प्रताप सरनाईक यांच्याविरुद्धच्या ‘टॉप्स समूह’च्या घोटाळय़ात गुन्हा घडलेलाच नाही असा ‘ईडी’चा अहवाल महानगर दंडाधिकाऱ्यांनी स्वीकारला. शिवाय, तक्रारदारानेही गैरसमजातून तक्रार नोंदवल्याचे म्हटले आणि सरनाईक यांनी सहीसलामत सुटण्याचा प्रतापच केला. यावर सोमय्या यांना किती टक्के मिळाले याची ट्विटरवरून विचारणा खरे तर मुंबई भाजपचे नूतन अध्यक्ष आशीष शेलार यांनी करायला हवी होती. चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण यांच्या आत्महत्येवरून संजय राठोड यांचा राजीनामा घेऊन मैदानच मारले होते. आता तेच राठोड नव्या मंत्रिमंडळात पहिल्याच फटक्यात कॅबिनेट मंत्री झाले. यात चित्रा वाघ यांना कोणत्या दराने किती टक्के मिळाले हे शेलार सांगतील का? ही सारी राजकीय मंडळी आहेत, पण न्यायालयाचेही कौतुक वाटते. एखाद्याने जरा चुकीची जनहित याचिका केली तरी त्याला लाखालाखांचा दंड ठोठावला जातो. प्रताप सरनाईक प्रकरणात तक्रारदार म्हणतो गैरसमजातून तक्रार नोंदवली. त्यावर न्यायालयाचा वेळ, ‘ईडी’सारख्या केंद्रीय यंत्रणेच्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचे श्रम फुकट गेल्याबद्दल न्यायालयाला काहीच कसे वाटत नाही? त्यासाठी तक्रारदाराला एका पैशाचाही दंड नाही? खरे म्हणजे आता प्रताप सरनाईक यांनी गुन्हा घडलाच नसताना फुकटची बदनामी केली म्हणून सोमय्यांवर १०० कोटींचा दावा लावायला हवा.
– अॅड. एम. आर. सबनीस, अंधेरी (पूर्व) मुंबई
देवच सांगतात तर माणसाने काय करावे?
गोव्यातील पक्षांतराबद्दल आपली भूमिका स्पष्ट करताना दिगंबर कामत म्हणाले की, त्यांनी मंदिरात जाऊन देवतांना विचारले (लोकसत्ता बातमी) की भाजपमध्ये जाण्याचा विचार त्यांच्या मनात येत आहे, त्यांनी काय करावे? यावर देव म्हणाले की, तुला तुझ्यासाठी जे योग्य वाटते ते कर. आता देवच एखाद्या गोष्टीला परवानगी देतो, तेव्हा काळजी करण्याची काय गरज आहे आणि यात कोणत्याही नैतिकतेचा, पक्षांतरविरोधी कायद्याचा किंवा जनतेबद्दल उत्तरदायित्वाचा मुद्दा कुठे आहे? आता दिगंबर कामत यांच्याकडून धडा घेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हेही सांगू शकतात की ते चर्चमध्ये गेले होते आणि तिथे त्यांनी देवाला सांगितले की, त्यांचा युक्रेनवर हल्ला करण्याचा विचार आहे, काय करावे? यावर येशू ख्रिस्त म्हणाले की, हे पूर्णपणे करा, काळजी करू नका. आता एवढय़ा दैवी संमतीने हल्ला झाला असेल, तर त्याला चुकीचे म्हणण्याचा संयुक्त राष्ट्र किंवा पाश्चात्त्य जगाला काय अधिकार आहे? कोणत्याही धर्मावरील श्रद्धा ही सामान्यत: कायदा आणि संविधानाच्या वर मानली जाते. आता दिगंबर कामत पाच वर्षे काँग्रेसचे मुख्यमंत्री होते, ते काँग्रेसच्या तिकिटावर जिंकले, हे देवाला माहीत नाही का? पण यानंतरही देव परवानगी देत असेल तर त्याला कोणीही पक्षांतर म्हणू नये. उलट याकरिता खुद्द देवाचीच मान्यता होती, असे म्हणायला हवे. देवाच्या इच्छेपुढे कोणतीही राजकीय नैतिकता असू शकत नाही, पक्षांतरविरोधी कायदा असू शकत नाही, कारण लोकशाही हे केवळ ताजे पीक आहे, देव अनंतकाळापासून आहे आणि तोच दिगंबर कामत यांना एखाद्या विशिष्ट रंगाचा झगा घालायला सांगत असेल, तर यावर टीका करण्याचा कोणालाच अधिकार नाही. काय आणले होते, काय घेऊन जाणार हे गीता वचन आठवून काँग्रेसने शांत बसावे.
