यवतमाळ येथील एका कार्यक्रमात कुप्रसिद्ध मनोहर ऊर्फ संभाजी भिडे नामक व्यक्ती राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या मातापित्यांच्या चारित्र्यावर यथेच्छ शिंतोडे उडवत असताना, त्यावर हसून हसून दाद देणाऱ्या लोकांची कीव करावीशी वाटते. शालेय पाठय़पुस्तकातील इतिहास या लोकांच्या डोक्यावरून गेलेला असावा.  मात्र, छत्रपती शिवाजी महाराज असोत किंवा महात्मा गांधी- त्यांच्याबद्दलचा खोटानाटा इतिहास अशा तद्दन लफंग्या माणसांकडून जाणून घेण्याची लोकांची वृत्ती त्यांना आणखी अज्ञानाकडे आणि अंधकाराकडे घेऊन जाईल.

राज्यात सध्या मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेलेली शेती, घरे, दुकाने, लहानमोठे उद्योग व्यवसाय, इरशाळवाडीसारख्याच इतर वाडय़ा- वस्त्यांचे पुनर्वसन, महागाई, बेरोजगारी  असे अनेक प्रश्न प्रलंबित असताना जनतेच्या कोणत्या भल्यासाठी  ही गरळ ओकली जाते आहे? राष्ट्रपित्याच्या अवमानाबद्दल सरकारने तात्काळ दखल घेऊन अटक केलीच पाहिजे. तसेच या माहितीचा त्यांचा स्रोत काय हेही शोधले पाहिजे. सामर्थ्यवान इंग्रजांनी ताब्यात घेतलेल्या भारतास अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवून देण्यात मोलाचा वाटा असलेल्या महात्मा गांधींच्या पालकांसंबंधी बोलण्याची या माणसाला लाज वाटायला हवी. त्यांचा निषेध करावा तेवढा कमीच.

  • दीपक सांगळे, शिवडी (मुंबई) 

कोणीही यावे, राष्ट्रपित्याविषयी काहीही बोलावे?

‘महात्मा गांधी यांच्याबाबतच्या संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावरून वाद’ ही लोकसत्ता मधील बातमी(२९ जुलै) वाचली. भारताच्या स्वातंत्र्याच्या वाटचालीत गांधीजींची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे मात्र दरवेळी कोणीतरी येतो आणि त्यांनी त्यावेळी घेतलेल्या निर्णयाला विरोध करून ऊठसूट टीका करीत असतो. गांधी विचार रुचत नसल्याकारणाने अधून मधून अशी बालिशपणाची वक्तव्ये केली जातात. टीका करीत असताना तारतम्य बाळगायला हवे. ज्या व्यक्तीवर टीका करता त्यांच्या इतके कर्तृत्व तर मुळात आपले नाहीच मग स्वातंत्र्याच्या नावाखाली टीका करण्याचा अधिकार तुम्हाला दिला कोणी? राष्ट्रपित्याचा आदर करता येत नसेल तर किमान अनादर तरी करू नका.

  • श्रीकांत शंकरराव इंगळे, पुणे</li>

पुढल्या शब्दच्छलासाठी निमंत्रण देऊ नये

भाजप म्हणजे भ्रष्ट जनता पक्ष हे उद्धव ठाकरे यांचे विधान फक्त नवीन निरर्थक शाब्दिक वादाला निमंत्रण ठरेल आणि वाचिवीरांना चांगलेच मोकळे रान मिळेल. त्याने काही साध्य होणार नाही. ‘फोले पाखडिता तुम्ही’ याचे हे उदाहरण आहे. सत्ता हातात असलेल्यांना हा परवडणारा खेळ आहे. सत्ता  हातातून गेलेल्यांच्या बाबतीत तो वैफल्याचा द्योतक मानला जाईल! भारतीय हे जनता आणि पक्ष या दोघांचे विशेषण आहे- म्हणून ‘भ्रष्ट ’हे जनतेला लावून ‘हे जनतेला भ्रष्ट म्हणत आहेत !!.. हा जनतेचा अपमान!!!’  असेही म्हटले जाईल. ‘बॅटल ऑफ विट्स नेव्हर पेज् ’हे ध्यानात घ्यावे!

