प्रत्येक दरवाढीवर सवंग लोकप्रियतेसाठी राजकीय टीका होत असताना ‘स्वागतार्ह दरवाढ’ (११ जुलै) या अग्रलेखाने वस्तुस्थितीची माहिती देऊन दरवाढीचे समर्थन केले आहे, ते अगदी योग्य आहे. त्यासाठी सर्व वीज कर्मचारी ‘लोकसत्ता’चे मनापासून आभार मानतील. शेतीपंपांची थकबाकी वाढीसाठी तत्कालीन ऊर्जामंत्री जबाबदार असल्याचे कारण योग्य आहे. नंतर आलेल्या सरकारला याबाबत ठोस भूमिका घेणे अवघड होते. आतासुद्धा त्यासाठी कोणी ठाम भूमिका घेईल अशी परिस्थिती नाही. परंतु यात राजकीय हस्तक्षेप एवढेच एक कारण नसून महावितरणचे कृषिपंपांबाबतचे धोरणही चुकीचे आहे. कृषिपंपांना सवलतीच्या दराने वीजपुरवठा होत असला तरी तो कायदेशीर बाबी न पाळता केला जातो. इतर सर्व ग्राहकांना विजेच्या वापरानुसार बिल आकारले जाते, मात्र शेतीपंपांना सर्रास अंदाजे बिल आकारले जाते. वीज कायदा-२००३ नुसार प्रत्येक ग्राहकाला वीज ही मोजून दिली पाहिजे आणि वापरलेल्या विजेनुसार वीज बिल आकारणे बंधनकारक आहे. असे असताना कंपनी शेतीपंपांना मात्र मीटर बसविण्याच्या बाबतीत नेहमी टाळाटाळ करत असते. ही गोष्ट वीज दरवाढीच्या, विद्युत नियामक आयोगासमोर झालेल्या अनेक सुनावण्यांमध्ये उघड झालेली आहे. शेतकरी वर्गाकडून विरोधाचे कारण सांगितले जाते, तथापि हे खोटे आहे. कंपनीने यासाठी कधीही गांभीर्याने प्रयत्न केला नाही आणि विजेचा वापर कमी व्हावा यासाठी बेकायदा भारनियमन केले जाते. वास्तविक अशा पद्धतीने भारनियमन करण्यासाठी कायद्यात तरतूदच नाही किंवा अशी परवानगी देण्याचा कोणाला अधिकारही नाही. अग्रलेखात म्हटल्याप्रमाणे कोणत्याही शेतकऱ्याची मोफत विजेची मागणी नाही, पण ते कारण पुढे करून राजकारण केले जाते. शेतीपंपांना मीटर बसवून २४ तास नाही, तर किमान दिवसा अखंडित वीजपुरवठा केल्यास बिलवसुलीला काहीच अडचण येणार नाही, अशी मला माझ्या अनुभवावरून खात्री आहे. पूर्वी ६० टक्क्यांपर्यंत होणारी वसुली माफीची योजना जाहीर करूनही वाढत नाही. मिळेल तशी वीज वापरून व बिल न भरता शेतकरी वेगवेगळे मार्ग अवलंबून शेती पिकवतो व देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावतो. माझी महावितरणला विनंती आहे की, राज्याच्या नाशिकसारख्या भागात प्रायोगिक तत्त्वावर अशी योजना राबवावी, त्यासाठी कोणत्याही प्रकारचा राजकीय विरोध होत नाही हे याआधी सिद्ध झालेले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा