‘चिनी चाटण!’ हा अग्रलेख (१५ फेब्रुवारी) वाचला. सरसंघचालक मोहन भागवत यांनी चिनी मालावर आणि अ‍ॅप्सवर बहिष्कार टाकून देशभक्ती व्यक्त करणाऱ्या नवराष्ट्रवाद्यांना चीनचेच उदाहरण देऊन कानपिचक्या दिल्या ते बरेच झाले. निदान आता तरी आयुर्वेदाविषयी गर्व बाळगणारे आयुर्वेदिक औषधांच्या संशोधनाकडे वळतील तर किती बरे होईल! खरे तर आयुर्वेदात काही औषधे खरेच गुणकारी आहेत, पण ती जुन्यापुराण्या ठोकताळय़ांवर दिली जातात. त्यामुळे त्यांचा ठोस परिणाम दिसत नाही. जोपर्यंत आयुर्वेदातील औषधे शास्त्रीय चाचण्यांना सामोरी जात नाहीत तोपर्यंत तरी आयुर्वेद हे जडीबुटीचे शास्त्रच समजले जाईल.

वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या अभावामुळे, प्रयोगांचे दस्तावेजीकरण न केल्यामुळे आयुर्वेदातील अनेक शोध ते लावणाऱ्या व्यक्तीबरोबर संपले. आयुर्वेद मागास ठेवण्यात या तथाकथित आयुर्वेदाचार्याचाच हातभार लागला आहे. संशोधन जागतिक स्तरावर पुढे यायचे असेल तर वैज्ञानिक पद्धतींचा वापर आणि दस्तावेजीकरण महत्त्वाचे असते. विज्ञानात सतत नवनवे शोध लागत असतात आणि माणसाची प्रगती होत असते. हे आपण लवकर लक्षात घ्यायला हवे. मोहन भागवतांच्या सूचनेचे पालन करण्यास हरकत नसावी.

औषधांची फसवी जाहिरातबाजी

‘चिनी चाटण!’ हा संपादकीय लेख वाचताना विविध माध्यमांवर झळकणाऱ्या फसव्या जाहिराती आठवल्या. आपल्याकडे आयुर्वेदाची सक्षम परंपरा असतानाही त्याकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही. वास्तविक प्रसारमाध्यमांवर प्रसारित होणाऱ्या या फसव्या जाहिरातींमुळे ग्राहक नाडला जातो व आवश्यकता नसतानाही नको ती औषधे खरेदी केली जातात. वृद्धत्व, सौंदर्य, स्फूर्ती, आरोग्य याबाबत ज्या जाहिराती दाखविल्या जातात, त्यातून अनावश्यक औषधे खरेदी केली जातात व त्यांचे सेवन केले जाते. याचा घातक परिणाम शरीरावर घडून येत आहे. याबाबत अन्न व औषध विभागाने नियमांत बदल करून फसव्या जाहिरातींवर लगाम घालणे महत्त्वाचे ठरेल. विशेष म्हणजे या जाहिराती दाखविताना अगदी लहान अक्षरांमध्ये त्या उत्पादनाचे धोके किंवा त्रुटी नमूद केलेल्या असल्याने ग्राहकाच्या ते लक्षातच येत नाही. या आयुर्वेदिक औषधांची परिणामकारकता तपासण्यासाठी सक्षम शासकीय यंत्रणा असणे गरजेचे आहे. असे झाल्यास आयुर्वेदाची विश्वासार्हता वाढीस लागेल व भारतीय औषध बाजारपेठ आपोआप विकसित होईल.

  • प्रा. सुनंदा शिंदे, मुरबाड (कल्याण)

दुसऱ्याचा तो बाब्या, आपले ते कार्टे?

