष्मी आरूढ!’ अशी आहे, त्याच्या उमेदवारांस निधीची चणचण भासू शकते ? निर्मला सीतारामन यांचे पती पारकला प्रभाकर यांनी निवडणूक रोखे हा जगातील सर्वात मोठा घोटाळा असल्याचा आरोप करून भाजपला नुकताच घरचा आहेर दिला आहेच. निवडणूक जिंकण्यासाठीचा आत्मविश्वासाचा अभाव हेच प्रमुख कारण निर्मला सीतारामन यांनी लोकसभा निवडणूक न लढण्यामागे आहे. -बाळकृष्ण शिंदे, पुणे