– तुषार अशोक रहाटगावकर, मस्कत, ओमान
गृहपाठ हवाच, पण त्याचे ओझे होऊ नये..
‘चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची गृहपाठातून सुटका’, हे वृत्त वाचले. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या मेंदूला नेहमी अतिरिक्त बौद्धिक खाद्य हवे असते. वर्गात शिकवलेल्या सर्व विषयांचा अभ्यास बराच काळ लक्षात राहावा आणि त्याचा अभ्यास व्हावा यासाठी गृहपाठ असतो. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना देण्यासाठी विद्यार्थ्यांना दररोज नवीन काहीतरी शिकण्यासाठी आणि शिकवलेल्या गोष्टींचा सराव करण्यासाठी गृहपाठ दिला जातो. पूर्णपणे शिक्षकांवर अवलंबून असलेल्या विद्यार्थ्यांचा हळूहळू अध्ययनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण विद्यार्थी घडणे अभिप्रेत आहे. या दीर्घ व खडतर प्रवासात गृहपाठ महत्त्वाची भूमिका करतो. मग प्रश्न गृहपाठ हवा की नको असा न राहता तो केव्हा व कसा द्यावा एवढाच राहतो. गृहपाठ विद्यार्थ्यांची विचारसरणी, स्मरणशक्ती, कौशल्ये सुधारण्यासाठी मदत करत असतो. यासाठी शिक्षकांनीही विद्यार्थ्यांचे वय लक्षात घेऊन, त्यासाठी लागणारा वेळ, तसेच तो गृहपाठ त्या विद्यार्थ्यांला ओझे वाटणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे.
– प्रा. जयवंत पाटील, भांडुप (पूर्व), मुंबई
गृहपाठ म्हणजे आकलनाचे मोजमाप!
शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आगामी शैक्षणिक वर्षांपासून पहिली ते चौथी या वर्गाना गृहपाठ देऊ नये असा विचार सुरू असल्याचे सांगितले. शहरी भागात ही संकल्पना योग्य आहे पण खेडय़ापाडय़ात व दुर्गम भागात जेथे पालक निरक्षर असतात त्या ठिकाणी गृहपाठ दिला नाही, तर काही मुले अभ्यासाकडे ढुंकूनही पाहणार नाहीत. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम योग्य रीतीने समजेल अशा पद्धतीने शिकविण्याचा शिक्षकांचा प्रयत्न असतो. पण मुलांना त्याचे कितपत आकलन होते, याचे काही मोजमाप नाही. त्यामुळे घरी त्याच विषयाचा अभ्यास गृहपाठ म्हणून दिला जात असेल तर त्यानिमित्ताने पाल्याची उजळणी होईल. तेव्हा गृहपाठ बंद होऊ नये.
-अजित परमानंद शेटय़े, डोंबिवली
मराठी तरुणांसाठी नोकऱ्या नसतातच..
दीड ते दोन लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण करणारा ‘फॉक्सकॉन’ प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यामुळे मराठी तरुण या नोकऱ्यांसाठी मुकणार आहे असे म्हटले जात आहे, पण त्यात किती तथ्य आहे? कारण आज महाराष्ट्रात ज्या आस्थापना आणि कंपन्या आहेत, त्यात किती मराठी तरुण नोकरी करत आहेत? अगदी ‘महाराष्ट्र बँके’सारख्या बँकेतसुद्धा मराठी कर्मचारी दुर्मीळ आहेत! महाराष्ट्रातील रेल्वेचे प्रकल्प घ्या, शिपिंग इंडस्ट्री घ्या, रस्ते बांधणी प्रकल्प घ्या, टोल नाके घ्या, त्यात किती मराठी लोक काम करत आहेत? त्यामुळे ‘फॉक्सकॉन’ प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे मराठी तरुण नोकरीसाठी मुकणार आहेत हे जे गळे काढले जात आहेत ते निव्वळ मगरीचे अश्रू आहेत असे म्हणावे लागेल.