‘चिनी चाटण!’ हे संपादकीय वाचले. चीनच्या पुरातन औषधोपचार पद्धतीची स्तुती करताना चीनच्या कौतुकापेक्षा भारतावर दुगाण्या झाडण्याची संधी या अग्रलेखात साधून घेतली आहे. चीनचा विस्तार प्रचंड, भाषा अगम्य. तेव्हा तिकडचे जे काही कळणार ते अनुवादकारांच्या चमच्यातून पडणाऱ्या थेंबांसारखे. त्याला चमच्याचा वास लागलेला असू शकतो. चीनच्या औषधांचा बटवा कोणा बोगस बाबा-बापूंच्या हाती पडला नाही असे खात्रीने म्हणता येऊ शकते का? रामदेवबाबांच्या आर्थिक उन्नतीचा मत्सर वाटून त्यांना दाढीधारी उपटसुंभ म्हटले आहे. मुळात ज्या अ‍ॅलोपथीला आदर्श मानले जाते त्यातच जुने निष्कर्ष किंवा उपचार पद्धती पुढे जाऊन चूक ठरतात. रक्तातील साखरेच्या योग्य प्रमाणाचे निकष औषध उत्पादकांच्या सोयीप्रमाणे बदलले जातात. कोलेस्ट्रॉल वगैरे काही नसतेच, त्याचा बाऊ करू नये असे सिद्धांत मांडले जातात. या सर्व प्रकारांत जुनी म्हण उलटी होऊन ‘दुसऱ्याचा तो बाब्या, आपले ते कार्टे’ अशी मनोवृत्ती काही भारतीयांमध्ये तयार झाली आहे.

  • श्रीराम बापट, दादर (मुंबई)

वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव

‘चिनी चाटण!’ हे संपादकीय वाचले. सलवार- कमीज घालून पळून जाणाऱ्याला जेव्हा आपण संपूर्ण आयुर्वेदाचे ज्ञान असणारा समजतो तेव्हा आपणच आपल्या प्राचीन ज्ञानाचे हसे करून घेतो. ‘कोरोनील’ जगातील सर्वात पहिले आणि सर्वात प्रभावी औषध आहे असे तोंडी प्रमाणपत्र खुद्द केंद्रीय मंत्रीच (जे स्वत: पेशाने डॉक्टर आहेत) देऊन मोकळे होतात, तेव्हा त्यामागे कोणता वैज्ञानिक पुरावा असतो? सदसद्विवेकबुद्धी जागृत असेल तर कोणती गोष्ट किती मिरवायची व कशी मिरवायची याचे भान राहते. प्लास्टिक सर्जरी आणि ट्रान्सप्लान्टेशन पुरातन काळात होत असे असा दावा केवळ व्हॉट्सअ‍ॅप युनिव्हर्सिटीतच खरा भासू शकतो. प्रश्नावर प्रश्न, त्यावर पुन्हा प्रतिप्रश्न जेव्हा विचारले जातात आणि त्यांची खरी उत्तरे शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जातो, तेव्हाच त्याला वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणता येते. आयुर्वेदाबाबत असा दृष्टिकोन विकसित करणे गरजेचे आहे.

  • परेश प्रमोद बंग, मूर्तिजापूर (अकोला)

केवळ संस्थेलाच जबाबदार धरून चालणार नाही

नावाजलेल्या उच्चशिक्षण संस्थांतील विद्यार्थी आत्महत्यांच्या बातम्या वाचनात आल्या. कुशाग्र बुद्धी असलेल्या विद्यार्थ्यांनी महत्प्रयासाने आयआयटी तसेच वैद्यकीय महाविद्यालयांत प्रवेश मिळविलेला असतो, मात्र प्रवेशानंतर तीन-चार महिन्यांतच त्यांना आत्महत्या करावीशी वाटते, हे आपली कुटुंबव्यवस्था विसविशीत होत चालल्याचे लक्षण आहे. विद्यार्थ्यांना मन मोकळे करण्यासाठी आश्वासक आधार मिळत नाही, हेही महत्त्वाचे कारण वाटते. उच्च शिक्षणात अग्रेसर मानल्या गेलेल्या संस्थांमधील विद्यार्थी आत्महत्येचे पाऊल उचलतात त्यात केवळ संस्थेलाच जबाबदार धरून चालणार नाही. या मुलांची मानसिकता, त्यांचा मनोव्यापार कोणत्या स्तरावर आहे याची आई-वडील आणि कुटुंबीयांना कल्पना नसणे, हे अधिक दुर्दैवी आहे. उच्च शिक्षणासाठी केवळ अभ्यास आणि यशाच्या मागे धावण्याच्या प्रचंड गतीपुढे आपण माणूस म्हणून मागे पडत चाललो आहोत, हे प्रकर्षांने जाणवते. केवळ चांगल्या संस्थेत प्रवेश मिळवण्यापुरतेच पालक आणि विद्यार्थ्यांचे अवकाश सीमित होत चालले आहे.