  • गजानन गुर्जरपाध्ये, दहिसर पश्चिम (मुंबई)

मुलांचे मोबाइल लाड थांबवा

मोबाइलचे दुष्परिणाम मोजण्याची वेळ ‘युनेस्को’ वर आली, कारण आपल्या सर्वासाठी तेच ‘सोनार’ आहेत ज्यांनी कान टोचल्यामुळे  शिक्षण क्षेत्रातील वाढलेला मोबाइलचा वापर कमी केला जाण्याची शक्यता तरी आहे. या विषयीच्या  ‘डिजिटल उपवास धरावा’ (२९  जुलै) या संपादकीयातील, मोबाइलमुळे अधिकाधिक वैयक्तिक होत चाललो आहोत, हे निरीक्षण अगदी पटले. आपले सामाजिक भान संपत चालले आहे. आपली येणारी पिढी आपल्याच पावलावर पाऊल टाकत मोठी होत आहे.  आजकालचे पालक मुले मोठी होत असतानाच आमची मुले मोबाइल हातात नाही दिला तर जेवत नाहीत म्हणून बालपणापासूनच मोबाइलचे ‘संस्कार’(!) करीत आहेत. आधुनिक होताना गरजेचे नाही की डिजिटालायझेशनचे गुलाम झाले पाहिजे.

  • नीता शेरे, दहिसर पूर्व (मुंबई)

हीच बाब ‘वर्क फ्रॉम होम’लाही लागू

‘डिजिटल उपवास धरावा’ हे संपादकीय (२९  जुलै) वाचले.  ‘विद्यार्थी आणि शिक्षक यांनी एकमेकांसमोर यावे’ याबाबत मी पूर्णपणे सहमत आहे.  वर्षभरापूर्वी परदेशी मुलीकडे असतांना आमच्या नातवाचे ऑनलाइन शालेय शिक्षण बघितले, अनुभवले आणि प्रकर्षांने वाटू लागले की विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांनी समोरासमोर असण्याची खरोखरीच गरज आहे.  कोविडमुळे असे शिक्षण घ्यावे लागणे अपरिहार्य होते, पण ही पद्धती कायमस्वरूपी असू नये.

आपला पाल्य जेव्हा प्रत्यक्ष शाळेत जातो, तेव्हा फक्त शिक्षण हाच मुद्दा नसतो.  इतर मुलांबरोबर वावरणे, त्यांच्याशी संभाषण करणे, काही ठिकाणी तडजोडी स्वीकारणे, अभ्यासात इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत आपण कुठे आहोत ते समजून घेणे, शिक्षक शिकवतांना, फळय़ावर काही लिहिताना लक्ष तेथे केंद्रित करणे, जेवणाच्या सुट्टीत आपल्या सवंगडय़ांसोबत डबा संपवणे, एकमेकांचे पदार्थ चाखून बघणे, वेळप्रसंगी शिक्षकांचे ओरडणे वा शिक्षा करणे, एवढेच नव्हे तर शालेय सहल, शाळेतील वाचनालय, प्रत्यक्ष करावे लागणारे काही प्रोजेक्ट्स, अशा अनेक गोष्टी ऑनलाईन पद्धतीत कशा मिळतील?  प्रत्यक्ष शिक्षण पद्धतीत शिक्षकांनाही विद्यार्थी नीट जोखता येऊ शकतात, त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव दिसतात, कोणाची वागणूक कशी आहे ते कळते.

याच जोडीला ‘वर्क फ्रॉम होम’ या संकल्पनेचाही उदय झाला.  तिचे सुरुवातीला खूप स्वागत झाले.  यायचा जायचा वेळ वाचला, घरचे जेवण मिळू लागले, इथपर्यंत ठीक. पण नंतर नंतर कंटाळा येऊ लागल्याचे बऱ्याच जणांनी मला सांगितले.  प्रत्यक्ष ऑफिसमध्ये जाऊन काम करण्यातली मजा, आपले सहकारी, हे अनुभवायला मिळत नाही.  शिवाय बॉस केव्हाही (नेमके आपण जेवत असताना) फोनवरून ऑर्डरी सोडतो त्यामुळे कौटुंबिक आयुष्यही राहिले नाही. मथितार्थ काय तर डिजिटल तंत्रज्ञान कितीही चांगले आणि उपयुक्त असले, तरी आपण त्याच्यावर स्वार व्हावे, त्याला आपल्या मानगुटीवर बसू देऊ नये.