– अनिरुद्ध गणेश बर्वे, कल्याण पश्चिम
आधी होते दोषी, मग झाले निर्दोष?
‘प्रताप सरनाईक यांची ‘ईडी’ चौकशी बंद?’ हे वृत्त वाचले. किरीट सोमय्या यांनी माध्यमांतून या संदर्भात केवढी वातावरणनिर्मिती केली होती ते आठवले. सरनाईक नक्की कशाला घाबरून नव्या कळपात गेले असावेत या विषयावर चर्चा होईलही, कदाचित. ती व्हावी व सत्य बाहेर यावेच. परंतु मूळ प्रश्न अनुत्तरित राहतो तो, ईओडब्लूचा अहवाल येण्याआधीच सोमय्या कशाच्या आधारावर सरनाईक दोषी असल्याचे सांगत होते? आणि अंमलबजावणी संचालनालय हाती असलेल्या माहितीची पुरेशी पडताळणी न करताच एखाद्याला अटक आदी गोष्टींची भीती कसे काय घालू शकते? सोमय्या राजकारणी असल्याने काही काळ ते मौन धारण करतील, अथवा माध्यमांना दूर ठेवू शकतील. परंतु सरकारी यंत्रणांची विश्वासार्हता पणाला लागते त्याचे काय?
एखाद्या नेत्याला भ्रष्टाचारी ठरविल्यास ‘राजकीयदृष्टय़ा ब्लॅकमेल’ करण्यास सोपे जात असावे. गेल्या काही वर्षांतील ‘आरोपसत्र’ हेच दर्शवते. ही एकप्रकारे जनतेची, यंत्रणांची राजकीय फायद्यासाठी दिशाभूल तर नाही? आज राजकीय व्यवस्थेपर्यंत मर्यादित असलेला प्रयोग पुढील काळात सामान्य नागरिकांवर कशावरून केला जाणार नाही? हे घातक ठरू शकते. या मानसिकतेला वेळीच पायबंद घालणे गरजेचे आहे.
शैलेश न. पुरोहित, मुलुंड (मुंबई)
याचाच अर्थ विरोधकांच्या आरोपात तथ्य..
‘प्रताप सरनाईक यांची ‘ईडी’ चौकशी बंद?’ ही बातमी वाचली. म्हणजे केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होत आहे असा विरोधी पक्ष जो आरोप करतात त्यात नक्कीच तथ्य आहे. आता किरीट सोमय्या यांना तोंड लपवण्यास जागा मिळणार नाही. भविष्यात शिंदे गटातील गैरव्यवहाराचे आरोप असणाऱ्या इतर काहींच्या चौकश्या बंद होतील याची खात्री बाळगायला हरकत नसावी. भाजप आपली विश्वासार्हता गमावत आहे असे खेदाने म्हणावेसे वाटते!
– डॉ. संजय पालीमकर, दहिसर पूर्व, मुंबई
रुद्रवर्षां नव्हे, ‘रौद्र’वर्षां!
‘मुंबई- ठाण्यात रुद्रवर्षां’ या बातमीचे (लोकसत्ता- १७ सप्टेंबर) शीर्षक खटकणारे आहे. रुद्र हा शब्द चुकीचा असून तिथे रौद्र हा शब्द असायला हवा होता. निसर्गाचे रौद्ररूप म्हणजे भयानक असा अर्थ आहे. रुद्र नव्हे.
– मकरंद देशपांडे, डोंबिवली
हे ज्योतिषाइतकेच मोघम भाकीत..
‘येत्या दोन वर्षांत महाराष्ट्र गुजरातच्या पुढे जाईल’ ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही विरोधकांच्या टीकेला त्वरित उत्तर देण्यातले त्यांचे कौशल्य दर्शवते एवढे आणि एवढेच त्याचे महत्त्व. गेलेला किंवा सध्याचा काळ जरा कठीण असला तरी लवकरच परिस्थिती बदलेल आणि येत्या काही काळात आपली प्रगती होईल असे ज्योतिषी सांगतात, तसाच हा प्रकार आहे, हे सांगायला राजकीय विश्लेषकांची गरज नाही. सध्या दुसरे काही निदर्शनास येईपर्यंत जे प्रकल्प गुजरातला गेले त्याला नेमके कोण जबाबदार याचा धुरळा उडत राहील.
– गजानन गुर्जरपाध्ये, दहिसर पश्चिम (मुंबई)