या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येला जबाबदार कोण, व्यवस्थेत त्रुटी होत्या काय याची यथावकाश उत्तरे मिळतीलच, पण आपली बुद्धिमान तरुणाई तणावामुळे जीवन संपवण्यापर्यंतच्या टोकाची पावले उचलत आहेत याकडे धोरणकर्ते, शिक्षण समुपदेशक, सजग पालक आणि शिक्षक या सर्व घटकांनी जाणीवपूर्वक पाहिले पाहिजे. आपली सळसळती तरुणाई आणि त्यांच्यातील बुद्धिसंपदा अशी अकाली संपण्यापासून वाचवण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी सजगपणे पावले उचलणे गरजेचे आहे.

  • राजेश श्रीराम बुदगे, ठाणे</li>

टोकाचे पाऊल उचलले जाऊ नये म्हणून..

विद्यार्थी आत्महत्यांच्या एकामागोमाग एक बातम्या वाचून मन विषण्ण झाले. वैश्विक जाणिवा समृद्ध होत असलेल्या आजच्या पिढीला हे पाऊल अचानक का उचलावेसे वाटते? या घटना कशा रोखणार? जीवन शक्यतांनी भरलेले असते, याची खात्री आपण मुलांना कशी देणार आहोत? इतरांच्या जीवनेच्छा बलवान करू शकू एवढे जीवन आपल्याला तरी कळले आहे का? ज्या घरांत या घटना घडल्या, त्या घरांतील पालकांना एक प्रश्न आज नक्की पडला असेल आपण कुठे कमी पडलो? असा प्रश्न पडण्याची वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून उद्या पालक होऊ इच्छिणाऱ्यांनी हे प्रश्न स्वत:ला आजच विचारावेत.

परीक्षा आहेत की निवडणुका?

शिक्षण विभागाला राज्यातील विद्यार्थ्यांची किती काळजी आहे याचे दर्शन विभागाने नुकत्याच जाहीर केलेल्या निर्णयातून घडले. मुलांची प्रश्नपत्रिका अवलोकनाची १० मिनिटे हिरावून घेऊन बोर्ड कोणाचे हित साधणार आहे? कोविडकाळात जे विद्यार्थी दहावीत होते, ते आता बारावीची परीक्षा देतील. ही त्यांची पहिलीच बोर्डाची परीक्षा असणार आहे. अशा विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेच्या अवलोकनासाठी १० मिनिटे द्यायला काय हरकत आहे?

बोर्ड विद्यार्थ्यांच्या हितासाठी आहे. संवेदनशील भागांत कलम १४४ लागू करणे, ५० मीटर परिसरात संचार करण्यास मनाई व झेरॉक्स दुकाने बंद ठेवणे.. बोर्डाची परीक्षा आहे की एखादी निवडणूक, असा प्रश्न पडला आहे. त्यातच शिक्षकेतर कर्मचारी संपावर जाणार आहेत. राज्य सरकारने ऐन परीक्षाकाळात निर्माण केलेला संभ्रम दूर करावा व विद्यार्थ्यांचे हित साधावे.

  • दत्तप्रसाद शिरोडकर, मुंबई

मूल्याधारित शिक्षण, श्रमाधारित काम

‘युवा कसे जगत आहेत?’ हा लेख वाचला, त्यांनी खरोखरच अत्यंत भयावह परिस्थितीचे दर्शन घडवले. आज भारत ‘तरुणांचा देश’ म्हणून ओळखला जातो. असे असताना या युवाशक्तीचा भारताच्या आर्थिक विकासाला हातभार लागणे गरजेचे आहे. मात्र परिस्थिती विपरीतच असल्याचे दिसते. आजच्या युवकाला दीड जीबी डेटामध्ये दिवस कसा जातो हे कळतच नाही. बेरोजगारीविषयी चिंता नाही आणि डोकी भडकवण्यासाठी समाजमाध्यमे सज्ज आहेतच. हे चित्र बदलायचे तर मूल्याधारित शिक्षण आणि श्रमाधारित काम मिळणे आवश्यक आहे. तसे झाले तर युवक भरकटणार नाहीत.

  • अ‍ॅड. मनोज ज्ञानेश्वर कंडारीकर