  • अभय विष्णु दातार, ऑपेरा  हाउस (मुंबई)

उशिरा का होईना, संवेदना जागृत..

‘तपास सीबीआयकडे’ ही मणिपूरमधील एका अत्याचार  प्रकरणासंदर्भातील बातमी वाचली. महिलांविषयी आपण किती संवेदनशील आहोत आणि महिलांवर अत्याचार करणाऱ्यांसाठी आपणच कर्दनकाळ बनू असा अट्टहास धरून ‘बहुत हुआ नारी पर वार, अबकी बार मोदी सरकार’ चा नारा देत २०१४ साली मोदी सरकार सत्तेवर आले. पण एका रेल्वे दुर्घटनेच्या वेळेस सदर ठिकाणी तात्काळ पोहोचणारे आपले पंतप्रधान मणिपूर विषयावर बोलण्यासाठी ७७ दिवस लावतात आणि तिथे जाण्याचा तर अद्याप प्रश्नच नाही. रेल्वे दुर्घटना झाली त्या राज्यात डबल इंजिन सरकार नव्हते  म्हणून आपल्या राजकीय पोळय़ा व्यवस्थित भाजता येण्याची ती सुवर्णसंधी होती आणि डबल इंजिन सरकारच्या ठिकाणी आपले कधी काही चुकते हेच मान्य नसलेले अहमन्य नेतृत्व असेल तर अशा अत्यंत घृणास्पद प्रसंगातही राजकीय ‘कथानक’ (नॅरेटिव्ह) कसे बनवावे हे सुचते. व्यथा समजण्यापेक्षा त्यातून राजकीय लाभ-हानीची गणिते मांडली जाताहेत. प्रचार आणि कारभार यातला फरक सुटला की जे होते ते मणिपूरच्या निमित्ताने दिसू लागले आहे. स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय दबावापोटी तपास सीबीआयकडे देऊन उशिरा का होईना संवेदना जागृत आहे हे दाखवण्याचा प्रयत्न विद्यमान सरकारकडून केला जात आहे.

  • परेश प्रमोद बंग, मूर्तिजापूर (अकोला)

‘एकमुखी पाठिंब्या’तून एक तरी उणे..

‘इंडिया’तील तमाम २६-२७ जे काही विरोधी पक्ष असतील ते कितीही कोरसमध्ये मोदींविरुद्ध आवाज उठवोत, आजपर्यंत असे चित्र होते की स्वपक्षीयांचा (वरकरणी) तरी मोदींना एकमुखी पाठिंबा आहे आणि त्यांच्या सगळय़ाच निर्णयाशी किंवा भूमिकेशी काहीजण (मनातल्या मनात किंवा खासगीरीत्या) सहमत नसले- जे अगदीच काही अशक्य नाही- तरी  जरब एवढी असावी की, ती असहमती व्यक्त करण्याची कुणाचीच हिंमत झाली नसणार!

पण अखेर एका तरी स्वपक्षीयाच्या सहनशीलतेचा अंत झाला आणि त्याने  व्यक्त होण्याची हिंमत केली.  भाजपचे बिहारमधील प्रवक्ते विनोद शर्मा यांनी मणिपूरमधील घटनेच्या निषेधार्थ पक्षाचा राजीनामा दिला. नुसता राजीनामा देऊनच ते थांबले नाहीत तर ‘मोदी अजूनही झोपेतच आहेत.. बिरेन सिंहांना हटवण्याची मोदींमध्ये हिंमत नाही’ अशी त्यांची संतप्त प्रतिक्रिया असल्याचे याविषयीच्या वृत्तात पुढे म्हटले आहे. हे गेल्या नऊ वर्षांत अभूतपूर्व आहे. आता प्रश्न असा आहे की, मोदींना आव्हान नव्हे पण विसंगत सूर तरी पक्षात दिसण्याची  शक्यता त्या पक्षात कितपत आहे?

  • श्रीकृष्ण साठे, नाशिक